समर्थांचे अधिष्ठान

विवेक मराठी    15-Feb-2023
Total Views |
@अजय धुमाळ
 
vivek 
 
 
अजय धुमाळ
 
शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे।
वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे।।
कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा।
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।
 
आज माघ वद्य नवमी. समर्थ रामदास स्वामी समाधिस्थ झाले, ती पावन तिथी. मध्ययुगीन शिवकाळात समाजाला सामर्थ्य आणि संघटन यांचे महत्त्व विशद करून शिवरायांच्या स्वराज्यकार्यात सामान्यांना सहभागी होण्याची प्रेरणा देणारे समर्थ रामदास स्वामी यांचे हे लेखरूपी स्मरण.
 
 
सामर्थ्य आहे चळवळीचे| जो जो करील तयांचे||
परंतु तेथे भगवंताचे| अधिष्ठान पाहिजे||
 
 
भगवंताच्या अधिष्ठानाचा प्रसार करून समाजाला आध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या समर्थ रामदास स्वामींनी माघ वद्य नवमी, शके १६०३ रोजी सज्जनगडावर देह ठेवला. प्रपंच असो किंवा साधना, कोणत्याही कार्यात देवाचे अधिष्ठान आवश्यक आहे आणि त्यामध्ये सावधपणे व आग्रहाने सातत्य हवे, हीच समर्थांची शिकवण. समर्थांना अभिप्रेत असणाऱ्या या अधिष्ठानाचा अगदी सोपा अर्थ विचारात घ्यायचा झाला, तर अधिष्ठान म्हणजे 'स्मरण'. दैनंदिन जीवनातील धावपळ, ताण-तणाव, स्पर्धा, उद्विग्नता, तळमळ, चिडचिड, संताप या सर्व मानवी भावना देवाच्या स्मरणाने सुखकर होतात, नकारात्मकता दूर होऊन निर्भेळ आनंद अनुभवण्यासाठी हे अधिष्ठान/स्मरण अत्यावश्यक आहे. समर्थ दासबोधात म्हणतात,
 
स्मरण देवाचे करावे| अखंड नाम जपत जावें||
 
नामस्मरणे पावावेंl समाधान||
 
दासनवमीच्या पावन दिनी समर्थांच्या या श्लोकाचे चिंतन करून प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधून आपण आपले जीवन आनंदमय करू शकतो.
 
जालना जिल्ह्यातील जांब या गावी निस्सीम सूर्योपासक सूर्याजीपंत ठोसर व राणूबाई या दांपत्यापोटी श्रीराम नवमीच्या सुमुहूर्तावर श्रीसमर्थांचा जन्म झाला. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले समर्थ हे बालवयापासून श्रीरामाचे निष्ठावान उपासक. त्यांना बालवयातच विश्वाची चिंता लागली होती. कुटुंबीयांच्या आग्रहाखातर ते विवाहास तयार झाले, मात्र बोहल्यावर उभे असताना 'सावधान' हे शब्द ऐकताच त्यांनी भर मांडवातून पळ काढला. एका वस्त्रानिशी मंडपातून पळून गेलेले समर्थ पुढे पंचवटीस गेले, त्यांनी तिथे गायत्री पुरश्चरण केले. टाकळीस जाऊन श्रीरामनामाचा तेरा कोटी जप केला. या कालावधीमध्ये त्यांच्या बलोपासनेच्या कार्यात कधीही खंड पडला नाही. ते रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. आपल्या तपश्चर्येनंतर त्यांनी आपल्या धर्मकार्याला मूर्त रूप देण्यास प्रारंभ केला. संपूर्ण देशभर जवळजवळ १२ वर्षे भ्रमंती केली. या भारतभ्रमणात त्यांना हिमालयात प्रभू श्रीरामांचे दर्शन झाले. त्यानंतर भारतातील सर्व परिस्थिती पाहिली. यावनी सत्तेच्या उन्मादाला पायबंद घालण्यासाठी गावोगावी ११ मारुती मंदिरांची स्थापना केली. १२ वर्षांनंतर समर्थ जेव्हा महाराष्ट्रात परत आले, तेव्हा स्वत्व हरवून बसलेल्या हिंदू समाजाला त्याच्या स्वत्वाची जाणीव करून देऊन सामर्थ्यसंपन्न बनवण्याला प्राथमिकता दिली. श्रीसमर्थ म्हणतात, 'आधी प्रपंच करावा नेटकाl मग परमार्थ विवेकll' प्रपंच म्हणजेच स्वराज्यस्थापनेचे कार्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याने समर्थ रामदास स्वामी खूपच भारावून गेले होते. स्वराज्यस्थापनेच्या कार्यात समर्थांनी समाजप्रबोधनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले.
 
