मराठी भाषेच्या जागराकरिता मराठी विकिपीडिया

विवेक मराठी    23-Feb-2023
Total Views |
@ज्ञानदा गद्रे-फडके
 
Centre for internet and society - Access to knowledgeमराठी भाषेचे भवितव्य धोक्यात, मराठी भाषकांना कोणी विचारतच नाही अशी नकारात्मक ओरड करण्यापेक्षा आपल्या भाषेसाठी आपण काय करू शकतो याचा शोध घेण्यासाठी मराठी विकिपीडियाचे काम कसे चालते याचा परिचय करुन देणारा स्वानुभवाधारित लेख ज्ञानदा गद्रे-फडके यांनी लिहिला आहे. 27 फेब्रुवारी रोजी साजर्‍या होणार्‍या मराठी भाषादिनाच्या दिवशी समाजमाध्यमावर मराठी भाषेच्या थोरवीच्या पोस्ट केवळ इकडून तिकडे ढकलण्याऐवजी आपण मराठी विकिपीडियावर लेखक म्हणून सहभागी झालो आणि आपापल्या क्षेत्रातल्या ज्ञानाची माहिती मराठीतून लिहिली, तर नक्कीच फायदा होईल. केवळ एक मोबाइल फोन हातात असेल, तरी हा उपक्रम आपण नक्कीच सुरू करू शकतो आणि आपल्या भाषेवरचं प्रेम आपण अर्थपूर्ण पद्धतीने व्यक्त करू शकतो.
 
गुगलवर किंवा कोणत्याही सर्च इंजीनवर एखादा विषय शोधला, तर शोध निकालात सामान्यपणे पहिली लिंक येते ती विकिपीडियाची, हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. हाच शब्द आपण मराठी भाषेत टाइप करून शोधलेला असेल, तर पहिली लिंक मराठी विकिपीडियाची दिसते. त्यामुळे विकिपीडियावरील माहिती आपण नेहमीच वाचत असतो, तिचा उपयोग करून घेत असतो. मात्र विकिपीडियामधील ही माहिती लिहिते कोण? असा प्रश्न आपल्याला कधी पडला आहे का?
 
 
विकिपीडियामधली माहिती तुमच्या-आमच्यासारखे सामान्य लोकच लिहितात! मग या माहितीची शहानिशा कोण करते? तर इतर संपादक (विकिपीडियावर लेखन/संपादन करणार्‍यांना संपादक असे म्हटले जाते). अर्थातच ही माहिती कोणत्या स्वरूपात लिहायची, कोणत्या विषयावर लिहायची, त्यासाठी कोणते संदर्भ दिले जाणे आवश्यक आहे, याची नियमावली विकिपीडियावर आहे; पण मुळातच हा अनेक लोकांनी मजकुराचे योगदान देऊन तयार झालेला माहितीचा साठा असल्यामुळे, हे उघड आहे की एखाद्या भाषक विकिपीडियावर जितके जास्त लोक काम करतात, तितका त्या विकिपीडियावरील लेखांचा दर्जा चांगला असतो. आपण इंग्लिश आणि अन्य भाषांतील विकिपीडियावरील लेखांची तुलना केली, तर हे लगेचच आपल्या लक्षात येईल. इंग्लिशमधील लेख जास्त विस्तृत, अनेक चित्रे, आकृत्यांचा समावेश असलेले, अनेक संदर्भ अंतर्भूत केलेले असतात. इंग्लिश विकिपीडियावरील एखाद्या लेखातील मजकुरामुळे गदारोळ उडाल्याची बातमीसुद्धा आपण कधीतरी ऐकली असेल. चुकीचा/उत्पातकारक मजकूर लगेचच काढून टाकला जाणे, हेसुद्धा त्या विकिपीडियावर काम करत असलेल्या लोकांची संख्या मोठी असल्यामुळेच शक्य होते. आजच्या दिवशी इंग्लिश विकिपीडियावरील लेखांची संख्या 66,18,212 इतकी आहे, तर बोलणार्‍यांच्या संख्येनुसार जगातील 10व्या क्रमांकावर असलेल्या मराठी भाषेच्या विकिपीडियावर केवळ 90,064 इतके लेख आहेत.
 
