रात्रपाळी आरोग्य जाळी

विवेक मराठी    06-Feb-2023   
Total Views |

 
seeping
 
निद्रा यत्तं सुखं दु:खं पुष्टीकार्श्यबलाबलम्।
 
वृषता क्लीबता ज्ञानमज्ञानं जीवितं न च॥
  
मनुष्याचे सुख/दु:ख, शरीराची पुष्टी/लुकडेपणा, बल/दुबळेपणा, प्रजननक्षमता/वंध्यत्व, ज्ञान/अज्ञान, जीवन/मृत्यू इत्यादी सर्व परस्परविरोधी गोष्टी झोपेवर अवलंबून असतात. ‘अर्धरोगहरी निद्रा’ अर्थात योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतलेली झोप ही मनुष्याचे अर्धे आजार बरे करते.
  
शास्त्रात इतकं माहात्म्य सांगून गौरवलेल्या झोपेचा विचार आपण गांभीर्याने करतो का? केवळ मनोरंजनासाठी ’आमच्या ग्राहकाची झोप ही आमची सर्वात मोठी व्यावसायिक शत्रू आहे’ असं राजरोस कबूल करणार्‍या जढढ मीडियाच्या आपण किती आहारी जात आहोत, याची आपल्याला कल्पना आहे का?
 
 
खरं तर मुंबईतील गिरण्यांची धडधड बंद झाल्यामुळे रात्रपाळी करणार्‍या कामगारांचं प्रमाण आता कमी झालं असलं, तरी हा विशिष्ट वर्ग आज सर्वत्र अस्तित्वात आहे. शिवाय संगणकांची कॉल सेंटर्स, भरमसाठ फोफावलेल्या आणि 24 तास चालणार्‍या मीडियाचे सर्व कार्यकर्ते, स्पर्धात्मक जगात सतत आघाडीवर राहण्यासाठी धडपडणारे विद्यार्थी, मंदीच्या काळात ’रात्र वैर्‍याची आहे’ असा जप करत जागणारे व्यावसायिक, आम्हीच प्रथम बातमी देतो याचा तोरा मिरवणारे पत्रकार, परदेशी कंपन्यांमध्ये काम करताना इथे बसून त्यांच्या दिवसरात्री जगणारे समस्त बुद्धिमान अशा विस्तारित वर्गाला रात्री जागरण करून कामं करावी लागतात. सुुदैैवाने यातून वाचलेल्या 50% लोकांपैकी 30% लोक हौसेने जागतात. रात्री टीव्ही/सोशल मीडिया बघत, गप्पा मारत, पार्ट्या करत अशा विविध पद्धतीने जागणं खूप लोकांना आवडतं. रात्रीच्या जागरणाला वयाचं बंधनदेखील नाही. दोन महिन्याच्या मुलापासून 80 वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत सर्व जण जागरणरूपी ’घी’चा आस्वाद घेत असतात, मात्र त्याच्यापाठीमागे दडलेल्या अनारोग्याचा ’बडगा’ अनदेखा राहतो. आयुर्वेदशास्त्र सांगतं, ’रात्रौ जागरणं रुक्षम्।’ म्हणजे रात्री जागरणामुळे शरीरात उष्णता आणि रुक्षता निर्माण होते. त्यामुळे केस, नखं, स्वर, सांधे, डोळे इत्यादी अवयव रुक्ष होतात. आंत्राला आणि त्वचेलादेखील रुक्षता येते. उष्णतेमुळे शरीरात पित्त वाढतं. याचा परिपाक म्हणून नियमित जागरण करणार्‍या व्यक्तींना वार्धक्य लवकर येतं. इंद्रियं अकार्यक्षम होणं (कमी दिसणं, कमी ऐकू येणं इ.) केस पांढरे होणं वा गळणं, सांधेदुखी, सांध्यातून आवाज येणं, निद्रानाश, रुक्ष त्वचा, सुरकुत्या असे वार्धक्याचे परिणाम जागरण करणार्‍या व्यक्तींच्या शरीरात लहान वयातच दिसू लागतात. याशिवाय अम्लपित्त, वजन कमी होणं, सांधेदुखी, पचनाच्या तक्रारी असे विविध आजारदेखील बळावतात. केवळ रात्री जागरण पुरेसं नाही की काय, म्हणून रात्रपाळी करणार्‍या व्यक्ती आहारविषयक प्रमादही भरपूर करतात. कंपनीत किंवा रात्री काम करताना थंड पेय, मद्य, मसालेदार पदार्थ, तिखट पदार्थ, चहा, आंबट-खारट चवीचे चायनीज पदार्थ, ब्रेड, सामोसे, वडापाव असे विदाही पदार्थ. यांचं सेवन रात्रीच्या जागरणाबरोबर सुरूच असतं. सकाळी काम संपवून घरी परतताना स्टेशनच्या बाहेरच डोसे, सामोसे, भजी, चहा असे पचायला जड आणि पित्तकर पदार्थ खाऊन हे लोक घरी येतात. त्यानंतर लगेच अंघोळ करून झोपतात. रात्रपाळी करणारे खूप लोक अशा उलट्यासुलट्या क्रमाने आचरण करताना आढळतात. त्याचा परिणाम म्हणून रात्रपाळी करणारी व्यक्ती अधिक काळ रोगीच राहते. रात्रपाळी करणं हा खूप व्यक्तींचा नाइलाज असतो. ती चालू ठेवून आरोग्य राखायचं असेल, तर अशा व्यक्तींनी आयुर्वेदाचा आधार घेऊन, नियमपूर्वक स्वत:ची दिनचर्या आणि जीवनशैली सुधारून घ्यायला हवी.
 
