विवेक प्रकाशनचे ‘भारतमातेच्या वीरांगना’ पुस्तक प्रकाशित

विवेक मराठी    14-Mar-2023
Total Views |

vivek
मुंबई - स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व विवेक समूहाचा अमृतमहोत्सव अशा अमृत मुहूर्ताचे औचित्य साधून विवेक प्रकाशनचे 75 महिलांवर आधारित ’भारतमातेच्या वीरांगना’ हे सोनाली तेलंग लिखित पुस्तक जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी वेलिंगकर इन्स्टिट्यूट येथे प्रकाशित करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रतिभा फाटक, तसेच स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे उपस्थित होत्या. वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे प्रबंध संचालक उदय साळुंखेसुद्धा या प्रसंगी उपस्थित होते.
 
 
पुस्तकाबद्दल बोलताना डॉ. निशिगंधा वाड यांनी सर्व महिलांना संबोधित केले. त्या म्हणाल्या, “हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या स्त्रियांच्या गोष्टी आज सर्वांना माहीत व्हायला हव्यात.” राणी मनकर्णिका, सावरकरांच्या पत्नी अशा अनेक स्त्रियांचे दाखले देत त्यांनी आपले मनोगत मांडले. त्या पुढे म्हणाल्या, “भारतमातेच्या वीरांगनांचा इतिहास हा काळजावरती कोरला पाहिजे.” तर, ’नीरक्षीरविवेक जपणारा विवेक’ असे सा. विवेकचे वर्णन केले.
 
 
सामाजिक कार्याबद्दल डॉ. प्रतिभा फाटक म्हणाल्या, “आज महिला सबलीकरण किंवा सशक्तीकरण हे विषय मला वाटतात तेवढे गहन राहिले नाहीत, असे हे पुस्तक वाचताना लक्षात येते.’‘
मंजिरी मराठे यांनी सावरकर बंधूंच्या पत्नी व त्यांच्या आठवणी सांगत पुस्तकातील काही इतर महिलांबद्दलही आपली मते व्यक्त केली.
 
 
‘’देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो.’ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे वाक्य आपल्याला पुढच्या काळात अधिक मार्गदर्शक ठरेल” असे मत लेखिका सोनाली तेलंग यांनी व्यक्त केले.
 
 
 
“या 75 वीरांगनांचे त्यांच्या कार्याप्रती जे प्रेम होते, ते पाहून खरेच नतमस्तक व्हायला होते. कितीतरी गाथा अजून बाकी आहेत. 75 हा आकडा अर्थातच पूर्ण नाही. या सर्व वीरांच्या आणि वीरांगनांच्या योगदानामुळे स्वतंत्र भारतात आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे आणि त्याला पुढे नेणे हे आपल्यासमोरचे आव्हान आहे” असे त्या म्हणाल्या.
 
 
सा. विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी प्रास्ताविकात सा. विवेक ते विवेक समूह हा प्रवास विशद करताना विवेक प्रकाशनच्या दमदार वाटचालीचाही परिचय करून दिला.
 
 
या प्रसंगी विवेकच्या महिला दिन विशेषांकाचेही प्रकाशन झाले.
 
 
निवेदिता मोहिते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर विवेक पुस्तक विभाग प्रमुख शीतल खोत यांनी आभार मानले. ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.