 
विकिपीडियावर लेख लिहिण्यासाठी आपल्याला कोडिंगचे ज्ञान असणे आवश्यक नाही, त्याचा इंटरफेस वापरण्यासाठी सोपा आहे. सहजपणे सर्व इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स हाताळणार्‍या शाळकरी मुलांपासून ते सहजगत्या स्मार्ट फोन्स आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकणार्‍या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण थोड्या सरावाने सहज लेख लिहायला, छोटी छोटी संपादने (म्हणजे बदल किंवा दुरुस्त्या) करायला शिकू शकतात. लेख लिहिताना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी अनेक मदत लेख विकीवर आहेत, तसेच कोणत्याही इतर सदस्याला त्यांच्या पृष्ठावर जाऊन आपण आपल्या शंका विचारू शकतो.
 
 
 
मी 2017मध्ये मराठी विकिपीडियावर संपादक म्हणून काम करण्याची सुरुवात केली, ती कुतूहलातूनच. ‘कोणीही संपादन करू शकते’ हे वैशिष्ट्य असलेल्या या ‘मुक्त ज्ञानकोशात’ आपल्याला काही भर घालता येते का ते पाहावे, हाच हेतू होता. सुरुवातीला मी काही व्यक्तींची माहिती गोळा करून त्यांच्याबद्दलचे लेख लिहिले. नंतर माझ्या गावातील, म्हणजे इचलकरंजीमधील काही महत्त्वाच्या संस्थांबद्दल लेख लिहिले. हळूहळू आधीपासून असलेल्या काही लेखांमध्ये भर घालणे, छायाचित्रे जोडणे, इतर लेखांना दुवे जोडणे, शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करणे अशी संपादने करण्यास सुरुवात केली. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची चरित्रे, स्त्रियांचे योगदान आणि स्त्रियांच्या समस्या या विषयांवर सर्वभाषक विकिपीडियांमध्येच कमी लेख आहेत. त्यामुळे मी उल्लेखनीय स्त्रियांचे चरित्रलेख लिहिण्यावर भर दिला. विकिपीडियावरील लेखनासाठी एक महत्त्वाचा नियम असतो, तो म्हणजे प्रताधिकाराचे (कॉपीराइट) उल्लंघन केलेले चालत नाही, म्हणजेच कुठलाही मजकूर जसाच्या तसा कॉपी-पेस्ट करण्याची परवानगी नाही. असे केल्याचे आढळल्यास लेखाचा असा भाग लगेच काढून टाकला जातो. त्यामुळे प्रत्येक लेखासाठी त्या व्यक्तीबद्दल वाचणे, तिच्या मुलाखती ऐकणे, वर्तमानपत्रातील मुलाखती वाचणे, विविध संदर्भ शोधणे आणि या सर्व स्रोतांमधून माहिती गोळा करून मग लेख पूर्ण करणे, हा सगळा आनंददायक प्रकार असतो. एखाद्या विषयाबद्दल लेख लिहायचा असल्यास तो विषय समजून घेणे, पुस्तकांमधून संदर्भ शोधणे आणि मग लेख तयार करणे अशा क्रमाने जावे लागते. महाराष्ट्रात राहणार्‍या किंवा मराठी भाषक कर्तृत्ववान व्यक्तींबद्दल मराठी विकिपीडियावर सर्वांत विस्तृत, चांगल्या दर्जाचा लेख असणे अपेक्षित असते, पण तसे घडताना दिसत नाही. माझ्या सवडीनुसार मी अशा लेखांची भर घालण्याचा प्रयत्न केला. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू असताना, त्या स्पर्धांमधील भारतीय पदकविजेत्या खेळाडूंवर लेख लिहिले, त्यांच्याबद्दल लेख असतील तर त्यामध्ये भर घातली, बीबीसीने आयोजित केलेल्या भारतीय महिला खेळाडूंसंबंधी लेख लिहिण्याच्या कार्यशाळेच्या निमित्ताने असे लेख लिहिणार्‍यांना मार्गदर्शन करत आले. पर्यावरण हा आवडीचा विषय असल्यामुळे रामसर परिषद, भारतातील रामसर स्थळे, विविध अभयारण्ये यावरही लेख लिहिले.
 


