ऑस्करच्या निमित्ताने..

ऑस्करच्या निमित्ताने..

विवेक मराठी    17-Mar-2023
Total Views |
किशोर अर्जुन । 8329256556
 

movie महान चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांना मिळालेला जीवनगौरव पुरस्कार, त्यानंतर भानू अथैय्यांना ‘गांधी’ चित्रपटच्या वेशभूषेसाठी मिळालेला पुरस्कार आणि त्यानंतर दर वर्षी हुलकावण्या देत मध्यंतरी ‘स्लमडॉग मिलिअनेअर’च्या निमित्ताने ‘जय हो‘ गाण्यासाठी गीतकार गुलजार आणि संगीतकार ए.आर. रहमान यांना मिळालेले पुरस्कार ही आपली ऑस्करमधील प्रातिनिधिक नोंद होती. राय यांचा अपवाद वगळता इतर सगळे पुरस्कार हे भारतीय कलाकारांना मिळालेले असले, तरी ते अभारतीय चित्रपट संस्था-चित्रपटांसाठी मिळालेले होते. त्यामुळे 100 टक्के भारतीय निर्मिती असलेल्या चित्रपटांना केव्हा ऑस्कर मिळणार? हा प्रश्न सतत चर्चिला जात होता. नुकत्याच झालेल्या 95व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या लघुपटाने आणि ‘नाटू नाटू’ या आरआरआर चित्रपटातील गाण्याने या दरवार्षिक प्रश्नाला एकाच वेळी उत्तर दिले आहे, त्या निमित्ताने..
अकादमी म्हणजेच ‘ऑस्कर’ पुरस्काराचा मोह नाही, असा एकही चित्रपटकर्मी नाही. आपल्या एकातरी कलाकृतीवर या पुरस्काराची नाममुद्रा उमटावी आणि हातामध्ये ‘ऑस्कर’ची सुवर्णलेप असलेली बाहुली उंचवावी, असे स्वप्न प्रत्येक जण पाहत असतोच. भारतासारख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात बहुभाषक चित्रपटांची निर्मिती करणार्‍या देशाला तर या पुरस्काराने आजवर बर्‍याच हुलकावण्या दिलेल्या आहेत. त्यामुळे भारतासाठी ऑस्कर पुरस्कार पटकावणारा पहिला चित्रपट कोणता असू शकेल, याबद्दल चित्रपट समीक्षक, चित्रपट चाहते आणि चित्रपटकर्मी दर वर्षी खल करत बसत. ‘लगान’ने अंतिम पाचामध्ये स्थान पटकावल्यानंतर तर गेल्या 20-22 वर्षांमध्ये भारतीय चित्रपटांकडून सगळ्यांच्याच अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. पण दर वर्षी मृगजळाप्रमाणे दिसणार्‍या या पुरस्काराने अखेर या वर्षी भारतीय चित्रपटाच्या गळ्यात एक नव्हे, तर एकाच वेळी दोन दोन विजयमाला टाकल्या आणि संपूर्ण देशालाच आनंदाचे भरते आले.
 
 
वास्तविक अकादमी पुरस्कार हा काही सरकारी पुरस्कार नव्हे. त्याचप्रमाणे तो काही ‘हॉलीवूड’कडून देण्यात येणारा अधिकृत पुरस्कारही नाही, तर आपल्याकडील ‘फिल्मफेअर’सारखाच तोदेखील खासगी संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा पुरस्कार आहे. त्याचप्रमाणे या पुरस्कारामध्ये कोणतीही अधिकृत पुरस्कार रक्कम देण्यात येत नाही. मात्र असे असले, तरी पहिल्या वर्षांपासूनच या पुरस्काराने दर्जात्मक चित्रपटांना अणि चित्रपटकर्मींनाच झुकते माप दिल्यामुळे ‘ऑस्कर’चे महत्त्व जगभरात अनन्यसाधारण राहिले आहे. त्यामुळे या वर्षी ‘नाटू नाटू’ आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’च्या रूपाने दोन दोन ‘ऑस्कर’ भारतामध्ये आल्यामुळे भारतीय चित्रपट रसिकांमध्ये आणि चित्रपटकर्मींमध्येसुद्धा चैतन्याचे वारे संचारले आहे. कारण आजवर ‘पाश्चिमात्य तेच उत्तम’ अशी आपली धारणा करून देण्यात आली होती. पण गेल्या काही वर्षांपासून एकूणच आशियाई देशांनी ‘ऑस्कर’वर आपला वरचश्मा प्रस्थापित करण्यास सुरुवात केलेले ठळकपणे जाणवते. याही वर्षी उत्कृष्ट चित्रपटासह सहा ऑस्कर खिशात टाकणारा ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स’ हा आशियाई चित्रपटच आहे. असे असले, तरी संपूर्ण भारतीय चित्रपटाला आजवर हा पुरस्कार मिळाला नव्हताच. ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या लघुपटाच्या माध्यमातून दुधाची तहान ताकावर भागली, असे नक्कीच म्हणता येईल.
 
 
movie
 
‘द एलिफंट व्हिस्पर्स’ हा एकाच वेळी माहितीपट आणि चरित्रात्मक लघु(कथा)पट आहे. निसर्ग आणि माणूस यांचे तादात्म्य दाखवतानाच या दोघांमध्ये सीमारेषा असणे किती महत्त्वाचे आहे, हेदेखील अधोरेखित करतो. अचित जैन, गुनीत मोंगा निर्मित आणि कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित हा सुमारे 41 मिनिटांचा लघुपट तामिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील एका आदिवासी दांपत्यांची कथा सांगतो. महत्त्वाचे म्हणजे ही कथा ज्या दांपत्यांची आहे, ते मुळात दांपत्यच नव्हते, तर सहकारी होते. पण अनाथ ‘रघू’ (हत्ती) त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर, वयाची साठी-पासष्टी ओलांडलेल्या या ‘एकल’ बोमन आणि बेल्ली यांना कळू लागते की, आता रघूची देखभाल हेच त्यांचे विहित आहे. आणि त्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला सदैव सोबतच राहावे लागणार, तेव्हा नातवंडांच्या आणि वाड्यावरील लोकांच्या साक्षीने ते वयाच्या उत्तरायणात एकमेकांशी लग्न करतात. निसर्ग माणसांना जवळ आणतो याचे हे एक वेगळेच उदाहरण या निमित्ताने आपल्यासमोर येते. पुढे रघू मोठा झाल्यानंतर त्याला दुसरीकडे वनविभागाकडे सोपवल्यानंतर बोमन अणि बेल्ली यांच्याकडे ‘अम्मू’ (हत्तीण) सुपुर्द करण्यात येते.
 
 
movie
 
दिग्दर्शिका कार्तिकी यांनी जवळपास पाच वर्षे रघूच्या कथेवर अभ्यास केला आणि सातत्याने विविध टप्प्यांवर त्यांचे चित्रीकरण सुरूच होते. यातून सुमारे 450 तासांचे फूटेज त्यांच्या हातात आले होते. रघूच्या अंघोळीचे, जेवतानाचे आणि खेळतानाचे अनेक तासांचे ते फूटेज होते. माहितीपटाची शिस्त आणि कथात्मकपटाचे स्वातंत्र्य असा दोहोंचा संगम यामध्ये ठिकठिकाणी दिसतो. बोमन, बेल्ली आणि रघू यांच्यातील जिव्हाळ्याचे क्षण ठरवून (स्क्रिप्टेट) चित्रित करता येण्यासारखे खचितच नव्हते, त्यामुळे अत्यंत संयम राखून चित्रीकरण केल्यामुळे आज आपण जे लघुपटामध्ये पाहतो आहोत, ती अप्रतिम दृश्ये साकारली आहेत.
‘द एलिफंट व्हिस्पर्स’ हा केवळ लघुपट म्हणून समोर उरत नाही, तर समोर साकारणार्‍या हरेक दृश्याच्या माध्यमातून आपण त्या कथेचा, दृश्यांचा, रघू-बोमन-बेल्लीच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग होतो. कारण जगण्याचे कोणतेही जगड्व्याळ तत्त्वज्ञान सांगत बसण्यापेक्षा अपघातानेच समोर आलेल्या पाच महिन्यांच्या अनाथ, कृश हत्तीच्या पिल्लाला आपल्या पोटच्या मुलासारखेच वागवणारे, वाढवणारे आणि त्याच्या चमकणार्‍या इटुकल्या डोळ्यामध्ये आपल्या जगण्याची इतिकर्तव्यता शोधणारे बोमन आणि बेल्ली हे कोणत्याही तत्त्वज्ञापेक्षा, धर्मगुरूपेक्षा मोठे ठरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण काहीतरी जगावेगळे करतो आहोत, असा त्यांचा कोणत्याही टप्प्यावर आविर्भाव नाही आणि नसतो. त्यामुळे ते सर्वार्थाने निसर्गाशी एकरूप झालेले खरे ‘आदि’माणूस वाटतात.
 

movie 
 
अत्यंत भावनिक, अकृत्रिम अशी गोष्ट या लघुपटातून आपल्या समोर आणणार्‍या कार्तिकी गोन्साल्विस यांचा दिग्दर्शिका म्हणून हा पहिलाच लघुपट आहे. कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांनी मंचावर हा पुरस्कार स्वीकारला. “माझी मातृभूमी भारताला मी हा पुरस्कार समर्पित करत आहे” असे कार्तिकी यांनी सांगितल्यानंतर सभागृहातील टाळ्यांचा गजर बरेच काही सांगून जात होता.
 
 
या लघुपटाबरोबरच ज्या दुसर्‍या कलाकृतीने भारताला ऑस्कर मिळवून दिला, ती म्हणजे ‘नाटू नाटू’ ही स्वररचना. काही दिवसांपूर्वी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवल्यानंतर ‘नाटू नाटू’चा ऑस्करवरील दावा अधिक प्रबळ झाल्याचे दिसत होतेच. पण तरिही ‘ओरिजिनल साँग’ या प्रकारामध्ये आजवर कधीही भारताने स्वत:ला न बघितल्यामुळे थोडी शंका नक्कीच होती. ‘स्लमडॉग मिलिअनेअर’च्या निमित्ताने जरी गुलजार आणि ए.आर. रहमान यांना ‘जय हो’ गाण्यासाठी ‘ऑस्कर’ मिळालेले असले, तरी हा चित्रपट, त्याची निर्मिती संस्था, त्यातील प्रमुख कलाकार आणि अर्थातच दिग्दर्शक आदी सगळेच परदेशी होते. त्यामुळे 100 टक्के (आणि त्यातही अगदी नेमकेपणाने सांगायचे तर ‘दक्षिण’) भारतीय चित्रपटाने या विभागात नामांकन मिळवणे आणि लगोलग पुरस्कार पटकावणे ही खूपच महत्त्वाची बाब आहे.
 

movie 
 
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या आणि तब्बल 1200 कोटींची कमाई करणार्‍या ‘आरआरआर’ या चित्रपटातील या जोशपूर्ण गाण्याने संपूर्ण देशालाच नाही, तर आता हॉलीवूडलादेखील वेड लावले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या गाण्याचे संगीतकार एम.एम. किरवानी हे दाक्षिणात्य चित्रपटातील मोठे नाव. मूळच्या आंध्र प्रदेशमधील या संगीताच्या जादूगाराने तामिळ चित्रपटांतून आपले सांगीतिक आयुष्य सुरू केले. तामिळ, तेलुगूबरोबर हिंदी चित्रपटांनादेखील त्यांनी संगीत दिलेले आहे.
 
 
‘नाटू नाटू’ हे गीत चंद्रबोस यांनी लिहिले आहे, तर कीरवानी यांचा मोठा मुलगा कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांनी हे गायले आहे. प्रेम रक्षित याने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. गाण्याचे चित्रीकरण युक्रेनमध्ये झाले आहे.
 
 
 
आपली उत्तम कलाकृती देशातील इतर सर्व भाषक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दाक्षिणात्य सिनेकर्मींचा हात कोणीही धरणार नाही. त्यामुळेच ‘नाटू नाटू’ गाणे आरआरआरच्या हिंदी व्हर्जनमध्ये ‘नाचो नाचो’ या टायटलअंतर्गत डब करण्यात आले. कन्नडमध्ये त्याला ’हल्ली नातू’, तामिळमध्ये ’नट्टू कूथु’ आणि मल्याळममध्ये ‘करिन्थोल’ करण्यात आले. नाटू म्हणजे नाचणे.
 
 
 
या गाण्याला जरी ऑस्कर मिळालेले असले, तरी या गाण्यावर ज्याप्रमाणे ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण नाचले आहेत, त्याला तोड नाही. हे नृत्यदिग्दर्शन प्रेम रक्षित याने केले आहे. सुमारे दोन महिने हे गाणे करण्यासाठी त्याने घेतले. रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यासाठी 110 मूव्ह तयार केल्या होत्या. दोन्ही कलाकारांकडे अफाट एनर्जी आहे. त्यांचा ताळमेळ साधणे हे त्यांच्यासाठी आव्हान होते. परंतु एसएस राजामौली यांच्यासह या दोन्ही दिग्गज कलाकारांनी त्याला पुरेपूर साथ दिली. चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर ते गाण्याचा सराव करायचे. सुमारे 43 रीटेक्सनंतर 20 दिवसांमध्ये या गाण्याचे चित्रीकरण झाले आणि ‘ऑस्कर’ने या गाण्यासाठी घेतलेली सगळ्यांची सर्व मेहनत फळाला आली आहे.
 
 
आजवर तद्दन बॉलिवूडी मसालापट किंवा गरिबी चित्रित करणारे कलात्मक चित्रपट हीच भारतीय चित्रपटांची ओळख आहे, असे चित्रण जगभरात झाले होते किंवा करण्यात आले होते. पण या पलीकडे जात परंपरेशी नाते जोडणारे, आशयघन, सौदर्यंवादी दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेले कलात्मक चित्रपटदेखील भारतामध्ये निर्माण होतात आणि जागतिक पातळीवर देशाची मान गौरवाने उंचावण्याचा सन्मान याच चित्रपटांना मिळतो आहे, हेदेखील या आपल्या पहिल्यावहिल्या दोन दोन ऑस्कर पुरस्कारांच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
 
 
लेखक कोचीस्थित पटकथा लेखक व
क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत.