सेवा है यज्ञ कुंड..

विवेक मराठी    11-Mar-2023
Total Views |
@अंजली तागडे
 
जनकल्याण समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी या तीन संस्थांनी मिळून पुण्यात ’सेवा भवन’ या भव्य सेवा प्रकल्पाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते शनिवार दि. 4 मार्च रोजी सेवा भवन या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. आरोग्य सुविधांसाठी पुण्यात येणार्‍या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना या प्रकल्पाद्वारे एकाच छताखाली विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. या निमित्ताने सेवाभवन प्रकल्पाच्या कार्याचा घेतलेला आढावा.

rss
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीची निर्मिती मुळातच आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती निवारणाप्रसंगी करण्यात येणार्‍या विविध सेवा व्यवस्थेपासून, कार्यापासून झाली. महाराष्ट्रात 1972मध्ये दुष्काळ पडला होता. त्या वेळी ‘महाराष्ट्र दुष्काळ विमोचन समिती’ म्हणून हे काम सुरू झाले. त्या प्रसंगी केलेल्या कामाचा आढावा घेत असताना, ‘आपत्ती आली तरच काम करायचे का? समाजात अनेक समस्या जाणवत असतात, त्यावर उत्तर म्हणून प्रत्यक्ष सेवा कार्ये सुरू झाली पाहिजेत’, असा विचार पुढे आला. या विचारातूनच 9 फेब्रुवारी 1973 रोजी रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून सेवा कामास सुरुवात झाली. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीच्या निमित्ताने 1989मध्ये तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या मार्गदर्शनाने सेवा कार्यांना अधिक चालना मिळाली. त्यातूनच जनकल्याण समितीचा विस्तार होत गेला.
 
 
मुहूर्तमेढ आणि दातृत्व
 
 
राजगुरूनगर (खेड) येथील ज्येष्ठ संघस्वयंसेवक नारायणकाका दाते यांनी त्यांच्या इच्छापत्राद्वारे पुण्याच्या एरंडवणे, पटवर्धन बाग येथील सहा हजार पाचशे चौ.फुटाचा भूखंड सेवा कार्यासाठी जनकल्याण समितीला दिला. संघप्रचारक मुकुंदराव पणशीकरांच्या प्रयत्नातून त्याची अंमलबजावणी होऊन सेवा भवनाची निर्मिती व्हावी, अशी कल्पना पुढे आली. ती प्रत्यक्षात साकार झाली आहे. कृष्णा गुजराथी (व्यास) यांनी इच्छापत्राची अंमलबजावणी केली. संघप्रचारक मुकुंदराव पणशीकरांच्या प्रयत्नांमुळे या सर्व गोष्टी जुळून आल्या. या जागेत ‘सेवा भवन’ या नावाने सेवा प्रकल्प उभा राहावा, असे त्यांनीच सुचविले होते. त्यानुसार या ठिकाणी आता सात मजली ‘सेवा भवन’ ही वास्तू उभी राहिली आहे. त्यातील सभागृहाला मुकुंदराव पणशीकर यांचे नाव दिले आहे.
 
 
विविध सेवा कार्ये
 
जनकल्याण समितीद्वारे महाराष्ट्रात 27 प्रकारची 1870 सेवा कार्ये चालविली जातात. याशिवाय नऊ मोठे प्रकल्प म्हणजे सेवा क्षेत्रातील नवविधा भक्तीचे प्रत्यक्ष रूपच म्हणता येईल. त्यात ठाणे, नगर, नाशिक येथील रक्तपेढ्या, पनवेल येथील रुग्णालय, मुंबई येथील 50 सेवा वस्त्यांत चालणारे वस्ती परिवर्तनाचे कार्य, लातूर येथे 570 विद्यार्थ्यांचे निवासी विद्यालय, 74 दिव्यांग विद्यार्थ्यांचे विकसन केंद्र ‘संवेदना’, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यांतील 12 गावांतील समाज अभिसरणाचे केंद्र, ‘भारतमाता मंदिर’ प्रकल्प आणि आता जनकल्याण समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘सेवा भवन’ हे प्रकल्प त्यात प्रामुख्याने आहेत.
 
