सोशल मीडिया बदलतंय! आपण कधी बदलणार?

विवेक मराठी    24-Mar-2023
Total Views |
व्यंकटेश कल्याणकर
। 7798703952
1 एप्रिल 2023पासून ‘इन्स्टंट आर्टिकल’ बंद करण्याची घोषणा केली आहे. त्याऐवजी ‘व्हिडिओ फस्टर्र्’ हे धोरण आणले आहे. त्यामुळे विदाउट बफरिंग वापरकर्त्यांना अखंडपणे ‘व्हिडिओ फर्स्ट’चा लाभ होणार असला, तरीही समाज म्हणून जे काही परिणाम होणार आहेत, ते लाभदायक असतील का? यावर चिंतन करण्याची हीच योग्य वेळ आहे. फेसबुकने इन्स्टंट आर्टिकल का बंद केले, याबद्दल माहिती देणारा लेख..


Social media
 
एक एप्रिलपासून सोशल मीडियाच्या आणि एकूणच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल होत आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे फेसबुक एक एप्रिलपासून इन्स्टंट आर्टिकल बंद करत आहे. शिवाय फेसुबकसह सर्वच सोशल मीडिया कंपन्या ‘व्हिडिओ फर्स्ट’ हे धोरण अवलंबणार आहेत. विशेष म्हणजे ‘फाइव्ह जी’चं वारं सध्या वाहत आहे, त्यामुळे विदाउट बफरिंग वापरकर्त्यांना अखंडपणे ‘व्हिडिओ फर्स्ट’चा लाभ होणार असला, तरीही समाज म्हणून जे काही परिणाम होणार आहेत, ते लाभदायक असतील का? यावर चिंतन करण्याची हीच योग्य वेळ आहे. सोशल मीडिया स्वत: बदलतेय आणि त्याप्रमाणे जगाला बदलत आहे. आपणही योग्य वेळी बदलणं गरजेचं आहे.
 
 
इन्स्टंट आर्टिकल म्हणजे काय?
 
‘या अभिनेत्याच्या आयुष्यात घडली दु:खद घटना!’ किंवा ‘जाणून घ्या या अभिनेत्रीच्या हॉट दिसण्यामागचं रहस्य!’ किंवा ‘ही मोलकरीण अशा अवस्थेत करते घरकाम की..’ अशा किंवा तत्सम अनेक हेडिंग्ज तुम्ही फेसबुकवर स्क्रोल करताना बघितली असतील. तांत्रिक भाषेत याला ‘क्लिकबेट’ असं म्हणतात. क्लिकबेट म्हणजे स्क्रोल करताना तुम्हाला क्लिक करण्याचा मोह होईल, अशा पद्धतीने कंटेंट किंवा ग्राफिक्स दाखवणं. बरं, हे दाखवण्यामागचा उद्देशही फार स्पष्ट असतो. (दुर्दैवाने तो आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नसतो.) त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जिथे पोहोचता ते म्हणजे बहुतेकदा ‘इन्स्टंट आर्टिकल’ असतं. ते वाचताना दोन परिच्छेदांच्या मध्ये ज्या जाहिराती असतात, त्यातून तो कंटेंट लिहिणार्‍या व्यक्तीला किंवा संस्थेला विशिष्ट रक्कम मिळते. विशेष म्हणजे त्या जाहिरातींवर भलेही तुम्ही क्लिक केलं अथवा नाही केलं, तरीही फक्त स्क्रोल केल्यावर संबंधितांना पैसे मिळतात. हे सगळं 2015पासून सुरू होतं. जाहिरातदारांच्या जाहिराती वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवणं आणि कंटेंट क्रिएटर्सना उत्पन्न देणं या दोन्ही आव्हानांवर मात करण्यासाठी इन्स्टंट आर्टिकलची एक चांगली कल्पना फेसबुकने सादर केली होती. मात्र, 14 ऑक्टोबर 2022पासून यामध्ये नव्या कंटेंट क्रिएटर्सची नोंदणी बंद केली, तर 1 एप्रिल 2023पासून इन्स्टंट आर्टिकलच बंद करण्याची घोषणा केली आहे. त्याऐवजी ‘व्हिडिओ फर्स्ट’ हे धोरण आणलं आहे. परिणामी एक एप्रिलपासून आपल्या ‘न्यूज फीड’मध्ये शब्दांमधील मजकुराच्या पोस्टपेक्षा व्हिडिओच्या पोस्ट अधिक दिसण्याची शक्यता आहे. या वर्षअखेरपर्यंत हे प्रमाण वाढत जाऊन एक वेगळा अनुभव आपल्या वाट्याला येणार आहे. दरम्यान, पोस्ट वाचण्यापेक्षा पोस्ट पाहण्यामध्ये आपण अधिक व्यग्र होणार आहोत, तसंच त्यातून आपला डेटा, मनाची ऊर्जा आणि वेळ अधिक खर्च होणार आहे.
 