 
आहाराचे नियम
 
 
रात्री जागरणाने वाढणार्‍या वात आणि पित्त या दोन दोषांचं शमन करण्यासाठी, रात्रपाळी करणार्‍या व्यक्तींनी गोड, स्निग्ध आणि ताजा आहार घ्यावा. गहू-तांदूळ-मुगाचे पदार्थ तुपाबरोबर खावे. दूध आणि दुधाच्या पदार्थांचा (उदाहरणार्थ खीर, लोणी, तूप) आहारात नेहमी समावेश असावा. रात्री काम करतानाही चहाऐवजी दूध घ्यावं. भूक लागली असतानाच आहार सेवन करावा, तसंच भूक लागली असताना उपाशी राहू नये. वाताचं आणि पित्ताचं शमन करणारं तूप हे रात्रपाळी करणार्‍यांसाठी श्रेष्ठ औषध आणि श्रेष्ठ आहार आहे, म्हणूनच रोजच्या आहारात देशी गायीच्या किंवा म्हशीच्या तुपाचा अवश्य समावेश करावा. मसालेदार आणि तळलेले पदार्थ पित्ताचा प्रकोप करतात. थंड पेयांमुळे शरीरात वातदोषाची रुक्षता वाढते. मद्यपानानेदेखील शरीरात उष्ण आणि रुक्ष हे गुण वाढतात. रात्रपाळीच्या लोकांनी या पदार्थांचं सेवन करणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे, म्हणूनच शिळे-मसालेदार-थंड पदार्थ, मद्य हे प्रकार टाळावे. अतिशय आंबट किंवा अतिशय खारट पदार्थ सातत्याने खाल्ल्यासदेखील वार्धक्य लवकर येतं, म्हणून रात्रपाळी करणार्‍या व्यक्तींनी लोणचं, पापड, व्हिनेगर, सॉस, खारवलेले पदार्थ न खाल्लेले बरे. रात्रपाळी करणार्‍या लोकांनी सहसा उपवास करू नये. सध्या प्रचलित असलेले उपासाचे पदार्थ तर अजिबात खाऊ नयेत. एकावेळी पोटाला तड लागेल इतकं जेवू नये. लसूण, आलं, मिरची इत्यादी मसालेदेखील कमी वापरावेत. आहारामध्ये दुधी भोपळा, कोहळा, पडवळ, घोसाळं, दोडका, भेंडी अशा भाज्यांचा समावेश असावा. डाळिंबाचा रस, तूप घालून मोरावळा, तूप केळी, चिक्कू, योग्य ऋतूत निर्माण झालेली गोड फळं, खजूर, नारळाचं पाणी यांचं आलटून-पालटून सेवन करावं. ज्यांना उत्तम भूक लागते, त्यांनी वेगवेगळ्या खिरी, वड्या, लाडू, नारळीभात, कोहोळेपाक, लाल भोपळ्याचे घार्गे खायलादेखील हरकत नाही. आहारात तुपाचं प्रमाण दिवसाला दोन ते सहा चमचे इतकं असायला हवं. आपल्या प्रकृतीनुसार आपल्या वैद्यांकडून हे प्रमाण निश्चित करून घ्यावं.
 
 
seeping
 
विहाराचे नियम
 
 
अ) झोप - अर्थार्जनासाठी अत्यावश्यक नसल्यास रात्री जागूच नये. रात्रीच्या जागरणाचे दुष्परिणाम भरून काढण्यासाठी दुसर्‍या दिवशी सकाळी रिकाम्यापोटी, रात्री जेवढा वेळ जागरण झालं असेल त्याच्या निम्मा वेळ झोप घ्यावी. बहुतेक सर्व जण काहीतरी खाऊनच रात्रीची झोप पूर्ण करण्यासाठी झोपी जातात. या सवयीमुळे पचनासंबंधीच्या तक्रारी आणि अम्लपित्त अशा विकारांना सामोरं जावं लागतं, म्हणून उपाशी झोपणं महत्त्वाचं.
 
 
आ) अभ्यंग - अंघोळीपूर्वी कोमट केलेलं तिळाचं किंवा नारायण तेल पूर्ण अंगाला लावल्यास शरीरातील रुक्षता कमी होते, सांध्यांना वंगण मिळतं, त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत, इंद्रियं कार्यक्षम राहतात, वार्धक्य दूर ठेवता येतं. सर्व अंगाला तेल लावणं शक्य नसेल तर किमान डोकं, तळपाय, आणि कान यांना तरी तेल लावावं. अभ्यंगामुळे शरीर पुष्ट होतं आणि झोपही चांगली लागते, म्हणून दिवसा झोपण्यापूर्वी अभ्यंग आणि स्नान करावं.
 
 
इ) नस्य - इंद्रियांची रुक्षता घालवण्यासाठी झोपताना तिळाच्या/ज्येष्ठमधाच्या/अणुतेलाचं नस्य करावं.
 
 
 
seeping
 
ई) गण्डूष - कोमट पाण्यात तीळ तेल घालून रात्री झोपताना त्याच्या गुळण्या कराव्या. यामुळे स्वर स्निग्ध आणि मधुर राहतो. दात बळकट होतात. हिरड्यांचं आरोग्य सुधारतं.
 
 
उ) व्यायाम - रात्रपाळी करणार्‍या व्यक्ती शरीराला श्रम होतील असा व्यायाम करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी झेपेल इतकाच व्यायाम करावा किंवा योगासन करावीत. नियमित दमवणारा व्यायाम आणि नियमित जागरण करायचं असेल, तर मात्र त्याला नियमित अभ्यंगाची जोड आवश्यक असते. व्यायामाची सवय नसणार्‍या व्यक्तींना योगासनांचा चांगला उपयोग होतो.
 
 
 
ऊ) रसायन - ही आयुर्वेदाची एक स्वतंत्र कल्पना आहे. वार्धक्य आणि आजार यांना दूर ठेवणार्‍या औषधींना रसायन म्हणतात. ज्येष्ठमध, अश्वगंधा, शतावरी, भृंगराज, आवळा, हिरडा, गुळवेल अशा विविध रसायनांचा शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रत्येक व्यक्तीने योग्य रसायनाचा उपयोग केल्यास आरोग्य राखण्यास आणि वार्धक्य दूर ठेवण्यास मदत होते. देशी गायीचं दूध आणि तूप ही दोन्ही श्रेष्ठ रसायन द्रव्यं आहेत. रात्रपाळी करणार्‍या लोकांनी आहारात यांचा योग्य प्रकारे समावेश करायला हवा. ’नित्य क्षीरघृताभ्यासो रसायनसेवनानाम् श्रेष्ठम्’।
 
 
 
बस्ती - बस्ती हा वातदोषाचा महत्त्वाचा चिकित्सोपक्रम आहे. निरनिराळ्या औषधी तेलांचे अल्पमात्रेत दिले जाणारे बस्ती म्हणजे मात्रा बस्ती. आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने, रात्रपाळी करणार्‍या व्यक्तींनी अधूनमधून मात्रा बस्ती घेण्यास हरकत नाही. यासाठी ज्येष्ठमध तेल, नारायण तेल, शतावरी घृत, ज्येष्ठमध घृत, बलातेल यांचा प्रयोग करता येतो.
 