 
रा.स्व. संघ जनकल्याण समिती ही सेवा कार्यांच्या रूपाने तेवणारी प्रेरक सेवा ज्योत आहे. ‘समाजाकडून समाजाला’ या तत्त्वावर जनकल्याण समिती लोकसहभागातून निधी उभारून सेवा भवनसह 9 मोठे सेवा प्रकल्प चालवीत आहे. त्याव्यतिरिक्त 7 विषयांमधील 28 प्रकारची 1880 सेवा कार्ये जनकल्याण समितीतर्फे विविध ठिकाणी सुरू आहेत. 380 शाळांमध्ये फिरती विज्ञान प्रयोगशाळा, 1039 आरोग्यरक्षक, 185 रुग्णोपयोगी साहित्य केंद्रे, 8 पूर्वांचल छात्रावास आणि नैसर्गिक येणार्‍या दुष्काळ, भूकंप, पूर, कोरोना इ. प्रकारच्या आपत्तिनिवारणाचे कार्य जनकल्याण समिती गेली 50 वर्षे अविरतपणे करत आहे.
 

rss 
 
निरंतर सेवा
 
 
जनकल्याण समितीने आपल्या कार्यातून जनसामान्यांच्या मनातील परस्पर सहसंवेदना, आत्मीयता, भ्रातृभाव जागता ठेवला आहे. कार्यकर्त्यांच्या निरपेक्ष आणि निरंतर सेवेतून या सेवा कार्यात फार मोठा विश्वास आणि आत्मीयता मिळविली आहे. त्यामुळे समाजाच्या आणि सज्जनशक्तीच्या दातृत्वातून आणि सहभागातून अनेक सेवा कार्ये, अनेक प्रकल्प, सढळ आर्थिक मदतीतून निर्माण झाले आणि सेवा भवनसारखी देखणी वास्तू हे त्याचेच दृश्य स्वरूप आहे. सामान्य जनतेमध्येही सेवा सहभागाची भावना सतत जागृत ठेवणार्‍या, राष्ट्र संरक्षणासाठी आणि राष्ट्रविकासासाठी सक्षम होत असणार्‍या असंख्य सेवा संस्था देशभरात कार्यरत आहेत. रा.स्व. संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) यात विशेषत्वाने अग्रेसर असून संस्थेने समाजात विश्वासार्हता प्राप्त केली आहे.
 
 

rss 
 
असा आहे सेवा भवन प्रकल्प
 
 
जनकल्याण सेवा फाउंडेशन, डॉ. हेडगेवार सेवा स्मारक निधी आणि जनकल्याण समिती या तीन संस्थांनी एकत्रितपणे सेवा भवनाची उभारणी केलेली आहे. यामागे मुंबईतील परळ येथील नाना पालकर रुग्णसेवा सदन या धर्तीवर पुण्यातही रुग्णसेवा देता यावी, हा मुख्य हेतू आहे. ही इमारत 7 मजली असून सत्तावीस हजार चौ.फूट बांधकाम केलेले आहे. पुण्याचा चोहोबाजूंनी विस्तार झाल्यामुळे ही वास्तू आता शहराच्या मध्यवस्तीत आली आहे. सेवा भवन परिसराच्या जवळपास महत्त्वाची रुग्णालये आहेत.
वैद्यकीय उपचारांसाठी पुणे जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पुण्यात येणार्‍यांची संख्या मोठी आहे. रुग्णांबरोबर येणार्‍या त्यांच्या नातेवाइकांची, मदतनीसांची पुण्यात कुठे तात्पुरती राहण्याची, भोजनाची सुविधा नसल्याने गैरसोय होत असते. ही समस्या लक्षात घेऊनच सेवा भवनमध्ये अत्यल्प दरात सुविधांचा विचार केला आहे.
 
 
सेवा सुविधा
 
जनकल्याण समितीने प्रामुख्याने काही सुविधा आणि सेवा देण्याचे नियोजन केले आहे.
 
डायलिसिसची गरज वारंवार किवा नियमित गरज असणार्‍या अनेक रुग्णांना त्या उपचारांचा खर्च करणे आवाक्याबाहेरचे असते. त्यासाठीची प्रतीक्षा यादीसुद्धा मोठी असते. अशा रुग्णांसाठी वीस बेडचे सुसज्ज डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येत आहे. यामधील डॉक्टर, परिचारिका, मदतनीस आदी प्रशिक्षित आणि मान्यताप्राप्त असतील. हे उपचारही अत्यल्प दरात होतील.
रुग्णांबरोबर येणार्‍या नातेवाईक-मदतनीसांची अत्यल्प दरात भोजनाची आणि निवासाची व्यवस्था डायलिसिस सेंटरच्या वरच्या तिसर्‍या मजल्यावर करण्यात येणार आहे.
 
