हिंदू समाजाचा संघटित हुंकार

विवेक मराठी    04-Feb-2023
Total Views |
 @निलेश भिसे। 9921111155
 
hindu 
 
गेली अनेक वर्षे हिंदू समाजावर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्तबद्ध आवाज म्हणजे हिंदू जन आक्रोश मोर्चा. सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी संपर्क झाल्यामुळे सर्वसामान्य हिंदू कुटुंबे सकल हिंदू समाज म्हणून या मोर्चात रस्त्यावर उतरत आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सर्व शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये उत्स्फूर्तपणे अशा स्वरूपाचे मोर्चे निघण्यास सुरुवात झाली.
कराडमध्ये सात वर्षांपूर्वी जैन समाजातील मुलगी लव्ह जिहादमध्ये अडकण्याची घटना उघडकीस आल्यानंतर कराड शहरात या घटनेला विरोध करण्यासाठी विक्रमजी पावसकर यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्तपणे लव्ह जिहाद विरोधी मोर्चा निघाला होता. ही हिंदू विरोधाची सुरुवात म्हणता येईल.
 
2 वर्षांपूर्वी पालघरमध्ये दोन साधूंना पोलिसांच्या उपस्थितीमध्ये दगडाने ठेचून मारण्यात आले. पोलिसांनी मूकप्रेक्षकाची भूमिका घेऊन समोर जमलेल्या जमावाला घाबरून त्या साधूंना चक्क जमावाच्या हवाली केले. अतिशय संताप आणणारी ही घटना या महाराष्ट्रामध्ये घडली आणि हिंदू समाजाला खच्ची करण्याच्या एकामागून एक घटना त्यानंतर घडण्यास सुरुवात झाली. राजकीय व्यासपीठावरून हिंदू मानबिंदूंचा अपमान, सरस्वतीमातेबद्दल अतिशय अपमानास्पद अशी टिप्पणी, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पीएफआयचे विणले गेलेले जाळे आणि अशातच 15 नोव्हेंबर 2022ला एक भयंकर घटना उघडकीस आली. वसईतील श्रद्धा वालकर नावाच्या मुलीला तिच्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहत असणार्‍या आफताब नावाच्या मुलाने लग्नाचा तगादा लावला, म्हणून दिल्लीमध्ये अतिशय निर्दयीपणे आणि थंड डोक्याने मारले. तिच्या देहाचे 35 तुकडे करून ते जंगलामध्ये टाकले. या घटनेमुळे संपूर्ण हिंदू जनमानस अस्वस्थ झाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वप्रथम परभणीमध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आणि मग त्यानंतर महाराष्ट्रातील जवळपास सर्व शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये उत्स्फूर्तपणे अशा स्वरूपाचे मोर्चे निघण्यास सुरुवात झाली.
 
 
 
ठिणगी पडली
 
मुंबईतील श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे दिल्लीमध्ये 35 तुकडे सापडले आणि मग आपल्या आजूबाजूला घडणार्‍या लव्ह जिहादच्या घटना, हिंदू मुलींची होणारी छेडछाड, शासकीय पातळीवरची अनास्था, पोलीस प्रशासनाकडून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे, राजकीय नेत्यांचे आणि बुद्धिजीवींचे कुतर्क यामुळे हिंदू मनाचे आक्रोशात रूपांतर झाले.
 

vivek 
 
दिसणे आणि बघणे
 
 
अशा श्रद्धा आपल्या आवतीभोवती रोज बळी पडत आहेत, हे सर्वांना दिसत होते, मात्र त्याकडे गांभीर्याने कोणीही बघत नव्हते. डोळ्यांना अशा अनेक घटना दिसत होत्या, पण त्यांच्या संवेदना मेंदूपर्यंत आणि मनापर्यंत पोहोचत नव्हत्या. श्रद्धा वालकरच्या प्रकरणानंतर मात्र, मेलेल्या आणि बोथट, बोजड झालेल्या या संवेदना प्रचंड वेगाने प्रवाहित झाल्या. आपल्या आजूबाजूला घडलेल्या अशा अनेक घटना स्मृतिपटलावर दिसू लागल्या आणि मनाच्या सुप्तावस्थेत असलेला या वेदना संतापाद्वारे बाहेर येऊ लागल्या. समाजातील या सुप्त संतापाचे रूपांतर प्रचंड आणि विराट अशा जन आक्रोशामध्ये आणि जनगर्जनेमध्ये झाले.
श्रद्धा वालकरसारख्या इतर सामायिक घटना
 
 
कोल्हापूरमधील आजरा येथे हिंदू मुलीची काढलेली छेड आणि कोल्हापूर शहरातील गवळी समाजाच्या मुलीचे जिहाद्यांनी केलेले अपहरण, याव्यतिरिक्त पाटण तसेच सांगलीतील विटा येथे घडलेल्या अशाच प्रकारच्या घटना ह्या तिथल्या मोर्चांच्या पाठीमागच्या तात्कलिक घटना ठरल्या असल्या, तरी श्रद्धा वालकरचे क्रूर हत्याकांड हाच सर्व ठिकाणच्या मोर्चाच्या पाठीमागचा ट्रिगर पॉइंट ठरला.
 
