रा.स्व. संघाचे उदय आगाशे यांचे अकाली निधन

03 Feb 2023 16:43:35
 
vivek
 
ठाणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते उदय श्रीराम आगाशे यांचे गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी अकाली निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात पत्नी शिल्पा आणि मुलगा मल्हार असा परिवार आहे. उदय यांनी देहदान केलेले असल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार नसल्याने, ठाण्यातील टेंभी नाका येथील गौतम लब्धी, अभ्युदय बँकसमोर या त्यांच्या जुन्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. उदय आगाशे यांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त होत आहे.
 
 
ठाण्याच्या नववर्ष स्वागत यात्रेत सक्रिय सहभाग असलेले, तसेच सुपरिचित स्वयंसेवक उदय आगाशे पूर्वी सा. ‘विवेक’मध्ये कार्यरत होते. त्यानंतर 20 वर्षे ते प्रख्यात ‘पितांबरी’ उद्योग समूहात मीडिया सेलमध्ये साहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ‘पितांबरी’च्या विविध उत्पादनांसाठी त्यांनी केलेले लेखन दखलपात्र होते. लेखनात, सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात माणसाला सर्वोच्च प्राधान्य देणारा संवेदनशील माणूस अशी त्यांची ओळख होती. आगाशे काही काळ मुंबई आकाशवाणीशीही निगडित होते. उदय आगाशे यांचे वडील देहदान चळवळीत सक्रिय असल्याने उदय यांनीही मृत्युपश्चात देहदान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार न करता त्यांचे पार्थिव दान करण्यात आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
 
- MTB 
Powered By Sangraha 9.0