बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न

विवेक मराठी    08-Feb-2023
Total Views |
@अभय पालवणकर 

worli
वरळी कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. आता शिंदे-फडणवीस सरकार येताच कोस्टल रोडच्या खांबांचा प्रश्न अगदी सहज सोडवला. त्याचे अभिनंदन करण्याचे सोडून आदित्य ठाकरे व शिवसैनिक सभेला गर्दी जमवता आली नाही असा आरोप करून शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावरून लक्ष विचलित करत आहेत. सभेची गर्दी आणि प्रत्यक्ष काम यामध्ये फरक असतो. बाळासाहेबांच्या सभेला होणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तित नसे. त्यामुळे येणार्‍या पालिका निवडणुकीत याच प्रत्यय येईल असे दिसते.
गेल्या काही दिवसांपासून भाजपाने मुंबई महानगरपालिका काहीही करून आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 2017 साली पालिकेत भाजपाचा निसटता पराभव झाला होता. या वेळेस मुंबई पालिकेत भाजपाची सत्ता येईल यासाठी चंग बांधला आहे. यासाठी सेनापती म्हणून मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे याची जबाबदारी दिली आहे. शेलार हेसुद्धा पालिकेतील सत्ताधारी पक्ष शिवसेनेला मजबूत आव्हान देत आहेत. मुंबईत भाजपाचे मोठे संघटन उभे केले आहे. सुरुवातीच्या काळात भाजपाने मुंबईतील उपनगरांवर आपले वर्चस्व निर्माण केले, आता भाजपाने मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या गिरणगावात - म्हणजे वरळी, दादर, लालबाग, परळ या भागांना लक्ष्य केले आहे. यातील वरळीमधून शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे निवडून येत असल्याने भाजपाने वरळीत आपले वर्चस्व वाढवण्याचे प्रयत्न जोमाने सुरू केले आहेत. त्यामुळे यापुढे भाजपा आणि शिंदे गट मिळून एक मोठे आव्हान शिवसेनेसमोर उभे करणार असे दिसतेय. शिवसेनेचासुद्धा आजवर हा बालेकिल्ला राहिला आहे. दत्ताजी नलावडे यांनी येथून चार वेळा आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवकसुद्धा या भागातून निवडून येत असतात. अगदी मनसेचे आणि राष्ट्रवादीचे आव्हान जरी असले, तरी इथला मराठी मतदार मोठ्या संख्येने शिवसेनेलाच मतदान करतो. अगदी कोणत्याही उमेदवाराला शेंदूर फासला, तरी तो इथून निवडून येईल अशा प्रकारचा हा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे. याला टक्कर देण्याचे काम जर कोणी केले असेल, तर ते राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांनी, असे म्हणायला काही हरकत नाही. 2009च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे आशिष चेंबूरकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुढील पालिका निवडणुकीत दोन नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आणले. वरळी कोळीवाड्यासारख्या मराठी भागातसुद्धा राष्ट्रवादीने आपले कार्यकर्ते उभे केले. शिवसेनेला हा मोठा धक्का होता. पण 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेने हा बालेकिल्ला परत मिळवला. सुनील शिंदे येथून आमदार झाले. आदित्य ठाकरे यांच्या या भागातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयानंतर तर सेनेने हा बालेकिल्ला अधिकच मजबूत केला. पण आता भाजपा व शिंदे गटाने या भागात आपले वर्चस्व निर्माण करून आदित्य ठाकरे यांना शह देण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी खासकरून मराठी दांडिया, दिवाळी पहाट कार्यक्रम या भागातच करायला सुरुवात केली आहे. जांबोरी मैदानामध्ये संकल्प दहीहंडी हा मोठा उत्सव असायचा. अगदी देशभरातून तेथे मोठ्या संख्येने तो दहीहंडी उत्सव बघण्यासाठी येत असत. पण गेल्या वर्षी सर्जिकल स्ट्राइक करत बालेकिल्ल्यातील दहीहंडी उत्सव भाजपाने केले. शिवसेनेला हा मोठा धक्का होता. यावरून वरळीतील शिवसैनिकांची मातोश्रीवर हजेरीही घेण्यात आली, असे बोलले जाते.
 