 
 
हिंदू जन आक्रोश मोर्चातील प्रमुख मागण्या
 
 
दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या लव्ह जिहादच्या घटनांबरोबरच ठिकठिकाणी लँड जिहादचे अतिक्रमणदेखील विळखा घालत आहे. विविध मोकळे सरकारी भूखंड, फूटपाथ, रस्ते, मुख्य चौक याचबरोबर गडकोटांवर झालेली अनधिकृत थडग्यांच्या आणि दर्ग्याच्या स्वरूपातील अतिक्रमणे, तसेच ख्रिश्चन मिशनर्‍यांकडून ग्रामीण भागांमध्ये आणि शहरातील सेवा वस्त्यांमध्ये लालूच दाखवून आणि अंधश्रद्धेच्या जोरावर होणारी धर्मांतरणे, कसायांमार्फत होणारी गोतस्करी आणि गोहत्या, गोमांस विक्री या सर्व विषयांना अनुसरून प्रमुख तीन मागण्या करण्यात येत आहेत.
 
 
1) लव्ह जिहाद आणि लँड जिहाद याविरुद्ध कडक कायदा करणे.
 
2) धर्मांतरणाविरुद्ध कडक कायदा करणे.
 
3) गोहत्येविरुद्ध कायदा केला असला, तरी त्याची अंमलबजावणी नीट होत नसल्यामुळे सक्तीने अंमलबजावणी करणे.
काही ठिकाणी टिपू सुलतान जयंतीविरुद्ध आवाज उठविणे याचबरोबर 26 डिसेंबरला घोषित केलेला गुरूगोविंद सिंग यांच्या पुत्रांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी घोषित केलेल्या वीर बाल दिवसाच्या धर्तीवर पुण्यामधील मोर्चात छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान दिन म्हणजेच फाल्गुन अमावस्या हा धर्मवीर दिन म्हणून घोषित करणे हीदेखील मागणी करण्यात येत आहे.
सत्तेत हिंदुत्ववादी सरकार असताना मोर्चांची आवश्यकता का?
 

vivek 
 
केंद्र सरकारने सीएए कायदा लागू केल्यानंतर सीएए कायदाविरोधी मुस्लीम समाजाचे प्रचंड मोठे मोर्चे निघाले. शाहीनबाग आंदोलन झाले, पण राष्ट्रभक्त आणि देशभक्त नागरिक मात्र सीएएच्या समर्थनार्थ केंद्र सरकारला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले नाहीत. ते फक्त मूक प्रेक्षक बनले. उद्या महाराष्ट्रात लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदे पारित होतील; पण जनमताचा रेटा आणि देशभक्त आणि राष्ट्रभक्त, जागरूक अशा हिंदू समाजाच्या समर्थनाचा प्रचंड रेटा आणि दबाव जर दिसला नाही, तर कदाचित याची अंमलबजावणी होऊ शकणार नाही. त्यामुळे अशा मोर्चाची नितांत आवश्यकता आहे. तसेच सरकार घेत असलेल्या चांगल्या निर्णयांना प्रचंड जनसमर्थन लाभल्यामुळे सरकारचादेखील आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि केलेले कायदे मागे घेणे किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधी चालढकल करणे असा अविचार सरकारच्या चुकूनही मनात येत नाही.
 
पुण्यातील राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेशजी पवळे यांनी छत्रपती श्री संभाजी महाराज आणि त्यांच्या धर्मवीर या उपाधीवरून अनावश्यक वाद छेडला गेला, या गोष्टीचा निषेध केला. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन हा ‘धर्मवीर दिन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी केली.
 
आपण बारकाईने निरीक्षण केले, तर सर्व हिंदू जन आक्रोश मोर्चे हे कुठल्याही ठरवून केलेल्या नियोजनाचा भाग नक्कीच नाहीत. परभणीच्या मूक मोर्चानंतर वेगवेगळ्या शहरांमधून आणि जिल्ह्यांमधून ते उत्स्फूर्तपणे निघत आहेत. पण या उत्स्फूर्ततेतही स्वयंशिस्त आणि सुसूत्रीपणा, तोही सकल हिंदू समाज म्हणूनच बघायला मिळत आहे. वरील सर्व समस्यांच्या आणि घटनांच्या विरोधात हिंदू समाजमनामध्ये असलेली अस्वस्थता, राग आणि चीड मोर्चाच्या रूपाने संघटित स्वरूपात दिसत आहे. तसेच सर तन से जुदा किंवा गजवा ए हिंद यासारख्या घोषणांमुळे, पीएफआयसारख्या मुस्लीम संघटनांनी 2047पर्यंत भारताचे मुस्लीम राष्ट्र करण्याच्या केलेल्या नियोजनामुळे हिंदू जनमानसामध्ये असुरक्षितता वाढत आहे व त्यामुळेच आपण हिंदू म्हणून एक झाले पाहिजे, अशी तीव्र भावना प्रचंड वेगाने प्रस्थापित होत आहे.
 
 
प्रतिसाद
 
 
शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या ठिकाणी 75 हजार ते एक लाख संख्येचे निघालेले मोर्चे आणि तालुक्याच्या ठिकाणी 25 ते 30 हजार संख्येचे निघालेले मोर्चे यावरून असे लक्षात येते की या जन आक्रोश मोर्चांना उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सातार्‍यासारख्या ठिकाणी जिल्ह्याचा मोर्चा झाल्यानंतर सातार्‍यातील अकरा तालुक्यांचे स्वतंत्र अकरा मोर्चे निघाले आणि आता कदाचित भविष्यात पुढे शहरांचे आणि जिल्ह्यांचे मोर्चे झाल्यानंतर तालुक्यांचे आणि शहरातील वेगवेगळ्या उपनगरांचे स्वतंत्र मोर्चे निघतील.
 
सुमारे 22 मोर्चांमध्ये सहभाग नोंदविणारे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते विक्रमजी पावसकर यांच्या मते या मोर्चाचे फलित म्हणजे प्रत्येक मोर्चाच्या मागे 25000 मुली लव्ह जिहादमध्ये अडकण्यापासून नैसर्गिकरित्या वाचल्या, असे समजावे.
परिणाम
 
 
मोर्चानंतर सामाजिक स्तरावर या सर्व समस्यांविषयी आलेली जागरूकता
 
हिंदू समाज म्हणून शतपटींनी वाढलेले मनोबल आणि आत्मविश्वास
 
पोलीस आणि प्रशासनाच्या स्तरावर या विषयांची आता योग्य रितीने दखल घेतली जाऊ लागली आहे.
 
लव्ह जिहाद हा आरएसएसचा प्रपोगंडा आहे असे मीडिया आणि बुद्धिजीवी म्हणत होते, ते आता नाइलाजाने का होईना पण ही समस्या आहे असे मानायला लागले आहेत.
 
 
मोर्चातून दिसणार्‍या हिंदू व्होट बँकेच्या प्रभावामुळे कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा राजकीय नेत्याने आत्तापर्यंत या मोर्चाच्या विरोधात एक अवाक्षरही काढलेले नाही.
 
 
सगळे नेते फक्त राजकारणी नसतात,
 
काही हिंदुत्वनिष्ठही असतात
 
राजकीय पक्ष, नेतेमंडळी यांचा या हिंदू जन आक्रोश मोर्चांशी कुठलाही संबंध नव्हता, तरी राज्यपातळीवर काही राजकीय नेतेमंडळी उघड उघड हिंदुत्वाच्या रक्षणासाठी या मोर्चामध्ये उतरली आणि या समस्यांविरुद्ध विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या बाहेरदेखील आवाज उठवला. यामध्ये प्रामुख्याने मा. आमदार नितेशजी राणे, मा. चित्राताई वाघ, मा. आमदार गोपीचंदजी पडळकर, मा. आमदार महेशदादा लांडगे, मा. आमदार भरतशेठ गोगावले, मा. आमदार रामभाऊ सातपुते, मा. आमदार दिलीपजी कांबळे यांचा समावेश होतो.
 
 
गेले दशकभर अनेक तळागाळातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांनी जे जागृतीचे काम केले, त्याला हिंदू समाजाने हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून एक प्रकारे मान्यता दिलेली आहे. हे लेखन मी अशा सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करतो, ज्यांनी स्वत:च्या जिवावर उदार होऊन आणि सातत्य टिकवून लव्ह जिहादसारख्या भीषण समस्येविरुद्ध जागृती केली आणि लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या हजारो हिंदू मुलींना सोडविले.
 
 
मोर्चाची वैशिष्ट्य
 
ना ओघवते वक्तृत्व, ना कसलेले नेतृत्व..
 