 
एक ठोस मॅनेजमेंट - कंपन्यांमध्ये किंवा संगणक क्षेत्रात आज सरसकट सर्वांना रात्रपाळी करावी लागते. त्यातही ही शिफ्ट वारंवार, काही ठिकाणी तर तीन-तीन दिवसांनी बदलते. यात कामगाराच्या आरोग्याचं आणि कंपनीच्या कामाचंही नुकसान होतं. या संदर्भात रात्रपाळीचे कर्मचारी निवडताना आयुर्वेदाचा प्रकृती विचार उपयोग उपयोगी पडू शकतो. कफप्रधान प्रकृतीच्या तसंच मेदसार व्यक्ती जागरण करू शकतात आणि जागरणाचे परिणाम सहन करू शकतात. त्या मानाने वातप्रधान किंवा पित्तप्रधान व्यक्ती रात्रीच्या जागरणाने आरोग्य गमावून बसण्याची शक्यता अधिक असते. अर्थातच रात्रपाळीसाठी व्यक्तींची प्रकृती निर्धारित करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांची मदत घ्यावी लागेल.
 
 
मॅनेजमेंटच्या क्षेत्रातील आणखी एक विषय म्हणजे रात्रपाळीतील बदल. दिवसाची आणि रात्रीची झोप बदलून त्यानुसार शरीराला अनुकूल होण्यास प्रत्येक व्यक्तीला किमान सात दिवस लागतात. अशी ती व्यक्ती अ‍ॅडजेस्ट होते ना होते, तोच तिची शिफ्ट पुन्हा बदलून, पुन्हा त्याच शारीरिक दुष्टचक्रात त्या व्यक्तीला लोटलं जातं. आरोग्याच्या दृष्टीने हे फारच घातक आहे. म्हणूनच एकदा रात्रपाळी सुरू झाली की कमीत कमी एक महिना तरी त्यात बदल करू नये. मग अशा व्यक्तींना त्यांची दिनचर्या थोडीफार निश्चित करता येते आणि आरोग्याचा अगदीच बोजवारा वाजत नाही. हा विचार अर्थातच व्यवस्थापनातील उच्चपदस्थ व्यक्तींनी करणं अपेक्षित आहे.
 
 
 
मोठ्या कंपन्यांमध्ये रात्रपाळी करणार्‍या व्यक्तींसाठी कँटीन उपलब्ध असतं आणि मध्यरात्री तिथे खाद्य किंवा पेय पदार्थ प्राप्त होऊ शकतात. मात्र ही खाद्यं आणि पेयं, जागरणाने लागलेल्या आगीत नेमकी तेल ओतणारी असतात. वडे, सामोसे, पावभाजी, कटलेट, भजी, मिसळ, चहा हे असेच पदार्थ तिथे उपलब्ध असतात. एखाद्या व्यक्तीने आरोग्यकर पदार्थच खायचा निश्चय जरी केला, तरी तसा पर्याय उपलब्ध नसतो. या कँटीनमधील पदार्थ वैद्यांचा सल्ल्याने निश्चित केले, तर अधिक उत्तम. ज्या कर्मचार्‍यांना स्वास्थ्यहितकर आहार घ्यायचा असेल, त्यांच्यासाठी उपमा, घावन, तूप-गूळ घातलेला पोळीचा लाडू, दूध, सोलकढी, मुगाची खिचडी, गोड शिरा असे पदार्थ कँटीनमध्ये उपलब्ध असावेत. रात्रपाळी करणार्‍या व्यक्तींचं जीवन अतिशय कष्टप्रद असतं. कुटुंबासाठी अर्थार्जन करताना कदाचित इतके कष्ट अनिवार्य असू शकतात. जोडीला स्वत:च्या आरोग्यासाठी थोडेसे वेगळे कष्ट घेतले, तर त्यांना आयुर्वेदाचे नियम पाळणं शक्य होईल आणि त्यातून आरोग्य राखता येईल.