Centre for internet and society - Access to knowledge 
 
2020मध्ये Centre for internet and society - Access to knowledge  या संस्थेने भारतातील विविध भाषक विकिपीडियन्स आणि विकिपीडिया कॉमन्स, विकिसोर्स, विकीडेटा, विकिबुक्स अशा विकिपीडियाच्या इतर प्रकल्पांमध्ये काम करणार्‍या व्यक्तींसाठी ‘ट्रेन द ट्रेनर’ ही कार्यशाळा आयोजित केली होती. मी तोपर्यंत केलेली विकिपीडियावरील 2500+ संपादने, प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये सहभाग, स्वत: घेतलेल्या ऑनलाइन कार्यशाळा इ.चा विचार होऊन मराठी विकिपीडियामधून या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी माझी निवड झाली. या TTTला संपूर्ण भारतातून विविध भाषांमधील विकिपीडियांवर आणि इतर विकीप्रकल्पांवर काम करणारे लोक आले होते. अगदी कॉलेजमध्ये शिकणार्‍या मुलामुलींपासून ते कॉलेजमध्ये प्राध्यापक, प्राचार्य म्हणून काम करणारे लोक असा मोठा वयोगट होता. या 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात विकिपीडियाशी संबंधित अनेक तांत्रिक आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा झाली. त्याच्या तपशिलात मी जात नाही, पण या देवाणघेवाणीतून मला भारतातील इतर भाषक विकिपीडियामध्ये काय काम चालते, ते कळले.
 
 
कर्नाटकात एका कॉलेजमध्ये विकीक्लब चालवला जातो. विकिपीडियावर काम केले की अंतर्गत परीक्षेचे 50 गुण मिळतात. या कॉलेजमधील दोन मुली या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी अनेक विकिपीडिया प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये प्रशिक्षक म्हणूनसुद्धा काम केले आहे.
 
 
गुंटूरच्या एका इंजीनिअरिंग कॉलेजमध्येसुद्धा विकीक्लब आहे. हे विद्यार्थी प्रामुख्याने विकीडेटा प्रकल्पात काम करतात. ते इतके चांगले काम करतात की भारतातील विकीडेटाच्या सर्व स्पर्धांमध्ये पहिल्या पाचात हे विद्यार्थी असतात. तिसर्‍या वर्षाची मुले दुसर्‍या वर्षाच्या मुलांना शिकवतात आणि चौथ्या वर्षाची मुले संपूर्ण कार्यक्रमाची आखणी करतात. या क्लबचा समन्वयक या कार्यशाळेत सहभागी झाला होता.
 
 
मेंगळुरूमध्ये विकी विमेन, मेंगळुरू हा गट काम करतो, विकिपीडियावर महिला संपादकांची, महिलांबद्दलच्या लेखांची संख्या वाढावी आणि जेन्डर गॅप कमी व्हावी यासाठी हा गट मुख्यत: काम करतो. या गटातील एक सदस्यासुद्धा या कार्यशाळेत सहभागी झाली होती.
 
