200 वर्षांपूर्वीचे जागृत देवस्थान - पंचमुखी परमेश्वर

विवेक मराठी    24-Feb-2023
Total Views |
 
vivek
 
संभाजीनगर : नांदेड जिल्ह्यात बिलोली रस्त्यावर कहाळा येथून 5 कि.मी. अंतरावर धनज खुर्द येथे पंचमुखी परमेश्वराचे भव्य असे मंदिर आहे. नवसाला पावणारा देव अशी या मंदिराची ख्याती असून वर्षभर या ठिकाणी विविध कार्यक्रम चालू असतात.
 
 
200 वर्षांपूर्वी जहागीरदार घराण्याचे कुलगुरू जगन्नाथ यांना दृष्टान्त झाला. त्या दृष्टान्ताप्रमाणे त्यांनी कंधार येथे पावन गणपतीची स्थापना केली आणि पंचमुखी परमेश्वराची स्थापना करण्यासाठी मूर्ती बैलगाडीतून नेत असताना मध्यरात्री बैलगाडीचे चाक निखळून पडले. जगन्नाथ यांनी रात्रभर तेथेच मुक्काम केला. तेव्हा रात्री स्वप्नात श्रीपरमेश्वराने जगन्नाथ यांना ‘जेथे गाडी खराब झाली आहे, तेथेच माझी प्रतिष्ठापना कर’ असे सांगितले. त्याप्रमाणे लगेचच दुसर्‍या दिवशी जगन्नाथ आणि धनज परिसरातील गावकर्‍यांनी मिळून पंचमुखी परमेश्वराची स्थापना केली.
 

vivek 
 
या स्थापनेच्या दिवसापासून प्रत्येक महाशिवरात्रीला जहागीरदार कुटुंबीयांतर्फे रात्रभर अभिषेक केला जातो. यासाठी गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित राहतात. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर गावकरी मंडळी पालखीमधून परमेश्वराची वाजत-गाजत मिरवणूक काढतात. या निमित्ताने दुसर्‍या दिवशी मोठी यात्रा भरते. यात्रेत पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनासाठी पायी अथवा स्वत:च्या वाहनाने येतात.
 
 
पंचमुखी परमेश्वरात विष्णू, गणपती, भवानीमाता, सूर्य आणि परमेश्वर अशी पाच मुखे असून परमेश्वराच्या मांडीवर पार्वती विराजमान झालेली आहे. परमेश्वराच्या मूर्तीसमोरच चिंतामणी असून या चिंतामणीला हात लावून मनात संकल्प केल्यास तो संकल्प पूर्ण होणार असेल, तर चिंतामणी उजव्या बाजूला फिरतो - म्हणजेच केलेला संकल्प पूर्ण होतो.
राजीव जहागीरदार