देशात ‘भारत जोडो’ परदेशात ‘भारत तोडो’

विवेक मराठी    13-Mar-2023
Total Views |
 @ल.त्र्यं. जोशी
। 9699240648
एकंदरीत भारताची चौफेर घोडदौड पचवू न शकणार्‍या आंतरराष्ट्रीय शक्ती - ज्यामध्ये देशविरोधी विचारांची एक फळी आहे, ज्या सातत्याने भारताच्या विरुद्ध विशेषत: मोदी सत्तेवर आल्यापासून नवनव्या भारतविरोधी कारस्थानात सक्रिय आहेत, त्यांनी भारतविरोधी अपप्रचाराचे एक टूलकिटच तयार केले आहे. या टूलकिटचा एक अविभाज्य भाग राहुल गांधी आहेत. नुकत्याच त्यांच्या इंग्लंड दौर्‍यातील बडबडीवरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

rahul gandhi
 
काँग्रेसचे एक नेते, केरळातील वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यांनी बराच गाजावाजा करून नुकत्याच पूर्ण केलेल्या ’भारत जोडो यात्रे’चा काय परिणाम झाला आहे, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे; पण त्यांच्या इंग्लंडच्या ताज्या दौर्‍यातील विविध कार्यक्रमांतील त्यांची मुक्ताफळे पाहिली, तर देशातील ‘भारत जोडो’ यात्रेनंतर त्यांनी परदेशात ‘भारत तोडो’ यात्रा सुरू केली आहे, असे म्हणावे लागेल. भाजपाने त्यांच्या या मुक्ताफळांचा निषेध करणे तसे स्वाभाविकच आहे. पण थोडा विचार केला, तर त्यांची मुक्ताफळे त्यांच्या स्वत:च्या पक्षातील विचारी नेत्यांना आणि अन्य विरोधी पक्षांनाही किती रुचतील, याबद्दल शंकाच आहे. त्यांच्यापैकी अजून कोणी बोलले नसले, तरी नितीशकुमारांच्या जनता दल युनायटेड या पक्षाचे नेते व राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंशप्रसाद यांनी त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
 
 
 
खरे तर भारतात अनेक पक्ष असले व त्यांच्यात तीव्र वैचारिक मतभेद असले, तरी स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच एक संकेत प्रस्थापित झाला आहे. त्याला नावच द्यायचे झाल्यास ‘वयं पंचाधिकम् शतम्’ असे देता येईल. तो संकेतही रीतसर बैठक घेऊन वा प्रस्ताव मंजूर करून तयार झालेला नाही. अगदी स्वाभाविकपणे तो आविष्कृत झाला आहे. आपले कितीही तीव्र स्वरूपाचे राजकीय मतभेद असले आणि आम्ही ते देशात कितीही तीव्रपणे व्यक्त केले, तरी जेव्हा आम्ही परदेशात असतो, तेव्हा केवळ आणि केवळ भारताचे प्रतिनिधी असतो. तेथे अंतर्गत राष्ट्रीय विवादांवर बोलायचे नाही व टीकाही करायची नाही, हा त्या संकेताचा गाभा आहे, तो आजपर्यंत कम्युनिस्टांसहित सर्व पक्षांनी जोपासला आहे. 1962च्या चिनी आक्रमणाच्या वेळी मार्क्सवाद्यांनी ते ’आक्रमण’ मानण्यास नकार दिला होता हे खरे, पण त्यांनी कधी चीनमध्ये वा रशियामध्ये जाऊन देशविरोधी भूमिका मांडल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही. परदेशी पत्रकार - विशेषत: डाव्या इकोसिस्टिममधले पत्रकार बरेचदा आपल्या अंतर्गत समस्यांच्या बाबतीत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतातच. पण त्या वेळी आपल्याकडील विरोधी नेत्यांनी ’तो आमचा अंतर्गत मामला आहे’ असे नमूद करून प्रत्येक वेळी त्याना टोलविले आहे. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे याच राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान स्व. नरसिंह राव यानी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेतील त्या वेळचे विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांना पाठविल्याची ऐतिहासिक नोंद आहे. या सर्वांची माहिती असतानाही जेव्हा राहुल गांधी परदेशात भारतविरोधी फूत्कार काढतात, तेव्हा मोदीद्वेषाने वा भाजपाद्वेषाने ते कमालीचे आंधळे झाले आहेत, असाच निष्कर्ष निघू शकतो.
 
