राष्ट्रचेतना जागविणारी स्वा. सावरकर संस्कारतीर्थ परिक्रमा

विवेक मराठी    03-Mar-2023   
Total Views |

भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासातील जे पान प्रखर राष्ट्रभक्तीच्या तेजाने झळाळत होते, ते पान म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कर्तृत्वगाथेचे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही अनेकांच्या पचनी पडणे कठीण गेले. त्यांच्या विचारांवर आक्षेप, गैरसमज, टीका, अपप्रचार सुरू झाले. स्वातंत्र्यानंतरही जवळजवळ सहा दशके सत्तारूढांनी - विशेषत: काँग्रेसपक्षीयांनी सावरकरांवर टीका केली. अगदी अलीकडेच भारत जोडो यात्रेतही त्यांच्याबद्दलचा रोष उफाळून निघालेला दिसला.
 
vivek
 
मात्र गेली आठ वर्षे केंद्रात झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर भारतीय अस्मितेला, भारतीय संस्कृतीला तिचा उचित सन्मान देण्याचा ध्यास घेतलेले शासन सत्तास्थानी आरूढ आहे. ’राष्ट्र प्रथम’ मानणार्‍या संघाच्या मुशीत घडलेले सरकार, स्वातंत्र्याच्या होमकुंडात आहुती दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यवीरांसारख्या जाज्वल्य देशाभिमान्यांचे विचार व कार्य आपल्या देशवासीयांपुढे आत्मीयतेने मांडत आहे. न वाचलेल्या इतिहासामुळे किंवा चुकीच्या इतिहासामुळे दिशाभूल झालेल्या पिढीला आता भारताचा नेमका इतिहास काय आहे हे समजते आहे. आजवर न सांगितल्या गेलेल्या खर्‍या भारताचे दर्शन नागरिकांना व्हावे आणि देशवासीयांच्या मनातली राष्ट्रीय भावना बळकट व्हावी, याकरिता केंद्र व राज्य शासन प्रयत्नरत आहे.
 

vivek 
 
यादिशेने टाकलेले आणखी एक पाऊल म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे महाराष्ट्रात ’स्वा. सावरकर संस्कारतीर्थ परिक्रमे’चे होत असलेले आयोजन. स्वा. सावरकरांच्या जीवनकार्याचा जगभर प्रसार व प्रचार करणे हे या परिक्रमेचे उद्दिष्ट आहे. स्वा. सावरकर यांच्या आत्मर्पण दिनी, म्हणजे रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी त्यांच्या जन्मस्थळी भगूर (जि. नाशिक) येथे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांनी या परिक्रमेची जाहीर घोषणा केली. या दिवसाचे औचित्य साधत भगूर येथे राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने भव्य अभिवादन पदयात्रेचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पर्यटन, कौशल्य रोजगार, महिला व बालविकास मंत्री मा. मंगलप्रभात लोढा हे या कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थित होते.
 
 
“स्वा. सावरकर यांचे विचार व जीवनकार्य सर्व भारतीयांसाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीसाठी एक प्रेरणास्रोत आहे. त्यांचे जीवनकार्य आणि विचार भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याच अंतर्गत सावरकरांचे जन्मस्थान भगूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय व भव्य थीम पार्क यांची उभारणी करण्यात येणार आहे. यात भगूर येथील गेली अनेक वर्षे अपूर्णावस्थेतील असलेले थीम पार्कचे काम तडीला नेण्यासाठी हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) ते स्वत:कडे हस्तांतरित करून घेत असून हे पार्क जलदगतीने पूर्ण करणार आहोत” अशी माहिती मुख्य कार्यक्रमात मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
 
 
vivek
 
या वेळी त्यांनी पर्यटन विभागातर्फे ’स्वा. सावरकर संस्कारतीर्थ परिक्रमे’ची घोषणा केली. “स्वा. सावरकरांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक वास्तूंचा या संस्कारतीर्थ परिक्रमेत समावेश करण्यात आला आहे - 1. जन्मस्थान भगूरमधील सावरकरवाडा, 2. स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे, 3. बाबाराव सावरकर स्मारक - सांगली, 4. पतितपावन मंदिर - रत्नागिरी, 5. स्वा. सावरकर सदन - शिवाजी पार्क, दादर ही ठिकाणे या परिक्रमेत पाहायला मिळणार आहेत.
 
 
या प्रत्येक स्थानाचे माहात्म्य व महत्त्व लक्षात घेऊन ती स्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी व जगभरातून अधिकाधिक पर्यटक या वास्तूंना भेट देण्यासाठी पर्यटन विभाग विविध उपक्रम हाती घेणार आहे आणि या सर्व कामात विवेक व्यासपीठ ही संस्था आमच्याबरोबर सहकार्याची/सहयोगाची भूमिका बजावणार आहे” असे त्यांनी या वेळी सांगितले.
 
 
vivek
 
स्वा. सावरकर संस्कारतीर्थ यात्रेची घोषणा करताना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आणखी एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केले. ते म्हणाले, ‘’राज्यात व केंद्रात सावरकरांच्या विचारांचे सरकार असून आम्ही सर्व जण त्यांचे मावळे आहोत.“ येत्या 15 दिवसांच्या आत भगूरला अधिकृतरित्या पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. ‘थीम पार्क’ आणि ‘संग्रहालया’साठी पाच कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केली असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वा. सावरकरांच्या आत्मार्पण दिनी सावरकरांच्या जन्मस्थळाला भेट दिल्याने ऊर्जा मिळाली, असे त्यांनी भावोत्कट उद्गार काढले.
 
