मुस्लीम साहित्य संमेलनावर आत्मवंचना आणि राजकारणाचा पगडा

विवेक मराठी    06-Feb-2023   
Total Views |
अ.भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन नुकतेच नाशिक येथे संपन्न झाले. पण मराठी मुस्लीम समाजाला इस्लामला धरून भेडसावणारा धर्मांतर्गत सांस्कृतिक दहशतवाद याला धरून चर्चा झालीच नाही. माझ्या अपेक्षेप्रमाणे हिंदू सांस्कृतिक दहशतवाद यावरच चर्वितचर्वण झाले. फरक एक होता - हिंदू दहशतवाद न म्हणता ब्राह्मणवाद, मनुस्मृती, रा.स्व. संघ यांच्यावरच झोड उठविण्यात आली. आत्मपरीक्षण करणे, समाजात कोणता वैचारिक बदल घडविण्याची आवश्यकता आहे, याची चर्चा न करता 2-3 टक्क्यांची अनेकदा आठवण करून देत त्यांनाच जबाबदार धरत स्वत:चीच फसवणूक, आत्मवंचना करणारे हे संमेलन होते.

sahity
 
दि. 28-29 जानेवारीला नाशिकमध्ये अ.भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्याबाबत सा. विवेकच्या 22 जानेवारीच्या अंकात मी इस्लाम आणि मुस्लीम समाजाअंतर्गत सांस्कृतिक दहशतवाद यांना धरून काही प्रश्न मांडले होते. ते चर्चेत येतील का? हा प्रश्न उपस्थित केला होता. संमेलन आयोजकांना आणि काही वक्त्यांना त्या लेखाच्या ई-प्रती पाठविल्या होत्या. तसेच दि. 22 जानेवारीच्या दै. मुंबई तरुण भारतात संमेलनाला धरून जो लेख प्रसिद्ध झाला, त्याच्याही छापील प्रती संमेलन सुरू होण्यापूर्वी वाटल्या होत्या. संमेलनात कोणत्या मुद्द्यांना धरून चर्चा, विशेषत: साहित्य आणि दहशतवाद या सत्रात कोणती चर्चा अपेक्षित आहे, ते परखडपणे मांडले होते.
 
 
माझ्या दोन्ही लेखांना धरून त्यांचा समाचार(?) घेणारा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात समाजवादी विचारवंत नरहर कुरुंदकर आणि प्रख्यात इतिहास संशोधक सेतुमाधवराव पगडी यांचे लिखाण कसे एकांगी आहे, यावरच ताशेरे ओढले होते. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ते कसे बगल देणारे होते, तो वेगळ्या लेखाचा विषय आहे.
 
 
संपूर्ण संमेलनात मराठी मुस्लीम समाजाला इस्लामला धरून भेडसावणारा धर्मांतर्गत सांस्कृतिक दहशतवाद याला धरून चर्चा झालीच नाही. माझ्या अपेक्षेप्रमाणे हिंदू सांस्कृतिक दहशतवाद यावरच चर्वितचर्वण झाले. फरक एक होता - हिंदू दहशतवाद न म्हणता ब्राह्मणवाद, मनुस्मृती, रा.स्व. संघ यांच्यावरच झोड उठविण्यात आली. आत्मपरीक्षण करणे, समाजात कोणता वैचारिक बदल घडविण्याची आवश्यकता आहे, याची चर्चा न करता 2-3 टक्क्यांची अनेकदा आठवण करून देत त्यांनाच जबाबदार धरत स्वत:चीच फसवणूक, आत्मवंचना करणारे हे संमेलन होते.
 


sahity 
 
काही क्षणचित्रे
 
 
प्रथम निघालेल्या छोटेखानी मिरवणुकीच्या शेवटी सभागृहाच्या प्रांगणात शालेय मुलामुलींनी सादर केलेले पथनाट्य संमेलनाचा राजकीय अजेंडा सुचविणारे होते. हमे काम दो, नौकरी दो इ. राजकीय मागण्यांचा त्यात समावेश होता. मराठी मुस्लीम संतांनी केलेली कवने, त्यांचे गायन यांचा मागमूसही नव्हता. काय ते मराठी मुस्लीम साहित्याचे अलंकार नाहीत? पथनाट्य एका इंग्लिश माध्यमाच्या मदरशाने सादर केले होते. सर्व मुली नखशिखांत बुरख्यात होत्या. इंग्लिश माध्यम असले, तरी आम्ही मध्ययुगीन मानसिकता सोडणार नाही हा अट्टाहास त्यात होता. संमेलनाची स्मरणिका प्रकाशित तर झाली, पण ती मला आणि इतर अनेकांना मिळाली नाही. व्यासपीठ न म्हणता ‘विचारमंच’ असा उल्लेख अनेकदा झाला.
 
 
नेहमी घडते त्याप्रमाणे चर्चासत्रे उशिराने सुरू झाली. खूप वक्ते होते. वक्ते 15-20 पानी भाषणे तयार करून आले होते. त्यांना घाईघाईत आपले विचार मांडावे लागत होते. त्यात विसकळीतपणा जाणवत होता. एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार अगदी शेवटपर्यंत चालला. आयोजकांनी दीपप्रज्वलन ही हिंदूंची मक्तेदारी ठरविल्याने, झाडाला पाणी देण्याच्या उपक्रमाने सुरुवात झाली. प्रास्ताविक भाषण सुरू असताना शेजारच्या मशिदीतून बांग ऐकू आल्यावर भाषण थांबविण्यात आले. त्या वेळी काही लोकांनी टोप्या घातल्या. महिलांनी पदर डोक्यावर ओढून घेतले. परिसंवादात एक गंमत पाहायला मिळाली. नागपूरचे साहित्यिक आणि भाषणात मुलूखमैदान तोफ असे आवेशपूर्ण आक्रस्ताळे भाषण करणारे जावेद पाशा कुरेशी यांना भाषण लांबते आहे अशी सूचना देणारे कोणी आले नाही. दुसर्‍या दिवशी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांचे अध्यक्षीय भाषण सुरू असताना त्यांना दोन-तीन वेळा भाषण आवरण्याची सूचना देण्यात आली. त्यांनी तिथल्या तिथे सौम्य शब्दात निषेध व्यक्त करून मुस्लीम साहित्यिकांना आणि एकंदर मुस्लीम समाजाला खडे बोल सुनविले. त्यांचेच तेवढे भाषण सामाजिक आत्मपरीक्षण करणारे होते. संमेलनात त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली. दिल्लीकर आमंत्रित आरफा खानम शेरवानी आणि गौहर रजांनी संमेलनाला येण्याचे किंवा दिलगिरी व्यक्त करणारे पत्र पाठविण्याचे सौजन्य दाखविलेले दिसले नाही. राजकारणी हुसेन दलवाई यांच्या भाषणाच्या वेळी त्याची मळमळ बाहेर पडली. श्रीमंत कोकाटेही अनुपस्थित होते.
 
 
पहिल्या दिवशीच्या चर्चासत्रात मुस्लीम सांस्कृतिक दहशतवादाच्या मुद्द्याला बगल दिली गेली, हे निदर्शनास आणणारे एक पत्रक मी 29ला सकाळी वाटले. तसेच माझ्या दहशतवादी मुस्लिमांच्या मानसिकतेचा आढावा घेणार्‍या Kafirophobia: Mindset of a home grown jihadi या मोठ्या (पृ. 80) निबंधाच्या पुस्तिकेचे शीर्षक पाहताच हात लावायलासुद्धा अनेक साहित्यिक धजत नव्हते. मी ठरवून एक प्रत हुसेन दलवाईंच्या हातात थोपविली. त्या वेळी घडलेला संवाद मजेदार होता. ती हातात दिल्यावर ते म्हणाले की “मला इंग्लिश वाचता येत नाही.” मी म्हणालो की “वाचणार नसाल तर परत द्या. मला प्रत वाया घालवायची नाही.” त्यावर ते म्हणाले की “माझी पत्नी इंग्लिशची प्राध्यापिका आणि ब्राह्मण आहे. तिच्याकडून समजून घेईन.” एक प्रत संयोजकांपैकी एका सदस्याच्या हातात थोपविली. उद्देश हा की Islamophobiaबाबत तुम्ही तावातावाने बोलता, त्याच वेळी मुस्लीम समाजात अगदी बालपणापासून दृढपणे रुजविल्या जाणार्‍या Kafirophobiaवरही मुक्त चिंतन करायला पाहिजे. त्यामुळे दोन वक्त्यांनी दुसर्‍या दिवशी माझा नामनिर्देश केला.
 
 
sahity
 
चिवडले गेलेले विषय
 
 
वक्त्यांमध्ये काही सेक्युलर हिंदू होते. ते ब्राह्मणवादी दहशतवाद चिवडत बसणार, मुस्लीम समाजातील कुप्रथा आणि पंथोपपंथात अजूनही कडकपणे पाळले जाणारे सामाजिक विभाजन, ‘सर तन से जुदा’ या सांस्कृतिक दहशतवादावर परखडपणे बोलण्याची हिंमत दाखवणार नाहीत हेही अपेक्षाप्रमाणे घडले. तेच काय, इतर 20-25 वक्त्यांमधून एकानेही माझ्या या संदर्भातील प्रश्नांचा उल्लेख करण्याचे टाळले. तो सांस्कृतिक दहशतवाद आम्ही स्वीकारत नाही हे बोलण्याची हिंमत कोणाही वक्त्याने दाखविली नाही. मनुस्मृती, ब्राह्मणवादी सांस्कृतिक दहशतवाद, रा.स्व. संघ इ.वर तोंडसुख घेणारे वक्ते अनेक होते. एकजात सर्वांनी इस्लाम म्हणजे समता, बंधुभाव याची सातत्याने पुनरावृत्ती केली. नवी गोष्ट वारंवार सांगण्यात आली की आम्ही मोगलांचे वारसदार नाही. त्यांनी दख्खनी मुसलमानांना जवळ केले नाही. आम्ही कधीच राज्यकर्ते नव्हतो. संघाच्या प्रतिपादनाचे हे एक प्रकारे समर्थन होते. तेथे अनेक मराठी मुस्लीम शिवाजी महाराजांशी आणि त्यांच्या वारशाशी विविध प्रकारे जवळीक प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात दिसले. उदाहरणादाखल, ‘धर्मनिरपेक्ष राज्य की स्थापना के लिये छत्रपति शिवाजी महाराज का जिहाद’ हे पुस्तक आणि चिपळूणची छत्रपति शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेड आहेत.
 
 
 
जावेद पाशा कुरेशींची दोन घणाघाती वक्तव्ये ऐकताना आपण समता आणि क्षमाशीलतेवर भाषण ऐकतो आहोत की समाजात विद्वेष पेरणी होताना ऐकत आहोत, याचा प्रश्न पडत होता. त्यांनी आपल्या भाषणात मराठी मुस्लीम समाजातील जातिनिष्ठ आणि फिरके-पंथोपपंथांतील घट्ट पकड असलेल्या विषमतेवर एक शब्द काढला नाही, उपाययोजना सुचविणे दूरच राहिले. शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर मुल्लामौलवी देतात तशी ही भडकाऊ भाषणे होती. त्यात अतिरंजित विधानांची सरमिसळ होती. मोडीत निघालेल्या आर्य आक्रमणाचा ब्राह्मणवादी व्यवस्थेशी संबंध जोडणारी गुळगुळीत झालेली कालबाह्य टेप वाजली. कुरेशांच्या अतिरेकी विधानाची एक झलक म्हणजे ‘12व्या शतकात भारतात 32% हिंदू स्वेच्छेने मुसलमान झाले होते.’ त्यांच्या बहुजनांचा धर्म इस्लाम (प्रकाशन 2012) या पुस्तकात त्यांनी ठिकठिकाणी अनेक लेखकांचे संदर्भ दिलेत. मुस्लीम लोकसंख्या 12व्या शतकात 24-25% असल्याचे लिहिताना (पृ. 33) स्वत:चाच (विश्वासार्हता?) संदर्भ दिला आहे. या वेळच्या भाषणात त्यांनी उडी मारून टक्केवारी 32वर आणली. आजकाल टक्केवारी सांगण्याचा परिपाठ असतो. त्याला धरून एका वक्त्याने सांगितले, “शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकूण 1,50,000पैकी 66,000 मुस्लीम होते.”
 