 
कार्यकर्त्यांना सेवेची प्रेरणा आणि प्रशिक्षण देण्यासाठी तळमजल्यावर सर्व तांत्रिक सुविधांनी सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले असून सेवाभावी संस्था त्याचा लाभ घेऊ शकतात.
 
 
जनकल्याण समितीच्या सेवा भवनसह मोठ्या 9 प्रकल्पांचे प्रमुख कार्यालयही या वास्तूत स्थलांतरित होत आहे. डॉ. हेडगेवार सेवा स्मारक निधी आणि जनकल्याण सेवा फाउंडेशन यांचीही कार्यालये सेवा भवनमध्ये असणार आहेत.
 
 
तसेच सेवा भवनाच्या परिसरात मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. परंतु सर्वांना हे ज्ञात असतेच असे नाही. अनेक आजारांवर उपचार करणारे, माहिती देणारे तज्ज्ञ डॉक्टरही याच भागात आहेत. एमआरआय, सीटी स्कॅन यांसारख्या तपासण्यांद्वारे विविध आजारांचे निदान करणारी उपकरणेही उपलब्ध आहेत. याबाबत बाहेरगावाहून येणार्‍या रुग्णांना सल्ला देण्याचे कामही या ठिकाणी चालणार आहे. त्यासाठी रुग्णवाहिका, ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याची सुविधाही या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे.
 
 
 
सेवा परमो धर्म:
 
 
“सेवा हा माणुसकीचा धर्म आहे. स्वार्थ हा सेवेची प्रेरणा कधीही होऊ शकत नाही. सेवा धर्म गहन आहे, परंतु तो माणुसकीचा धर्म आहे” असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सेवा भवन या वास्तूचे लोकार्पण केले. “जनकल्याण समितीने 50 वर्षे सेवेचे हे कार्य चालविले, त्याचा हा उत्सव आहे. संकटकाळात कोणीतरी उभे राहण्याची गरज असते आणि समाज संकटात असला की त्यासाठी काही ना काही करणार्‍या व्यक्ती समाजात असतातच. देशात सर्वत्र सेवा कार्ये चालू आहेत. जनकल्याण समितीचे कार्य हा त्यातील एक भाग आहे.
 
 
समरसता हे सेवेचे तत्त्व आहे आणि सद्भावना हा सेवेचा व्यवहार आहे. मात्र सेवेचा परिणाम सेवा हाच आहे. सेवा करताना हे आम्ही केले हा अहंकार नसावा. समाज भरभरून देतो, मात्र समाजाला हे कळावे लागते की ही माणसे विश्वासार्ह आहेत. सेवा शब्द हा भारतीय आहे आणि सर्व्हिस या शब्दात मोबदल्याची अपेक्षा आहे” असे स्पष्ट करत त्यांनी सेवाभावाची व्याप्ती अधोरेखित केली. सेवा ही मजबूरी नाही किंवा ती भीतीने होऊ शकत नाही. सेवा ही आपली सहजप्रवृत्ती आहे. माणूस म्हटले की संवेदना असतेच. हे अस्तित्वाच्या एकतेचे रहस्य आहे. हे आध्यात्मिक असले, तरी वास्तविक सत्य आहे. सर्वांमध्ये असलेल्या चैतन्यामुळे करुणा हा गुण येतो, असे सांगत मानवी मनाच्या संवेदनशील भावनेतून सेवा उभी राहते, त्यातील सहजता मांडत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सेवाभाव आणि सेवा कार्ये याविषयी विविध विचार मांडले.
 
 
समाजात मार्गक्रमण करत असताना सेवाभाव आणि सामाजिक सद्भाव हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक असतो. असा सद्भाव निर्माण करत जनकल्याण समितीच्या माध्यमातून उभी राहणारी कामे पुढील अनेक पिढ्यांना सेवा वारसा जतन करण्यासाठी नक्कीच मैलाचा दगड ठरत आहेत.
 
 
लेखिका विश्व संवाद केंद्र (पुणे)च्या संपादक आहेत.