 
rahul gandhi
 
वास्तविक राहुल गांधी कुठल्याही सरकारी पदावर नाहीत.त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष वा महत्त्वाचे पदाधिकारीही नाहीत. संसदेतील मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेतेही नाहीत. पण भारतात दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाचे खासदार, त्याच पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि नेहरू घराण्याचे वारसदार म्हणून जग आणि जग म्हणण्यापेक्षा परदेशातील भारतविरोधी शक्ती त्यांना निमंत्रित करतात. त्यांचा वापर करून घेतात, असेही म्हणता येईल. ह्याच शक्ती त्यांची भाषणे घडवून आणण्यात पुढाकार घेतात. याच प्रक्रियेतून केंब्रिज युनिव्हर्सिटी व ब्रिटिश संसद या ठिकाणी त्यांची दोन भाषणे झाली. या संस्थांचे महत्त्व लक्षात घेऊन खरे तर राहुल गांधींनी तेथे अधिक जबाबदारीने बोलायला हवे होते. आपल्या बोलण्यामुळे भारताची अप्रतिष्ठा होणार नाही, याचे भान ठेवायला हवे होते. पण ते मोदीद्वेषाने इतके आंधळे झाले आहेत की, दुसर्‍या देशातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये आपण देशाची बदनामी करीत आहोत आणि तीही खोटारडेपणा करून, याचीही चिंता न करता बोलले.. नव्हे, अक्षरश: बरळले. भारतात लोकशाही उरलेली नाही, कुठलेही स्वातंत्र्य म्हणून उरले नाही, हुकूमशाहीच जणू प्रस्थापित झाली आहे, भाजपा आणि संघ यांनी सर्व वैधानिक संस्था बळकावल्या आहेत, ही त्यांची बरळण्याची धाटणी. तरी बरे की, यापूर्वी राफेल विमान खरेदी प्रकरण, पेगॅसस प्रकरण, नोटबंदी प्रकरण यात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे आरोप साफ फेटाळले आहेत. या इंग्लंड दौर्‍यातही त्यांनी आपला मोबाइल पेगॅससशी जोडण्यात आल्याचा दावा केला. वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांनी आपला मोबाइल पेगॅसस तपासणीसाठी कुठेही दिलेलाच नाही. पण धादांत खोटे बोलायचे आणि रेटून खोटेच बोलायचे हे त्यांनी ठरविलेले दिसते. त्यामुळे आपल्याच विश्वसनीयतेला धक्का बसतो, याची त्यांना अजिबात चिंता दिसत नाही.. देशाची चिंता हा फार पुढचा भाग. त्यामुळे भाजपा नेते व माजी मंत्री रविशंकर प्रसाद यांना ‘निर्लज्ज, खोटारडे’ या शब्दात त्यांचे वर्णन करावेसे वाटले असेल, तर काय आश्चर्य?
  

rahul gandhi
 
चीनची आपल्याशी शत्रुत्वाने वागण्याची तर्‍हा सर्वांना ठाऊक आहे. दोन देशांमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा कुणीही ओलांडायची नाही असे करारमदार झाले असताना जेव्हा चीनने डोकलाम व लदाखमध्ये तसा प्रयत्न केला असता शूरवीर भारतीय सैनिकांनी प्राणांची बाजी लावून आणि चिन्यांच्या रक्ताचे घोट पिऊन देशाचे रक्षण कसे केले, हे ताजे असताना जेव्हा राहुल गांधी चीनला अनुकूल ठरणारे वक्तव्य, तेही जगाच्या वेशीवर करतात, ‘भारत चीनला घाबरतो’ असा सैन्याचा तेजोभंग करणारा आरोप करतात, तेव्हा त्याएवढे गलिच्छ, बेजबाबदार, लज्जास्पद राजकारण दुसरे कोणतेही असू शकत नाही. राहुल गांधींना आपल्या अकलेचे दिवाळे जगासमोर टांगण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण ब्रिटनमधील भाषणांमधून त्यांनी देशाच्या बदनामीचे ओंगळवाणे राजकारण केले आहे.
 
 
 
अर्थात बेजबाबदार वर्तनाची राहुल गांधींची ही पहिली वेळ नाही. आता तर त्यांच्या विरोधी पक्षाचे सरकार आहे. ज्या पक्षाने लागोपाठ दोन संसदीय निवडणुकांमध्ये जनतेचा स्पष्ट कौल मिळविला आणि लोकसभेत त्याच्या पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यताही मिळू दिली नाही, त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे फक्त पानिपतच होत आहे, तरीही त्यांची अक्कल ठिकाणावर येत नाही. जनादेशाचा अपमान करून जणू ते 1975मध्ये आणीबाणी लावून देशाचे तुरुंगात रूपांतर करणार्‍या आपल्या आजीबाईंच्या पावलावर पाऊलच टाकू पाहत आहेत. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी दिल्लीत आपल्या पक्षाचे सरकार असताना, आपल्या आईच्या योजनेतून झालेले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग परदेश दौर्‍यावर असताना त्यांच्याच सरकारने जारी केलेला अध्यादेश पत्रकार परिषदेमध्ये टराटरा फाडून फेकण्याचा विक्रम केला आहे.त्यासाठी त्यांना मित्रपक्षाच्या शरद पवारांसारख्या नेत्याकडून अपरिपक्व म्हणून कानपिचक्या बसल्या आहेत, ते पक्षाचे नेतृत्व करू शकतात यावरचा सहकार्‍यांचा विश्वास उडाला आहे, तरीही ते आपल्या बालिश चाळ्यांना आवर घालायला तयार नाहीत, हा त्यांच्या दुष्टबुद्धीचा कडेलोटच म्हणावा लागेल.
 
 
खरे तर भारताची सर्व क्षेत्रांतील घोडदौड पचवू न शकणार्‍या आंतरराष्ट्रीय शक्ती - ज्यात डावे, धर्माच्या नावावर निरपराध लोकांची हत्या करणारे दहशतवादी, भांडवलदार यांची एक फळी भारताच्या विरुद्ध विशेषत: मोदी सत्तेवर आल्यापासून नवनव्या भारतविरोधी कारस्थानात सक्रिय आहेत. त्यांनी भारतविरोधी अपप्रचाराचे एक टूलकिटच तयार केले आहे. सीएएविरोधी आंदोलनापासून ते शेतकरी आंदोलनापर्यंत त्यांनी प्रत्येक वेळी या टूलकिटचाच वापर केला आहे. राहुल गांधी त्या टूलकिटचा एक अविभाज्य भाग आहेत, हेच त्यांच्या इंग्लंड दौर्‍यातील बडबडीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
 
 
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.