हवामान बदलाचा विध्वंसक आविष्कार ‘फ्रेडी ’ वादळ

विवेक मराठी    21-Mar-2023
Total Views |
 @डॉ. श्रीकांत कार्लेकर
। 9764769791
चक्रीवादळाचा प्रवासकाळ, त्याची तीव्रता, सक्रियता आणि त्याने केलेली ऊर्जेची साठवण या सर्वच बाबतीत फ्रेडी हे वादळ आजपर्यंतचे वादळी ऊर्जेचा प्रचंड साठा असलेले जगातले सर्वात मोठे वादळ ठरले आहे. यामुळेच हवामान बदलाच्या परिणामाचा तो एक भरभक्कम पुरावा मानण्यात येत आहे.
 
vivek
 
दि. 6 फेब्रुवारी 2023पासून दक्षिण हिंदी महासागरात विकसित झालेले आणि साडेआठ हजार कि.मी.चा प्रवास करणारे फ्रेडी हे वादळ आजपर्यंतचे वादळी ऊर्जेचा प्रचंड साठा असलेले जगातले सर्वात मोठे वादळ ठरले आहे! हवामान बदलाची अनेक रूपे सध्या वेगाने वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर उभी ठाकत आहेत. हा बदल म्हणजे प्रामुख्याने जागतिक तापमानवाढ.
 समुद्रावर या बदलाचे परिणाम सर्वप्रथम आणि लगेचच दिसून येतात. वादळनिर्मिती हा याचा दृश्य आणि विध्वंसक परिणाम असतो.
 
 
दि. 6 फेब्रुवारी 2023ला ऑस्ट्रेलियाच्या वायव्य किनारपट्टीजवळ निर्माण होऊन अजूनही - म्हणजे 13 मार्चपर्यंत (हा लेख लिहीपर्यंत) दक्षिण हिंदी महासागराच्या विस्तृत पट्ट्यातून फ्रेडी नावाच्या वादळाचा प्रवास चालूच होता.
 
 
चक्रीवादळाचा प्रवासकाळ, त्याची तीव्रता, सक्रियता आणि त्याने केलेली ऊर्जेची साठवण या सर्वच बाबतीत फ्रेडी हे उच्चांक निर्माण करणारे आणि आधीच्या सर्व वादळांचे आजपर्यंतचे विक्रम मोडीत काढणारे वादळ ठरले आहे आणि म्हणूनच हवामान बदलाच्या परिणामाचा तो एक भरभक्कम पुरावा मानण्यात येत आहे.
 
 
दक्षिण गोलार्धातील फ्रेडी चक्रीवादळाने सर्वाधिक काळ - म्हणजे तब्बल 37 दिवस सक्रिय राहण्याचा आणि सर्वाधिक ऊर्जासंचय करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सहा फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाच्या वायव्येकडे दक्षिण हिंदी महासागरात तयार झालेल्या या चक्रीवादळाने तब्बल साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करत पश्चिमेकडे जात रविवारी 12 मार्च रोजी मोझांबिक देशाची किनारपट्टी ओलांडली. वास्तविक पाहता 4 फेब्रुवारीलाच पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या ब्रूम शहरापासून वायव्येकडे 770 कि.मी. अंतरावर या वादळाच्या निर्मितीची चिन्हे दिसू लागली होती.
 
 
याआधी हरिकेन जॉन (1994) हे प्रशांत महासागरातील चक्रीवादळ सर्वाधिक 31 दिवस सक्रिय राहणारे वादळ ठरले होते. दक्षिण हिंदी महासागरातील फ्रेडी या चक्रीवादळाने 37 दिवस सक्रिय राहत हरिकेन जॉनचा विक्रम मोडलाच, त्याचबरोबर या चक्रीवादळातील एकूण ऊर्जासुद्धा (ACE - Accumulated cyclone energy) 85 एकक (Unit) इतकी विक्रमी नोंदली गेली. याआधी प्रशांत महासागरात 2006मध्ये निर्माण झालेल्या आयोक या टायफून वादळामध्ये ती 81 एकक इतकी नोंदली गेली होती.
 
