‘उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियान’ सामर्थ्याचे प्रकटीकरण

विवेक मराठी    24-Mar-2023   
Total Views |

vivek
देशभरात प्रतिकूल परिस्थिती असतानाही कार्यकर्त्यांच्या जोरावर प्रथम जनसंघ ते भाजपा असा वाढत्या भाजणीचा पक्षाचा प्रवास राहिला आहे. निःस्वार्थी कार्यकर्ते हे भाजपाचे सगळ्यात मोठे आणि प्रचंड सामर्थ्य आहे. हेच सामर्थ्य लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश भाजपा ‘उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियान‘ राबवून असे कार्यकर्ते जवळ आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
एकोणीसशे ऐंशी साली जनसंघाचा भाजपा झाला. अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे अध्यक्ष झाले. देशाचे भावी पंतप्रधान म्हणून संघ आणि भाजपाबाहेरील काही मान्यवर त्यांच्याकडे बघू लागले. त्यामध्ये न्यायमूर्ती एम.सी. छागला हेदेखील होते. 1985 साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि भाजपाचे केवळ दोन खासदार निवडून आले. दोन खासदारांच्या पक्षाचा प्रमुख पंतप्रधान कसा होणार? देशातील राजकीय पत्रपंडितांनी आणि मान्यवर राजकीय नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला नगण्य ठरवून टाकले. हा पक्ष राजकीय सत्ता परिघाच्या बाहेरील पक्ष आहे, तो कधीही सत्तेवर येणे शक्य नाही असे सर्वांनी लिहायला सुरुवात केली आणि बोलायलाही सुरुवात केली.
 
 
vivek
 
उत्तमराव पाटील 
 
 
परंतु भारतीय जनता पक्षाचे काम करणार्‍या तळागाळातील कार्यकर्त्यांना असे मुळीच वाटत नव्हते. ‘अगली बारी अटल बिहारी’ ही त्या वेळची कार्यकर्त्यांची घोषणा होती. निवडणुकांचा तो कालखंड होता. उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त होत. परंतु कार्यकर्त्यांच्या उरातील अभंग आवेश कधीही संपला नाही. ही होती ‘बचेंगे तो ओर भी लढेंगे’ असे म्हणणार्‍या दत्ताजी शिंदेंची औलाद. लढण्याची जिद्द त्यांनी कधी सोडली नाही. निराशा त्यांना कधी स्पर्शून गेली नाही. आज या जगात आपण वेडे ठरलो तरी भविष्यकाळ आपलाच आहे, या दुर्दम्य आशावादावर कार्यकर्ते काम करीत राहिले.
 
 
 
हे बळ त्यांना कुठून प्राप्त झाले? सत्तेच्या लाभापासून ते सर्व दूरच होते. सत्तेच्या लाभाचा मोह त्यांना नव्हता. ते विचाराने भारावलेले कार्यकर्ते होते. आपल्याला भारत घडवायचा आहे, दु:ख, दैन्य, दारिद्य्र मिटवून टाकायचे आहे, जातीपातीचे भेद संपवून टाकायचे आहेत, एकात्म समाज निर्माण करायचा आहे आणि भारतमातेला जगद्गुरूच्या पदावर पोहोचवायचे आहे, या ध्येयवादावर भारावून लाखो कार्यकर्ते घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करीत राहिले.
 
 
vivek
 
शेवटी अपेक्षित ते परिवर्तन घडले. 1990 सालच्या लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेने देशाची राजकीय विषयसूची बदललेली. बाबरी ढाचा कोसळल्यानंतर या देशातील राष्ट्रीय समाज नवीन तेजाने आणि आत्मविश्वासाने उभा राहत गेला. त्याचा परिणाम म्हणून 1996 साली अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले म्हणजे काय झाले?
 
 
अटलबिहारी नावाची एक व्यक्ती पंतप्रधानपदावर बसली असा याचा अर्थ नाही. अटलबिहारी वाजपेयी म्हणजे एक विचार, एक ध्येय, एक स्वप्न आणि हे ध्येय, हा विचार आणि हे स्वप्न लाखो कार्यकर्त्यांचे होते. अटलबिहारी त्याचे प्रतीक होते. म्हणून पंतप्रधानपदाची ते जेव्हा शपथ घेत होते, तेव्हा देशातील लाखो घरे आनंदाश्रूंनी तुडुंब भिजत होती. अशा लाखो घरांतील प्रत्येकाला असे वाटले की, मीच पंतप्रधान झालो आहे. हे स्वप्न पाहण्यासाठी ‘अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होत नाहीत, तोपर्यंत मी पायात वहाणा घालणार नाही’ असे म्हणणारे सांगलीचे बाळासाहेब गलगले हे एकमेव कार्यकर्ते होते असे नाही, अशा हजारो कार्यकर्त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी वेगवेगळी व्रते घेतली होती. भाजपाचे हे सगळ्यात मोठे आणि प्रचंड सामर्थ्य आहे.
 