साधारण मोर्चा म्हटले की एखादा वक्ता असतो, ज्याच्याकडे ओघवती आणि प्रभावी अशी वक्तृत्वशैली आहे किंवा एखादा कसलेला नेता असतो, ज्याच्या पाठीमागे हजारो लोकांचे पाठबळ आहे. लोक फक्त अशा आपल्या नेत्याची पाठराखण करण्यासाठी किंवा आपल्या आवडत्या नेत्याचं वक्तृत्व ऐकण्यासाठी गर्दी करीत असतात. पण इथे मात्र कुठेही असा एखादा फायर ब्रँड नेता दिसत नाही. या मोर्चाला संबोधित करणारे वक्ते जर आपण बघितले, तरी ते हिंदुत्वाच्या चळवळीतूनच आलेले असे कार्यकर्त्यांमधीलच कोणीतरी नव्याने उभे राहिलेले नवीन वक्ते आहेत, ज्यांना महाराष्ट्र फारसा ओळखत नाही. यावरून हे लक्षात येते की मोर्चामध्ये होणारी गर्दी किंवा लोक हे उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले आहेत.
 
 
ना कुठली संघटना किंवा पक्ष..
 
मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही संघटनेने किंवा कुठल्याही पक्षाने या मोर्चाची हाक दिलेली नाही किंवा मोर्चाच्या आयोजनामध्ये कुठल्याही प्रमुख अशा एकाच संघटनेचा सहभाग नाही, तर सर्व संघटना आपला अभिनिवेश विसरून या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
 
 
धर्म जागरण, हिंदू जागरण, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्री शिव प्रतिष्ठान, सनातन संस्था, हिंदू एकता आंदोलन, सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदू जनजागृती समिती या प्रमुख हिंदुत्ववादी संघटनांबरोबरच सर्व न्याती संस्था, सामाजिक संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळे, वारकरी संप्रदाय, छोटी छोटी प्रतिष्ठाने, दुर्गा वाहिनी आणि मातृ शक्ती, भजनी व आरती मंडळे, सर्व मठ-मंदिरे आणि धार्मिक संस्था यांच्या जोडीला अनेक हास्य क्लब, योग वर्ग, बचत गट, आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रूप, पतंजली परिवार, श्रीराम संघटना, मातंग चेतना परिषद, गुरुद्वारा शीख समाज यांच्या माध्यमातून सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी संपर्क झाल्यामुळे सर्वसामान्य हिंदू कुटुंबे सकल हिंदू समाज म्हणून या मोर्चात रस्त्यावर उतरत आहेत.
 
ना जाहिरातबाजी ना फ्लेक्सबाजी..
 
या मोर्चाच्या प्रसिद्धीसाठी जसे आपल्याला नेहमी दिसतात तसे कुठल्याही मोठ्या राजकीय किंवा सामाजिक नेत्याचे फोटो आणि नावे असलेले फ्लेक्स दिसले नाहीत, जी काही जाहिरात किंवा फ्लेक्स दिसत होते, ते फक्त सकल हिंदू समाज याच नावाने दिसत होते.
 
ना कोणाच्याही विरोधात, ना कुठली नकारात्मकता
 
गेली अनेक वर्षे हिंदू समाजावर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्तबद्ध आवाज म्हणजे हिंदू जन आक्रोश आणि जनगर्जना मोर्चा. या मोर्चांना आत्तापर्यंत कुठलेही गालबोट लागलेले नाही. हिंदू समाजाचा सर्व स्तरांतून उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद.
 
ना जाती, ना पंथ, फक्त हिंदुत्व
 
‘वर्ण-जाती विसरून जाऊन, हिंदू सारे एक होऊ’ अशा पद्धतीचे जबरदस्त असे भारलेले वातावरण. जाती आणि पंथच काय, कुठल्याही संघटनेचा किंचितदेखील अभिनिवेश आणि श्रेयवाद या मोर्चामध्ये जाणवत नाही. सर्व हिंदू बांधव सकल हिंदू समाज म्हणून एकत्र आलेले बघायला मिळतात. ‘कंधों से उपर छाती नही होती, धर्म से उपर जाती नही होती’ यासारख्या घोषणांनी आसमंत दुमदुमून जातो. टाळ-मृदुंग आणि हातामध्ये कार्डशीटवरील स्लोगन्स व भगवे झेंडे, लव्ह जिहादमुक्त मुंबई, लव्ह जिहादमुक्त पुणे असे बोर्ड हातामध्ये धरून सहकुटुंब आलेले सामान्य हिंदू बांधव, ज्यामध्ये महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग. या सर्वांच्या हृदयात एकच भाव जाणवत होता, तो म्हणजे एक दिवस धर्मासाठी, एक दिवस हिंदुत्वासाठी.