रामाचे सत्त्व आणि तत्त्व जोपासणारे भोसला सैनिकी प्रशिक्षण शिबिर

विवेक मराठी    13-Apr-2023
Total Views |
@हेमंत देशपांडे
 
महाराष्ट्रातून आणि आसपासच्या राज्यांबरोबर देशातील विविध भागांतून विद्यार्थी-विद्यार्थिनी येथील प्रशिक्षण शिबिरासाठी येत असतात. देशभक्ती मनात आहे, सैन्यात जायचे आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून पहिले पाऊल म्हणून शिबिराची वाट धरणारे अनेक जण आहेत. या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे ‘विविधता मे एकता’!

vivek
 
‘भोसला’ हे नाव आता तसे देशभरात सगळीकडेच परिचित आहे. सुट्टीच्या दिवसात हिवाळी आणि उन्हाळी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर असो, सैनिकी प्रशिक्षणाचा भाग असो, अनेक पावले या रामभूमीच्या परिसराकडे वळतात. उन्हाळ्यात होणारे शिबिर हे महिनाभरासाठी 15 ते 21 वयोगटातील फक्त मुलांसाठी, तर हिवाळ्यात होणारे शिबिर 12 ते 14 वयोगटातील मुलांमुलींसाठी.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
 
 
धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, समाजसुधारक व निष्णात नेत्रविशारद, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान द्रष्टे नेते. वयाच्या 64व्या वर्षी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून दि. 15 जून 1937 रोजी भोसला मिलिटरी स्कूलचा पाया रोवला. यासाठी कराचीपासून देशभर प्रवास करून मदत मिळवली व अत्यंत दूरदृष्टीने विशाल माळरानावर एक भव्य स्वप्न साकार केले. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी स्थापना केली. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे आराध्य दैवत कोदंडधारी राम आहे! पावित्र्य, तेज, शौर्य, चारित्र्य, पराक्रम यांचा मूर्तिमंत आविष्कार मर्यादापुरुषोत्तम श्रीराम! धर्मवीर डॉ. मुंजे यांनी स्थापन केलेल्या भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात कोदंडधारी रामाचे सुंदर मंदिर आहे. नेमबाजी शिकविताना बंदुकीच्या ज्या गोळ्या - काडतूस उडविल्या जातात, त्या काडतुसांच्या उरलेल्या धातूतून ही अप्रतिम मूर्ती घडविलेली आहे. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आपल्या विद्यार्थ्यांना ‘रामदंडी’ ह्या नावाने संबोधते.
 
 
vivek
आभासी जगातून वास्तव जगात घेऊन जाणारी भोसलाची शिबिरे
 
 
कधीतरी मनात पोहण्याची भीती बसलेली असते, आपण घोडेस्वारी नीट करू शकू ना? बंदूक, शस्त्र नेमके चालवायचे कसे? डोंगराच्या कड्याकपारीवरून उतरताना भीती घालवत आनंद कसा मिळवायचा? यापासून योग, गटश: चर्चा याच्या साहाय्याने या सर्वांमध्ये नेतृत्वगुण सहजगत्या तयार होत जातात. गेल्या काही वर्षांत शाळांचे मैदान हरवले आहे, पालकांचे आयुष्य धावपळीचे झाले आहे अशी स्थिती आहे, तर दुसर्‍या बाजूला डिजिटल युगात वाढणारी मुले सोशल मीडियाच्या साहाय्याने एका वेगळ्या आभासी जगात वावरत असतात. आभासी जगातून वास्तव जगात घेऊन जाणारी भोसलाची ही शिबिरे काळाच्या पटलावर आजही तितकीच यशस्वी ठरलेली आहेत.
 
 
उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची परंपरा
 
 
गेल्या 87 वर्षांपासून भोसलामध्ये उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची परंपरा राहिली आहे. उन्हाळ्यात होणारे शिबिर हे महिनाभरासाठी 15 ते 21 वयोगटातील फक्त युवकांसाठी, तर हिवाळ्यात होणारे शिबिर 12 ते 14 वयोगटातील मुलांमुलींसाठी. उन्हाळ्यातील शिबिराची 84 वर्षांची परंपरा आहे आणि हिवाळ्यातील शिबिराची परंपरा 48 वर्षांची आहे. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये भोसला उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात पाठविल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा संपूर्ण दृष्टीकोन बदलल्याचे लक्षात येते आहे. आत्मविश्वास, धैर्य, सर्जनशील विचारप्रणाली आणि नेतृत्वगुण विकसित करत असताना जबाबदार नागरिक होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी जीवनाचा मार्ग म्हणून शिस्त म्हणून स्वीकारावा यासाठी सैनिकी प्रशिक्षण दिले जाते.
 
 
vivek
पूर्वतयारी म्हणून पहिले पाऊल
 
 
ड्रिल, योग, पी.टी., शस्त्रास्त्र प्रशिक्षण, फायरिंग, स्विमिंग, रायडिंग, स्वसंरक्षण, आपत्तिव्यवस्थापन अशा अनेक विषयांचे प्रशिक्षण या कालावधीत देण्यात येते. शारीरिक क्षमता आणि समन्वय यांच्या साह्याने शारीरिक व मानसिक जीवनशैलीला एक शिस्तबद्ध आकार देण्याचा प्रयत्न या कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. दिवसेंदिवस या शिबिराची कीर्ती देशात आणि देशाबाहेर पोहोचत आहे.
 
 
 
महाराष्ट्रातून आणि आसपासच्या राज्यांबरोबर देशातील विविध भागांतून विद्यार्थी-विद्यार्थिनी येथील प्रशिक्षण शिबिरासाठी येत असतात. देशभक्ती मनात आहे, सैन्यात जायचे आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून पहिले पाऊल म्हणून शिबिराची वाट धरणारे अनेक जण आहेत. या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे ‘विविधता मे एकता’! गोवा, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तराखंड, केरळ, दीव दमण, दिल्ली, दादरा-नगरहवेली आणि महाराष्ट्र या राज्यांतून या शिबिरासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. राष्ट्रीय एकात्मता आणि नेतृत्वगुण यांचे प्रशिक्षण ही या शिबिराची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
 
 
 
शारीरिक आणि मानसिक विकास
 
 
अशा प्रशिक्षणातून स्वयंनियंत्रण, वेळेचे व्यवस्थापन, बदलाला सामोरे जाणे याबरोबर शारीरिक आणि मानसिक विकास होत असतो. स्वयंशिस्त निर्माण करीत असताना पुरेशा तापमानात लोखंड तापले तर त्यात अधिक चांगले गुणधर्म तयार होतात, त्याचप्रमाणे कठोर परिश्रम, काटेकोर प्रशिक्षण आणि सवयी याआधारे विकास होतो. येथील प्रशिक्षणाचा लाभ घेतला की त्याला ‘रामदंडी’ असे संबोधले जाते. आयुष्यभरासाठी ही आणखी एक ओळख निर्माण होते. यशस्वी होण्यासाठी ध्येय, दृढनिश्चय आणि पाठपुरावा या तीन गोष्टी आवश्यक असतात आणि भोसला उन्हाळी सैनिकी प्रशिक्षण शिबिरामुळे या सर्व गोष्टी शक्य होतात.
 
 
vivek
नवीन चांगल्या सवयी
 
 
रामदंडीच्या अनेक पिढ्या आता तयार झाल्या आहेत. आजी, पणजोबा, आई, वडील, मावशी, काका अशा शिबिरात सहभागी झाले, म्हणून या शिबिरात सहभागी होणारे अनेक जण आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन अनेक जण सैन्यात अधिकारीसुद्धा झाले आहेत. प्रत्येक जण सैन्यात जाईलच असे नाही. पोलीस, प्रशासकीय, खेळ अशा विविध सेवांमध्ये रामदंडींचा सहभाग उल्लेखनीय आहे. रामभूमी परिसरात घालवलेले पंधरा दिवस किंवा महिना हा आयुष्यभराचा ठेवा असतो. विद्यार्थी अनेक गोष्टींमध्ये आपल्या क्षमता ओळखायला लागतात. वेगवेगळ्या भाषा असणारे, राज्यात वावरणारे विद्यार्थी सहजपणे एकत्र राहतात. घट्ट मैत्री होते. विद्यार्थी या पंधरा दिवसांत अनेक नवीन चांगल्या सवयी आत्मसात करतो, हे या शिबिराचे वैशिष्ट्य आहे.
 
 
मुलींसाठी शिबिर
 
1938-39 सालापासून 15 ते 25 वयोगटातील मुलामुलींचे एकत्रित शिबिर व्हायचे. 1953-54 साली मध्य प्रदेशचे माजी राज्यपाल नामदार पक्वसांच्या उत्तेजनाने मुलींसाठी खास हिवाळी शिबिर सुरू झाले. सुरुवातीला शिबिरात 18 मुली होत्या व मुलींना एकटे पाठवणे योग्य नाही, या विचाराने कुणाची आई, आजी, बहीण, सासू अशी 17 पालक मंडळीही ह्या शिबिरात सहभागी झाली. आता ह्या शिबिराला 350हून अधिक मुली असतात. आतापर्यंत देशभरातील हजारो विद्यार्थिनींनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. सशस्त्र दलातील महिलांच्या सहभागाबाबत डॉ. मुंजे सुरुवातीपासून आग्रही होते. त्या काळात मुलींसाठी सैनिकी विद्यालय सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे भोसलाच्या उन्हाळी सैनिकी प्रशिक्षण शिबिरात मुलींचा पहिल्यापासून सहभाग होता.

प्रतिक्रिया
 
डॉ. सुवर्णाताई रावळ
राष्ट्रनिर्माण करण्यासाठी, मानव समूहाचे कल्याण करण्यासाठी संस्कार, निष्ठा आणि शिस्त यांच्या साहाय्याने प्रामाणिकपणा निर्माण करण्याची गरज आहे. आजच्या कालावधीत असलेल्या आव्हानासाठी प्रत्युत्तर देणारे प्रशिक्षण आहे. शरीर, मन आणि आत्मा या स्तरांवर आपण सक्षम असले पाहिजे. मी, माझे कुटुंब यापलीकडे असलेल्या समाजाचे उत्तरदायित्व माझे असून हा समाज भारत देशाचा अभिन्न भाग असून आपण आपला अखंड भारत नक्की समजून घ्यावा. येणार्‍या काळात आव्हाने लक्षात घेता जगातील अनेक प्रश्नांची उत्तरे भारताच्या संस्कृती आणि सामाजिक जीवनात दडलेली असून ते आपण सर्वांनी मिळून जपण्याची गरज आहे.
 ----------------------------------------------------------------------------------------------------------
नीलिमाताई पवार
 
कुटुंबाच्या सुरक्षित चौकटीतून बाहेर पडून पंधरा दिवसांसाठी स्वत:च्या खिडकीबाहेरच्या मोकळ्या अवकाशाचे दर्शन घ्यावे यासाठी मुलींचे पालक विशेष प्रयत्न करतात. नीलिमाताई पवार स्वत:चा उल्लेख रामदंडी करत याच शिबिरात त्यांनी प्रथमत: घोडेस्वारी शिकल्याचे सांगतात. मुलींना श्रम, शिस्त, स्वावलंबन आणि योग्य मूल्यांच्या आधाराने स्वतंत्रपणे वाढू देण्यासाठी या शिबिराची आवश्यकता आहे. स्वत:ची कामे स्वत: करण्याची सवय याच वयात लागायला हवी. स्वत:चा विकास साधण्यासाठी जिद्द, कठोर परिश्रम याची तयारी असायला हवी. हल्ली पालक एका मर्यादेपलीकडे मुलांना काळजी घेत संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सामाजिक जीवनात मुली विकसित होत नाहीत. सूर्य हा आपला आयुष्यभराचा मित्र आहे. उन्हामुळे त्रास सहन करण्याची सवय हवी. मुलींच्या अंगी शारीरिक कणखरपणा नक्की असायला हवा.
 
--------------------------------- --------------------------------------------------------
 
कर्नल हर्षकुमार श्रीधर
 
 
दिवसभराचे पहाटेपासून ठरलेले वेळापत्रक अगदी रात्री दहा वाजेपर्यंत, महिनाभराचा सराव यादरम्यान युवक नेतृत्व शारीरिक क्षमता आणि समन्वय यांच्या साह्याने विद्यार्थी महिनाभरात शारीरिक व मानसिक जीवनशैलीला एक शिस्तबद्ध आकार देण्याच्या प्रयत्नात सहभागी झाले, यासाठी त्यांचे अभिनंदन.
 ------------------------------------------------------------------------------
 
डॉ. दिलीप बेलगावकर
 
सरकार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी
 
 
भोसलाने नेहमीच समाजात सुरक्षा विषयात मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. देशभक्तीने भारावलेले वातावरण ही येथील उपक्रमांची उपलब्धी आहे. सतत प्रवाही असणारे सैनिकी प्रशिक्षणातील दैनंदिन आयुष्य यामुळे येथील विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची शिस्त इथे आकाराला येत राहते.