सरन्यायाधीशांविषयीचा माहितीकोश

विवेक मराठी    20-Mar-2023
Total Views |
 
vivek
 
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतानाच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड यांनी सूत्रे हाती घेतल्याची बातमी वृत्तपत्रातून वाचली होती. 50वे सरन्यायाधीश हा खरे तर न्यायालयाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा होताच, तसेच हे 50वे पद एका मराठी न्यायाधीशाला मिळावे आणि तेही ज्या खुर्चीवर त्या व्यक्तीच्या पित्याला विराजमान होता आले, त्यालाच मिळावे हा आणखी एक सुवर्णयोग होता. त्यामुळे या टप्प्यावर आजवरच्या सर्वच न्यायाधीशांविषयी एकत्रितपणे कुठे वाचायला मिळेल का? याचा शोध मनाशी घेत असतानाचा नाशिकचे कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. मिलिंद चिंधडे यांनी लिहिलेले ‘भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश’ हे पुस्तक हातात आले.
 
 
अ‍ॅड. चिंधडे यांनी सुमारे चाळीस वर्षे वकिली व्यवसायात घालवली आहेत. ती घालवत असतानाच त्यांनी कायदा महाविद्यालयांमध्ये 32 वर्षे अध्यापनाचे कामही केले आहे. अभ्यासाचा एक भाग म्हणून आजवर महाराष्ट्रात प्रकाशित झालेली वकिलांची आत्मचरित्रे त्यांनी अभ्यासली आहेत आणि नाशिकच्याच एका दैनिकात त्यावर लेखमालादेखील लिहिली आहे. वकिली आणि कायदा या विषयाशी संबंधित त्यांची आणखीही काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘स्वाक्षरीचे जग’, ‘प्रकाशाचे दिवे’, ‘ज्योतिष नभातील तारे’ ही त्यांची आणखी काही पुस्तके. वैशाली प्रकाशनचे विलास पोतदार हे त्यांचे प्रकाशक. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हा विषय त्यांनीच अ‍ॅड. चिंधडे यांना सुचवला आणि त्याबरहुकूम अ‍ॅड. चिंधडे यांनी लेखन केले, हे ध्यानात घेतले पाहिजे. अ‍ॅड. चिंधडे यांनी प्रत्येक सरन्यायाधीशाविषयी लिहिताना त्याचे त्याचे वेगळेपण ठळकपणे उद्धृत केले आहे.
  • • पुस्तकाचे नाव - भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
  •  
  • • लेखक - अ‍ॅड. मिलिंद चिंधडे (संपर्क - 9423968964)
  •  
  • • प्रकाशक - वैशाली प्रकाशन, पुणे.
  •  
  • • पृष्ठसंख्या - 116
  •  
  • • मूल्य - 210 रुपये.
हरिलाल जेकिसुनदास कानिया हे स्वतंत्र भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश. स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वोच्च न्यायालय ओळखले जात असे ते संघीय न्यायालय म्हणून. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि 14 ऑगस्ट 1947 रोजी संघीय न्यायालयाचे तत्कालीन प्रमुख सर पॅट्रिक स्पेन्ज निवृत्त झाले, त्यांच्या निवृत्तीनंतर कानिया यांची त्या पदावर नियुक्ती झाली. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाल्यानंतरच ‘भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती’ हे पद त्यांना मिळाले. जवळपास पावणेदोन वर्षे ते या पदावर होते आणि पदावर असतानाच त्यांचे निधन झाले. सरन्यायाधीश हे पद भूषवत असताना आजवर फक्त दोघा न्यायाधीशांना मरण आले, त्यातले दुसरे होते सव्यसाची मुखर्जी. तसे ते 20वे सरन्यायाधीश. लंडन येथे व्याख्यानासाठी गेले असताना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांना मरण आले.
 
 
सरन्यायाधीश होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर महत्त्वाची पदे भूषवण्याची संधी अनेकांना मिळाली, त्यातले मेहरचंद महाजन हे पहिले. राजा हरिसिंग यांच्या शासनकाळात जम्मू-काश्मीर राज्याचे पंतप्रधानपद तर त्यांनी भूषवलेच, तसेच देशभरातील सर्व संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करण्याच्या दिशेने तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रयत्न सुरू केल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्याचे भारतात विलीनीकरण करण्याच्या प्रयत्नात महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, हे उल्लेखनीय. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद त्यांच्या वाट्याला आले ते त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी.
 
 
 
बिजनकुमार मुखर्जी हे भारताचे चौथे सरन्यायाधीश. 22 डिसेंबर 1954 रोजी त्यांनी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली. हे पद घेण्यासाठी पंडित नेहरू यांनी त्यांना त्याआधी काही वर्षे विनंती केली होती. पंडित नेहरूंना नकार देण्याचे धाडस तर त्यांनी दाखवलेच, त्याचबरोबर ते दाखवताना मेहरचंद महाजन हे आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत, ते प्रथम सरन्यायाधीश व्हायला हवेत अशी त्यांनी भूमिका घेतली आणि महाजन यांच्यानंतरच ते सरन्यायाधीश झाले. न्या. यशवंत चंद्रचूड हे सर्वाधिक मोठा कालावधी (2696 दिवस) मिळालेले सरन्यायाधीश, तर कमल नारायण सिंह हे सर्वात कमी (अवघे 17 दिवस) कालावधी मिळालेले सरन्यायाधीश ठरले.
 
