‘गोपाल शेणखत’ सेंद्रिय शेती चळवळ

विवेक मराठी    20-Mar-2023
Total Views |
@आदिनाथ पाटील
 
सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीला बळ मिळावे, म्हणून भिवंडी तालुक्यातील आनगाव येथे विवेक मल्टिव्हिजन फाउंडेशनने सुरू केलेल्या गोपाल शेणखत प्रकल्पाने अवघ्या चार वर्षांत परभणी, पुणे, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव आदी जिल्ह्यांतील पाचशे शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीकडे वळवले आहे. आगामी काळातही विषमुक्त शेती व्यवसायाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे, या हेतूने प्रकल्पाचे पाऊल पडत आहे.
 
gopal

गेल्या 75 वर्षांच्या वाटचालीतील विवेक माध्यम समूहाने सामाजिक आणि राष्ट्रीय विचारांशी बांधिलकी जपून आपली ओळख निर्माण केली आहे. विवेक समूहाच्या विस्तारातील एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे विवेक मल्टिव्हिजन फाउंडेशन. या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील आनगाव येथे 2018 साली ‘गोपाल शेणखत निर्मिती प्रकल्पा’स सुरुवात झाली आहे. सेंद्रिय खत शेतीच्या माध्यमातून विषमुक्त शेतीचा प्रसार करणे, तसेच रासायनिक खतांच्या आणि औषधांच्या तुलनेमध्ये कमी खर्चात शेती करण्याचा पर्याय शेतकर्‍यांना उपलब्ध करून देणे हा गोपाल खतनिर्मितीमागील उद्देश आहे. आनगाव येथील एका गोशाळेतील सुमारे दोन हजार गायींच्या कच्च्या शेणापासून वार्षिक एक हजार टन सेंद्रिय गोपाल खत तयार केले जाते. त्यापैकी 800 टनांपर्यंतच्या खताची विक्री होत असते. शेतकर्‍यांना व ग्राहकांना 40 किलोच्या पिशव्यांमध्ये हे खत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 
पाचशे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे
 
गोपाल शेणखताच्या माध्यमातून नाशिक, जळगाव, परभणी, बेळगाव, निपाणी, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बुलडाणा यासह पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सेंद्रिय शेती प्रक्रियेला बळ देण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे तब्बल एक हजार शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. गोपाल शेणखतामध्ये नैसर्गिक घटक उपलब्ध असल्याने शेतकर्‍यांच्या पीक उत्पादनात वाढ झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांचा औषधे आणि खते यांचा खर्च कमी होऊन मूळ उत्पादन खर्चात बचत झाली आहे. शेतकर्‍यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन येत्या पाच वर्षांत पाच हजार शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीशी जोडण्याचा आमचा मानस आहे.
 
सेंद्रिय शेतकरी आहेत समाधानी
 
 
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील कारजगा गावातील नितेश तात्यासाहेब खोत यांनी गोपाल शेणखताचा उपयोग करून उत्पादनामध्ये 25 टक्के वाढ झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात अनुभवकथन करताना ते म्हणाले, “माझी पाच एकर शेती आहे. पूर्वी रासायनिक खते वापरायचो. पुढे पिकांमध्ये उत्पादन घट झालीच, शिवाय जमिनीचा पोतही खालावत गेला. त्यामुळे मी सेंद्रिय शेतीकडे वळलो. गोपाल शेणखताचा मी प्रारंभीपासून ग्राहक आहे. सध्या ऊस, वांगी, कलिंगड, टोमॅटो अशी पिके घेतो. पूर्वी उसाचे एकरी 65 टन उत्पादन निघायचे, आता 80 टनांपर्यंत मजल गेली आहे. 34 ते 36 कांड्या वाढलेला ऊस पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातले शेतकरी येत असतात. हे सर्व गोपाल खतामुळे शक्य झाले आहे. एकूणच सर्व पिकांमध्ये 25 टक्के वाढ झाली आहे.”
 

gopal 
 
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कोरठाणा येथील चंद्रशेखर रेणुकादास देशमुख सांगतात, “माझी 25 एकर शेती आहे. मागील वर्षापासून गोपाल शेणखत वापरत आहे. सध्या हरभरा, टरबूज, गहू आणि हळद या पिकांना गोपाल खताची मात्रा देत आहे. गतवर्षांपेक्षा यंदा हरभरा आणि गहू जोमात आला आहे. गव्हाला 25 लोंब्या आल्या आहेत. यामुळे मी अत्यंत समाधानी आहे.”
 
 
परभणी जिल्ह्यातील लोहगाव येथील शेतकरी वसंत देसाई-देशमुख सांगतात, “माझी 15 एकर शेती आहे. दोन वर्षांपासून मी सेंद्रिय गोपाल शेणखत वापरून पीक घेत आहे. ऊस आणि हळद या दोन्ही पिकांना खताची मात्रा देत आहे. एकरी एक टन खत वापरतो. त्यामुळे उत्पादनामध्ये 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे.”
 

gopal 
 
गोपाल नैसर्गिक शेणखताचे फायदे
 
 
रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम टळून जमिनीचा पोत सुधारतो.
 
 
गोमूत्रमिश्रित असल्याने त्यातील विविध क्षार, संप्रेरके झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात.
 
 
गांडुळांची व जीवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन तिच्यात हवा खेळती राहते.
 
नत्र, स्फुरद, पालाश इ. मुख्य अन्नघटक व सेंद्रिय कार्बन यांच्यामुळे पिकांची भरघोस वाढ होते.
 
 
जमिनीची जलसंधारण क्षमता वाढते.
 
 
सूक्ष्म जीवाणू, फॉस्फेट सॉल्युबिलायझिंग बॅक्टेरिया यामुळे झाडांच्या वाढीस मदत.
 
 
रंग, चमक, चव तसेच साठवणक्षमता सुधारण्यास मदत.
 
 
उत्पादन खर्च कमी येतो व शेती उत्पन्न वाढण्यास मदत होते.
 
 
फक्त देशी गाईचे शेण, गोमूत्र आणि पालापाचोळा यांच्या मिश्रणातून तयार केलेले परिपूर्ण शेणखत आहे.
 

gopal 
 
येत्या काळात तज्ज्ञांकडून, अभ्यासकांकडून शेतकर्‍यांना थेट बांधावर मार्गदर्शन करणे, सेंद्रिय प्रमाणीकरणाकरिता पुढाकार घेणे, शेतकर्‍यांच्या उत्पादक खर्चात बचत करणे आणि शेतकर्‍यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्नशील आहोत. जगभरात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे परदेशात गोपाल शेणखत निर्यात करण्यासाठी योग्य ती पावले उचलत आहोत.
संपर्क : व्यवस्थापकीय संचालक, गोपाल खत प्रकल्प, आनगाव ता. भिवंडी, जि. ठाणे - 9594961856