@सुधीर जोगळेकर। 9820016674
नौदलात गौरवास्पद कामगिरी करणारा जवान ते डोंबिवलीतील कुष्ठरुग्णांना त्यांची दैनंदिन लढाई लढण्यासाठी बळ देणारा कार्यकर्ता हा प्रवास करणार्या गजानन माने यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कुष्ठरुग्णांना सन्मानाने जगता यावे, त्यांनी स्वावलंबी बनावे या उद्देशाने कुष्ठरुग्ण वसाहतींसाठी माने यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि स्वत:मध्ये निष्ठापूर्वक जोपासलेली लढाऊ वृत्ती यातून या सेवा कार्याला खतपाणी मिळाले.
2014 ते 2023 ही दहा वर्षं पद्म पुरस्कारांच्या क्षेत्रात नवा इतिहास घडवणारी ठरली आहेत. आजवर पद्म पुरस्काराने गौरवली जात असत ती ल्युटेन्सच्या कोंडाळ्यातील माणसं. मात्र मोदी सत्तेवर आल्यापासून या दहा वर्षांत प्रथमच, प्रसिद्धीपासून स्वत:ला प्रयत्नपूर्वक दूर राखणार्या अनेक अनाम कार्यकर्त्यांचा पद्म सन्मानाने गौरव होताना दिसतो आहे. माने यांच्याप्रमाणेच यंदा अंदमान निकोबारचे डॉक्टर रतन चंद्र कार, गुजरातमधल्या वनवासी कार्यकर्त्या हिराबाई लोबी, मध्य प्रदेशातील वैद्यक व्यावसायिक मुनीश्वरचंद्र दावर, आसामचे हराका समाजाचे रामकुईवान्ग्बे, केरळचे गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक व्ही.पी. अप्पुकुत्तन पोदुवल, आंध्र प्रदेशचे वैद्यक व्यावसायिक संकुरथी चंद्र शेखर, तामिळनाडूचे सर्पतज्ज्ञ वडिवेल गोपाल आणि मासी सदयन, सिक्कीमचे जैविक शेतीतज्ज्ञ तुलाराम उप्रेती, हिमाचल प्रदेशाचे नेकराम शर्मा, झारखंडचे जनम सिंग सोय, पश्चिम बंगालचे धनीराम तोतो, तेलंगणचे भाषारक्षक बी. रामकृष्ण रेड्डी, छत्तीसगडचे लाकूड कोरीवकाम कारागीर अजय कुमार मांडवी, कर्नाटकच्या राणी मचय्या, मिझोरामच्या के.सी. रुनरेमसंगी, मेघालयचे वाद्यनिर्माते रीसिंगबोर कुर्कलांग, पश्चिम बंगालमधील जलपैगुरीचे 102 वर्षांचे मंगल कांती रॉय, नागालँडचे मोआ सुबोंग, कर्नाटकचे मुनिबेंकटप्पा, छत्तीसगडचे दोमरसिंग कुंवर, जम्मू-काश्मीरचे गुलाम मोहम्मद जाझ, गुजरातचे भानुभाई चितारा, परेश राथवा, बिहारचे कपिल देव प्रसाद आणि महाराष्ट्रातील झाडीपट्टी रंगभूमीचे परशुराम कोमाजी खुणे यांनाही सन्मानित करण्यात आलं आहे.
2023 हे डोंबिवलीच्या समाजजीवनातलं भाग्यवर्ष ठरणार आहे, याची पहिली खूणगाठ यंदाच्या 26 जानेवारीला केंद्र सरकारतर्फे जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांनी पटली आहे. डोंबिवलीचा ज्ञात इतिहास तसा दीडशे वर्षांचा. त्या दीडशे वर्षांतल्या अनेक ठळक घटना घडायला सुरुवात झाली ती 1920 सालापासून. विकासाच्या पहिल्या टप्प्यातल्या म्हणजे 1920 ते 1924 या महत्त्वाच्या पाच वर्षातल्या घडामोडींची शताब्दी सध्या सुरू आहे आणि या शताब्दी वर्षातच डोंबिवलीच्या एका माजी आणि एका आजी रहिवाशाला, अशा दोघांना एकाच वेळी पद्मश्री पुरस्कार जाहीर होण्याचा समसमा संयोग घडून आला आहे.
हनुमाननगर येथील कुष्ठरुग्ण वसाहतीत उभारलेला दुग्धविकास प्रकल्प
यातली पद्म पुरस्काराने सन्मानित पहिली व्यक्ती आहे डोंबिवलीचे माजी रहिवासी, ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक विवेकचे प्रकाशन करणार्या हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, तर दुसरी व्यक्ती आहे तीन दशकांहून अधिक काळ कुष्ठरुग्णांच्या सेवेत आपले तन-मन-धन समर्पित करणारे गजानन माने.