 
 
एकूण पाच महाराष्ट्रीय न्यायाधीशांना सरन्यायाधीशपद मिळाले, त्यातील प्र.बा. गजेंद्रगडकर हे पहिले, तर यशवंत विष्णू चंद्रचूड हे दुसरे. तिसरे शरद अरविंद बोबडे, तर चौथे उदय उमेश लळीत आणि पाचवे धनंजय यशवंत चंद्रचूड. अमलकुमार सरकार हे भारताचे आठवे सरन्यायाधीश, ते अविवाहित होते. वकिलीची परीक्षा न दिलेला, साधी सनदही न घेतलेला परंतु आयसीएस असल्याने मॅजिस्ट्रेट, कलेक्टर आणि सिव्हिल न्यायाधीश होऊन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झालेले असे ज्यांचे वर्णन करता येईल, असे होते कैलाश नाथ वांचू.
 
 
मोहमद हिदायतुल्ला हे होते मुस्लीम समाजातील पहिले सरन्यायाधीश. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशी तिन्ही सर्वोच्च पदे त्यांनी भूषवली. या एका वैशिष्ट्यामुळे न्यायपालिकांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी त्यांचे नाव लिहिले जाईल. न्या. जयंतीलाल छोटेलाल शाह हे बारावे सरन्यायाधीश. आणीबाणीमध्ये सर्वसामान्यांचा जो छळ झाला, सत्तेचा दुरुपयोग झाला, अधिकारांचा गैरवापर झाला, त्याची चौकशी करण्यासाठी त्या वेळच्या जनता सरकारने जे शाह कमिशन नेमले, ते हेच न्या. शाह. आपण सरन्यायाधीश होतो याचा त्यांना कोणताही दुराभिमान नव्हता. ‘निवृत्तीनंतर मी जर न्यायाधीश राहिलो नसेन, तर मी माझ्या नावामागे माजी न्यायाधीश असे बिरुद का लावायचे? असे बिरुद लावणे हे न्यायाधीशांना शोभादायक नाही’ असे त्यांचे म्हणणे होते..
 
 
 
सर्व मित्र सिकरी हे तेरावे सरन्यायाधीश. बार असोसिएशनमधून नेमणूक झालेले सर्वोच्च न्यायालयाचे ते पहिले सरन्यायाधीश. तिघा तिघा न्यायाधीशांचा ज्येष्ठताक्रम डावलून सरन्यायाधीश झालेले आणि तब्बल 1372 दिवसांचा कालावधी मिळालेले सरन्यायाधीश म्हणजे अजित नाथ रे. रे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दिलेले अधिकतर निकाल सरकारच्या बाजूने होते. त्यांना सरन्यायाधीशपदावर नेमताना तत्कालीन कायदा मंत्री कुमारमंगलम यांनी अवघे दोन तास दिले होते. कुमारमंगलम हे असे कायदा मंत्री होते, ज्यांचे मत न्यायालय सरकारला बांधील असले पाहिजे असेच होते.
 
 
पद्म पुरस्काराने सन्मानित केले गेले असे सहा निवृत्त सरन्यायाधीश होऊन गेले. त्यात हमीदुल्ला बेग मिर्झा, पी.एन. भगवती, एम.एन. वेंकटचलय्या, जगदीश शरण वर्मा, आदर्श सेन आनंद आणि विश्वेश्वरनाथ खरे यांचा समावेश आहे. निवृत्तीनंतर राज्यपाल झालेले सरन्यायाधीश म्हणजे पी. सदाशिवम, पहिले दलित सरन्यायाधीश म्हणजे कोणाकुप्पकाटिल गोपीनाथन बालकृष्णन. शीख समाजातील पहिले सरन्यायाधीश म्हणजे जगदीश सिंह खेहर. याच खेहर यांनी दर तीन महिन्यांनी एकदा असे सातत्याने 40 वर्षे रक्तदान केले, हे तर आणखी उल्लेखनीय. निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्य म्हणून नेमले गेलेले एकमेव सरन्यायाधीश म्हणजे रंजन गोगोई. अल्तमास कबीर हे 39वे सरन्यायाधीश. हज सबसिडी बंद करणारे आणि संध्याकाळी साडेसहापर्यंत कामकाज चालवणारे सरन्यायाधीश अशी त्यांची ओळख होती.
 
 
अ‍ॅड. चिंधडे यांनी या पुस्तकात ज्या 50 सरन्यायाधीशांचा परिचय करून दिला आहे, त्यातले 17 सरन्यायाधीश पुस्तक लिहिले तेव्हा हयात होते, परंतु 2 मार्च 2013 रोजी अजीज मुशब्बर अहमदी यांचे निधन झाले. त्यामुळे आता हयात असणार्‍या सरन्यायाधीशांची संख्या झाली आहे 16. भूपेंद्रनाथ किरपाल आणि विश्वेश्वरनाथ खरे हे दोघे सरन्यायाधीश उत्तम क्रिकेट खेळणारे, त्यातले न्या. खरे तर रणजी ट्रॉफीदेखील खेळले.
 
 
अ‍ॅड. चिंधडे यांच्या हातून लिहिताना नकळत काही चुका राहिल्या आहेत, परंतु त्या पुढच्या आवृत्तीत ते दुरुस्त करतील अशी अपेक्षा बाळगली पाहिजे. उदा., सरोश होमी कापडिया यांची जन्मतारीख, उदय लळीत न्यायमूर्ती झाले ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टातच, पुस्तकाचे शीर्षक भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असे आहे, परंतु प्रत्येक प्रकरणात सरन्यायाधीशाच्या नावावर उल्लेख आहे तो सर्वोच्च न्यायालयातील प्रमुख न्यायमूर्ती असा. कोका सुब्बा राव यांच्याविषयी लिहिताना चिंधडे यांनी ‘विद्रोही न्यायमूर्ती’ असा उल्लेख केला आहे, पण त्यांच्या नावाशी जोडलेल्या विद्रोही या विशेषणाविषयी त्यांनी फारसे स्पष्टीकरण दिलेले नाही.
 
 
सुधीर जोगळेकर
। 9820016674