मुलांमधील वाढते क्षयरोगाचे प्रमाण

विवेक मराठी    21-Mar-2023
Total Views |
@डॉ. उषा पंडित देशमुख
। 9423107039

tb 
गेल्या काही वर्षांपासून क्षयरोगाचे रुग्ण वाढत आहेत. या रोगाचे निदान करता येईल अशा चाचण्या व तो पूर्णपणे बरा करू शकतील अशी औषधे उपलब्ध असतानाही दिवसेंदिवस वाढत असलेली क्षयरुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. लहान मुलांमध्येही वाढत चाललेले क्षयरोगाचे प्रमाण, हे अतिशय भयावह आहे. त्यासाठी पालकांनी जागरूक राहून वेळेत औषधोपचार करणे गरजेचे आहे. 24 मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधत लहान मुलांमधील क्षयरोगाविषयी मार्गदर्शन करणारा विशेष लेख प्रकाशित करीत आहोत.
यस्यात्स राज्ञ: प्रागासौद्राजयक्ष्मा ततो मत:।
 
हा व्याधी राजालासुद्धा ग्रासतो, म्हणून त्याला ‘राजयक्ष्मा’ असे म्हणतात. Tuberculosis (Too-ber-kyoo-loH-sis) प्रामुख्याने ट्यूबरक्युलोसिस हा फुप्फुसांना होणारा व्याधी आहे. मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूंमुळे क्षयरोग होतो. तो अर्थात शरीराच्या इतर अवयवालादेखील होतो. क्षयरोग हा एक अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून - किंबहुना शिंकांतून क्षयरोगाचे जंतू हवेत पसरतात आणि मग हवेच्या माध्यमातून टीबीच्या जीवाणूंचा दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग होतो.
 
 
जागतिक पातळीवरील एकूण क्षयरोगबाधित रुग्णांपैकी 26% टक्के रुग्ण भारतात आहेत. (24 मार्च 2022.)
 
 
1882 साली या रोगाच्या जीवाणूचा शोध लागला. पूर्वी या रोगावर औषधोपचार नव्हता. पण जीवाणूचा शोध लागल्यामुळे तो पूर्ण बरा होतो. पूर्वी या रोगावर उपचार नव्हते. त्यामुळे बर्‍याच मोठमोठ्या घराण्यांतही हा रोग झालेला आहे. उदा., माधवराव पेशवे, कमला नेहरू, प्रत्यक्ष डॉक्टर असलेल्या आनंदी गोपाळराव जोशी यांनादेखील क्षयरोगाची बाधा होऊन त्यातच त्यांचा अंत झाला, म्हणूनच या रोगाला ‘जो राजालाही ग्रासतो, तो राजयक्ष्मा’ असे म्हटले आहे. मग बालकांचे काय? त्यांची अवस्था तर खूपच नाजूक असते. कोणत्याही रोगाविरुद्ध लढण्याचे व्याधिक्षमत्वदेखील त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेले नसते. प्रत्येक बालकांचे पोषण, त्यांच्या सभोवलाचे वातावरण आरोग्यदायक असतेच असे नाही.
 
 
लहान बालकांत क्षयरोगाच्या जंतूंचा प्रथमच संबंध येतो. बालकांत व्याधिक्षमत्व अर्थात रोगप्रतिकारशक्ती अजून निर्माण झालेली नसल्यामुळे ते या रोगास बळी पडतात. यामुळे फुप्फुसांत ठिपक्याएवढा डाग तयार होतो. क्षयरोग म्हणजे खोकला हेच लक्षण प्रामुख्याने आपल्याला परिचयाचे आहे. हल्ली काही वर्षांमध्ये क्षयरोगाचे स्वरूप खूप बदलले आहे. फुप्फुसाव्यतिरिक्त शरीरांतील इतर अवयवयांवरही क्षयरोगाचे जीवाणू परिणाम करतात. मुंबईसारख्या शहरांत जागा कमी आणि लोकसंख्या अधिक असलेल्या शहरांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढत आहे. बालकांमध्ये तर याचे प्रमाण अधिकच दिसून येत आहे. त्यांचे कारण अपुर्‍या जागेत क्षयरोगबाधित रुग्ण असल्यास मुलांना लगेच त्याची लागण होऊ शकते. कुपोषित बालक, एचआयव्हीबाधित आणि रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषध घेत असलेली बालके यांना क्षयरोगाची लागण होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
 
क्षयरोगाची लक्षणे
 
 
फुप्फुसाचा क्षयरोग असेल, तर मुलांमध्ये दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला हे लक्षण पाहायला मिळते. कफ आणि छातीत दुखते, रोज ताप येतो, अधिक घाम येतो. वयोमानानुसार बालकांचे वजन वाढत नाही, उलटपक्षी ते कमी झालेले दिसून येते.
 
 
संशोषांद्रसादिनां। हळूहळू बालकांच्या शरीरांत धातुक्षय दिसून येतो. लसिका ग्रंथींना सूज येते. थंडी वाजते. मुलांना भूक लागत नाही. मुले अशक्त दिसू लागतात. थुंकीतून कधीकधी रक्त पडलेले दिसते. सध्या क्षयरोगाचा संसर्ग झालेल्या 66% बालकांना पल्मनरी टीबीशिवाय इतर अवयवांना टीबी झाल्याचे आढळून येत आहे. बाकी उरलेल्या बालकांमध्ये फुप्फुसाचा टीबी झालेला दिसून येतो.
 
 
निदानात्मक परीक्षण
 
 
लहान मुलांना फुप्फुसाचा क्षयरोग असल्यास मुले काही थुंकी काढू शकत नाहीत. त्यामुळे मुलांमध्ये थुंकीची तपासणी करता येत नाही. अशा वेळी नाकातून नळी टाकून गॅस्ट्रिक एस्पिरेट पद्धतीने थुंकीचे नमुने घ्यावे लागतात. फुप्फुसांशिवाय इतर अवयवाचा क्षयरोग असल्यास त्या भागाची बायोप्सी - म्हणजे छोटा तुकडा काढून तपासणी करावी लागते. ही तपासणी थोडी खर्चीक असून बालकांमध्ये ती करणे थोडे अवघड जाते. त्वचेची तपासणी (Skin test) करून क्षयरोगाचे निदान करता येते. रक्ताच्या तपासणीत क्षयरोगाचे निदान करता येते. चेस्ट एक्सरे करावा, मँटो टेस्ट, अऋइ, घरात कुणाला टीबी झालेला आहे का? 2 ते 3 वर्षे अशा लोकांच्या सहवासात आहेत का? मातेला टी.बी. असल्यास तिच्यापासून बालकाला टी.बी. होऊ शकतो. मातेच्या दूधातून टी.बी. जीवाणू बालकाच्या शरीरात जाऊन त्यास क्षयरोग होतो. एवढेच नव्हे, तर जनावराच्या दुधातूनदेखील क्षयरोगाचे जीवाणू बालकांच्या शरीरात जाऊन त्यास त्या रोगाची लागण होते. त्याकरिता दूध नेहमी उकळूनच मुलांना द्यावे.
 
 
चिकित्सा
 
 
सध्या 6 ते 12 महिने औषधोपचार घेतल्यास क्षयरोग पूर्णत: बरा होतो. यात चार प्रकारच्या अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. 1. आयसोनियाझिड (Isoniazid) 2. रिफॅम्पिसीन (Rifampicin) 3. पायराझिनामाइड (Pyrazinamide), 4. इथाम्ब्युटॉल (Ethambutol)
 
 
मुलांमध्ये पहिले दोन महिने ही चार औषधे द्यावी. नंतर दोन अँटीबायोटिक्स आयसोनियाझिड आणि रिफॅम्पिसीन चार महिने द्यावीत. रिफॅम्पिसीन आणि आयसोनियाझिड ही औषधे जेवणापूर्वी घ्यावीत, त्याचा परिणाम अधिक दिसून येतो. पायराझिनामाइड आणि इथाम्ब्युटॉल ही जेवणानंतर घ्यावीत. व्याधी बरा करण्यास या औषधाचा उत्तमरित्या परिणाम होतो. पण त्याचे अनिष्ट परिणामदेखील शरीरावर दिसून येतात. उदा., मळमळ, भूक न लागणे, हातापायाला मुंग्या येणे वा हातापायाची आग होणे, डोळ्यांना कमी दिसणे, कानाने कमी ऐकू येणे अशी लक्षणे दिसली असता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच विविध परीक्षणे करून घ्यावीत. वैद्यकीय औषधोपचारासोबत आयुर्वेदिक औषधे घेतली असता, वरील औषधांच्या साइड इफेक्टची तीव्रता आपण कमी करू शकतो.
 
 
वर्धमान पिंपळी रसायन - पहिल्या दिवशी अर्धा कप दूध, अर्धा कप पाणी घेऊन त्यात पाच पिंपळ्या टाकाव्यात. दूध शिल्लक राहीपर्यंत उकळावे आणि गाळून त्यात मध+तूप टाकून दररोज सकाळी ते दूध प्यावे.
 
 
 
पिंपळी ही वर्धमान मात्रेत घ्यावी. पहिल्या दिवशी 5, दुसर्‍या दिवशी 10, तिसर्‍या दिवशी 15, चौथ्या दिवशी 20, पाचव्या दिवशी 25, सहाव्या दिवशी 30, सातव्या दिवशी 35 अशा वर्धमान मात्रेत सात दिवस घ्यावे. नंतर त्याच क्रमाने सात दिवस 5-5 पिंपळ्या कमी कराव्यात, असे सात दिवस करावे. असे एकूण चौदा दिवस प्रतिमाह तीन ते सहा महिने घ्यावे.
 
 
मण्डूकपर्णी, शुष्ठी, ब्राह्मी आणि ज्येष्ठमध यांचे भरड चूर्ण समप्रमाणात घेऊन त्याचा क्षीरपाक करावा - अर्थात, हे चूर्ण दूध आणि पाणी एकत्र करून उकळावे. दूध शिल्लक राहीपर्यंत उकळून 40 मि.ली. इतक्या प्रमाणात तूप आणि मधासोबत सकाळ-संध्याकाळ घ्यावे.
 
 
या दोन उपायांमुळे भूक वाढते, अन्नाचे पचन होऊन शरीरबल वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर दुधातील घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासदेखील मदत होते.
 
 
जागतिक सहा नॅशनल प्रोग्रॅमांपैकी ट्यूबरक्युलोसिस एक प्रोग्रॅम आहे. जागतिक पातळीवर हा प्रोग्रॅम राबवला जातो. त्यामध्ये औषध पुरवठा, आहार योजना या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होतो.
 
 
लहान मुलांना लसीकरण केले जाते.
 
 
जन्मानंतर लगेच B.C.G. ही लस दिली जाते. त्यामुळे बालकांत टीबीविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते.
सन 2025पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याविषयी योजना शासन स्तरावर राबवल्या जाणार आहेत.
क्षयरुग्णाच्या आहाराची निक्षय पोषण योजना थेट लाभार्थींना देण्यात येते.
 
 
देशभरात 1,180 सीबीएनएएटी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे क्षयरोग निदान निश्चिती लवकरात लवकर होऊन औषधोपचार सुरू झाल्यामुळे क्षयरोगाचा संसर्ग होण्यासही रोध निर्माण होऊ शकतो.
 
 
क्षयरोगबाधित रुग्णांना व नातेवाइकांना आरोग्यशिक्षण देणे खूप जरुरीचे आहे. यात नियमित औषध घेणे, पोषक आहार, खुल्या वातावरणात राहणे आणि घरातील इतर व्यक्तींना क्षयरोगाची बाधा होऊ नये याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.
क्षयरोगाचा प्रसार रोखणे हे क्षयरोगावर चिकित्सा करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.
 
 
श्वासाबरोबर, थुंकीद्वारे, खोकल्याद्वारे वा शिंकेद्वारे बाहेर पडणार्‍या तुषाराद्वारे क्षयरोगाचा प्रसार होतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सार्वजनिक कशा होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
 
 
 
क्षयरोग प्रसार कसा होतो याचे शिक्षण नातेवाइकांना द्यावे. त्याचबरोबर त्यांना शासन योजना समजावून सांगून लाभार्थींना त्याचा लाभ घेण्यास प्रवृत्त करावे.