 
 
ऑस्ट्रेलियाच्या वायव्य किनारपट्टीजवळ सहा फेब्रुवारीला मान्सून द्रोणीमध्ये (Troughमध्ये) फ्रेडी चक्रीवादळाची ही निर्मिती झाली होती. त्यानंतर दक्षिण हिंदी महासागरातून पश्चिमेकडे सरकताना फ्रेडीची तीव्रता पाचव्या श्रेणीच्या विनाशकारक वादळाइतकी वाढत गेली. फ्रेडी चक्रीवादळाने 21 फेब्रुवारीला मादागास्करची, तर 24 फेब्रुवारीला मोझांबिकची किनारपट्टी ओलांडली. त्यानंतर पुढील काही दिवस मोझांबिकपासून झिम्बाब्वेपर्यंत थैमान घातल्यानंतर फ्रेडी पुन्हा समुद्रावर येऊन मादागास्करकडे वळले.
 
 
vivek
 
वायव्य ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया यांच्यादरम्यान तयार झालेले हे वादळ दक्षिण हिंदी महासागरात साडेआठ हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापून आफ्रिकेच्या आग्नेय किनार्‍यावर जाऊन पोहोचले, हा या सर्व घटनेतील महत्त्वाचा घटक आहे. 19 फेब्रुवारीला ते मादागास्कर आणि 24 फेब्रुवारीला मोझांबिक येथे जाऊन पोहोचले. मोझांबिक आणि मादागास्करमधले चॅनल त्याने जवळजवळ तीन वेळा ओलांडले आणि त्यानंतर त्याने पुन्हा एकदा किनार्‍यावर धडक मारली. रविवारी 12 तारखेला मोझांबिकमधल्या झांबझी नदीच्या मुखापाशी वादळ जाऊन पोहोचले. त्या वेळी वादळातील वार्‍याचा वेग ताशी 55 मैल होता. मोझांबिक आणि मादागास्करच्या किनार्‍यावर या वादळाने इतका हैदोस घातला आहे की अजूनही इथल्या संपर्क यंत्रणा आणि वीज उद्ध्वस्त झालेल्या स्थितीतच आहेत.
 
 
समुद्राच्या वाढलेल्या तापमानाचा हा परिणाम आणि त्यानुसार बदलणारा वादळाचा मार्ग केवळ अनपेक्षित असाच होता.
 
 
मोझांबिकच्या किनार्‍यावर आपटण्यापूर्वी फ्रेडी, हरिकेन वादळाच्या ताकदीचे होते. पण त्यानंतर झपाट्याने एका अतिशय विध्वंसक अशा उष्ण कटिबंधीय वादळात त्याचे रूपांतर झाले. सात मार्च रोजी जास्तीत जास्त काळ टिकून राहिलेले उष्ण कटिबंधीय वादळ म्हणून त्याची नोंद झाली. पृथ्वीवरील आतापर्यंतच्या अतिशय ताकदीच्या आणि ऊर्जेच्या वादळांचा उच्चांक त्या दिवशी त्याने मोडला.
 
 
यादरम्यान आतापर्यंत चक्रीवादळामुळे 134 जणांचा मृत्यू झाला आहे. मादागास्करमध्ये आणि आग्नेय आफ्रिकी देशांमध्ये लाखो लोक विस्थापित झाले आहेत.
 
 
फ्रेडी चक्रीवादळाने रविवारी महिन्याभरात दुसर्‍यांदा मोझांबिकची किनारपट्टी ओलांडली. यापुढेही वादळ सक्रिय राहणार का, याबाबत अनिश्चितता होती; पण आता ती संपली आहे, कारण वादळ दुर्बळ होऊ लागले आहे.
 
 
निर्मिती झाल्यापासून दक्षिण हिंदी महासागराच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे सर्वाधिक प्रवास करणार्‍या वादळांमध्ये फ्रेडीचा समावेश झाला. याआधी सन 2000मध्ये लिओन-इलाइन आणि हुदा या दोन चक्रीवादळांनी दक्षिण हिंदी महासागरात पूर्व-पश्चिम असा दीर्घ प्रवास केला होता.
 
 
यंदाचे वर्ष हे ‘ला निना’चे वर्ष असून समुद्रपृष्ठावरील तापमान बदलांमुळे अनेक वादळे निर्माण होण्याची शक्यता आहेच. सध्याप्रमाणेच 2000 हे सालही ‘ला निना’चे वर्ष होते, याची नोंद घ्यायला हवी, असे जागतिक हवामानशास्त्र संघटनेने (WMOने) म्हटले आहे.
 
 
निर्मिती झाल्यापासून हळूहळू दुर्बळ होऊन नाहीसे होण्यापर्यंतच्या आपल्या जीवनकाळात फ्रेडी चक्रीवादळाची तब्बल सहा वेळा तीव्रता (Intensity) वाढली. उत्तर अटलांटिक समुद्रातील एका हंगामातील चक्रीवादळांच्या ऊर्जेइतकी ऊर्जा एकट्या फ्रेडीमध्ये नोंदली गेली. मोझांबिकमध्ये गेल्या महिन्याभरात वर्षभरापेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला, अशीही निरीक्षणे ‘डब्ल्यूएमओ’ने नोंदवली.हा सगळा जलद गतीने होत असलेल्या हवामान बदलांचा परिणाम असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.
 
