रामपंथी मुसहर आणि वतनपरस्त मौलाना

विवेक मराठी    06-Feb-2023
Total Views |
@सुषमा पाचपोर
  
 काशी येथील विशाल भारत संस्थानच्या विद्यमाने 19 ते 25 जानेवारी दरम्यान सहा दिवसांच्या ‘सुभाष महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले होते. अत्यंत मागासलेले, दलित अशा मुसहर समाजातील बांधवांना श्रीरामपंथाची दीक्षा आणि श्रीरामनामाचा मंत्र देऊन या सुभाष महोत्सवाची सुरुवात झाली. तसेच शेकडो मुस्लीम मौलाना-मौलवींनी आपल्या ‘वतन परस्ती’चा परिचय देत पूर्वज, मातृभूमी आणि संस्कृती यांमुळे आम्ही सर्व हिंदुस्तानीच आहोत, या सत्याचा एकमुखाने उद्घोष केला.
  

Rampanthi Musahar and patriot Maulana
‘रामाच्या नावाने कोण वाया गेले, जळी तरले पाषाण’ अशी एक कविता आम्ही शाळेत शिकलो होतो. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील छितौना जलालपूर या गावात त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. प्रसंग होता भगवान श्रीरामांच्या सहकार्‍यांच्या वंशजांना सन्मानित करण्याचा आणि त्यांना रामनामाचा मंत्र देऊन पुनश्च श्रीरामकार्यात सक्रिय करून घेण्याचा, तोदेखील पूज्यपाद शंकराचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या आशीर्वादाने!
 
 
काशीच्या विशाल भारत संस्थानद्वारा 24 जानेवारी रोजी आयोजित राम पंथ दीक्षा कार्यक्रमात मुसहर आणि आदिवासी समाजाच्या सुमारे 600 लोकांना श्रीरामनामाच्या मंत्राची दीक्षा देऊन त्यांना श्रीराम पंथात दीक्षित करण्यात आले. या घटनेमुळे जौनपूरची भूमी या नव्या क्रांतिकारक सांस्कृतिक पुनर्जागृती प्रक्रियेची साक्षीदार बनली. शंकराचार्य श्री स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या हस्ते मुसहर आणि आदिवासी समाजाच्या घटकांना दिक्षा दिली जाणे ही खरोखरच एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक घटना आहे.
 

Rampanthi Musahar and patriot Maulana 
 
मुसहर समाज हा उत्तर प्रदेशातील आणि बिहारमधील अत्यंत मागासलेला असा समाज आहे. शिक्षण, आरोग्य, आधुनिक सुधारणा या सर्वापासून दूर असा हा समाज मुख्य धारेपासून आजपर्यंत वंचितच राहिला आहे. त्यांना मंदिरातसुद्धा जाण्याची अनुमती नाही. अशा या समाजाला ख्रिश्चन मिशनरी संस्थांनी लक्ष्य केले नसते, तरच नवल होते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे मिशनरी पोहोचले आणि त्यांचे धर्मांतर होऊ लागले.
 
 
 
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विशाल भारत संस्थानचे प्रमुख प्रा.डॉ. राजीव श्रीवास्तव पुढे सरसावले आणि काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक आणि विशाल भारत संस्थान चे मार्गदर्शक तसेच श्रीराम पंथाचे प्रणेता इंद्रेश कुमार यांच्या नेतृत्वात या मुसहर समाजाचा मंदिर प्रवेश सोहळा झाला होता. त्या वेळी मंदिरात प्रवेश करताना आणि मूर्तीचे जवळून दर्शन घेतांना या लोकांचे डोळे पाणावून गेले होते.
 

Rampanthi Musahar and patriot Maulana 
 
याच प्रक्रियेचा पुढचा टप्पा म्हणजे या समाजातील लोकांना श्रीरामपंथाची दीक्षा देऊन समाज आणि राष्ट्रकार्यात सहभागी करून घेणे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 126व्या जयंतीचा मुहूर्त साधून विशाल भारत संस्थानने सुभाष महोत्सवाचे आयोजन केले होते. या आयोजनाचा एक कार्यक्रम म्हणून हा दीक्षा समारंभ होता.
 
 
ईशान्येकडील प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांतून या कार्यक्रमासाठी एकत्रित आलेल्या मुसहर आणि आदिवासी समाज बांधवांचे चेहरे प्रसन्नतेने फुलले होते. आज त्यांना ‘हिंद्व: सोदर: सर्वे, न हिंदू पतितो भवेत’ याची प्रचिती यायची होती. आपल्या सनातन परंपरेत शंकराचार्यांना सर्वोच्च सन्मान दिला आहे. त्याच शंकराचार्यांच्या पावन उपस्थितीत आज या मुसहर समाजाच्या बांधवांना ‘सब के राम, सब मे राम’ याचे प्रत्यंतर मिळणार होते. सनातन धर्माचे व्यावहारिक स्वरूप सर्वसमावेशक करण्यासाठी राम पंथाचा मंत्र आहे ‘सब के राम, सब मे राम’.
 
 
जातींमध्ये भेदभाव दूर सारून समरसतेची आणि एकात्मतेची भावना जागविण्यासाठी देशभर रामसंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे रामपंथाचे ध्येय आणि मिशन आहे. त्यासाठी गाव-गावात श्रीराम परिवार मंदिरे उभारण्यात येतील, ज्यात प्रभू श्रीराम आणि त्यांचे सर्व बंधू - लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि त्यांच्या सहचारिणी, तसेच श्री हनुमान यांच्या मूर्ती असतील. लोकांमध्ये परस्पर कौटुंबिक स्नेह, प्रेम, वाढीस लागावे यासाठी प्रभू श्रीरामाच्या संयुक्त कुटुंबाचे दर्शन प्रेरणादायक ठरेल, असे मत रामपंथाचे आचार्य डॉ. राजीव श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.
 
 
रामपंथाने सर्वांना पूजा करण्याचा आणि पुजारी होण्याचा अधिकार दिला आहे. मुसहर समाजाचे लोक कधी वनवासात आणि लंकेवरील चढाईच्या दरम्यान श्रीरामांसोबत होते. रावणासारख्या दुरात्म्याच्या विरुद्ध लढाईत त्यांनी श्रीरामांची साथ दिली. पण आजच्या बदलत्या परिस्थितीत यांची अवस्था दयनीय झाली आहे. समाजातील सर्वात उपेक्षित आणि तिरस्कृत जीवन त्यांच्या वाट्याला आले आहे. अशा लोकांना श्रीरामपंथात दीक्षित करून त्यांना आदरपूर्वक पुजारी होण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आणि तोदेखील सनातन धर्माचे सर्वात श्रेष्ठ धर्माचार्य शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या गरीमामय उपस्थितीत!
 
 
वरिष्ठ संघप्रचारक इंद्रेश कुमार यांच्यासह काशीचे सात वैदिक ब्राह्मण पंडित अमित पुरोहित यांच्या नेतृत्वात या सर्व रामपंथी लोकांच्या द्वारा हवन करण्यात आले. गंगाजल आणि पंचगव्य शिंपडून त्यांना गुरुमंत्र घेण्यासाठी तयार करण्यात आले.
 
 
या वेळी पूज्य शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती, रामपंथाचे संस्थापक इंद्रेश कुमार, आचार्य डॉ. राजीव श्रीवास्तव, पातालपुरी मठाचे पीठाधीश्वर, महंत बालक दास, अयोध्या साकेत भूषण श्रीराम पीठाचे पीठाधीश्वर महंत शंभूदेवाचार्य आचार्य विपिन, गया येथील संत चुन्नू साई या सर्वांनी मुसहर आणि आदिवासी दीक्षितांच्या गळ्यात तुळशीमाळ घातली, त्यांना रामनामी दुपट्टा दिला आणि श्रीरामनामाचा गुरुमंत्र दिला.
 
 
गुरुमंत्रप्राप्त सर्व मुसहर लोकांच्या चेहर्‍यावर अतीव प्रसन्नता आणि संतोष झळाळत होता. या सर्वांना गाव-गावात रामकार्य म्हणजेच देशकार्य करण्याची आणि प्रत्येक गावात श्रीराम परिवार मंदिर बनविण्याची जबाबदारी देण्यात आली. एकूण 309 महिलांनी आणि 219 पुरुषांनी या वेळी रामपंथाची दीक्षा घेतली. सोनभद्र येथील दीक्षित द्वारिका प्रसाद खारवार यांना रामाचार्य पदवीने सम्मानित करण्यात आले आणि त्यांना पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला.
 
 
शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती आपल्या आशीर्वचनात म्हणाले की “भारतात ज्यांचा जन्म झाला आहे, ते सर्व हिंदूच आहेत. भारतमातेचे पुत्र आहेत. सर्व समान आहेत, कुणीही उच्च-नीच नाही. राम हा तारक मंत्र आहे. प्रभू श्रीरामांचे नाव घेत देशाप्रती आणि धर्माप्रती निष्ठा व्यक्त करून समाजकल्याणाचे काम करीत राहा. आमच्या वनवासी समाजात ख्रिश्चन मिशनरी धर्मांतराचे काम करीत आहेत. त्यांचे हे कारस्थान हाणून पाडले पाहिजे. आजच्या या दीक्षान्त समारंभाने माझी ही चिंता दूर झाली आहे. आपण सर्व एक आहोत याची अनुभूती या कार्यक्रमाने पुन: एकवार घेता आली आहे. आमच्या समाजात कुणीही अशुद्ध नाही, अस्पृश्य नाही, कारण निसर्गात असे भेदभाव नाहीत. रामपंथ हिंदू सांस्कृतिक पुनर्जागृती प्रक्रियेत एक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा माझा आशीर्वाद आहे. आपण सर्व हिंदू म्हणून राहू या आणि हीच माझी दक्षिणा आहे.”
 
 
इंद्रेश कुमार या वेळी म्हणाले की “आज या दीक्षान्त समारोहाने हे दाखवून दिले की आमच्या हिंदू समाजात कुणीही अस्पृश्य नाही. यांच्या सन्मानाने भारतीय संस्कृतीचा सन्मान वाढला आहे.” डॉ. राजीव श्रीवास्तव म्हणाले की “सर्व धर्मांत समन्वय स्थापन करण्याचे काम रामपंथाचे हे कार्यकर्ते करतील. त्यासाठी आम्ही‘रामसेतू योजना’ सुरू केली आहे.”
 
 
“आम्ही सर्वच हिंदुस्तानी आहोत”
 
 
मुस्लीम मौलानांनी केली घोषणा
 
 
एकीकडे मुसहर आणि आदिवासी समाजाला रामपंथाची दीक्षा देऊन देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयोग यशस्वीपणे पार पडला, तर दुसरीकडे त्याच सुभाष महोत्सवाच्या दरम्यात आयोजित ‘जलसा-ए-उलमाए इस्लाम’ या कार्यक्रमात शेकडो मुस्लीम उलेमा, मौलवी आणि मौलाना सहभागी झाले आणि त्यांनी दहशतवाद आणि कट्टरतेच्या विरोधात काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
 

Rampanthi Musahar and patriot Maulana 
 
कार्यक्रमाचा प्रारंभ करीत मौलाना हाफिज जावेद खान म्हणाले की “वर्तमानकाळात दहशतवाद भारतासाठी आणि जगासाठीसुद्धा एक मोठेच संकट आहे. आम्ही सर्व मौलाना या दहशतवादाचा कठोरतेने विरोध करण्यासाठी इथे एकत्रित आलो आहोत. आम्ही सर्व मिळून त्यांचा मुकाबला करू. आम्ही सर्व हिंदुस्तानी आहोत आणि आमच्या हिंदुस्तानात अनेक पंथांचे लोक मिळून-मिसळून शांततेत राहतात. पण काही लोकांना आमचे हे असे राहणे आवडत नाही. त्यामुळे असे लोक समाजात विद्वेष पसरवितात. पण आम्ही आता त्यांचे हे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही.”
 
 
आणखी एक मुस्लीम धर्मगुरू मौलाना शफिक अहमद मुजाद्दिदी म्हणाले की “आम्हीही या देशासाठी आमचे रक्त सांडले आहे. आम्ही मानवतेचे आणि देशाचे शत्रू नाही. जोवर शरीरात प्राण आहेत, तोवर आम्ही आमच्या प्रिय देशाकरता जगू आणि कुर्बानीसुद्धा देऊ.”
 
 
मौलाना मकसूद अहमद कादरी म्हणाले की “जोवर आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो आणि परस्पर बंधुभावाने राहतो, तोवर आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाचीही हिम्मत होणार नाही. आपसातील तिरस्काराची आणि द्वेषाची भावना समूळ नष्ट करायची असेल, तर आम्हाला आमच्या देशाच्या प्रत्येक वस्तूवर प्रेम करावे लागेल.”
 
 
मऊचे मौलाना तहरीर चतुर्वेदी म्हणाले की “काश्मीर जर भारताचा स्वर्ग आहे, तर भारत हा जगाचा स्वर्ग आहे. आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला भारतात जन्म मिळाला. त्यामुळे आमच्यासाठी देश सर्वप्रथम आणि धर्म नंतर आहे.”
 
 
या कार्यक्रमात सामील झालेल्या मुस्लीम धर्मगुरूंचे हे प्रातिनिधिक विचार आहेत. आज देशातील मुस्लीम समाजात एक नवीन मंथन सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी केरळचे मौलाना अब्दुलखादर यांनी “जगात मुसलमानांना पूर्ण स्वातंत्र्य कुठे असेल, तर ते फक्त भारतातच आहे” असे वक्तव्य केले होते. मुस्लीम देशांतसुद्धा इतके स्वातंत्र्य नाही, असे ते म्हणाले होते. हे मौलाना महाशय संघवाले नाहीत, तर चक्क साम्यवादी पक्षाचे आहेत.
 
 
केरळचे राज्यपाल श्रीमान आरिफ मोहम्मद खान म्हणाले की “हिंदू ही एक धार्मिक संकल्पना नाही, तर ती भौगोलिक संकल्पना आहे. त्यामुळे मी जसा हिंदू आहे, तसेच या देशात राहणारे सर्वच हिंदू आहेत.” वर नमूद केलेले मौलानांचे उद्गार आणि केरळच्या या नेत्यांचे भाव याच शाश्वत सत्याकडेच अंगुलिनिर्देश करीत आहेत, नाही का? अगदी काही दिवसांपूर्वी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनीही असेच विचार व्यक्त केले होते.
 
 
 
या ‘जलसा-ए-उलमाए इस्लाम’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे संस्थापक आणि मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी विशाल भारत संस्थानने स्थापन केलेल्या हिंदू-मुस्लीम संवाद केंद्राचे उद्घाटन केले. या वेळी आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले की, “या संवाद केंद्राच्या माध्यमातून हिंदू आणि मुस्लीम समाजाचे लोक प्रत्येक महिन्यात चर्चा आयोजित करून दोन्ही समाजांत परस्पर बंधुभाव कसा निर्माण करता येईल, याबद्दल विचार करतील. काशीच्या या संवाद केंद्राच्या माध्यमातून संघर्ष आणि तिरस्कार यांऐवजी परस्पर प्रेम आणि बंधुभाव वाढेल आणि अनेक समस्यांचे उत्तर सहजतेने मिळेल.”
 
 
 
इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की “आपल्या सर्वांचे पूर्वज, मातृभूमी आणि संस्कृती एकच आहे, म्हणूनच तर आमचा डी.एन.ए. एक आहे असे म्हटले जाते. ‘डी’चा अर्थ आहे ड्रीम म्हणजे स्वप्न. आम्ही जी काही स्वप्ने पाहतो, त्यांची भाषा ही आमची मातृभाषाच आहे. ‘एन’चा अर्थ आहे नेशन म्हणजे मातृभूमी आणि ‘ए’चा अर्थ आहे Ancestor म्हणजे पूर्वज. त्यामुळे आमचे सर्वांचे वतन म्हणजे मातृभूमी आणि पूर्वज एकाच आहेत. मग आम्हाला कोण अलग करू शकेल?”
 
 
विशाल भारत संस्थानचे अध्यक्ष आणि सुभाष महोत्सवाचे शिल्पकार डॉ. राजीव श्रीवास्तव म्हणाले की “सुभाष भवन ही अशी एक जागा आहे, जिथे हिंदू-मुस्लीम एका कुटुंबातील सदस्यांसारखे मिळून मिसळून राहतात. हिंदू-मुसलमान यांच्यातील संघर्ष समाप्त करण्याच्या दृष्टीने सुभाष भवन हे एक उत्तम अनुकरणीय उदाहरण आहे.”
 
 
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी इंद्रेश कुमार आणि मुस्लीम धर्मगुरू यांनी मिळून नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मंदिरात पुष्पांजली अर्पण केली आणि दीपप्रज्वलन केले. या वेळी सभागृहात बसलेल्या मुस्लीम धर्मगुरूंनी ‘हिंदोस्तान जिंदाबाद’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत हिंदू-मुस्लिमात फूट पाडणार्‍या देशविघातक शक्तींना एक कठोर संदेशच दिला.
 
 
सुभाष मंदिरात नेताजींच्या प्रतिमेकडे एकटक पाहणार्‍या जौनपूरच्या नौशादभाईंचे डोळे पाणावले होते. ते म्हणाले की “आमच्या परिवारातील सदस्य नेताजींच्या आझाद हिंद फौजेत होते. संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले, खंडित भारतासाठी नाही. नेताजी असते, तर देशाचे विभाजन झाले नसते आणि हिंदू-मुस्लिमांत फूट पडली नसती.”