ध्यान आणि योगसंपूर्ण मानवतेसाठी उपकारक

13 Mar 2023 16:03:50
@राजस वैशंपायन । 8425084587
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिका, ‘ग्लोबल पीस इनिशिएटिव्ह ऑफ वूमन’च्या संस्थापिका आणि श्री परमहंस योगानंद यांच्या क्रियायोग परंपरेतील योगसाधक डेना मरियम यांच्या सीतायण या बहुचर्चित पुस्तकाच्या मराठी अनुवाद प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मुलाखतीचा सारांश..
 
vivek
 
आपण सुरू केलेले सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय उपक्रम - उदा., इंटरफेथ डायलॉग, तुम्ही स्थापन केलेली ’ग्लोबल पीस इनिशिएटिव्ह ऑफ वूमन’ ही संस्था याविषयी माध्यमांवर बरीच माहिती उपलब्ध आहे. या सर्व कार्याची आध्यात्मिक पार्श्वभूमी काय आहे? याविषयी थोडं सांगा. तुमचा संपूर्ण आध्यात्मिक आणि सामाजिक प्रवास कसा होता? त्याची सुरुवात कशी झाली?
 
 
माझा प्रवास या आयुष्याच्याही आधीपासून सुरू झाला! पण या जन्मी मी न्यूयॉर्कमध्ये सेक्युलर ज्यू कुटुंबात वाढले. माझे वडील यशस्वी व्यापारी, कलासंग्राहक आणि कलाप्रेमी होते. त्यांना कलेची आवड होती. त्यांच्यासाठी कला हाच त्यांचा धर्म होता आणि मी लहानपणापासूनच अध्यात्माचा शोध घेत होते. किशोरवयातही अध्यात्माविषयी जे काही वाचता येईल, ते वाचून, समजून मी शोध सुरू केला. महाविद्यालयात असताना कोणीतरी माझ्या गुरूंचं - परमहंस योगानंदांचं पुस्तक माझ्या हातात दिलं,
 
‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’.
 
 
त्यांचं चित्र पाहताच मी त्यांना माझे गुरू म्हणून ओळखलं. त्यांनी आधीच नश्वर शरीर त्यागलं होतं. पण त्यांनी एक संस्था स्थापन केली होती आणि तिथे ध्यानाच्या पद्धतींवर प्रशिक्षण दिलं जात असे. तेव्हापासून मी ध्यान करू लागले. मला विश्वास होता की ध्यानामुळे एक संपूर्ण नवीन जग, नवी दृष्टी मला उपलब्ध होईल. मी गीतेचा, उपनिषदांचा अभ्यास करू लागले.
 

vivek 
 
योगसाधक डेना मरियम 
 
मुळात, इंटरफेथ असं काही करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी एक शांत, एकांतप्रिय योगी होते, विवाहित होते आणि माझ्या दोन मुलांना वाढवत होते.
 
 
त्या काळी माझे वडील संयुक्त राष्ट्राचे माजी प्रमुख कोफी अन्नान यांचे चांगले मित्र होते. सन 2000मध्ये धर्मपंडितांची आणि धर्मप्रमुखांची एक शिखर परिषद करण्याची कोफी अन्नान यांची कल्पना होती. माझा अध्यात्माकडे असलेला ओढा पाहून, या कामात डेना मदत करू शकेल असं माझ्या वडिलांनी अन्नान यांना सुचवलं. आणि मी त्या शिखर परिषदेच्या आयोजन समितीची उपाध्यक्षा झाले.
 
 
त्या काळात मी अनेक धर्मप्रमुखांना भेटले. संयुक्त राष्ट्र संघटनेचं म्हणणं होतं की यात महिला धर्मप्रमुख असल्याच पाहिजेत. पण सर्व धर्मप्रमुखांच्या मते, या क्षेत्रात महिलांचं नेतृत्व नाही. परिषदेचं आयोजन झालं, पण फारच कमी महिला उपस्थित होत्या.
 
 
आणखी एक म्हणजे त्या काळी अशा परिषदेत बहुतेक ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लीम धर्मांनाच प्रतिनिधित्व मिळत असे. आणि तोपर्यंत मी तर स्वत:ला हिंदू म्हणवून घ्यायला सुरुवात केली होती. पण या परिषदेत हिंदू, बौद्ध आणि पौर्वात्य धर्मपरंपरांना स्थान मिळालंच नाही. त्यामुळे अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या या शिखर परिषदेनंतर काही महिला धर्मप्रमुखांशी आम्ही पुन्हा चर्चा केली आणि असं ठरवलं की, महिला धर्मप्रमुखांची आणखी एक मोठी शिखर परिषद आपण आयोजित करायची.
 
 
त्यानंतर, आम्ही जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्य इमारतीत एक शिखर परिषद आयोजित केली. ती यशस्वी झाली आणि त्यातून ‘ग्लोबल पीस इनिशिएटिव्ह ऑफ वूमन’चा जन्म झाला. आम्ही हे व्यासपीठ सर्वांसाठी खुलं केलं. ते केवळ महिलांसाठी नव्हतं, पण केंद्रस्थानी नेतृत्व महिलांचं होतं.
 
 
vivek
 
दरम्यान, माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझ्या मागील जन्माच्या अनेक स्मृती माझ्या डोळ्यांसमोर येत होत्या. मी त्याबद्दल लिहायला सुरुवात केली. ‘माय जर्नी थ्रू टाइम’ या माझ्या पहिल्या पुस्तकात मी माझ्या मागील अनेक जन्मांचं वर्णन केलं आहे आणि या अनुभवांनी जगाबद्दलचा माझा दृष्टीकोन पूर्ण बदलला. मी स्वत:ला वेगवेगळ्या काळात, निरनिराळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या रूपात पाहत होते. मग मुळात मी कोण आहे? त्यामुळे माझा संपूर्ण दृष्टीकोन बदलला. आणि या संपूर्ण काळात मी ग्लोबल पीस इनिशिएटिव्ह ऑफ वूमनचं काम पाहत होते. याच काळात अयोध्येची तीर्थयात्रा केली. त्या तीर्थयात्रेतून ‘सीतायण’ निर्माण झालं. ही खरं तर सीतेची कथा आहे. हे माझं दुसरं पुस्तक आहे.
 
 
 
या पुस्तकानंतर ‘रुक्मिणी अँड टर्निंग ऑफ टाइम’ मी लिहिलं. माझ्या तीर्थयात्रेच्या काळात मी द्वारकेला गेले. माझ्यासाठी कृष्ण कधीच वृंदावनातला गोपाल किंवा राधेचा कृष्ण नव्हता. माझ्यासाठी तो नेहमीच द्वारकेचा कृष्ण होता, महाभारत युद्धाचा कृष्ण होता आणि म्हणून मी रुक्मिणीवर हे पुस्तक लिहिलं.
 
 
आपले गुरू परमहंस योगानंद यांचाही सिद्धान्त हेच सांगतो की आध्यात्मिक शक्ती ही एक दैवी सर्जनशील स्त्रैण शक्ती आहे. या आध्यात्मिक सिद्धान्ताचा किंवा आपल्याला आलेल्या आध्यात्मिक अनुभवांचा, तुम्ही हाती घेतलेल्या सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय कार्यांशी कसा संबंध आहे? म्हणजे त्यातून आपल्या सामाजिक कार्यात काही अडथळा निर्माण झाला की त्यातून एक प्रकारे मदत झाली?
 
 
दोन्हीचा संबंध कायमच येतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीशी अध्यात्माचा संबंध आहे. उदाहरणार्थ, रुक्मिणीवर पुस्तक लिहिताना मला अर्जुनाचं आदि-मातृत्वशक्तीवरील प्रेम आणि आदर दिसून आला. तो म्हणतो की आदिशक्ती रुक्मिणीमध्ये व्यक्त झाली आहे. आपण राधा आणि कृष्णाबद्दल ऐकतो, पण अर्जुनासाठी रुक्मिणी नारायणी होती.
 

vivek 
 
 
काही वर्षांपूर्वी 2008मध्ये आदिशक्ती या विषयावर भारतात एक परिषद आम्ही आयोजित केली होती. एक प्रख्यात कॅथलिक नन या परिषदेला येणार होती. पण जावं की नाही या संभ्रमात होती. मी तिला म्हणाले, “तू काळजी करू नकोस, तू फक्त कॉन्फरन्सला ये.” ती एक प्रथितयश महिला लेखिका आहे. ती आली आणि तिच्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल झाला आणि त्यानंतरचा तिचा सर्व अभ्यास, सर्व सादरीकरणं आता आदिशक्ती या विषयावर आहेत. परमपित्याकडून आदिशक्ती मातृत्वशक्तीपर्यंतचा मूलभूत परमात्मा संकल्पनेत झालेला तो आमूलाग्र बदल होता.
 
 
मला वाटतं आजच्या काळात याबद्दल बोलणं खूप सोपं आहे. सुरुवातीच्या काळात ज्या अनेक गोष्टी मांडू शकत नव्हतो, त्या आता आपण मांडू शकता. उदाहरणार्थ, जगात कुठेही आपण कर्माबद्दल बोलू शकता.
 
 
माझ्या मागच्या जन्मांबद्दल भाष्य करणारं माझं ‘माय जर्नी थ्रू टाइम’ हे पुस्तक मी पहिल्यांदा प्रकाशित केलं, तेव्हा माझे काही मित्र म्हणाले, “त्यावर लेखक म्हणून तुझं नाव टाकू नकोस.” पण मी म्हटलं, “हे माझं आयुष्य आहे! जे मला योग्य वाटतं आणि अनुभवातून उमटतं, ते मी करणारच.”
 
 
एक ख्रिश्चन धर्मप्रमुख आहेत. पुस्तक वाचून ते म्हणाले, ‘’हे वाचल्यानंतर मी यावर बरंच संशोधन केलं आहे आणि आता पुनर्जन्म या संकल्पनेवर इतकं मानसशास्त्रीय संशोधन झालं आहे की ते अकाट्य आहे.” मी कधीही संशोधन केलं नाही. हा माझा अनुभव आहे. अनुभूती आहे.
 
 
आपण एक आयुष्य जगतो आणि ते संपतं. पण पुढच्या आयुष्यासाठी आपल्या आकांक्षा याच आयुष्यात निश्चित होतात. आपल्या इच्छा आणि कर्मानुसार हे सर्व ठरतं. कोणताही इतर न्यायाधीश नाही. आपणच आपल्यासाठी अटी तयार करतो. जर भूतकाळाने आपली वर्तमान परिस्थिती निश्चित केली असेल, तर आज आपण जे करत आहोत ते आपलं भविष्य ठरवत आहे. आपण अधिक जाणीवपूर्वक आपलं भविष्य घडवू शकतो. हे जर आपण खरोखर समजून घेतलं, तर आपणच आपल्या भविष्याचे निर्माते आहोत.
 
 
पाश्चिमात्य लोकांना या दृष्टीकोनाबद्दल पटवून देण्यात तुम्हाला काही अडचणी कधी जाणवल्या का? उदाहरणार्थ, यूएनमध्ये आपण कशी मांडणी करता?
 
 
मी कधीच कोणाला पटवून देण्याचा प्रयत्न करत नाही. मी फक्त सत्य सांगते.
 
 
पश्चिमेकडे अजूनही काही लोक हटवादी आहेत. लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक अतिशय कट्टर ख्रिश्चन आहेत. प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांच्या निश्चित कल्पना आहेत. पण आता विशेषत: तरुण असं मान्य करत आहेत की ते आध्यात्मिक आहेत परंतु धार्मिक नाहीत. दुसर्‍या शब्दांत सांगायचं तर आध्यात्मिक जीवनाकडे त्यांचा ओढा आहे, परंतु ते ज्या धर्मात वाढले, त्यात त्यांना आध्यात्मिक आत्मीयता जाणवत नाही.
 
आणि माझ्यासाठी हे खूप उत्साहवर्धक आहे. मला वाटतं, आपली समज आपल्या वैयक्तिक अनुभवावर आधारित असावी. आज ध्यान ही आध्यात्मिक विकासाची पद्धत खुलेपणाने स्वीकारली गेली आहे.
 
 
परमहंस योगानंद यांनी बायबलवर त्या काळी भाष्य लिहिलं होतं, त्यातील नव्या करारावर, तिथल्या पारंपरिक ख्रिश्चन किंवा कॅथलिक समुदायात त्या भाष्याचं स्वागत कसं झालं?
 
 
योगानंद 1920 साली यूएसएला आले. तेव्हा तो ख्रिश्चनबहुल देश होता. योगानंदांना योग, क्रियायोग, त्याची आध्यात्मिक दृष्टी लोकांना द्यायची होती. त्यासाठी त्यांना तेथील लोकांच्या भाषेत समजावणं आवश्यक होतं. त्यातही येशू ख्रिस्ताचा संदेश आणि जीवन यातही योग अनुभवून योगानंदांनी हे भाष्य निर्माण केलं.
 
 
vivek
 
 
त्या काळी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यांना काही ठिकाणांवरून निघून जावं लागलं. काही ठिकाणांवरून अक्षरश: पलायन करावं लागलं. 1920च्या आणि 30च्या दशकात त्यांच्यावर अनेक हल्ले झाले आणि तरीही, 1920च्या दशकात हॉलीवूडने त्यांना स्वीकारलं. या पिढीला नवीन मार्गांमध्ये रस होता, नवी परिभाषा, नवे अर्थ त्यांना खुणावत होते.
 
 
तुम्ही स्वत:ला नारायणीच्या, आदिशक्तीच्या आध्यात्मिक उपासनेत स्थिर केलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही पर्यावरणाच्या क्षेत्रात विविध उपक्रम सुरू केले आहेत. तुम्ही जागतिक स्तरावर काम करत आहात. ज्या काळी तुम्ही यूएन किंवा तत्सम व्यासपीठावर हे सर्व मांडायला सुरुवात केलीत, त्या काळी लोकांच्या भावना कशा होत्या आणि आज त्यात काय फरक दिसून येतो?
 
 
यूएन नेहमीच महिलांसाठी विविध उपक्रम राबवते. पण महिला कधीच त्याच्या केंद्रस्थानी नव्हत्या. अविकसित देशांतील महिलांना प्रशिक्षित करणं, त्यांना उत्पन्न मिळवून देणं अशा प्रकारचे हे उपक्रम असत.
 
 
जेव्हा आम्ही आमची पहिली परिषद आयोजित केली, तेव्हा व्हॅटिकनच्या धार्मिक आणि आध्यात्मिक नेत्यांनी आम्हाला अक्षरश: धमकावलं, ‘नाव बदला. महिला धर्मप्रमुखांबद्दल बोलू नका. इंटरफेथ क्षेत्रातील स्त्रियांच्या भूमिकेबद्दल बोला.’ आम्हीही निक्षून सांगितलं, ‘जर आपण महिला धर्मप्रमुखांबद्दल बोलू शकत नसू, तर या शिखर परिषदेला काहीही अर्थ नाही.’ आम्हाला जिनेव्हातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला गेला. शिखर परिषदेच्या काही दिवस आधी त्यांनी सांगितलं की ‘तुम्ही संयुक्त राष्ट्राची इमारत वापरू शकत नाही.’ आम्ही तेव्हा कोफी अन्नानना कळवलं, ‘मी प्रेसमध्ये जाईन. यूएनने पुरुषांसाठी दरवाजे उघडले आणि स्त्रियांसाठी दरवाजे बंद केले.’ त्यांचा एक कॉल आला आणि आम्हाला संयुक्त राष्ट्राची इमारत वापरायला मिळाली.
 
 
2000 ते 2005 हा काळ खूप कठीण होता. धर्म-नेतृत्व क्षेत्रात पुरुष आणि स्त्रिया यांच्यात संतुलन राखणं का महत्त्वाचं आहे, हे लोकांना सांगणं कठीण होतं. पौर्वात्य आणि इतर धर्मपरंपरा व अब्राहमिक परंपरा यांच्यात संतुलन राखणं महत्त्वाचं का आहे, ही संकल्पनादेखील त्यांना समजत नव्हती.
 
 
आता हे बदललं आहे. मी आता इंटरफेथ करत नाही. मला वाटतं की इतर लोक काम पुढे वाढवत आहेत. मला आता ते करण्याची गरज नाही. आता मी योग, मानवी चित्ताचा विकास आणि त्यातून समाजबदल, पर्यावरण रक्षण या क्षेत्रात काम सुरू केलं आहे.
 
 
तुम्ही जेव्हा हिंदू धर्माचा अभ्यास सुरू केला, त्या वेळी कोणत्या गोष्टींनी तुम्हाला पहिल्यांदा हिंदू धर्माकडे आकर्षित केलं?
 
 
सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आदिशक्ती आणि दुसरं म्हणजे चेतना जागृत करण्याचंं तंत्र, योग. हा फक्त विश्वासाचा किंवा श्रद्धेचा विषय नाही, तो जिवंत अनुभवाचा विषय आहे. धर्मगुरूच्या म्हणण्यावर मी का विश्वास ठेवायचा? मला माझा प्रत्यक्ष अनुभव हवा आहे. आणि तो योगमार्ग आहे. संपूर्ण जगत्, दृश्य-अदृश्य हे सर्व काही परमात्म्याचा भाग आहे, परमात्मा आहे, कोणतंही वेगळेपण नाही, हा अनुभव योगमार्ग देतो. अब्राहमिक परंपरेत देव निर्माता आहे, पण निर्मितीपासून भिन्न उभा आहे. परंतु हिंदू योगिक दृष्टीकोनातून सर्व काही दैवी चेतनेचा एक भाग आहे. आपण त्या चेतनेचा एक भाग आहोत आणि आपण आपलं खरं स्वरूप ओळखू शकतो. हे माझ्यासाठी खूप आशादायक होतं! माझ्या एकत्वाची, परमात्म्याचा भाग म्हणून माझी खरी ओळख साकारण्यासाठी मी क्रियावान होऊ शकते, हा विश्वास आणि अनुभव या मार्गात मिळतो.
 
 
जेव्हा तुम्ही हे उपक्रम सुरू केले, तेव्हा आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिका आणि/किंवा चीन, जपान यांसारख्या देशातील स्त्रियांना, धर्मप्रमुखांना जोडून घेऊ शकलात का?
 
 
आफ्रिकेत आम्ही अनेक कार्यक्रम केले. आम्ही स्थानिकांबरोबर काम केलं. त्यांचा अजूनही निसर्गाशी घनिष्ठ असा आत्मिक आणि आध्यात्मिक संबंध आहे. आम्ही लॅटिन अमेरिकेत काही कार्यक्रम केले आहेत. पण चीनमध्ये कार्यक्रम केले नाहीत. आम्ही तैवानमध्ये कार्यक्रम करू शकलो. पण तरुण चिनी बौद्धांना आम्ही जोडून घेऊ शकलो आहोत. उदाहरणार्थ, हे पुस्तक सीतायण, याचं आमच्या एका चिनी तरुणीने चिनी भाषेत भाषांतर केलं आहे. ती सीतेच्या प्रेमातच पडली आहे. ती एक बौद्ध आहे, बीजिंगमध्ये राहते. तिला हे पुस्तक ऑनलाइन विक्रीसाठी आणि सर्वांसाठी खुलं अशा स्वरूपात ठेवायचं होतं, परंतु ते इंटरनेटवरून काढून टाकलं गेलं. चीनमध्ये कोणतंही आध्यात्मिक लिखाण किंवा कंटेंट ऑनलाइन जाऊ शकत नाही.
 
 
एक शेवटचा प्रश्न. संपूर्ण मानवी चेतनेच्या भविष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपण कुठे जात आहोत? दिशा काय असू शकते?
 
 
हे सर्व कालचक्र आहे. माझ्या मते आपण कलियुगातून बाहेर पडलो आहोत आणि आपण आता द्वापारयुगात जात आहोत. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. आपला प्रवास वरच्या दिशेने होतोय. त्याबद्दलचे बरेच पुरावे आपण पाहू शकतो. आपण ध्यानाच्या प्रसाराबद्दल बोललो.. लोकांकडे आता अ‍ॅप्स आहेत, माध्यमं आहेत, ज्ञान संपादन करण्यासाठी बरंच काही उपलब्ध आहे. आधी गुरूला शोधायला वणवण फिरावं लागे, मात्र आता ज्ञानाची आणि अनुभूतीची कवाडं सर्वांसाठी उघडी होत आहेत.
 
 
 
मला वाटतं की ध्यान आणि योग हेच प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. कारण, त्यामुळे जाणीव बदलते, दृष्टी आणि अनुभव आमूलाग्र बदलतो. पण याचा अर्थ असा नाही की संघर्ष संपला. कठीण संघर्षांमधून आपल्याला जायचं आहे. पण आपण उत्तमाकडे जात आहोत हे निश्चित. काही गोष्टी पूर्ण बदलतील. काही परंपरा पूर्णपणे नामशेष होतील. हे सर्व स्वीकारून आपण पुढे जाणार आहोत. आपण अशा युगात आहोत, ज्यात आपल्याला ‘स्व’ ओळखून, नवीन निर्माण करण्याची गरज आहे. जगण्याचे नवीन मार्ग, एकत्र राहण्याचे नवीन मार्ग आपल्याला तयार करावे लागतील.
 
 
हे तरुणांसाठी पुढील कार्य आहे. भविष्य घडवणं हेच त्यांचं कार्य आहे. आणि मला वाटतं की ते एक चांगलं भविष्य असेल.
सर्व धर्मांच्या मूलभूत एकतेबद्दल परमहंस योगानंदांनी मांडणी केली होती. सर्व मानवजातीची एकता आणि त्या एकत्वातून सर्वोत्कृष्ट सत्याकडे आपला प्रवास त्यांना अपेक्षित होता.
 
 
त्यांना तसे दृष्टान्तही मिळाले होते. एकत्रित काम करणार्‍या आध्यात्मिक समुदायांचं, संप्रदायांचं, धर्मांचं भविष्य त्यांनी पाहिलं होतं. मानवी एकता अजून दूर आहे. अजून आपण ते साध्य केलेलं नाही. पण ती संपूर्ण मानवजातीची सुप्त पण मूलभूत आकांक्षा आहे आणि तेच आपलं ध्येय आहे.
Powered By Sangraha 9.0