 

Social media
 
शॉर्ट व्हिडिओजची क्रेझ
 
तुम्ही फेसबुकवर दररोज किमान 4-5 तरी शॉर्ट व्हिडिओज म्हणजेच रील्स किंवा स्टोरीज बघत असाल. अवघ्या 10 सेकंदांपासून ते एक मिनिटांपर्यंत असलेल्या या व्हिडिओजमध्ये मनोरंजन, वेगळेपणा आणि तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा, काही वेळा पुन्हा पुन्हा बघावा असं वाटणारा असतो. म्हणजेच तो खिळवून ठेवणारा असतो. ‘टिकटॉक’ त्यामुळेच अल्पावधीतच लोकप्रिय झालं. (सध्या ते भारतात बंद आहे.) स्टोरी आणि रील्सच्या स्वरूपात तयार होत असलेल्या शॉर्ट व्हिडिओजना मिळणार्‍या प्रचंड प्रतिसादामुळे सर्व सोशल मीडिया कंपन्या शॉर्ट व्हिडिओ स्वरूपातील कंटेंटकडे अधिक लक्ष देत आहेत. म्हणूनच एक एप्रिलपासून ‘व्हिडिओ फस्टर्र्’ धोरण अवलंबण्यात येत आहे. यामध्ये व्हिडिओ तयार करणार्‍या क्रिएटरलासुद्धा (वापरकर्त्याला) चांगलं उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त चांगला कंटेंट तयार होईल आणि वापरकर्ते त्यामध्ये व्यग्र राहतील.
 
 
24 March, 2023 | 17:7
 
 
लक्षवेधी आकडेवारी

Social media

फेसबुक हा जगातील सर्वांत मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनला असून फेसबुकवर जवळपास 285 कोटी मासिक अ‍ॅक्टिव्ह वापरकर्ते आहेत. त्यामध्ये दरमहा 7.18% वाढ होत आहे.
जगाची लोकसंख्या जवळपास 788 कोटी आहे. त्यापैकी इंटरनेट वापरकर्ते साधारण 464 कोटी आहेत. तर त्यापैकी 61% जणांच्या फोनमध्ये फेसबुक इन्स्टॉल केलेले आहे.
भारतामध्ये फेसबुक वापरकर्त्यांची संख्या 31 कोटींच्या वर आहे. यापैकी केवळ 50% वापरकर्त्यांनी दररोज एक मिनिट जरी फेसबुक वापरले तरीही दररोज 15.5 कोटी मिनिटं भारतीय लोक फेसबुकवर घालवतात.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मिळून दररोज 14 हजार कोटी वेळा रील्स (जुन्या किंवा नव्या) बघितली जातात. फक्त फेसबुकवर दररोज 60 लाख रील्स तयार केली जातात.
 
 
ओळख निर्माण करण्यासाठीची धडपड!
 
भारतीय व्यवस्थेत ‘आयडेंटिटी क्रायसिस’ हे एक सर्वांत मोठं आव्हान आहे. आपल्याला सामान्य बनून राहायचं नाही, तर आपल्याला असामान्य बनायचं आहे, ते झालं की लौकिक जगात लागणारी घर, गाडी, बंगला, प्रसिद्धी वगैरे सगळं मिळवता येईल असा समज झालेल्या पिढीचा उदय झाला आहे. विशेषत: निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात ही परिस्थिती अधिक तीव्र आहे. मग स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी वाट्टेल ते करावं लागलं, तरीही त्यांना फरक पडत नाही. अश्लीलता, नग्नता, क्रौर्य आणि कुरूपता या सर्व पातळ्यांचा आधार त्यासाठी घ्यावा लागला, तरीही त्यात त्यांना गैर वाटत नाही. हे सगळं भीषण आहे आणि फेसबुकसारखी समाजमाध्यमं अशा गोष्टींना लोकांसमोर आणून प्रोत्साहन देत आहेत. एक एप्रिलपासून हे अधिक प्रखर होण्याची चिन्हं आहेत. त्यासाठी भौतिक (ऑनलाइन नव्हे!) पातळीवर अनौपचारिक पद्धतीने प्रबोधन, जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
 
 
Social media
 
चुकीच्या व्यक्तीच्या हातात शक्ती
 
 
जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत असलेला उद्योगपती इलॉन मस्क नावाचा एक कलंदर माणूस सध्या ट्विटरचा प्रमुख आहे. एका ट्वीटमुळे अमेरिकेतील शेअर बाजारावर प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्यात आहे. स्वत:च्या हातात सूत्रं घेतल्यावर त्यांनी ट्विटरवर अनेक आमूलाग्र बदल केले. त्यामध्ये निळ्या रंगाच्या व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी शुल्क आकारण्यास प्रारंभ केला. उत्पन्नाचे मार्ग वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न ते करत आहेत. ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर योग्य व्यक्ती मिळत नसल्याचं सांगत त्या खुर्चीवर कुत्र्याचा फोटो टाकून त्यांनी तो शेअर केला होता. स्वत:च्या हातात सूत्रं आली की माणूस काय करू शकतो, याचं हे एक उत्तम आणि किळसवाणं उदाहरण आहे. अशा लोकांच्या हातात जर सोशल मीडिया जात असेल, तर याचे भविष्यात काय पडसाद उमटतील याची कल्पनाच केलेली बरी. ज्याप्रमाणे ट्विटरचं त्याप्रमाणे आपल्यासारख्या सामान्य वापरकर्त्यांचं आहे. एखाद्या सामान्य किशोरवयीन मुलाच्या ट्विटर हॅण्डलला किंवा फेसबुक पेजला दोन-चार लाख फॉलोअर्स मिळाले, तर तो जे काही पोस्ट करेल ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्याचे राजकीय, सामाजिक आणि इतर सर्व प्रकारचे परिणाम काहीही होऊ शकतात. परिणामी समाजमाध्यमांची शक्ती चुकीच्या व्यक्तीच्या हातात जात असताना, आपण सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
आम्ही काय करायचं?
 
 
एक एप्रिलपासून सोशल मीडियाचं जग बहुतांशी बदलणार आहे किंवा त्यात आमूलाग्र बदल होणार आहेत. आपला जास्तीत जास्त वेळ तिथे जावा, यासाठी पद्धतशीरपणे काळजी घेतली जात आहे. सोशल मीडिया लोकांना बदलायच्या भानगडीत न पडता, लोकांना बदलण्यासाठी स्वत:त बदल करत आहे. या पार्श्वभूमीवर आपण सोशल मीडिया कंपन्यांच्या नावे खडे न फोडता त्यांना बदलण्यासाठी स्वत:त बदल घडवायला हवेत. म्हणजे बघा - दोन-चार लाख फॉलोअर्स असलेल्या एखाद्या फेसबुकच्या पेजवरील चुकीचा कंटेंट जर एकाच वेळी किंवा हळूहळू लोकांनी बघितलाच नाही, तर तो अनेकांपर्यंत पोहोचणार नाही. परिणामी संबंधित क्रिएटरच्या पुढील पोस्टनाही प्रतिसाद मिळणार नाही आणि तो तसला कंटेंट बनवणं थांबवण्याचा विचार करेल. गोष्ट साधी आहे, पण तिचे परिणाम गंभीर आहेत. याउलट जर तुम्ही किंवा तुमच्या परिघातील कोणी एखादा नवा उद्योग-व्यवसाय करत असतील, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करून तुम्ही तुमची आर्थिक समृद्धी करू शकता. त्यामुळे हे माध्यम 100% वेळखाऊ आहे असं वाटत असलं, तरीही त्याचा जर सदुपयोग करून घेतला, तर ते 100% उपयोगी असल्याचं निदर्शनास येईल. फक्त कोण कसा वापर करतो त्यावर हे सगळं अवलंबून आहे. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नव्या वर्षात आपण संकल्प करू या की सोशल मीडियाचा मर्यादित स्वरूपात जास्तीत जास्त व्यावसायिक वापर करून घेऊ.
 
समारोप
 
आपल्या आयुष्याला परस्परांशी जोडणारं सोशल मीडिया नक्कीच फलदायक आणि उपयुक्त ठरलं आहे. पण आपल्याला कनेक्ट करण्याच्या नादात ती आपल्याला माणसांपासून डिस्कनेक्ट करत चाललं असल्याचं आपल्या लक्षातही आलेलं नाही. हातात वेळ असताना याकडे लक्ष दिलं नाही, तर हातातील वेळ आणि आपलं आयुष्य कधी आपल्या हातून निघून जाईल, ते समजणारही नाही.