समर्थांनी जवळजवळ ११०० मठ स्थापन करून अध्यात्माबरोबर बलोपासनेचाही पुरस्कार केला, 'सामर्थ्य आहे चळवळीचे' ते हेच होय. मठांच्या माध्यमातून लोकसंग्रह आणि लोककल्याण हेच जीवनकार्य मानून श्रीरामाच्या त्रयोदशाक्षरी नामाचा प्रसार करून धर्माला सैद्धान्तिक विचारसरणीची जोड दिली. कविहृदयाच्या श्रीसमर्थांनी आपल्या अमृतवाणीने विपुल वाङ्मयनिर्मिती केली. सार्थ दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, विविध आरत्या, विविध उपदेश ही सर्व समर्थांची लिखित ग्रंथसंपदा व त्यातील तत्त्वे आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहेत. समर्थांनी जवळजवळ ११०० मठ स्थापन करून अध्यात्माबरोबर बलोपासनेचाही पुरस्कार केला, 'सामर्थ्य आहे चळवळीचे' ते हेच होय. मठांच्या माध्यमातून लोकसंग्रह आणि लोककल्याण हेच जीवनकार्य मानून श्रीरामाच्या त्रयोदशाक्षरी नामाचा प्रसार करून धर्माला सैद्धान्तिक विचारसरणीची जोड दिली. पण याच वेळी ते 'अखंड सावधान असावे' ही सूचनाही आठवणीने देतात आणि 'बहुत लोक मिळवावे। एक विचारे भरावे। कष्ट करोन घसरावें। म्लेंच्छांवरी।।' हासुद्धा उपदेश देतात. समर्थांनी श्रीक्षेत्र चाफळ येथे श्रीराम मंदिराची स्थापना केली. श्रीरामाची उपासना करणाऱ्या समर्थ संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. भावी नामसाधकांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी समर्थांनी श्रीमत् दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. प्रपंच, परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण देत प्रबोधन व संघटन केले. समर्थ रामदास स्वामी हे राजकारणावर आणि धर्मकारणावर प्रखरपणे भाष्य करणारे एकमेव संत होते, हेच दासबोधावरून लक्षात येते. माघ शुद्ध नवमी या दिवशी दासबोध ग्रंथाची रचना पूर्ण झाली. रायगड जिल्ह्यातील शिवथरघळ या निबिड अरण्यात समर्थांनी आपले शिष्योत्तम समर्थ कल्याण स्वामी यांच्यासह दासबोधाचे लिखाण पूर्ण केले. १७व्या शतकातील हा श्रीमत् दासबोधाचे तत्त्वज्ञान आजही यथार्थ वाटते. २० दशक आणि १० समासातील हा ग्रंथराज प्रापंचिक, साधक, विरक्त योगी, जनसामान्य, अगदी बालांपासून ते वयोवृद्ध सर्वांना मार्गदर्शनपर आहे. या ग्रंथाला गुरु-शिष्य यांच्या संवादाचे स्वरूप आहे. दासबोधाच्या प्रारंभी या ग्रंथाची रचना, त्याची कारणे व त्याची शिकवण कळून येते. त्यावरून लक्षात येते की, समर्थांनी निश्चयपूर्वक या ग्रंथाची रचना केली आहे. मनाच्या श्लोकातून मनावर ताबा मिळवून समाधानप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे.
 
 
vivek
 
समर्थ रामदास स्वामींनी जीवनकार्याचा उत्तरार्ध काळ सातारा जिल्ह्यातील परळीच्या किल्ल्यावर व्यतीत केला. गडावरील श्रीराम पंचायतनासमोर बसून समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या जीवनातील शेवटचे पाच दिवस निर्जल उपवास केला. माघ वद्य नवमीला श्रीरामनामाचा जप करत समर्थ ब्रह्मलीन झाले. निर्वाण वेळी त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले की,
 
माझी काया आणि वाणी | गेली म्हणाल अंत:करणी||
 
परी मी आहे जगज्जीवनी| निरंतर||
 
आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वत:सिद्धl
 
असता न करावा खेद| भक्तजनी||
 
 
आजही समर्थ साधकांची यावर नितांत श्रद्धा आहे. समर्थांचा समाधी दिवस 'दासनवमी' म्हणून श्रद्धापूर्वक साजरा होतो.
 
जय जय रघुवीर समर्थ|