भावनिक बंधासहित आर्थिक बंध विस्तारणारा ‘अथ्वास’

विवेक मराठी    24-Mar-2023
Total Views |
केंद्र सरकारने 370 आणि 35 अ कलम हटविल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर व लदाख येथील व्यापार्‍यांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी भारताच्या आर्थिक राजधानीत व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी 17 ते 22 मार्चदरम्यान ‘अथ्वास’ या व्यापारी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
 
athwas
 
 
महाराष्ट्र सरकार, गुलशन फाउंडेशन, पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर (पार्क), फाउंडेशन ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट, सहकार भारती, पनाश फाउंडेशन, उद्योग मित्र अशा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अथ्वास’ हे जम्मू-काश्मीर, लदाख व महाराष्ट्र यांमधील एक सामाजिक आर्थिक महामार्ग विस्तारणारे सहा दिवसीय प्रदर्शन नुकतेच वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आरकेड एक्स्पोमध्ये संपन्न झाले. याअंतर्गत जम्मू-काश्मीरवरून शंभर विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील हँडलूम व हँडिक्राफ्टअंतर्गत काश्मीरच्या पश्मिना शाली, क्रेवल, तिल्ला, सोझनी, आरी वर्क या कलाकुसरी असलेले टॉप्स, सलवार-कुर्ता व साडी, त्याचबरोबर विकरपासून तयार केलेल्या विविध प्रकारच्या टोपल्या, गृहोपयोगी वस्तू, पेपर मॅशेच्या विविध प्रकारच्या भेटवस्तू, प्लेट्स, डबे, कालीन इत्यादी विविध प्रकारच्या वस्तू व खाद्यपदार्थाचे स्टॉल्स - सुकामेवा, बदाम, अक्रोड व त्याचबरोबर अकरा विविध मसाले वापरून तयार केलेले काहवा हे पेय सर्वांच्या पसंतीस उतरले. या स्टॉल्सपैकी 40 टक्के कपड्याचे स्टॉल्स, 35 टक्के हस्तकलावस्तू हरपवळलीरषीीं, 15 टक्के खाद्यपदार्थ व 5 टक्के कार्पेट स्टॉल्स होते.
 
 
 
24 March, 2023 | 17:6

athwas
 
 
या सहा दिवसांत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या एक्स्पोला व या अंतर्गत असलेल्या बिझनेस मीट व उद्योजकता विकास कार्यक्रमास भेट दिली. माननीय मंत्री मंगलप्रभात लोढा उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित होते, तसेच श्रीकांत भारती व स्वनाथ फाउंडेशनच्या व्यवस्थापिका श्रेया श्रीकांत भारती, ड्रीमवर्ल्ड सोल्युशनचे संस्थापक गगन महोत्रा व दर्पण फाउंडेशनच्या व्यवस्थापक सारिका गगन महोत्रा, तसेच एसीपी बागवे, उद्योजक अनुराग बत्रा, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे विजय कलंत्री व इस्कॉनचे प्रभू गौरांग दास यांची पहिल्या दिवशी उपस्थिती होती. जम्मू-काश्मीरमधील डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रिकल्चर प्रॉडक्शन अँड फार्मर्स वेल्फेअरकडून शमशुल हसन मीर व माजिद लोन सर्व दिवस उपस्थित होते. जम्मू-काश्मीर कृषी संचालनालयाचे संचालक मोहम्मद इकबाल चौधरी, तसेच समग्र शिक्षा प्रकल्पाचे संचालक श्रीदीप राजकन्या यांचादेखील सहभाग होता. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नायक स्वप्निल जोशी हेदेखील वेळ काढून आपल्या सहकार्‍यांसह सहभागी झाले होते. चनाप इम्पेक्सचे व्यवस्थापक अनिल चांधोक, सत्विदिक या कंपनीचे संचालक मुबारक कडीवाला व याव्यतिरिक्त अनेक मराठी उद्योजकदेखील आनंदाने सहभागी झाले होते. बहारीनचे गव्हर्नर, तसेच सारा ग्रूपचे व्यवस्थापक, राजाराणी ट्रॅव्हल्सचे विश्वजीत पाटील, भारतीय जनता पार्टी काश्मीर सेलचे अध्यक्ष अजय कौल हेदेखील उपस्थित होते.
 
 
athwas
 

athwas 
 
एकूणच जम्मू-काश्मीरमधील विविध क्षेत्रांतील संधी व या संधीला पूरक असलेल्या योजना असा उद्योजक चर्चासत्रातील विषय होता. यामध्ये सुमय्या इंडस्ट्रीज लिमिटेडचे दीपक परीक, ऑक्सिको रिसोर्सेस कॅनडाच्या शुभांगी सिंग, मार्क्स को या हैदराबादस्थित कंपनीचे कार्यकारी व्यवस्थापक महीधार बोलेन यांचा सहभाग होता. बिझनेस मीटअंतर्गत जम्मू-काश्मीरमधील नवीन युवा उद्योजकांबरोबर एक चर्चासत्र आयोजित केले होते. त्यामध्ये काश्मीरचे डाळिंब बांधे, ग्रेट स्पोर्ट्सचे कबीर, इको कास्टच्या इनशा मिर, काश्मीरच्या महिला उद्योजिका मेहेर यांनी आपला उद्योग वाढवण्यासाठी लागणारे सहकार्य याविषयी मत मांडले. तसेच उद्योगाचा विस्तार कसा करता येईल याविषयी आपले विचार मांडले.
 
 
athwas
 
एकंदरीत पाहता जम्मू-काश्मीरमधील नवीन उद्योजकांना आपला उद्योग वाढवण्यासाठी लागणारा जनसंपर्क व तज्ज्ञांची भेट व तसेच विपणनासाठी लागणारे मार्केट लीकेज देण्यात हा कार्यक्रम सफल झाला. त्याचबरोबर मुंबईमध्ये राहणार्‍यांना जम्मू-काश्मीरमधील विविध प्रकारच्या नवीन मूल्यवर्धन केलेल्या खाण्यापिण्याच्या व इतर गृहपयोगी वस्तूंचाही परिचय झाला.