आधुनिक शालिवाहन डॉ . हेडगेवार

21 Mar 2023 14:48:49
 
rss
वर्षप्रतिपदा, गुढीपाडवा, डॉ. हेडगेवार जयंती असा त्रिवेणी योग असणार्‍या दिवशी नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या अलौकिक दूरदृष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
वर्षप्रतिपदा. भारतीय नववर्ष. तिथीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस म्हणजे गुढीपाडवा. शालिवाहन शकाचा पहिला दिवस. शालिवाहनाने मातीच्या सैन्यात चैतन्य निर्माण केले आणि परकीय आक्रमणे परतवून लावली. शालिवाहनाने आपल्या विजयाप्रीत्यर्थ शक सुरू केले. शालिवाहन शकाच्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस आहे. हा केवळ योगायोग नाही, तर हा नियतीचा संकेत आहे. डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला. संघ स्थापन करण्यापूर्वी हिंदू समाजाची स्थिती कशी होती? ‘मला गाढव म्हटले तरी चालेल, पण हिंदू म्हणू नका’ असे अभिमानाने सांगणारे समाजधुरीण निर्माण झाले होते. हिंदू समाजाला आत्मतत्त्व, अस्मिता, इतिहास आणि जाज्वल्य अभिमान यांची विस्मृती झालेली होती. आपण कोण आहोत? आपले जीवितकार्य काय? आणि आपली अवनती कशामुळे झाली? या गोष्टींची जाणीव नसलेल्या हिंदू समाजाला संघटित करून, समर्थ, शक्तिशाली, वैभवसंपन्न समाज निर्माण करायचा संकल्प डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने साकार केला. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दीकडे वाटचाल करत असताना डॉ. हेडगेवारांनी पाहिलेले हिंदू समाजसंघटनाचे स्वप्न कसे साकार होत आहे, हे पाहिले पाहिजे. तसेच डॉ. हेडगेवारांनी हिंदू समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जाण्याचे दिशादर्शन केले आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.
 
 
21 March, 2023 | 14:56
 
‘संघाचे कार्य हे ईश्वरी कार्य आहे’ असे डॉ. हेडगेवारांनी सांगितले आहे. या ईश्वरी कार्याचे स्वरूप आणि कार्यपद्धती कशी असावी? कार्य ईश्वरी आहे, त्यामुळे ते नि:स्वार्थी भावाने करायचे आहे. आत्मीयता, आपलेपणा यांच्या आधाराने हिंदू समाजाचे काम करायचे आहे. संघ हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी निर्माण झाला असल्याने हिंदू समाजाच्या स्थितीगतीशी संघ आपोआपच जोडला जातो. समाजाला जडलेली व्याधी दूर करून समतेच्या पायावर उभा असणारा भेदभावमुक्त, शोषणमुक्त, समरस समाज हे संघाचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कसा प्रयत्न केला पाहिजे? डॉ. हेडगेवारांनी सांगितले आहे की, ‘आपण काही मोठे विशेष कार्य करत आहोत हा भाव नसून हे परमेश्वराचे कार्य आहे व या कार्यात आपण सर्व अंत:करणपूर्वक काम करावयाला लागल्यावर परमेश्वर आपणाला योजलेल्या कार्यात खात्रीने यश देईलच.’ इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे डॉ. हेडगेवारांनी संघ हे ईश्वरी कार्य आहे असे सांगितले असले, तरी ज्याची आराधना करायची, तो ईश्वर कोण? तो ईश्वर आहे हिंदू समाज. हिंदू समाजाला कालसापेक्ष बनवण्यासाठीची ही उपासना आहे. आणि म्हणूनच गेली 98 वर्षे चाललेली ही उपासना कर्मकांडात रूपांतरित झाली नाही. गंगेच्या प्रवाहासारखी ती काठावरची बाग फुलवत गेली. यामागे डॉ. हेडगेवारांनी सांगितलेले संघटनसूत्राचे अधिष्ठान आहे. ‘संपूर्ण हिंदू समाजाची चिंता आपणास करावयाची आहे; असे असले, तरी आपला वेगळा मठ, पंथ, संप्रदाय निर्माण होणार नाही, याची काळजीही घ्यायची आहे’ हा डॉ. हेडगेवारांनी सांगितलेला संघमंत्र. आज याच मंत्राने भारावून जाऊन संघस्वयंसेवक समाजात काम करताना दिसत आहेत.
 
rss 
 
संघ स्थितिवादी नाही, तो नित्यनूतन आहे. संघ असा आहे, कारण त्याला डॉ. हेडगेवारांनी दिलेला दिशाबोध. संघाचे काम कशासाठी करायचे? डॉ. हेडगेवारांनी सांगितलेले आहे, “प्रारंभापासून आपले असे निश्चित मत आहे की, हिंदुस्थान जर हिंदूंचा देश असेल, तर त्याच्या उद्धाराची सारी जबाबदारी हिंदूंच्या माथ्यावर आहे. घर आपले आहे, त्याविषयीची कोणतीही जबाबदारी आम्ही कोणत्याही परिस्थितीत टाळू शकणार नाही. ज्यांना या देवाविषयी प्रेम नाही, भक्ती नाही, ते आपणास मदत करतील अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे आणि अनुचित आहे. आपणच आपल्या समाजाचे भवितव्य नक्की करणार आहोत.” या एका संकेताला आधार मानून संघस्वयंसेवक समाजजीवनात विविध कामे करत असतात. नगरीय काम, ग्रामीण काम, वनांचलातील काम अशी जरी विभागणी केली, तरी आज संघकाम सर्वस्पर्शी झाले आहे. डॉ. हेडगेवारांनी हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी दिलेला मंत्र ‘कुणी ना राहो दुबळा येथे, मनी असा निर्धार जागवू’ या शब्दात परावर्तित झाला असून लक्षावधी संघस्वयंसेवक संघमंत्र जगत आहेत. ही किमया डॉ. हेडगेवारांच्या दूरदृष्टीची आहे.
 
21 March, 2023 | 14:57
 
हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी काम करताना समाजाचे प्रश्न बाजूला ठेवता येत नाहीत, समस्यांकडे कानाडोळा करता येत नाही, तर प्रश्नांना, समस्यांना सामोरे जावे लागते, उत्तरे शोधावी लागतात. संघवाटचालीची मागील 98 वर्षे प्रश्नांचे आणि समस्यांचे निराकरण करणारी आणि नवसमाजजीवनाला आकार देणारी आहेत. वैयक्तिक जीवनात देवदेवता, उपासना यांचा जितक्या आत्मीयतेने अंगीकार केला पाहिजे, तितक्याच आत्मीयतेने समाजजीवनात सक्रिय राहिले पाहिजे, समाजरूपी ईश्वरास सेवेची, करुणेची, प्रेमाची आहुती दिली पाहिजे. हे केवळ कृतीतून दाखवून देणारे स्वयंसेवक डॉ. हेडगेवारांच्या संघमंत्रातून निर्माण झाले आहेत, यापुढेही होत राहतील. समाजाची गरज लक्षात घेऊन काम करताना हिंदू समाजसंघटन या विषयाचा विसर पडू न देता संघमंत्र जगणार्‍या संघस्वयंसेवकांच्या अनेक पिढ्या घडल्या. 1925 साली कुणाला स्वप्नातही वाटले नसेल की डायलिसिससारख्या उपचारांसाठी संघाला काम करावे लागेल. संघ स्थापन झाला, तेव्हा कुणी विचारही केला नसेल की पर्यावरणासारख्या विषयात संघस्वयंसेवक काम करतील. आज असे अनेक विषय आहेत, ज्यामध्ये संघस्वयंसेवक काम करत आहेत. आपले कार्य समग्र हिंदू समाजाचे असल्यामुळे त्यांच्या कोणत्याही अंगाची उपेक्षा करून चालणार नाही, असे डॉ. हेडगेवारांनी सांगितले होते. आजच्या संघकामामध्ये आणि स्वयंसेवकांच्या व्यवहारामध्ये त्याचे प्रतिबिंब अनुभवता येते. डॉ. हेडगेवारांनी जे संघमंत्र सांगितले, त्यांचे आज कृतीतून प्रकटीकरण होताना दिसत आहे, त्याचप्रमाणे नव्या परिप्रेक्ष्यात संघमंत्र समजून घेऊन भावी दिशा निश्चित केली जात आहे.
 
 
आज आपल्या हिंदू समाजाचा स्वाभिमान जागृत झाला आहे आणि तो जागृत करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून झाले आहे. आपल्या अस्मिता, आपला इतिहास, आपला वारसा, आपले पूर्वज यांचा शोध घेण्याची सार्वत्रिक मानसिकता हिंदू समाजात दिसून येते आहे. एकसंघ हिंदू समाज निर्माण करण्यासाठी यांची आवश्यकता आहेच. आपण कोण आहोत हे लक्षात आले की आपण काय केले पाहिजे याचा दिशाबोध होत असतो. डॉ. हेडगेवारांनी हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी दिलेला संघमंत्र कालातीत आहे. डॉ. हेडगेवारांनी सांगितले आहे, ‘आम्हाला नवीन काही करायचे नाही. आमच्या पूर्वजांनी ज्या प्रकारे समाजाची आणि संस्कृतीची सेवा केली, जी ध्येये आपल्यासमोर ठेवली आणि त्यांच्या प्राप्तीसाठी दिवसरात्र प्रयत्न केले, त्या ध्येयांना त्याच प्रकारे आम्हालाही सिद्ध करायचे आहे, त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करून राष्ट्रसेवा करायची आहे.’ हाच चिरंतन वारसा घेऊन आज प्रत्येक संघस्वयंसेवक आपापल्या क्षेत्रात संघमंत्राची अभिव्यक्ती करताना दिसत आहे. शालिवाहनाने मातीच्या सैन्यात प्राण भरले. आधुनिक शालिवाहन डॉ. हेडगेवारांनी हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी हिंदूंना हिंदूपणाची जाणीव करून दिली आणि ते हिंदूपण जगण्यासाठी दिशादर्शनही केले.
 
 
Powered By Sangraha 9.0