कर्मयोगी दादा वाडेकर

विवेक मराठी    24-Mar-2023
Total Views |
@अरुण करमरकर । 9391259949
 
पालघर-वाडा जिल्ह्याचे संघचालक व संघाच्या विविध जबाबदार्‍या पार पाडणारे दादा वाडेकर यांचे 15 मार्च 2023 रोजी निधन झाले. संघकार्यकर्त्यांच्या मांदियाळीत दादा वाडेकर यांचे स्थान अत्यंत ठळक आहे. अनेक वर्षे ते पालघर-वाडा जिल्ह्याचे संघचालक होते. केवळ कार्यकर्ता - स्वयंसेवक समूहाचेच नव्हे, तर आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील सर्व समाजघटकांविषयीचा, सुजाण पालकाचा ममत्वभाव त्यांच्या ठायी नांदत होता. अशा या कर्मयोगींना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख...
rss
 
ज्येष्ठ मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर त्यांच्या एका रचनेत म्हणतात, ’नुसतेच ना दुनियेत तुमच्या, आलो अम्ही गेलो अम्ही, भगवन तुझ्या दुनियेस काही, देऊनी गेलो अम्ही’ याच आत्मविश्वासपूर्ण भावनेवर स्पष्ट दावा सांगू शकणारे, जीवन कृतार्थपणे जगून जयवंत हरी उर्फ दादा वाडेकर नुकतेच काळाच्या पडद्याआड शांतपणे निघून गेले. निसर्गनियमानुसार व्यक्ती पार्थिव रूपाने निघून जाते, तेव्हा तिच्या सार्‍या आप्तस्वकीयांना ’आता ती आपल्यात नाही’ हे वास्तव अपरिहार्यपणे स्वीकारावेच लागते. मात्र ते स्वीकारताना, पचविताना हृदयात उमटणारी वेदना किती काळ सलत राहणार, हे त्या व्यक्तीच्या जीवनप्रवासावर, त्या प्रवासात तिने उमटविलेल्या पाऊलखुणांच्या ठळकपणावर अवलंबून असते. जयवंतराव उर्फ दादा वाडेकर यांनी रेखलेल्या पाऊलखुणा इतक्या गडद आहेत की ते नसल्याची वेदना तर दीर्घकाळ ठसठसत राहील. पण विशेष बाब अशी की वेदनेबरोबरच एक आश्वासक प्रेरणाही दीर्घकाळपर्यंत दरवळत राहील. या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू महत्त्वाचे आहेतच, पण बहुधा सर्वात महत्त्वाचे आहे ते त्या सर्व पैलूंना लाभलेले संघविचाराचे आणि संघ व्यवहाराचे कोंदण. स्वत: दादांनी आयुष्यभर हे कोंदण जपले-जोपासले, निष्ठेने आणि सहजतेने.
 
 
पालक संघचालक
 
 
संघविचार, संघसंस्कार परिपुष्ट झाला, समाजजीवनातही झिरपत राहिला तो संघाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या जगण्यातून. सैद्धान्तिक, तात्त्विक पातळीवर परिभाषित करण्याच्या आटापिट्यापेक्षाही व्यवहारात तो विचार निष्ठापूर्वक जगत स्वत:चे उदाहरण समाजासमोर सादर करणार्‍या अशा सर्व कार्यकर्त्यांचे योगदान सर्वात मोठे आहे. त्या कार्यकर्त्यांच्या मांदियाळीत दादा वाडेकर यांचे स्थान अत्यंत ठळक आहे. अनेक वर्षे ते पालघर-वाडा जिल्ह्याचे संघचालक होते. (संघाच्या संघटनात्मक रचनेत गेल्या सुमारे पन्नास वर्षांपासूनच वाडा पालघर परिसर स्वतंत्र जिल्हा गणला जातो). संघात संघचालक या दायित्वाचे एक स्वतंत्र स्थान आहे, एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिका राहत आली आहे. परिपक्व, प्रगल्भ कुटुंबप्रमुख असे ते स्थान आहे. दादा या अपेक्षित भूमिकेला तंतोतंत न्याय देणारे संघचालक राहिले.केवळ कार्यकर्ता - स्वयंसेवक समूहाचेच नव्हे, तर आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील सर्व समाजघटकांविषयीचा, सुजाण पालकाचा ममत्वभाव त्यांच्या ठायी नांदत होता. त्यांच्याद्वारे सबंध वाडेकर परिवारातच ही आत्मीय सुजाणतेची धारा प्रवाहित होत आली.
 