 
काही भाषणात 2024च्या लढ्याचे रणशिंग फुंकण्याची भाषा होती. खरी गम्मत व्यावसायिक राजकारणी हुसेन दलवाईंच्या भाषणात आली. भाजपा, संघ ब्राह्मणवाद इ. तोंडसुख घेताना त्यांनी मळमळ व्यक्त केली की त्यांच्या मुंबई ते दिल्लीच्या राजकीय प्रवासातील अडसर उ.प्र. आणि बिहारी मुस्लीम होते. त्यांनी उपदेश दिला की आमचा-तुमचा प्रवास आंबेडकरवाद्यांबरोबर होणार आहे, हैदराबादच्या शेरवानीवाल्यांना दारात उभे करू नका.
 
 
 
मुस्लीम नेहमी आवर्जून सांगतात की जगात सर्वात प्रथम इस्लामने महिलांना पैतृक संपत्तीत वाटा दिला. अब्दुल कादर मुकादम यांनी त्याचीच पुनरावृत्ती केली. ज्या मनुस्मृतीवर अनेकांनी तोंडसुख घेतले, त्यात अध्याय 9 श्लोक 118मध्ये भावांनी त्यांच्या वाटणीतील एक चतुर्थांश भाग आपल्या कुमारी बहिणीस द्यावा, असे स्पष्ट दिले आहे. मुकादमांसारख्या विवेकी विचारवंताने ठोकून देण्यासारखे विधान करावे, हे योग्य नाही. मुलींना इस्लामने तरी योग्य स्थान दिले का? सर्वच बाबतीत दुय्यम स्थान दिले. अगदी बारशाच्या कुर्बानीच्या वेळी मुलींसाठी एक बकरा, तर मुलांसाठी दोन बकरे, महिलांची साक्ष अर्धी म्हणून दोन महिला साक्षीदारांची आवश्यकता, मुलींना भावांच्या अर्धा वाटा इ. गोष्टी धर्माधिष्ठित आहेत. या चर्चासत्रात ते अधिकच ठळकपणे जाणवले. पैगंबरांचे आईविषयी प्रेम, त्यांनी जहलिया - अंधारयुगात - जन्मलेल्या आईला स्वर्गात स्थान मिळावे यासाठी अल्लाकडे केलेली प्रार्थना (जी अल्लाने नाकारली), त्यांचा आपल्या दूधआईविषयीचा अत्यंत आदर या सर्व गोष्टींचा मुस्लीम वारंवार पुनरुच्चार करत असताना, काही मुस्लीम मराठी महिलांच्या आत्मचरित्रांचा गौरवपर निर्देश होताना संयोजकांनी एकाही महिलेला व्यासपीठावर विषय मांडण्याची संधी देऊ नये? हिदूंना उद्देशून सामाजिक समतेवर भडकाऊ भाषणे ठोकणारे वक्ते आणि संयोजक पुरुषप्रधान व्यवस्थेचे किती गुलाम आहेत हे ठळकपणे दिसले.
 
 
गार वार्‍याची झुळूक
 
 
वारीदरम्यान बुक्का-पूजासाहित्य विक्रेत्या पंढरपूरच्या मुस्लिमांनी महिनाभर मांसाहार वर्ज्य करण्याचा उल्लेख एका आत्मचरित्रात आहे. आपला धर्म न सोडता हिंदू समाजाशी एकरूप होण्याचे हे उत्तम उदाहरण होते. जवळपास सर्वच आत्मचरित्रांत गावच्या हिंदूंनी भेदभाव न करता कशी मदत केली, याचे उल्लेख आहेत. त्या सर्वांवर कडी करणारे आत्मचरित्र आणि हिंदू समाजातील लोकांनी वर येण्यास कशी मदत केली याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख कुलगुरू डॉ. पठाण यांनी पुस्तक प्रकाशनादरम्यान केला.
 
 
 
मुस्लीम साहित्यावरील चर्चासत्रात मराठी मुस्लीम संतकवींचा उल्लेख टाळता आला नाही. तसे झाले असते, तर ते वैचारिकदृष्ट्या कलुषित ठरले असते. हे संतकवी विठ्ठलभक्तीत रममाण झाले होते. एका वक्त्याने निर्देश केल्याप्रमाणे अल्ला आणि विनायक-गणेश यांच्याप्रती एकच भक्तिभाव दर्शविणारे हे मध्ययुगीन संत मूर्तिभंजक भावनेचे बंधन तोडलेले खर्‍या अध्यात्माचे पाईक होते. संत तुकारामांचा वारंवार उल्लेख झाला. शांतता आणि धर्मातीत समानता उलगडणारा एक धागा त्यातून समोर आला. दुसर्‍या दिवशीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वेधसत्राच्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात डॉ. पठाण यांनी श्रोत्यांना चार खडे बोल सुनावले. “दाढी, टोपी, विजार यात इस्लाम अडकवून ठेवू नका. हमीद दलवाईंना पडत्या काळात मदत करणारे हिंदू होते. मुस्लीम समाजाने दोन घोडचुका केल्या. डॉ. बाबासाहेब जेव्हा समतेची लढाई लढत होते, तेव्हा मुस्लीम समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. (तेव्हा त्यांना पाकिस्तानचे मृगजळ खुणावत होते.) (ढोंगी) मुस्लीम समाजाने भारतीय संस्कृतीशी एकरूपता साधण्याची स्वातंत्र्योत्तर काळातील संधी गमावली. आताही जेव्हा अतिरेकी मुस्लीम हिंसाचार करतात, त्याच्या विरोधात जर तुम्ही निषेध नोंदविला नाही, मोर्चे काढले नाही, तर अतिरेकाला तुमची संमती आहे असे बहुसंख्य हिंदू धरून चालतील.”
 
 
 
संमेलनाच्या शेवटी केलेल्या ठरावात मराठी साहित्य संमेलनात मुस्लीम मराठी साहित्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली. मुस्लीम समाजाने शिक्षणाची कास धरावी असे अनेक वक्त्यांनी आणि ठरावात नमूद करण्यात आले. त्याच वेळी शासनाने कमी नव्हे, 10 लाख शिष्यवृत्त्या देणे सुरू केले आहे, त्याच्या उल्लेख झाला नाही. मुस्लीम आरक्षणाबरोबरच मुस्लीम लेखकांना शासकीय अनुदानाची मागणी नोंदविण्यात आली.
 
 
राजकारण आणि आत्मवंचना या मिश्र वातावरणात हे संमेलन पार पडले.

डॉ. प्रमोद पाठक

अभियांत्रिक म्हणून उच्चविद्याविभूषित असणारे डॉ. प्रमोद पाठक हे 'गोवा एनर्जी डेव्हलपमेण्ट एजन्सी' अर्थात 'गेडा'चे प्रमुख म्हणून काम पाहतात. कामानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहण्याचा त्यांना वारंवार योग आला. मुस्लीम प्रश् आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांचा खास अभ्यासविषय आहे. या विषयावरील लेखन साप्ताहिक विवेक तसेच अन्य नियतकालिकांतून सातत्याने प्रकाशित होत असते.