 
स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विभाग व अनेक सहयोगी संस्था-संघटनांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन पदयात्रेत व कार्यक्रमात नाशिक-भगूरमधीलच नव्हे, तर मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्रातील मुख्य शहरांतील नागरिक, सावरकरप्रेमी, भगूरमधील शाळेतील विद्यार्थी, तसेच भोसला मिलिट्री स्कूलमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगूरमधील नूतन विद्यालय ते स्वा. सावरकर वाडा अशी भव्य अभिवादन पदयात्रा या वेळी काढण्यात आली होती. स्वा. सावरकरांच्या जयघोषाने भगूर परिसर दणाणून निघाला. अभिवादन पदयात्रा सुरू होण्यापासून संपूर्ण भगूर सावरकरमय झालेले पाहायला मिळाले. या पदयात्रेचे मुख्य वैशिष्ट्य ठरले ते स्वा. सावरकरांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या आणि त्यांची कुलदेवता असलेल्या अष्टभुजा देवीची पालखी. या अष्टभुजा देवीची पालखी घेऊन पर्यटन मंत्री या भव्य अभिवादन पदयात्रेत सहभागी झाले होते. सावरकरांचा विचार मुलांच्या मनात बालवयापासून रुजविण्याचे काम करणार्‍या भोसला मिलिट्री स्कूलचे विद्यार्थीही या अभिवादन पदयात्रेत आपली प्रात्यक्षिके/पथसंचलन करत सहभागी झाले होते.
 
 
vivek
 
या अभिवादन पदयात्रेनंतर सर्वांनी सावरकर वाड्यात जाऊन सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले व मानवंदना दिली. तसेच या पुण्यवास्तूचे दर्शन घेतले. त्यानंतर सावरकर आत्मार्पण दिनाच्या मुख्य कार्यक्रमाकडे सर्व जण वळले. या मुख्य कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक चारुदत्त दीक्षित व सहकलाकांरासमवेत सावरकर रचित देशभक्तिपर गीतगायनाचा कार्यक्रम सादर करून वातावरण चैतन्याने भारून टाकले.
 
 
आदित्य धलवार व बद्रीश कट्टी या तरुण कलाकारांनी योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित ‘सावरकर आणि मृत्यू’ या संवादांचे अभिवाचन केले. त्यांच्या भावपूर्ण अभिवाचनाने ऐकणार्‍यांचे डोळे पाणावले.
 
 
या कार्यक्रमात व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यापैकी विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य एकनाथ शेटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, “सावरकरांचे स्मारक होण्यासाठी गेल्या तीन दशकांपासून सरकारदरबारी लढा दिला. तो लढा सावरकर विचारांच्या या सरकारने यशस्वी केला.” नाशिकचे खा. हेमंत गोडसे म्हणाले, “स्वा. सावरकर नाशिकचे सुपुत्र असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जयंती व आत्मार्पण दिन या दोन दिवशी तरी इतर कामांतून वेळ काढून या पवित्र वास्तूंचेे दर्शन घेण्यासाठी मी येथे येतो, त्यामुळे मला राष्ट्रीय विचार पुढे नेण्याचे बळ व प्रेरणा मिळते.” नाशिकचे माजी आमदार राहुल ढिकले म्हणाले, “गेल्या काही वर्षांत सावरकरांच्या विचारांशी जाणीवपूर्वक फारकत घेतली होती. मात्र विद्यमान सरकारने त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन राष्ट्रविचारांची जागृती सुरू केली आहे.”
 
 
सावरकर म्हणजे एक संतुलित विचार आणि त्या विचाराला जोडलेला सुनियोजित आचार. विनायक दामोदर सावरकर या नावातच समर्पणवृत्तीचे दर्शन होते. स्वा. सावरकर स्वत: व त्यांच्याबरोबर स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात आपले संपूर्ण जीवन स्वाहा करणारे त्यांचे संपूर्ण कुटुंब म्हणजे प्रखर राष्ट्रभक्तीचे जाज्वल्य उदाहरण आहे. कालसुसंगत विचार हे स्वा. सावकरांचे जीवनकार्याचे वैशिष्ट्य आहे. ‘स्वा. सावरकर संस्कारतीर्थ परिक्रमे’मुळे तरुणाईची पावले पुन्हा या वास्तूंकडे आणि या वास्तूत प्रकट झालेल्या तेजस्वी विचारांकडे वळतील. मरगळ आलेल्या या वास्तू त्यानिमित्त पुन्हा नव्या दमाने उभ्या राहतील, येणार्‍या प्रत्येकाला इतिहासाची पाने वाचून दाखवतील आणि आपल्या पराक्रमाचा इतिहास उलगडतील. कष्टाने मिळालेल्या स्वातंत्र्याच्या बळकटीकरणासाठी, राष्ट्रउभारणीसाठी, विधायक संघटन घडविण्यासाठी, राष्ट्रप्रेमी युवा पिढी घडविण्यासाठी ‘स्वा. सावरकर संस्कारतीर्थ परिक्रमा’ ऐतिहासिक ठरेल, यात शंका नाही.
 
 

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.