rss 
 
ऋजुता आणि निष्ठेची प्रखरता, मोकळा ग्रामीण रांगडेपणा आणि जमिनी वास्तवाचे शहाणपण, सदाचार-सद्विचाराचा सुगंध आणि दुराचाराविषयीचा कमालीचा तिटकारा या गुणसंपदेचा अद्भुत संगम दादांच्या नित्य वर्तनातून अनुभवाला येत असे. या सार्‍या सत्त्वगुणांनी परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाला अतिशय भक्कम पाया होता तो विशुद्ध भारतीयतेचा. दिनचर्या, शिक्षण, उद्योग, समाजकारण या सगळ्यातून त्यांनी ही भारतीयता सातत्याने आणि निष्ठेने जपली.
 
 
निसर्गपुत्र
 
निसर्गस्नेह हा दादांचा स्थायिभाव. आचार-विचार, आहार-व्यवहार, इतकेच काय, तर चरितार्थाचा व्यवसाय या सार्‍या त्यांच्या विश्वावर निसर्गस्नेहाची ठळक मुद्रा होती. निसर्ग आणि निसर्गाच्या सान्निध्यातील जीवन हाच त्यांचा शैक्षणिक, व्यावसायिक आणि दिनक्रमिक आखाडा. ते उत्तम वाचक होते. सगळ्यात प्रभावी वाचन त्यांनी केले ते निसर्गाचे. सात-आठ दशकांपूर्वीच्या ग्रामीण शेतकरी कुटुंबात ते वाढले. शरीरश्रम - मग ते शेतकर्‍याचे असोत, त्याच्या कुटुंबीयांचे असोत वा अगदी शेत नांगरणार्‍या बैलाचे.. या श्रमाचे शेतीतील आणि एकूण मानवी जीवनातील स्थान त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले, तसेच साक्षीभावाने जाणले. त्याचबरोबर ते श्रम सर्वोत्कृष्ट (optimum) स्तरापर्यंत कारणी लागावेत या दृष्टीने केलेल्या चिंतनातून त्यांनी आपल्या कारखान्यात आपली सर्जनशक्ती पणाला लावली. त्यातून त्यांनी जे तंत्रकौशल्य साकार केले, ते एखाद्या निष्णात अभियंत्यालाही स्तिमित करणारे होते. हाताळण्यास सुलभ, शरीरश्रमांना पूर्णपणे इष्ट प्रतिसाद देणारी आणि तरीही परिणामकारक अशी शेतीची अवजारे त्यांनी आपल्या कारखान्यात सिद्ध केली. बैलगाडीच्या चाकाची धाव असो की दगड फोडणारा हातोडा, जमीन वखरणारे खुरपे असो व कापणी करणारा विळा.. अशी सगळी कृषी अवजारे अधिकाधिक तंत्रसुलभ आणि परिणामकारक कशी होतील, याचाच त्यांना सदैव ध्यास असे. वाडा शहराजवळच असलेली वाडेकर कृषी यांत्रिकी उद्योगाची कार्यशाळा याच ध्यासाने झपाटलेली असे. शेतातली बैलजोडी, गोठ्यातली गाय, घराच्या आवारात बागडणार्‍या कोंबड्या, आवतीभोवती किलबिलणार्‍या पक्ष्यांचा थवा.. या सर्व परिदृश्याकडे पाहण्याची त्यांची स्नेहपूर्ण दृष्टी त्यांच्या निसर्गप्रेमाची ठळक साक्ष देत असे. ती त्यांची जन्मजात प्रवृत्तीच होती. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, गोधन संवर्धन, पशुधन संगोपन, पर्यावरण या सार्‍याबद्दलची त्यांची आस्था स्वाभाविकच अतिशय उत्कट होती.
 