तब्बल बारा वर्षं भारतीय नौदलात सेवा बजावून ऐंशीच्या दशकात माने डोंबिवलीत राहावयास आले आणि डोंबिवलीकर होऊन गेले. माने मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख तालुक्यातील अंबव गावचे. वडील नोकरीनिमित्ताने मुंबईत आले आणि गिरणगावचे झाले. एका गिरणी कामगाराच्या कुटुंबातच माने यांचा जन्म झाला आणि मुंबईतल्या या श्रमशक्तीच्या जागृत शक्तिपीठाचा वरदहस्त त्यांच्या माथ्यावर दीर्घकाळ टिकला. घरची परिस्थिती गरिबीची, वयाच्या 14व्या वर्षापासूनच माने यांना नोकरी करावी लागली. 1962चं भारत-चीन युद्ध हे त्यांच्या शालेय जीवनादरम्यान घडलं, त्या युद्धाने सैन्यात भरती होण्याची ठिणगी माने यांच्या अंत:करणात प्रज्वलित केली आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी, म्हणजे 1965 साली घरी कुणालाही न सांगता त्यांनी भारतीय नौदलात प्रवेश मिळवला. त्या वर्षी झालेल्या भारत-पाक युद्धात रणभूमीवर जाण्याची संधी त्यांना मिळाली नाही, पण सहाच वर्षांनी झालेल्या 1971च्या युद्धात ते सहभागी झाले आणि तेव्हा बजावलेल्या गौरवास्पद कामगिरीमुळे ‘संग्राम‘ पदकाचे मानकरीही बनले. 1965 ते 1976 असा अकरा वर्षांचा त्यांचा नौदल सेवेचा कालावधी.
युद्ध संपलं, नौदलातला कार्यकाळ संपला आणि माने नागरी जीवनात परतले. ठाणे शहरातील एका खाजगी कंपनीत माने यांनी नोकरी केली आणि कंपनीच्या उत्कर्षातदेखील मोलाचा वाटा उचलला. पण मनात एक विचार पक्का होता - देशाच्या सेवेसाठीच सतत काहीतरी जनोपयोगी कार्य करत राहायचं. 1985च्या सुमारास माने डोंबिवलीत राहावयास आले. नव्याने नागरीकरण होऊ लागलेल्या डोंबिवलीचे नागरी प्रश्न आ वासून उभे राहत होते. ते पाहून त्यांच्यातल्या लढवय्या सैनिकाला अस्वस्थ व्हायला होत होतं. सरस्वत कॉलनी परिसरातील रेल्वेखालून जाणारा नाला सतत सात वर्षं पाठपुरावा करून रेल्वे प्रशासनाकडून बांधून घेण्यात त्यांना यश आलं. श्री गणेश मंदिराजवळच्या पूर्व-पश्चिमेला जोडणार्या पुलाचं काम रेंगाळलं होतं, जलाराम मंदिर परिसरातल्या भुयारी गटाराचं रुंदीकरण होत नसल्याने पावसाळ्यात घराघरात पाणी साठत होतं. माने सच्च्या सैनिकाप्रमाणे त्यासाठी लढले, त्यांनी ते प्रश्न मार्गी लावले, त्यांचं निराकरण करून घेतलं. हे करत असतानाच तत्कालीन आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी त्यांना एका प्रदीर्घ लढाईसाठी उद्युक्त केलं. ती लढाई होती कुष्ठरोगाविरुद्धची. ठाकुर्लीहून कल्याणला जायच्या मार्गावर पत्री पुलाजवळ कुष्ठरोग्यांची एक वस्ती आहे. या वस्तीसाठी काम करा, असं मदान यांनी त्यांना सुचवलं आणि केवळ वैद्यकीय उपचार पुरेसे नाहीत, या वस्तीतल्या नागरिकांना सन्मानाचं जिणं जगता यावं यासाठी त्यांना स्वावलंबी बनवणं गरजेचं आहे, हे त्यांनी जाणलं.

कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत काम करायला प्रारंभी घरून विरोध झाला. परंतु काही काळ गेल्यानंतर या कामाचं महत्त्व घरच्यांच्याही ध्यानी आलं आणि त्यांचं संपूर्ण सहकार्य या कामासाठी मिळू लागलं. या वस्तीतल्या निरोगी तरुण पिढीला शिक्षण मिळणं, नोकर्या मिळणं, स्वत:च्या पायावर उभं राहता येणं यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती. माने यांनी कंबर कसून प्रयत्न सुरू केले ते रुग्णांना रोगमुक्त करण्याचे, त्या वसाहतीत चांगले रस्ते, भरपूर पाणीपुरवठा होण्याचे. त्यांनी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी, भारत विकास परिषद यासारख्या अनेक संस्थांचं सहकार्य घेतलं आणि खडूनिर्मिती, शिवणकाम, शिधावाटप केंद्र, दुग्धविकास यासारखे प्रकल्प उभे करून देत महत्त्वाच्या पुनर्विकास कार्याला हात घातला.