 
shivsena
 
महापौर किशोरी पेडणेकर, आ. सुनील शिंदे, आ. सचिन अहिर, माजी नगरसेवक अरविंद भोसले, आशिष चेंबूरकर, नगरसेविका हेमांगी वरळीकर, हरीश वरळीकर, गणेश कोळी अशी मोठी नेत्यांची फळी वरळीमध्ये आहे. पण आज भाजपा व शिंदे गटाच्या आव्हानाला तोंड देण्याची ताकद त्यांच्यात दिसून येत नाही. माजी महापौर पेडणेकर सुरुवातीच्या काळात प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण किरीट सोमैय्यांच्या आरोपानंतर मात्र त्यांनी आपले तोंड बंद केले आहे. त्यातच शिवसेनेचे नगरसेवक संतोष खरात यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता कार्यकर्तेसुद्धा पक्ष सोडू लागले आहेत, असे दिसून येत आहे.
 
 
शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यातील वरळी कोळीवाडा हा मराठी माणसांचा भाग म्हणून ओळखला जातो. कोस्टल रोडच्या कामामुळे वरळी कोळीवाड्यातील मासेमारी करणारे लोक त्रस्त होते. कोस्टल रोडच्या खांबांमुळे मच्छीमारीच्या बोटींचा अपघात होऊ शकत होता. त्यामुळे वरळीतील मच्छीमार बांधवांनी कोस्टल रोडला विरोध केला होता. शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनेने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. यासाठी समुद्रात जाऊनही अनोखे आंदोलन केले, अनेक प्रकारे विरोध दर्शवला, पण शिवसेनेने त्याला केराची टोपली दाखवली. पण शिंदे फडणवीस सरकार येताच त्यांनी मागणीकडे लक्ष देऊन समस्या सोडवली आहे. आता दोन खांबांमधील अंतर 120 मीटर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा शिवसेनेला मोठा धक्काच मानला जातो आहे. आजपर्यंत शिवसेनेच्या पारड्यात भरभरून मते टाकणार्‍या कोळीवाड्यातील लोकांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पण शिवसेनेने त्यांच्या समस्यांकडे पालिकेची सत्ता असूनही कानाडोळा केला आहे. येणार्‍या पालिका निवडणुकीत कदाचित शिवसेनेला याची किंमत मोजावी लागेल असे दिसते.
 
 
 
shivsena
कार्यक्रम मोठे, संघटन छोटे

वरळीसारख्या मराठी भागात आव्हान देणे भाजपा आणि शिंदे गटासाठी तितकेसे सोपे नाही, हेही तेवढेच सत्य आहे. कारण वरळीमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. स्व. दत्ताजी नलावडे यांनी हा मतदारसंघ मजबूत बांधून ठेवला आहे. आज या बालेकिल्ल्यात भाजपाचे नगण्य कार्यकर्ते आहेत. 2019पर्यंत सुनील राणे हे भाजपाचा किल्ला एकाकीपणे लढवत होते. पण आदित्य ठाकरे यांना युतीत दगाफटका नको, म्हणून भाजपाने सुनील राणे यांना बोरिवलीत पाठवले व तेथून त्यांना विजयी केले. आदित्य ठाकरे यांचा मार्ग सुखकर केला. पण आज राणे तिकडे अडकल्यामुळे भाजपाची काही छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर मदार आहे. त्यामुळे कार्यक्रम मोठे मोठे होऊन मीडियातून हवा होते, पण संघटन पातळीकडे अजिबात लक्ष दिसत नाही. कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी भाजपाने लक्ष दिले पाहिजे, तरच भाजपा आदित्य ठाकरे यांना आव्हान देऊ शकतो.