 
vivek
 
यानंतर 2014 साली नरेंद्र मोदी पूर्ण बहुमताने पंतप्रधान झाले. पुन्हा 2019 साली, 2014पेक्षा अधिक जागा मिळवून ते पंतप्रधान झाले. अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हे दोघेही राजकारणात जाण्यापूर्वी संघप्रचारक होते. प्रचारक म्हणजे ज्यांनी ध्येयासाठी आपले संपूर्ण जीवन मातृभूमीच्या चरणी समर्पित केले आहे, अशी व्यक्ती. अशा व्यक्तीचा श्वासोच्छ्वास देशहिताचाच असतो. माझा देश कसा संपन्न होईल, माझे राष्ट्र कसे संपन्न होईल, माझा देश विश्वात कसा महान होईल, एवढी एकच चिंता त्याच्या मनात असते. अटलबिहारी काय किंवा नरेंद्र मोदी काय, हे राजयोगी आहेत. सत्तेचे वैभव प्राप्त झाले आहे, पण मन:स्थिती योग्याची आहे. सत्तेची आसक्ती नाही. आसक्ती नसल्यामुळे सत्तेचा माज नाही. निष्काम कर्मयोग हेच त्यांचे जगणे.
 
 
भाजपा आता सत्ताधारी पक्ष आहे आणि दीर्घकाळ तो सत्तेवर राहणार आहे. समाजामध्ये सत्तेची लालसा असणार्‍या अनेक व्यक्ती असतात, अनेक गट असतात, अनेक राजकीय पक्ष असतात. एक फार मोठा वर्ग असा असतो, जो नेहमी सत्तेबरोबर राहू इच्छितो. या वर्गाला विचार, ध्येयवाद, भव्य स्वप्न, त्याग, तपस्या याच्याशी फार काही देणेघेणे नसते. सत्तेवर राहायचे किंवा सत्तेच्या जवळपास राहायचे. त्यामुळे समाजात मानसन्मान प्राप्त होतो, धन प्राप्त होते आणि सत्ता भोगण्याची हौस पूर्ण होते. जेव्हा काँग्रेस हीच दीर्घकाळ सत्तेवर राहणार आहे, तेव्हा समाजातील हाच वर्ग फार मोठ्या संख्येने काँग्रेसबरोबर राहिला. महात्मा गांधींचा विचार, भारतासंबंधीचे त्यांचे स्वप्न, पं. नेहरूंच्या भारताविषयीच्या संकल्पना किंवा त्याच्याही पूर्वीचा काँग्रेसचा लोकमान्य टिळकांनी मांडलेला विचार, या सर्वांशी त्याला काही देणेघेणे नसे. नगरपालिकेपासून ते लोकसभेपर्यंत तिकिट कसे प्राप्त करायचे आणि त्यासाठी काय काय उचापती करायच्या, यात असंख्य लोक तरबेज झाले. त्यावर अनेक चित्रपटही निघालेले आहेत. काँग्रेसच्या र्‍हासाची सुरुवात या कार्यकर्त्यांनी केली. विचार आणि ध्येयवाद याशिवाय पक्ष जगू शकत नाही. विचार आणि ध्येयवाद, ध्येयवादी कार्यकर्ते हाच पक्षाच्या पाठीचा कणा असतो.
 
 
आता दीर्घकाळ भाजपा सत्तेवर आहे - म्हणजे ज्याप्रमाणे काँग्रेस एकेकाळी सत्ता देणारा पक्ष होता, तीच स्थिती आता भाजपाची झाली आहे. आणि म्हणून बाहेरून येणार्‍या लोकांची रीघ भाजपामध्ये लागलेली आहे. नरेंद्र मोदी महान आहेत, ते देशाचे तारणहार आहेत, भाजपाच देशाला सामर्थ्यशाली आणि समृद्ध करू शकतो, असा अनेक लोकांना साक्षात्कार झालेला आहे. आणि ते भाजपात प्रवेश करतात. पक्षालादेखील आपला जनाधार वाढविण्याची आवश्यकता असते, म्हणून पक्षदेखील नवागतांचे स्वागत करीत राहतो, त्यांना पदे देतो. काही जणांना आमदारकी मिळते, काही खासदार होतात, काही मंत्री होतात. असे करणे योग्य की अयोग्य हा एक वादाचा आणि नाजूक विषय आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करता येऊ शकतो. एक गोष्ट मात्र खरी की कोणत्याही सत्ताधारी पक्षाला आपले दरवाजे बंद करून चालत नाही. तसे करणे पक्षाच्या हिताचे होत नाही.
 
 
 
अशा वेळी एक भावनिक आणि नाजूक प्रश्न निर्माण होतो. विचारासाठी आणि ध्येयासाठी जीवनभर खस्ता खाणार्‍या कार्यकर्त्याला असे वाटू लागते की, पक्षाचे नवनेतृत्व आता आपल्याला विचारीत नाही, आपली गरज संपली आहे. आपण नगण्य होत चाललो आहोत, आपण दुर्लक्षित आहोत ही भावना अनेकांच्या मनात निर्माण होते. ध्येयवादी पक्षकार्यकर्त्यांच्या या मनात अशी भावना आणि विचार निर्माण होणे हे पक्षाच्या दृष्टीने फार धोकादायक आहे. या कारणामुळे नेहरूंची काँग्रेस, राहुल गांधीची काँग्रेस झाली आहे. या कारणांची बीजे इथे आहेत. म्हणून वेळीच त्यावर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
 
 
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ही गोष्ट प्रथम लक्षात आलेली दिसते, म्हणून त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी ‘उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियान’ या नावाने एक अभियान राबविण्याचे ठरविले आहे आणि त्याची जबाबदारी माजी आमदार मधू चव्हाण यांच्यावर सोपविली आहे. मधू चव्हाण हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत आणि प्रदीर्घ काळ एकनिष्ठेने ते पक्षकार्य करीत आहेत. संघविचारासंबंधीच्या त्यांच्या धारणा पक्क्या आणि स्पष्ट आहेत. ते स्वत: विचक्षण वाचक आहेत. भाजपातील अन्य किती नेते मुंबई तरुण भारत आणि विवेक वाचतात, मला माहीत नाही, परंतु मधू चव्हाण मात्र बारकाईने वाचन करतात. आवडले -नावडले याचा अभिप्राय कळवितात.
 
 
 
उत्तमराव पाटील हे भाजपा सत्तेवर येण्यापूर्वीचे बहुजन समाजातील भाजपाचे नेते होते. अटलबिहारी आणि नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे पूर्ण समर्पित. पाटील अडनाव असल्यामुळे अन्य पुरोगामी पक्षांनी त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला नसेल असे नाही. पण संघनिष्ठांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. आपल्याला एका ध्येयासाठी राजकीय क्षेत्रात काम करायचे आहे आणि राजकीय क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणायचे आहे. कलम 370 समाप्त करायचे आहे. श्रीरामजन्मभूमी मुक्त करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सत्ताकारणात आणायचा आहे. बहुजन समाजाला बरोबर घेऊन पक्ष वाढवायचा आहे. उत्तमराव पाटील यांच्या या जीवननिष्ठा होत्या. ही विचारनिष्ठा सोडून चालणार नाही.
 
 
 
आज भाजपा जरी सत्तेवर असला, तरी ‘भारत तेरे टुकडे होंगे’ ही तुकडे तुकडे गँग विविध प्रकारे सक्रिय असते. खलिस्तानी आंदोलन, मूलनिवासीवाद, लव्ह जिहाद, गरिबांच्या आणि वंचितांच्या धर्मांतरांचे धोके, जिहादी दहशतवाद, परकीय देशांच्या हस्तक्षेपाची मागणी करणारी वक्तव्ये, असे सगळे गंभीर राष्ट्रीय धोके आहेत. जेव्हा समाजातील सज्जनशक्ती निष्क्रिय होते, तेव्हा दुष्ट शक्तींचे प्राबल्य वाढते. देशाचा हा सनातन इतिहास आहे. म्हणून ज्यांच्या उरात विश्वगुरू भारतमातेचे स्वप्न आहे, सामथ्यर्र्शाली आणि समृद्ध भारताचे स्वप्न आहे, अशा सर्व जाणत्या कार्यकर्त्यांनी स्वत:ला कामात गुंतवून ठेवले पाहिजे. आपला संस्कार असा आहे की, विचारासाठी काम करायचे आहे, कोणत्याही लाभासाठी काम करायचे नाही. आणि आपला दुसरा कर्मसिद्धान्त आहे, चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते. म्हणजे सत्तेच्या लाभासाठी काम करायचे नाही हे खरे असले, तरीही सत्ता टिकून राहिल्यास तिचे लाभ सर्वांना आपोआप प्राप्त होतात. आपापल्या क्षेत्रात नित्य जागरूक राहून सक्रिय राहणे आवश्यक आहे. सत्तेची लढाई ही मुख्यत: मतांची लढाई असते आणि मतांची लढाई जिंकण्यासाठी मतदारांशी नित्य संपर्क, नित्य संवाद आवश्यक असतो. हे काम गावपातळीपासून ते प्रदेशपातळीपर्यंत सर्वांना करावे लागते. जो घरात बसला तो संपला हे आपण अनुभवतो आहोत. मधू चव्हाणांना येणार्‍या काळात भरपूर प्रवास करून जुन्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, त्यांच्या कथा ऐकून घेणे आणि त्यांच्यात उत्साह निर्माण करणे हे कार्य करावे लागेल. त्यात ते यशस्वी होतील, यात शंका नाही.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.