 
rss
 
अशा निसर्गपुत्राला आदिवासीबहुल क्षेत्राचे सान्निध्य जन्मापासूनच लाभावे, हा नियतीचा जणू विलक्षण संकेत होता, असेच म्हणायला हवे. या संकेताला पुरेपूर सार्थ करणारे समाजसंघटकाचे जीवन दादा जगले. निरामय, कार्यक्षम आणि समाजहितैषी. वाडा-पालघर परिसरात आज संघप्रणीत संस्थाजीवनाचा प्रचंड विस्तार आकाराला आला आहे. साधारण 1966-67मध्ये तलासरी येथील वनवासी कल्याण प्रकल्पातून सुरू झालेल्या संघसृष्टीच्या संस्थाजीवनाचा आता अक्षरश: महावृक्ष म्हणावा असा झाला आहे. दादा वाडेकरांचा संघजीवनाचा प्रवासही याच काळात फुलत गेला. जिल्हा संघचालक या नात्याने शिक्षण, शेती, सहकार, संस्कार अशा समाजजीवनाच्या सर्व महत्त्वपूर्ण क्षेत्रांत प्रतिष्ठित झालेल्या संस्था-संघटनांच्या उभारणीशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. आणीबाणी आली, तेव्हा देशभरातील वरिष्ठ संघजनांप्रमाणेच दादांनाही सतरा-अठरा महिन्यांचा करावास झाला. त्या वेळी त्यांचे वय, त्यांचा व्यवसाय आणि त्यांचा संसारही ऐन उमेदीच्या आणि मोक्याच्या टप्प्यावर होता. आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने काळ बिकटच होता. मुले अगदी लहान, शालेय शिक्षणवयातच होती. मात्र दादांच्या कुटुंबाने तो कठीण काळही हिमतीने निभावला. त्यांच्यापैकी कोणाचीच संघनिष्ठा, समाजनिष्ठा तीळभरही उणावली नाही. कन्या रश्मी हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही वर्षे पूर्णवेळ कामही केले. स्वत: दादा तर संघचालक या नात्याने स्वयंसेवक समूहाचा प्रवासी प्रचारकांचा आणि विविधलक्ष्यी कार्यविस्ताराचा मुख्य आधारच बनून राहिले.
 
 
दोनच वर्षांपूर्वी दादा वाडेकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा सोहळा त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केला होता. वयाच्या दृष्टीने हालचाली काहीशा मंदावलेल्या स्थितीतच या सोहळ्याला दादा सामोरे गेले. मात्र त्यांचे मन त्याही प्रसंगी कृतार्थतेने ओसंडून भरले असणार. त्याच कृतार्थ भावनेने मृत्यूलाही ते शांतपणे सामोरे गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाच्या अखेरच्या काळात त्यांच्या मनातील सार्थकता अतिशय समर्पक आणि प्रत्ययकारक शब्दात व्यक्त केली -
 
’मी असता दिवस नसे व्यर्थ गमविला,
 
दिवसास्ताचेही म्हणुनि, भय नसे मला।’
 
अगदी याच, अशाच भावनेचे अधिकारी राहिले दादा - जयवंत हरी वाडेकर.
 
अतिशय शाश्वत आणि उदात्त भारतीय संस्कृतीच्या समृद्धीचे लेणे असलेल्या ग्रामीण भारतीय जीवनाचा एक आदर्श मापदंड दादांसारख्या निसर्गपुत्रांच्या जीवनाने साकार करून ठेवला आहे. तथाकथित आधुनिक, झगमगाटी जीवनशैलीच्या गदारोळात आदर्शाचा तो स्नेहदीप मंदावू न देणे हीच दादांना योग्य आदरांजली ठरेल. त्यांच्या स्मृतींना विनम्र प्रणाम!