माने यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी या पुनर्विकास कार्यासाठी परिसरातूनच नव्हे, तर परदेशातूनही पैसा उभारला. सासाकावा लेप्रसी फाउंडेशनतर्फे दुग्धविकास प्रकल्प उभारला आणि भारतीय कुष्ठरोग्यांनी चालवलेला सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून 2011 साली त्याची निवड झाली. या कुष्ठरुग्ण वस्तीचं नाव हनुमाननगर, त्या वसाहतीतील अनेकांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. कुष्ठरोगामुळे अपंगत्व आलेल्या अनेकांना पालिकेकडून मासिक भत्ता मिळू लागला. या रुग्णांना औषधोपचारासाठी आणि मलमपट्टीसाठी लांब अंतरावर जावं लागे. माने यांनी महापालिकेच्या मागे लागून कुष्ठरुग्ण वसाहतीतच स्वतंत्र दवाखाना सुरू करून घेतला. दुग्धव्यवसायाच्या जोडीला माने यांनी हा बायोगॅस प्रकल्प सुरू केला आणि कुष्ठ बांधवांना स्वावलंबनाचे धडे दिले. कुष्ठरुग्णांना व्याधीमुळे सर्वसामान्यांच्या मंदिरात प्रवेश दिला जात नाही, ही गोष्ट माने यांना खटकत होती. त्यांनी रुग्णांसाठी वसाहतीच्या आवारातच राधाकृष्णाचं मंदिर बांधलं. अद्याप या वसाहतीतील 28 मुलांना महापालिकेत रोजगार मिळाला आहे, तर संपूर्णपणे विकलांग अशा 67 रुग्णांसाठी दरमहा 2500 रुपयांचं अनुदान सुरू झालं आहे.
माने यांनी 1992 ते 2013 अशी तब्बल 21 वर्षं अखिल महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्या सल्लागारपदाची धुरा सांभाळली आहे. कुष्ठरुग्णांच्या प्रत्येक वसाहतीत स्वतंत्र दवाखाना, त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणं, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्न करणं, महाराष्ट्रभरात प्रत्येक कुष्ठरुग्णाच्या घरात एक रिक्षा परवाना मिळणं असे त्यांनी नेटाने लावून धरलेले आणखीही काही प्रयत्न. केवळ आरोग्य सेवा पुरेशी नाही, हॉस्पिटल असणं गरजेचं आहे हाही आग्रह माने यांनी लावून धरला आणि आता तोही पुरा होण्याच्या मार्गावर आहे. 2013 साली माने यांनी कुष्ठरोग जनजागृतीचं उद्दिष्ट समोर ठेवून डोंबिवली ते रत्नागिरी अशी 400 किलोमीटरची पदयात्रा सुरू केली. अशी पदयात्रा सुरू करणारे ते गेल्या शंभर वर्षांतील पहिले भारतीय ठरले. तरुण पिढीच्या मनात भारतीय सैन्यात रुजू होण्याची आणि देशसेवा करण्याची बीजं रुजावी, यासाठी माने प्रयत्नशील आहेत. गेल्या काही वर्षांत सैन्यदलांच्या साहाय्यता निधीला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी माने प्रयत्नशील आहेत. ते शाळाशाळात जातात, मुलांना मार्गदर्शन करतात, सैन्यात जा म्हणून सांगतात. डोंबिवली शहरात स्फूर्तिस्थळ उभारून मुलांना आकर्षित करण्यासाठी काही मॉडेल्स आणि युद्धस्मारक उभारण्यासाठी ते महापालिकेला सहकार्य करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि स्वत:मध्ये निष्ठापूर्वक जोपासलेली लढाऊ वृत्ती यातून गेल्या पाच दशकांत ते जी सेवा करताहेत, त्याला त्यांची पत्नी स्मिता, मुलं देवेंद्र आणि योगेंद्र तसेच सुना आर्या आणि रावी यांचं मोलाचं सहकार्य आहे. हनुमाननगर वसाहतीत आज पंचकमिटी, महिला मंडळ, विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, स्थापन झालं आहे.
माने यांना आजवर नऊ संस्थांकडून सन्मानित करण्यात आलं आहे. पण प्रसिद्धिपराङ्मुखपणेे काम करत राहणार्या माने यांनी त्याचा बोलबाला कधी केलेला नाही. त्यामुळे पद्म पुरस्काराने त्यांचा होत असलेला सन्मान अधिकच उठून दिसतो आहे. कुष्ठरोगाच्या क्षेत्रात अधिकाधिक तरुण कार्यकर्त्यांनी यावं, यासाठी तो पद्म पुरस्कार प्रेरणा देणारा ठरेल अशी अपेक्षा केली पाहिजे.