 
जागतिक हवामान बदलांमुळे चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता कमी वेळेत विशेषत: उष्ण कटिबंधात वाढत आहे. समुद्राचे सतत वाढणारे तापमान आणि वातावरणातील अतिरिक्त हरित वायू यांमुळे वादळे तीव्र होत आहेत, असेही जागतिक हवामान संघटनेने (WMOने) म्हटले आहे.
 
 
vivek
 
फेब्रुवारीच्या मध्याला या वादळाची ताकद हिंदी महासागराच्या मोकळ्या भागात खूपच वाढली आणि ती वाढलेली तशीच जवळजवळ 34 दिवस होती. यापूर्वी 11 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर 1994 या काळात झालेले जॉन हे हरिकेन वादळ 31 दिवस टिकले होते.
 
 
उष्ण कटिबंधात समुद्रावर यापूर्वी जी वादळे झाली, त्यांचे फक्त चार वेळाच अतितीव्र (Intense) वादळात रूपांतर झाले होते. मात्र हे फ्रेडी वादळ एकूण सात वेळा अतितीव्र श्रेणीत पोहोचले. त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात ही वादळे सामान्यपणे फक्त एकदाच अतितीव्र होतात. तीनपेक्षा जास्त वेळा ती तीव्र होणे हे अतिशय अपवादात्मक आहे आणि म्हणूनच फ्रेडी हवामान बदलाचे नक्कीच द्योतक आहे, असे म्हणता येते! समुद्राचा तापलेला पृष्ठभाग आणि वेगाने वाहणारे वारे तसेच पाऊस यामुळे या वादळामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि ती त्यात साठवून ठेवली जाते. वादळाने समुद्रावर जास्त अंतरापर्यंत प्रवास केल्यास या साठवलेल्या ऊर्जेचे प्रमाणही वाढते आणि वादळे जास्त विध्वंसक बनतात. हीच परिस्थिती फेड्री वादळामध्ये निर्माण झाली.
 
 
वर्ष 2006च्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जी हरिकेन व टायफून वादळे निर्माण झाली, त्यांनी साठवलेल्या ऊर्जेचे प्रमाण 85 युनिट एवढे होते, मात्र फ्रेडीने ही मर्यादाही ओलांडली असून त्याने साठवलेल्या ऊर्जेचे प्रमाण 86 युनिट इतके होते.
 
 
झपाट्याने झालेले ऊर्जा संकलन, जीवनकाल आणि प्रवासकाळ आणि ऊर्जेचे वितरण या बाबतीत जरी या वादळाने उच्चांक गाठला असला, तरीसुद्धा त्याच्या संपूर्ण प्रवासात हे वादळ हरिकेन वादळाच्या ताकदीचे राहिले नव्हते. 21 फेब्रुवारीला मादागास्करच्या किनार्‍यावर आदळल्यानंतर, कमी तीव्रतेच्या आणि कमी भाराच्या आवर्तात त्याचे रूपांतर झाले.
 
 
आपली पृथ्वी सध्या ज्या विविध आपत्तींना तोंड देत आहे, त्यात अशा वादळांचे स्थान खूप वर आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर येणार्‍या वादळांच्या संख्येत आणि तीव्रतेमध्ये होणारी वाढ आपण गेली काही वर्षे पाहतोच आहोत. सगळ्या जगातच थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे आणि फ्रेडी वादळाने ही परिस्थिती अधिक चिंताजनक होणार असल्याचे संकेत द्यायला नक्कीच सुरुवात केली आहे! वाढत्या जागतिक हवामान बदलाचाच हा परिणाम असल्याचे शास्त्रज्ञांचे ठाम मत आहे.
 
 
जगाच्या सगळ्याच किनार्‍यांवर वादळे अनुभवाला येत असली, तरी उष्ण कटिबंधात ती अधिक विध्वंसक असतात. उष्ण कटिबंधातील ही वादळे किंवा आवर्ते (Tropical cyclones) सूर्याच्या उष्णतेने नियंत्रित असतात. त्यांचा विस्तार कमी असतो, मात्र ती विनाशकारक असतात. ही वादळे नेहमीच 5 अंश ते 20 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या पट्ट्यात तयार होतात. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पाच अंश अक्षांश (सुमारे 550 किलोमीटर)पर्यंत कोरिओलिस फोर्स नाही, म्हणून या प्रदेशात कोणतीही उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे तयार होत नाहीत. वादळाचे कमी दाब केंद्र विकसित करण्यासाठी पुरेशी कोरिओलिस प्रेरणा किंवा प्ररिभ्रमण शक्ती (Rotation force) असणे आवश्यक असते.
 
