सर्वोच्च समर्पण करणारा हेमू कलानी

विवेक मराठी    12-Apr-2023   
Total Views |
हेमू कलानी या वयाच्या विशीत देशासाठी हुतात्मा झाला. त्यांच्या बलिदानाची कहाणी प्रेरणादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात आपले बलिदान देणार्‍या हेमू कलानीचे पाकिस्तानला विस्मरण झाले आहे. वास्तविक सिंध आता पाकिस्तानात असले, तरी ब्रिटिशांच्या विरोधातील लढ्यात अखंड भारत सहभागी होता. हेमू कलानीच्या बलिदानाची भारताने आठवण ठेवली आहे. नुकतेच त्याच्या जयंतीनिमत्त देशभरातील सिंधी बांधवांनी भोपाळ येथे कार्यक्रम आयोजित केला होता. सरसंघचालक मोहन भागवत त्याला उपस्थित होते. यानिमित्ताने हेमू कलानी यांचे स्मरण करणारा लेख...
 
hemu kalani
 
“देशाची फाळणी होणे ही एक घोडचूक होती आणि पाकिस्तानातील नागरिक फाळणीनंतर सात दशकांनंतरदेखील संतुष्ट नाहीत” असे वक्तव्य करून सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी अखंड भारत हेच सत्य आहे असे प्रतिपादन केले. ते ज्या कार्यक्रमात बोलत होते, तो होता हेमू कलानी या वयाच्या विशीत हुतात्मा झालेल्या एका तरुणाच्या जयंतीचा. देशभरातील सिंधी बांधवांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. सिंध हा भाग आता पाकिस्तानचा हिस्सा असला, तरी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सिंधचे मोठे योगदान आहे. स्वाभाविकच हेमू कलानीचे स्मरण करताना फाळणी आणि अखंड भारत हे विषय सरसंघचालकांनी मांडले.
 
 
 
ज्या हुतात्म्याच्या जन्मशताब्दीनिमित्त हा कार्यक्रम होता, त्या हेमू कलानीने स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि तीही वयाच्या विशीच्या उंबरठ्यावर असताना. काही योगायोगच विलक्षण असतात. आद्य क्रांतिकारक मानले जाणारे वासुदेव बळवंत फडके यांनी देशासाठी प्राणार्पण केले 1883 सालच्या 17 फेब्रुवारीला आणि ज्यांनी पुढे क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून ख्याती प्राप्त केली, ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 1883 सालच्याच मे महिन्यातील. हेमू कलानीच्या बाबतीत असाच विलक्षण योगायोग आहे. त्याचा जन्म 23 मार्च 1923चा. 1931 साली, मात्र 23 मार्च रोजीच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली. त्या वेळी हेमू कलानीचे वय होते आठ वर्षांचे आणि त्यानंतर अवघ्या अकरा वर्षांनी स्वत: हेमू कलानीनेदेखील देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचाच समर्पणाचा वारसा पुढे नेला, असेच म्हटले पाहिजे.
 
 संसद परिसरात 2003 साली हेमू कलानीच्या राम सुतार यांनी घडविलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, तेव्हा पंतप्रधानपदी होते अटलबिहारी वाजपेयी. त्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने संसद सचिवालयाने हेमू कलानीच्या जीवनाचा धावता आढावा घेणारी पुस्तिकादेखील प्रकाशित केली होती.
 हेमू कलानीच्या बलिदानाची कहाणी प्रेरणादायक अशीच. दुर्दैवाची बाब म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात आपले बलिदान देणार्‍या हेमू कलानीचे पाकिस्तानला विस्मरण झाले आहे. वास्तविक सिंध आता पाकिस्तानात असले, तरी ब्रिटिशांच्या विरोधातील लढ्यात अखंड भारत सहभागी होता. वर्तमानाने इतिहास पुसता येत नसतो. सुदैव हे की संसद परिसरात 2003 साली हेमू कलानीच्या राम सुतार यांनी घडविलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, तेव्हा पंतप्रधानपदी होते अटलबिहारी वाजपेयी. त्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने संसद सचिवालयाने हेमू कलानीच्या जीवनाचा धावता आढावा घेणारी पुस्तिकादेखील प्रकाशित केली होती.
 

hemu kalani 
 
हेमू कलानीच्या बलिदानाची कहाणी पाहण्यापूर्वी एकूणच सिंध प्रांताचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान पाहणे औचित्याचे. के.आर. मलकानी यांनी आपल्या ’दि सिंध स्टोरी’ या पुस्तकात सिंधचा अगदी प्राचीन काळापासूनचा इतिहास कथन केला आहे. ब्रिटिशांनी 1843 साली सिंधवर ताबा मिळविला आणि त्यानंतर सिंध त्या वेळच्या बाँबे प्रेसिडेन्सीमध्ये सामील झाले. साहजिकच गुजराथी व्यापारी, मराठी आणि पारशी प्रशासक यांचा सिंधला जाण्याचा ओघ वाढला. ब्रिटिशांच्या विरोधातील लढ्यात सिंधमधून अनेक जण सहभागी झाले. त्याखेरीज अनेक संघटना-संस्थांनीदेखील या भागात आपला विस्तार केला. त्यात पंजाब आर्य समाजाचा समावेश होता, तद्वत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही होता. राजपाल पुरी यांनी सिंधमध्ये संघाची रुजवात केली आणि सरसंघचालक गोळवलकर गुरुजी दर वर्षी सिंधला भेट देत असत. साहजिकच सिंधमधील हिंदू समाजात मोठी जागृती झालीच, त्याचबरोबर तेथील स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नांनादेखील बळ मिळाले. वंगभंगाच्या विरोधात देशभर जो प्रतिकार झाला, त्याचे पडसाद सिंधमध्येदेखील उमटले. खुदिराम बोस या क्रांतिकारकाला त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी फाशी देण्यात आले, तेव्हा सिंधमधील अनेक देशभक्तांच्या घरात त्याची छायाचित्रे आढळू लागली. वीरुमल बेगराज यांनी सुक्कुरमध्ये स्वदेशी वस्तुभांडार सुरू केले. लोकमान्य टिळकांना मंडालेच्या कारावासाची शिक्षा झाली, तेव्हा सिंधमधील अनेक तरुण जमिनीवर झोपू लागले. शिक्षेचा निषेध आणि लोकमान्यांप्रती आत्यंतिक आदराची भावना यांतून ही कृती झाली होती. 1919 साली सिंधमध्ये प्रकाशित होणार्‍या एका वृत्तपत्राचे नाव ‘हिंदू’ असे होते. लोकमान्य टिळकांनी 1920 साली सिंधला भेट दिली होती. त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात लोकमान्य टिळकांचे देहावसान झाले, तत्पूर्वी काहीच महिने लोकमान्य सिंधला आले होते, हे येथे आवर्जून नमूद करावयास हवे. मलकानी यांनी अशी माहिती दिली आहे की ज्या बग्गीत लोकमान्य बसले होते, ती सिंधमधील तरुणांनी स्वत: ओढली. लोकमान्यांच्या देहावसानानंतर सिंधमधील अनेक पुढार्‍यांनी आपले मुंडन करून घेतले. टिळकांनंतर स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व गांधीजींकडे आले आणि त्यातही सिंध प्रांताने आपले पूर्ण सहकार्य आणि सहभाग नोंदविला. 1930चा सत्याग्रह सिंधमध्ये अत्यंत यशस्वी ठरला. हे सर्व नमूद करण्याचे कारण असे की फाळणीमुळे सिंध प्रांत पाकिस्तानात गेला, तरीही त्या प्रांताने स्वातंत्र्यलढ्यात अतिशय महत्त्वाचा आणि सक्रिय सहभाग दिला होता, हे विसरता येणार नाही. या वातावरणाचे अपत्य म्हणजे हेमू कलानीसारखे स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक. याचाच दुसरा अर्थ असाही आहे की सिंध आता पाकिस्तानात आहे, म्हणून सिंधमधील क्रांतिकारकांच्या, स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती पाकिस्तानने पुसून टाकता कामा नये.
 
 
 
हेमू कलानीचा जन्म सिंध प्रांतातील सुक्कुर येथे झाला. त्याचे वडील डॉक्टर होते. सुक्कुर येथेच हेमू कलानीचे शिक्षण झाले आणि तेही टिळक प्रशालेतून! राष्ट्रभक्ती हेमूच्या धमन्यांतून लहानपणापासूनच वाहत होती आणि त्याला जोड मिळाली ती त्याला आपल्या काकांकडून मिळालेल्या प्रेरणेची. हेमू कलानीचे चुलते डॉ. मंघाराम कलानी हे काँग्रेसचे सुक्कुरमधील नेते होते. येथे प्रेम तनवानी यांनी लिहिलेल्या आणि दीपक रामचंदानी यांनी भाषांतर केलेल्या ’भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सिंधचे योगदान’ या पुस्तिकेचा उल्लेख करावयास हवा. याचे कारण या सगळ्या लढ्यात सिंधचा किती मोठा सहभाग होता, यावर त्या पुस्तिकेत दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. याच पुस्तिकेत डॉ. कलानी यांच्या त्यागाची माहिती लेखकाने दिली आहे. ती यासाठी महत्त्वाची की ते हेमू कलानीचे प्रेरणास्रोत होते.
 
 

hemu kalani
 
डॉ. कलानी हे शासकीय सेवेत होते, मात्र स्वदेशी चळवळीत उतरण्यासाठी त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आपले स्वत:चे रुग्णालय सुरू केले. अर्थात त्यामागील उद्देश होता तो सामान्य लोकांची सेवा करण्याचा आणि त्याबरोबरच स्वातंत्र्यासाठी झटण्याचा. त्यांनी ’स्वराज सेना’ची स्थापना केली होती ती राष्ट्रभक्तीची भावना नागरिकांमध्ये वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने. आपल्या रुग्णालयात रोज सायंकाळी ते तरुण स्वातंत्र्यसैनिकांच्या बैठकी घेत असत. हेमू कलानी याने प्रभावित झाला आणि तोही या ‘स्वराज सेने’त सक्रिय झाला. स्वदेशीच्या चळवळीतदेखील हेमू कलानीचा पुढाकार होता. 1942 साली गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा दिला. त्या भारलेल्या वातावरणात हेमू कलानीनेदेखील आपल्या समिधा त्या स्वातंत्र्ययज्ञात अर्पण करण्याचा निर्धार केला. एका रेल्वे गाडीतून ब्रिटिश सैनिक आणि दारूगोळा सिंधमध्ये येणार आहे आणि ती रेल्वेगाडी आपल्याच गावातून जाणार आहे, ही माहिती हेमू कलानीला समजली. तेव्हा त्यातून दारूगोळ्याची लूट करावी हे उद्दिष्ट ठेवून हेमू कलानी आणि त्याच्या काही सहकार्‍यांनी गाडी रुळांवरून उतरेल यासाठी रुळांचे फिशप्लेट काढण्याचा ’कट’ रचला. अर्थात त्यासाठी आवश्यक हत्यारे त्यांच्यापाशी नव्हती आणि त्यामुळे ठोकाठोक करून ते आपले इप्सित साध्य करीत होते. असे म्हणतात की त्या रेल्वे रुळांजवळच एक बिस्कीट कारखाना होता आणि त्या कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाला ठोकाठोक ऐकू आली. त्याने त्या घडामोडी पोलिसांच्या कानी घातल्या आणि अखेरीस ब्रिटिश सैनिकांनी हेमू कलानीला अटक केली. सहकारी तेथून निसटून जाण्यात यशस्वी ठरले. हेमू कलानीने मात्र निसटण्याचा प्रयत्नही केला नाही.
 
 
 
त्याच सुमारास सिंधमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. साहजिकच सिंधच्या हैदराबाद येथील लष्करी न्यायालयात हेमू कलानीचा खटला चालविला गेला आणि न्यायालयाने हेमू कलानीला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तुरुंगात हेमू कलानीचा छळ करण्यात आला आणि आपल्या सहकार्‍यांची नावे उघड करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तथापि हेमू कलानीने त्यास स्पष्ट नकार दिला. शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी हैदराबाद मुख्यालयातील मुख्य अधिकारी कर्नल रिचर्डसनकडे निकाल पाठविण्यात आला. रिचर्डसनला क्रांतिकारकांबद्दल कमालीचा आकस होताच, त्यातच हेमू कलानीसारख्या एका विशीतल्या तरुणाने ब्रिटिश साम्राज्याला आव्हान द्यावे, हे त्याच्या पचनी पडले नाही आणि रिचर्डसनने जन्मठेपेची शिक्षा बदलून ती फाशीच्या शिक्षेत बदलली. यावर सर्वत्र गदारोळ उठणे स्वाभाविक होते. मात्र फाशीच्या शिक्षेतून सुटका करायची, तर माफीचा साक्षीदार व्हावे लागेल आणि या कटात सहभागी असणार्‍या आपल्या सहकार्‍यांची नावे उघड करावी लागतील, अशा अटी टाकण्यात आल्या. ऐन तारुण्यात असूनही हेमू कलानीने त्या अटी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. हेमू कलानीचा हा निर्धार आणि मनोनिग्रह त्याच्या बलिदानाइतकाच गौरवास्पद. 21 जानेवारी 1943 रोजी या तरुण क्रांतिकारकाला फाशी देण्यात आली. चेहर्‍यावर समाधानाचे हास्य आणि ओठांत ‘भारत माता की जय’च्या घोषणा यासह हेमू कलानी फासावर चढला.
 
 
 
1945 साली जवाहरलाल नेहरू सिंधच्या दौर्‍यावर असताना त्यांनी कलानी कुटुंबीयांची भेट घेतली, तर नेताजी बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या प्रतिनिधींनी हेमू कलानीच्या या सर्वोच्च बलिदानाबद्दल कृतज्ञता म्हणून त्याच्या कुटुंबीयांना सुवर्णपदक बहाल केले. 1983 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना हेमू कलानीच्या स्मरणार्थ डाक तिकीट जारी करण्यात आले आणि 2003 साली वाजपेयी पंतप्रधान असताना संसद परिसरात हेमू कलानीचा पुतळा उभारण्यात आला. सिंध प्रांत आता पाकिस्तानात असला, तरीही फाळणीपूर्वी सिंध भारतातच होता. किंबहुना कराची, सुक्कुर, हैदराबाद (सिंध) येथे स्वातंत्र्यलढ्याची आंदोलने आणि चळवळी जोरातच होत्या. तत्कालीन बाँबे प्रेसिडेन्सीचाच हा एक भाग होता, हेही याचे एक कारण असू शकते. तेव्हा हा इतिहास बदलता येणार नाही, याची जाणीव पाकिस्ताननेही ठेवावयास हवी. अलीकडेच पाकिस्तानच्या ’डॉन’ (Dawn) या वृत्तपत्रात कराचीस्थित पत्रकार रियाझ सोहेल यांचा एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. आपल्या लेखात त्यांनी म्हटले आहे की ‘हेमू कलानी यांना 1943 साली फ़ाशी देण्यात आल्यानंतर सिंधभर निदर्शने करण्यात आली होती, काळे झेंडे दाखविण्यात आले होते. सुक्कुरनजीकच्या साधो बेलो येथे हेमू कलानीचे रेखाचित्र लावण्यात आले होते’; मात्र हा लेखक अशी व्यथा व्यक्त करतो की ‘हेमू कलानीचे नाव भारतात सुपरिचित असले, तरी पाकिस्तानात ते अभावानेच ठाऊक आहे. ज्या सिंध प्रांतात त्याचा जन्म झाला आणि ज्यासाठी त्याने सर्वोच्च बलिदान दिले, त्याच प्रांतात हेमू कलानीचे विस्मरण झाले आहे.’ हा पत्रकार असेही म्हणतो की ‘पाकिस्तानात इतिहास शिकविला जातो, मात्र त्यात हेमू कलानीचे योगदान समाविष्ट नसते. या वगळण्याच्या संस्कृतीने (की विकृतीने?) इतिहास खोडून टाकण्याचा उद्देशच दृग्गोचर होतो.’ याचे एक समर्पक उदाहरण या पत्रकाराने दिले आहे आणि ते म्हणजे अलीकडेच सुक्कुरमधील हेमू कलानी उद्यानाचे नामांतर ’मोहम्मद बिन कासिम उद्यान’ असे करण्यात आले. वास्तविक कासिम हा सिंधवर चालून आलेला अरब आक्रमक होता. उद्यानाला आपल्या हुतात्म्याचे दिलेले नाव बदलून आक्रमकाचे नाव द्यायचे, हा वावदूकपणा झाला. हेमू कलानीच्या बलिदानाची भारताने आठवण ठेवली आहे. त्याचे विस्मरण झालेल्या पाकिस्तानला आपली चूक दुरुस्त करण्याची इच्छाशक्ती दाखविण्यासाठी हेमू कलानीच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधता येईल!

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार