संघशताब्दीच्या पार्श्वभूमीवर संघशक्तीचे आत्मपरीक्षण

विवेक मराठी    17-Mar-2023
Total Views |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय पदाधिकार्‍यांची बैठक 12 ते 14 मार्च या कालावधीत पानिपतजवळ संपन्न झाली. सुमारे चौदाशे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतून आगामी काळात संघकामाची दिशा निश्चित केली गेली आणि स्वशक्तीचे आत्मपरीक्षणही झाले.

rss

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 2025मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघविचार परिवारातील संस्था, संघटना समाजजीवनाच्या सर्व आयामांना स्पर्श करताना दिसत आहेत. हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी कार्यरत असणार्‍या या संस्था-संघटनांच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय पदाधिकार्‍यांची बैठक 12 ते 14 मार्च या कालावधीत पानिपतजवळ संपन्न झाली. सुमारे चौदाशे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते. मागील वर्षाचा आढावा आणि पुढील वर्षाचे नियोजन असे या बैठकीचे स्वरूप होते. या अखिल भारतीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य आणि अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. या वेळी डॉ. वैद्य म्हणाले, “2025मध्ये संघ आपल्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण करणार आहे. सध्या 71355 ठिकाणी प्रत्यक्ष काम करून संघ सामाजिक परिवर्तनाच्या महत्त्वपूर्ण कार्यात आपली भूमिका बजावत आहे. पुढील वर्षभरात एक लाख ठिकाणी पोहोचण्याचे संघाचे उद्दिष्ट आहे.” कोरोनाच्या आपत्तीनंतरही संघाचे कार्य वाढले असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “2020मध्ये 38913 ठिकाणी 62491 शाखा, 20303 ठिकाणी साप्ताहिक सभा आणि 8732 ठिकाणी मासिक सभा झाल्या. 2023मध्ये ही संख्या 42613 ठिकाणी 68651 शाखा, 26877 ठिकाणी साप्ताहिक सभा आणि 10412 ठिकाणी मासिक सभा झाली आहे. संघाच्या दृष्टीकोनातून देशभरात 911 जिल्हे आहेत, त्यापैकी 901 जिल्ह्यांमध्ये संघाचे थेट कार्य चालते. 6663पैकी 88 टक्के मंडलांमध्ये, 59326 मंडलांपैकी 26498 मंडलांमध्ये संघाच्या थेट शाखा आहेत. शताब्दी वर्षात संघाचे कार्य वाढवण्यासाठी संघाचे नियमित प्रचारक आणि विस्तारक यांच्या व्यतिरिक्त 1300 कार्यकर्ते दोन वर्षांसाठी शताब्दी विस्तारक बनले आहेत” असेही सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी नमूद केले आहे.
 
17 March, 2023 | 13:44
 
 
जनतेची संघाप्रती असलेली आस्था वाढत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे संघाशी जोडून घेण्यास लोक उत्सुक आहेत. 2017 ते 2022 या काळात ‘जॉइन आरएसएस’द्वारे 7,25,000 विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. यातील बहुतांश 20 ते 35 वयोगटातील तरुण आहेत, ज्यांना समाजसेवेसाठी संघात सामील व्हायचे आहे. संघाच्या 60 टक्के शाखा या विद्यार्थ्यांच्या शाखा आहेत. गेल्या वर्षभरात 121137 तरुणांनी संघाचे प्राथमिक शिक्षण घेतले आहे. आगामी वर्षाच्या योजनेत देशभरात संघशिक्षणाचे 109 अध्यापन वर्ग आयोजित केले जातील, ज्यामध्ये सुमारे 20 हजार स्वयंसेवकांनी शिक्षण घेणे अपेक्षित आहे.
 
rss 
 
तीन दिवस चाललेल्या या बैठकीत संघशताब्दीच्या पार्श्वभूमीवर संघकामातून समाजजीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पाच आयामांवर भर देण्याचा निर्णय घेतला गेला. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी या निर्णयासंबंधी माध्यमांना माहिती दिली. सामाजिक समरसता, परिवार प्रबोधन, पर्यावरण रक्षण, स्वदेशी आणि नागरिक कर्तव्य या पाच आयामांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करणार आहे .
 
 
17 March, 2023 | 13:45
 
 
या वर्षी हिंदवी स्वराज्यस्थापनेस 350 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रा.स्व. संघाद्वारे महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्याविषयी होसबळे यांनी सांगितले की, “शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून समाजाला मुक्त करून समाजात आत्मविश्वास व स्वाभिमानाची भावना निर्माण करणार्‍या भारतातील थोर व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन अद्वितीय शौर्य, सामरिक कौशल्य, भेदक युद्धकौशल्य, संवेदनशील, निष्पक्ष आणि निष्पक्ष प्रशासन, महिलांचा आदर, प्रखर हिंदुत्व अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण होते. आज भारत आपली सामाजिक शक्ती जागृत करून आपल्या ‘स्व’च्या आधारावर राष्ट्रउभारणीच्या मार्गावर वाटचाल करत आहे, भारताचे ‘स्व’आधारित राज्य स्थापन करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनयात्रेचे स्मरण अत्यंत समर्पक आणि प्रेरणादायक आहे” असे होसबळे यांनी नमूद केले.
 

rss 
 
हे वर्ष भगवान महावीर यांच्या दोन हजार पाचशे पन्नासाव्या (2550वे) निर्वाण वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर देशभर त्यांच्या विचार प्रसाराच्या कार्यक्रमात स्वयंसेवक योगदान देणार आहेत.
 
 
तसेच आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांचे 200वी जयंती (फेब्रुवारी 2024पासून) वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. ’वेदांकडे परत चला’ ही त्यांची प्रमुख घोषणा होती. स्वातंत्र्यसंग्रामातील प्रेरणा, जातिनिर्मूलन, स्त्री शिक्षण व पुनरुत्थान क्षेत्रात त्यांनी मौलिक व पथदर्शक कार्य केले. त्या निमित्तानेदेखील त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
 

rss 
 
पत्रकार परिषदेत सरकार्यवाह होसबळे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारतविरोधी वक्तव्यांविषयी संघाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “राजकीय पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांकडून अतिशय जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते. त्यामुळे खासदारांनी अतिशय जबाबदारीने बोलणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे देशात आणीबाणी लादून लोकशाही खुंटीस टांगणार्‍या आणि अशा लोकशाहीविरोधी कृत्यासाठी माफीही न मागणार्‍यांना देशाच्या लोकशाहीविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही” असे होसबळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रा.स्व. संघाचा हिंदुराष्ट्राचा विचार हा सांस्कृतिक राष्ट्राचा विचार आहे, त्यामुळे त्याकडे भूराजकीय अशा स्टेट या संकल्पनेसारखे बघू नये, सांस्कृतिक राष्ट्र या दृष्टीने बघितल्यास त्याविषयी कोणतीही शंका निर्माण होत नाही, कारण भारत या रूपात हिंदुराष्ट्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रा.स्व. संघ हा लोकसंख्येच्या असंतलुनाविषयी गंभीर असल्याचे होसबळे म्हणाले. लोकसंख्या असंतुलन हा अतिशय गंभीर मुद्दा असून त्याविषयी महात्मा गांधी आणि माजी मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांनी गंभीर चिंता व्यक्त केली असल्याचेही ते म्हणाले.
 
 
rss
 
“जागतिक नेतृत्वाच्या वाटेवर भारत स्थिर वाटचाल करत असताना, या वाटेवर कोणाला काटे आणायचे आहेत, हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे” असे होसबळे म्हणाले. विकृत इतिहासाच्या जागी योग्य इतिहास सांगावा आणि समकालीन इतिहासाचे लेखन व्हावे, अशी संघाची भूमिका असल्याचेही सरकार्यवाह होसबळे यांनी सांगितले. भारत आर्थिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होत असल्याचे सांगून सरकार्यवाह होसबळे म्हणाले की, सामरिक आणि मुत्सद्दी आघाड्यांवरील भारताचे वाढते महत्त्व जगासमोर आहे. देश-परदेशात अशा अनेक शक्ती आहेत, ज्या भारताला या मार्गावर पुढे जाण्यापासून रोखू पाहत आहेत. मात्र, ’स्व’च्या जाणिवेने या शक्तींना निष्प्रभ ठरविण्यासाठी समजाने सज्ज व्हावे, असे होसबळे यांनी नमूद केले.
 
 
12 ते 14 मार्च या कालावधीत झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतून आगामी काळात संघकामाची दिशा निश्चित केली गेली आणि स्वशक्तीचे आत्मपरीक्षणही झाले.
- प्रतिनिधी