की तिने सुगंधा घ्यावे.....

विवेक मराठी    06-Feb-2023
Total Views |
lata mangeshkar
 
 @अंजोर पंचवाडकर
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांसाठी आदराचा विषय. लतादीदींनी त्यांच्या आर्त स्वरांनी सावरकरांच्या अनेक गीतांचे सौंदर्य वाढवले. लतादीदींच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त लतादीदींचे स्वर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची गीते यांचे ऋणानुबंध उलगडणारा लेख.
लताबाईंना जाऊन बघता बघता एक वर्ष झाले. अर्थात अमरत्वाचे वरदान लाभलेला तो स्वर, शतकानुशतके येणार्‍या पिढ्यांना रिझवत राहील, प्रसंगी आधार देत राहील.
 
 
सात दशकांच्या गायन कारकिर्दीत हर तर्‍हेची गाणी लताने गायली आहेत. त्याबद्दल नव्याने किती आणि काय काय बोलणार? विवेकने एक वेगळा विषय देऊन ’स्वातंत्र्यवीर सावरकर यांची लताने गायलेली गाणी’ यावर लिहिणार का? असे विचारले, तेव्हा पटकन आठवलेली 4 गाणी - ती एकूणही तेवढीच आहेत, पण ती इतकी लोकप्रिय आहेत की सावरकर-मंगेशकर गाणी हा महत्त्वाचा विषय ठरावा.
 
 
 
‘ने मजसी ने’, ‘जयोस्तुते’, ‘जयदेव जयदेव जय जय शिवराया’ आणि ‘हे हिंदुशक्ती संभूत दीप्तीतम तेजा’ ही ती चार गाणी!
स्वातंत्र्यवीरांची भाषा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वासारखीच प्रखर आणि ओजस्वी. आपण देवदेवतांच्या आरत्या पूर्वापार गात आलोय. पण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सावरकरांनी लिहावी, त्याला पं. हृदयनाथ मंगेशकरांनी चाल लावावी आणि स्वराने ओवाळावी ती लताबाईंनी! कुठल्या नक्षत्रावर हे सगळे योग जुळून आले असतील?
 
 
आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
 
 
आला आला, सावध हो शिवभूपाला
 
 
सद्गदिता भूमाता दे तुज हांकेला
 
 
करुणारव भेदुनी तव हृदय न कां गेला!
 
 
या ओळी ऐकताना सर्रकन काटा येतो अंगावर! ’दे तुज हाकेला’ अशी आळवणी करताना टिपेला पोहोचलेला लताचा स्वर, ’भूमातेची हांक तुझे हृदय भेदून कशी जात नाही?’ विचारताना किती आर्त होतो!
 
 
 
आपल्या लाडक्या शिवबाला सावरकर कृष्णाच्या जागी पाहतात.
 
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
 
भगवन् भगवद्गीता सार्थ कराया या!
 
आमचे शिवाजीराजे कसे? तर जणू प्रकाशातून जन्मलेले ओजस्वी हिंदुरत्न! महान राज्यकर्त्याला आवश्यक सारे गुण, शुद्धी, बुद्धी, युक्ती, शक्ती छत्रपतीच्या ठायी एकवटलेत.
 
 
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
 
 
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
 
 
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
 
 
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी!
 
 
‘जयोस्तुते’ आणि ‘ने मजसी ने’ ही दोन्ही गीते अजरामर आहेतच. असंख्य मराठी मनाच्या कप्प्यात त्यांना फार मोलाचे स्थान आहे.
 
 
 
‘जयोस्तुते’ हे लताबाईंनी गायलेले, मधुकर गोळवलकर यांनी संगीत दिलेले समूह स्फूर्तिगीत आहे. सुरुवातीच्या म्युझिक पीसपासून प्रत्येक ओळीमध्ये खरेच स्फूर्ती जागवण्याची ताकद आहे. याउलट, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे मातृभूमीसाठी लिहिलेले विरहगीत आहे. इतक्यात भारतात जाणे शक्य नाही, हे समजल्यावर ब्रायटनच्या समुद्रकिनारी विषण्ण अवस्थेत लिहिलेली ती कविता. मंगेशकर भावंडांनी एकत्र गाऊनसुद्धा यातला हताशतेचा पदर जाणवतो. संगीतकारांनी आणि गायकांनी शब्द समजून गाणे केले की कवीच्या शब्दांना कसा यथोचित न्याय मिळतो.
 
 
 
सावरकर हा लताचा आणि सगळ्याच मंगेशकर कुटुंबीयांचा प्रेमाचा, आदराचा विषय. लताबाईंचे वडील स्वरसूर्य मास्टर दीनानाथ मंगेशकर हे शिवराय, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांचे डोळस भक्त होते. दीनानाथांनी गायलेली सावरकरांच्या ‘संन्यस्त खड्ग’मधली ‘शतजन्म शोधताना’ आणि ‘सुकतातची जगी या’ ही नाट्यगीते किती अफाट ताकदीची आहेत.
 
 
’मोठी तिची सावली’ या लताबाईंवर लिहिलेल्या पुस्तकात मीना खडीकर सांगतात, ‘बाबा (दीनानाथ) प्रखर देशाभिमानी होते. सावरकरांच्या जातिनिर्मूलन चळवळीत त्यांचा पुढाकार असायचा. भारताला स्वातंत्र्य मिळाले, ते पाहायला बाबा हवे होते. देव, धर्म, संस्कृती यावर बाबांची नितांत श्रद्धा. कदाचित त्यांनी आणि वीर सावरकरांनी एखादे नवीन नाटक निर्माण केले असते.’
असे वडील आपल्यामागे आपल्या देवदत्त प्रतिभेच्या मुलांसाठी फक्त चिजा लिहिलेली वही आणि तानपुरा सोडून जातील? दीनानाथांनी सुरांचा ठेवा दिलाच, त्याबरोबर स्वाभिमानाचा आणि देशाभिमानाचा वारसाही सोपवला. हृदयनाथ सावरकारांच्या विचारांनी इतके भारावले होते की त्यांना आपले जीवन समाजकार्याला वाहून घ्यावे असे वाटू लागले होते. सावरकरांनीच त्यांना समजावले.
 
 
 
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा।
 
 
हा व्यर्थ भार विद्येचा॥
 
 
 
जे काम आपण करत असतो, त्यात आपली मूल्ये ओतावीत, त्याचा उपयोग आपल्या मातृभूमीसाठीच व्हायला हवा ही तात्यारावांची शिकवण आणि दीनानाथांचा देव-देश-धर्मप्रेमाचा वारसा लताबाईंनी आणि हदयनाथांनी किती शिरोधार्य मानला, ते त्यांच्या शिवकल्याण राजा, मीराबाई, ज्ञानेश्वर, भगवदगीता अशासारख्या कलाकृतीतून, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या उभारणीतून जाणवतोच, नाही का?
 
 
 
जणू लताला आदरणीय असलेले तात्याराव आणि तिचे प्रिय बाबा, आपला वारसा पुढे नेणार्‍या लताला म्हणताहेत -
 
 
गुणसुमनें मी वेचियली या भावें।
 
 
की तिने सुगंधा घ्यावें॥
 
 
 
यांच्या प्रखर विद्वत्तेची गुणसुमने लतानेही वेचली आणि आपल्यापर्यंत त्याचा स्वरसुगंध पसरवला.
 
 
मला तर लताचे गाणे ही, तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्य तूची असेच वाटत आले आहे!