 
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तामिळनाडू! तामिळ लोकांच्या मातृभाषेच्या अभिमानाबद्दल आपल्याला माहीत असेलच. त्यांचे राज्य सरकारही तामिळ विकिपीडियाला खूप मदत करते. शिक्षकांसाठी विकिपीडिया प्रशिक्षणे आयोजित केली जातात. सरकारकडे असलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तामिळनाडूतील देवळांबद्दल तामिळ विकिपीडियामध्ये मोठ्या प्रमाणात लेख लिहिले आहेत. तामिळनाडूमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थांना सरकारतर्फे लॅपटॉप दिले जातात. त्यावर युनिकोडमधील तामिळ फॉन्ट्स असावेत, या सूचनेचा स्वीकार होऊन आता तसे लॅपटॉप दिले जात आहेत.
 
 
दर वर्षी भारतीय भाषांमधील विकिपीडियांवर ‘प्रोजेक्ट टायगर’ ही स्थानिक भाषेत विकीवर लेख लिहिण्याची स्पर्धा घेतली जाते. ही स्पर्धा 3 महिने असते आणि प्रत्येक महिन्यात 3 विजेते निवडले जातात. 2020मध्ये मराठी विकिपीडियावर तिन्ही महिन्यात मी 3 विजेत्यांपैकी एक ठरले. पण माझे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांच्यापुरतीच ही बातमी मर्यादित ठरली. तामिळ भाषेत जे विजेते ठरले, तेसुद्धा आमच्या या प्रशिक्षण कार्यशाळेत होते, त्यांचे तिकडे खूप कौतुक झाले. वृत्तपत्रात बातम्या आल्या.
 
 
 
अतिशय अभिमानाने त्यांनी आम्हाला त्या दाखवल्या. प्रोजेक्ट टायगरमध्ये सर्वांत जास्त लेख ज्या भाषेत लिहिले जातात, त्या भाषेलासुद्धा बक्षीस असते, ते अर्थातच तामिळ भाषेने मिळवले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आमच्या एका गटचर्चेत एक तामिळ सहकारी म्हणाले, “आमच्या भाषेचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्यासाठी आम्ही खूप काम करतो.” तेव्हा नुकत्याच झालेल्या मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर मी मनातच म्हणाले - हो, आम्हालाही खूप अभिमान आहे, आम्ही सगळे मराठी गौरव दिनाचे स्टेटस लावतो whatsapp! आम्ही भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नांमध्ये गुंतलो आहोत आणि ते आपल्या भाषेत ज्ञाननिर्मिती करण्यावर भर देत आहेत!
 
 
 
विकिपीडियावर लेख लिहिण्याचा हा सगळा खटाटोप कशासाठी? असा प्रश्न कदाचित आपल्याला पडेल. इंटरनेट आणि स्मार्ट फोन आता देशभरात सर्वत्र पसरले आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. स्मार्ट फोन वापरणारी मोठी लोकसंख्या ग्रामीण भागात असल्यामुळे ते स्थानिक भाषेत इंटरनेट वापरतात आणि स्थानिक भाषेत माहिती शोधण्याचा प्रयत्नही करतात. अनेक वेळा काही विषयांवर मराठी भाषेत पुरेशी माहिती उपलब्ध नसते. हा शोध घेताना अर्थातच पहिला शोध मराठी विकिपीडियावर घेतला जातो, त्यामुळेच मराठी विकिपीडियावर अधिकाधिक उपयुक्त विषयांवरील लेख, दर्जेदार, माहितीपूर्ण लेख असणे आवश्यक आहे.
 
 
 
एक सुशिक्षित मराठी भाषक म्हणून आपणच यासाठी पुढाकार घ्यायला हवा. विकिपीडिया आपल्याला केवळ एक फ्रेमवर्क देते, त्यामध्ये माहिती लिहिण्याची आणि केवळ मराठीच बोलू आणि वाचू शकणार्‍या आपल्याच बांधवांपर्यंत ती पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच नाही का? 27 फेब्रुवारी रोजी साजर्‍या होणार्‍या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपल्या मातृभाषेची सेवा करण्याचा एक प्रयत्न म्हणून आपण त्या दिशेने सुरुवात करायला हवी!