ज्ञानदानाचे आजीवन कार्य करणारा तपस्वी

विवेक मराठी    04-Feb-2023
Total Views |
@सुधीर गाडे
 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे या संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे यांचे दि. २७ जानेवारी २०२३ या दिवशी दुःखद निधन झाले...
 
vivek
 
डॉ. यशवंत वाघमारे यांचे कुटुंब मूळचे बडोद्याचे. बडोद्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे तीन बंधू आणि दोन बहिणी या सर्वांनाच बुद्धिमत्तेचे मोठे वरदान. बालपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. संघाच्या शाखेतून त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झाले. क्रिकेट खेळातही पारंगत असलेल्या यशवंतरावांनी त्या वेळी क्रीडाप्रकाराला असलेली मर्यादित प्रतिष्ठा बघता आपल्या आवडीच्या - म्हणजे भौतिकशास्त्र विषयात अध्ययन करून त्यामध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. भारतात आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. मारिया मेयर या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या हाताखाली संशोधन करण्याची ही अपूर्व संधी होती. स्वतःची बुद्धिमत्ता, परिश्रम, सतत उद्योगी राहण्याचा स्वभाव या सगळ्या गुणांमुळे त्यांनी मेयर यांची शाबासकी मिळवली. त्यांची बुद्धिमत्ता बघून त्यांना उर्वरित आयुष्य अमेरिकेत घालवण्याचा प्रस्तावदेखील मिळाला. परंतु 'नेवो नेते जड तनूस या दूर देशास, दैव परी प्रिय राहो मम चित्ती मातृभूमी सदैव' या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून भारतातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा निश्चय केला. आपले जीवितकार्य म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रामध्ये काम केले. कानपूर येथील आयआयटीमध्ये त्यांनी भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक, विभागप्रमुख, डीन अशा विविध पदांवर दीर्घकाळ काम केले. हे काम करीत असताना स्वतःच्या विषयामधली निष्णातता, विद्यार्थ्यांबद्दल मनात असलेली आपुलकीची भावना, खेळकर, आनंदी वृत्ती ही सर्व वैशिष्ट्ये असलेल्या डॉ. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना दीर्घकाळ प्रेरित केले. प्रा. हरीश वर्मांसारखे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले अनेक विद्यार्थी घडवले.
 
या प्रवासात त्यांच्या पत्नी अंजली वाघमारे यांनी त्यांना संपूर्ण साथ दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी मुक्त प्रवेश असे. सुहास्य वदनाने विद्यार्थ्यांचे स्वागत होत असे. विद्याभ्यासामधील शंका, प्रश्न दूर होत असतच, तसेच आपुलकीने केलेल्या पाहुणचाराचादेखील अनुभव विद्यार्थ्यांना नेहमीच येत असे. आपुलकीच्या व्यवहारामुळे वाघमारे पती-पत्नी यांनी विद्यार्थी, सहकारी, परिचित या सर्वांशी एक प्रकारचे घट्ट कौटुंबिक नाते निर्माण केले होते.
 
 
अणुभौतिकशास्त्र या विषयातील त्यांच्या प्रावीण्यामुळे देश-परदेशातील अनेक विद्वानांशी त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले होते. डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारखे अनेक ख्यातनाम शास्त्रज्ञ त्यांच्या सहज संपर्कात होते. याचा उपयोग करून त्यांनी भारतीय भौतिकशास्त्र शिक्षक परिषद (आयएपीटी) या संस्थेचे काम पुढे नेण्यासाठी खूप परिश्रम घेतले. त्यांच्या निमंत्रणावरून अनेक शास्त्रज्ञ या परिषदेच्या कामासाठी आपला बहुमूल्य वेळ देत असत. या परिषदेच्या कामातून ते विद्यार्थ्यांना मूलभूत शास्त्रांमध्ये प्रावीण्य मिळवण्याची प्रेरणा देत असत.
 
 
स्वतःच्या प्रज्ञेने शास्त्रीय विश्वात तळपत असतानाच ते आपल्या कुटुंबाकडेदेखील तितक्याच समर्थपणे लक्ष देत असत. भावंडांच्या शिक्षणामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांमध्ये मार्ग काढणे, त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देणे, आपल्या मुलीबरोबर मित्रत्वाचे नाते निर्माण करणे, तिला पुस्तकी शिक्षणाबरोबरच आयुष्याचेदेखील शिक्षण देणे या सगळ्यातून त्यांचा कुटुंबवत्सल स्वभाव लक्षात येतो. बाहेर सर्वांसाठी प्रसिद्ध शास्त्रज्ञ असलेले डॉ. यशवंत वाघमारे कुटुंबीयांसाठी मात्र प्रेमळ अप्पा, अप्पाकाका किंवा अप्पामामा होते. आपल्या मोठेपणाचे कोणतेही दडपण ते घरात जाणवू देत नसत.
 
 
निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पुण्यात आल्यावर ते रा.स्व. संघाच्या ज्ञानेश्वर प्रभात शाखेत जाऊ लागले. निवृत्तीनंतर विश्रांती न घेता अनेक शैक्षणिक संस्थांशी त्यांचा संबंध आला. या संस्थांच्या कामांमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले. राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर या द्रष्ट्या त्रयीने स्थापन केलेली, १६२ वर्षांची परंपरा असलेली आणि आजही वर्धिष्णू असलेली पुण्यातील पहिली शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी होय. सन २०००पासून मृत्यूपर्यंत ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या निमित्ताने ते जात असत. आपुलकीने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करीत असत. म.ए.सो.च्या शाखांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन विषयांचे शिक्षण दिले गेले पाहिजे यासाठी संस्थेच्या होणाऱ्या वेगवेगळ्या सभा-बैठकांमधून ते विविध कल्पना मांडत असत. केवळ कल्पना मांडून सोडून देण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता, तर या कल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठी ते स्वतः सहभागी होत असत. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी ते आपुलकीने संवाद साधत. एक-दोन भेटीमध्येच त्यांचे प्रत्येकाशी जवळकीचे संबंध निर्माण होत असतात. चांगल्या झालेल्या कार्यक्रम, उपक्रमांबद्दल ते भरभरून बोलत असत, शाबासकी देत असत. त्यांच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीने दिलेली कौतुकाची थाप संस्थेतील सर्वांनाच मोलाची वाटत असे. वेळप्रसंगी ते त्रुटी, चुकादेखील स्पष्टपणे दाखवून देत असत. त्यामागे कार्यक्रम, उपक्रम अधिक चांगले व्हावे ही तळमळ असे.
 
 
त्यांच्या प्रेरक मार्गदर्शनाला आम्ही सर्व जण आता पारखे झालो आहोत. परमेश्वर त्यांना सद्गती देवो, ही विनम्र श्रद्धांजली.
 
सहसचिव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे
 
९८६०३६६४३३