 
उष्ण कटिबंधीय वादळांना प्रशांत महासागरात टायफून, अटलांटिकमध्ये हरिकेन, भारतात चक्रीवादळ, मायक्रोनेशियामध्ये बागुईओ आणि ईशान्य ऑस्ट्रेलियात विली विली वादळे म्हटले जाते. संपूर्ण जगात कॅरिबियन समुद्र, मेक्सिकोचे आखात, फिलिपाइन्सपासून चिनी समुद्रापर्यंतचा प्रशांत महासागराचा वायव्य भाग, मेक्सिकोच्या पश्चिमेकडचा प्रशांत महासागर, मादागास्करच्या पूर्वेकडचा दक्षिण हिंदी महासागर, बंगालच्या उपसागरातील उत्तर हिंदी महासागर आणि अरबी समुद्र अशा प्रमुख सहा ठिकाणी ही वादळनिर्मिती होते. प्रशांत महासागराच्या मध्यवर्ती आणि पश्चिम भागात जून ते ऑक्टोबर या काळात सरासरी 20 उष्ण कटिबंधीय वादळे होतात. पूर्व प्रशांत महासागरात, मेक्सिकोच्या नैर्ऋत्येस दर वर्षी 3 वादळे होतात, पण ती क्वचितच जमिनीवर पोहोचतात. काही हरिकेन वादळे या प्रदेशांच्याही बाहेर तयार होतात आणि त्यांची वारंवारिताही जास्त असते. अटलांटिक महासागरात विषुववृत्ताच्या दक्षिणेला ती तयार होत नाहीत.
 
 
अशा वादळांना टिकून राहण्यासाठी भरपूर ऊबदार बाष्प आवश्यक असते. तीच त्यांची मुख्य उर्जा असते. अशी वादळे हा मुख्यत: उष्ण कटिबंधीय आवर्ताचाच (Cycloneचाच) प्रकार आहे. कर्क आणि मकर वृत्तांच्या दरम्यान अशी आवर्ते म्हणजे लघुभार प्रदेशांची बंदिस्त प्रणाली असते. 650 किलोमीटर इतक्या विस्तृत व्यासाची ही आवर्ते म्हणजे उत्तर व दक्षिण गोलार्धात वाहणार्‍या वार्‍यांचे प्रचंड भोवरेच असतात. ही वादळे पृथ्वीवरची सर्वात प्रबळ व विध्वंसक वादळे म्हणून ओळखली जातात.
 
 
काही विशिष्ट गुणधर्मामुळेच ही वादळे इतकी विध्वंसक बनतात. यातील वार्‍याचा वेग ताशी 180 ते 400 कि.मी. असतो. या वादळाबरोबरच समुद्रात भरतीच्या महाकाय लाटा तयार होतात आणि भरपूर पाऊसही पडतो. यातील अतिशय कमी वायुभारामुळे समुद्राची पातळी उंचावते. आकार, विस्तार, वार्‍याचा वेग, पर्जन्यमान आणि टिकून राहण्याचा कालखंड या सर्वच बाबतीत या वादळात भरपूर विविधता आढळून येते. यांचा सरासरी वेग ताशी 180 कि.मी. तरी असतोच. समुद्रावर त्यांचा वेग व तीव्रता नेहमीच जास्त असते. मात्र किनारा ओलांडून जमिनीच्या दिशने येताना ही वादळे दुर्बळ व क्षीण होतात. किनारी प्रदेशात ती नेहमीच संहारक ठरतात. अतिशय कमी वायुभाराचा प्रदेश हा ह्यांचा केंद्रबिंदू असतो.
 
 
 
वातावरणात उष्ण व आर्द्र हवेचा पुरेसा व सततचा पुरवठा हे त्यांच्या निर्मितीमागचे मुख्य कारण आहे. जिथे 60 ते 70 मीटर खोलीपर्यंत 270 सेल्शियस एवढे तापमान असते, अशा उष्ण कटिबंधीय, ऊबदार समुद्रपृष्ठावर त्यांचा जन्म होतो. समुद्रपृष्ठाच्या वर 9 हजार ते 15 हजार मीटर उंचीवर प्रत्यावर्ती अभिसरण असले, तर अशी चक्रीवादळे तयार होण्याची प्रक्रिया सुलभ होते.