चंद्रशेखर भडसावळे 9822282623
प्रदूषित पाणीसाठ्यांवर फारच झपाट्याने वाढते. त्यामुळे त्या वनस्पतीचा घट्ट गालिचा प्रदूषित पाणी शुद्ध करण्याचे काम करत असल्याचे समज होतो. प्रत्यक्षात मात्र या वनस्पतीमुळे तेथील पाण्याचे प्रदूषण व विषारी घटकांचे प्रमाण वाढवण्याचे काम होत असते. जलपर्णीचे व्यवस्थापन करण्यासाठी जलपर्णी या वनस्पतीची Physiology (शरीरक्रियाविज्ञान) समजून घेणे अत्यावश्यक आहे. समग्रदृष्टीकोनातून याचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.
फेब्रुवारी-मार्च पासून आसपासच्या नद्या-धरणे-तलावाच्या कडाकोपर्यातून तुकतुकीत तरंगते हिरवे गच्च जाजम दिसू लागते. एप्रिलच्या सुरुवातीला ही वनस्पती आक्रमकपणे वाढत पाण्याचा पृष्ठभाग झाकून जाड गालिचासारखी दिसू लागते. ही वनस्पती म्हणजे जलपर्णी होय. लांब देठ, जाड पाने व उंच पुष्पदंडावर जांभळ्या रंगाची फुले अशी या वनस्पतीची ठेवण असते. इंग्लिशमध्ये या वनस्पतीला To manage "Water Hyacinth' असे म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव Eichhornia crassipes असे आहे. जलपर्णीची आणखी एक प्रजात म्हणजेच जलकुंभी (Water Lettuce) होय. तिचे शास्त्रीय नाव Pistia stratiotes असे आहे. गोड्या पाण्यामध्ये प्रचंड वेगाने वाढण्याची, जिवंत राहण्याची दुर्दम्य क्षमता आणि स्वत:चे साम्राज्य पसरवण्याची सहजता हे या परदेशी वनस्पतीचे दुर्धर गुणधर्म आहेत. या दोन्ही वनस्पतींनी आपल्या देशातील जलसाठ्यांवर घाला घातल्याचे चित्र आज सर्वदूर पाहायला मिळते.
विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला जॉर्ज मॉर्गन नावाच्या ब्रिटिश अधिकार्याने ह्या तणाच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन दक्षिण अमेरिकेतल्या अॅमेझॉनमधून ते प्रथम पश्चिम बंगालमध्ये आणले. बोल बोल म्हणता जलपर्णी तेथील जलसाठ्यांमध्ये दिसू लागली आणि तिच्या वाढीच्या प्रतापामुळे लवकरच अडचणी जाणवू लागल्या. अडचणींच्या यादीमध्ये शेती (अमन भात व ज्यूट) उत्पादनामधील व मासेमारीमधील घट, जलमार्ग खंडित होणे, पुलामध्ये अडकून त्यांचे नुकसान होणे, सरोवरे गुदमरवणे हे व असे नुकसान दिसू लागले. 1914 साली तेथील राज्यकर्ते व सामाजिक संस्था एकत्र येऊन जलपर्णी हे आक्रमण आहे व ते तातडीने थोपवण्यासाठी कार्यक्रम राबवला गेला. त्यासाठी इंग्लंडमधून तज्ज्ञ पाचारण केले गेले. या वनस्पतीने निर्माण केलेल्या अडचणी पाहता त्या वेळच्या बंगालमध्ये बंगाल वॉटरवेज अॅक्ट, बंगाल मुन्सिपल अॅक्ट, बंगाल सेल्फ गव्हर्मेंट अॅक्ट व बंगाल व्हिलेज सेल्फ गव्हर्नमेंट अॅक्ट असे विविध कायदे केले गेले. खरे तर 1936चा वॉटर हायसिंथ अॅक्ट करून जलपर्णी घरामध्ये, स्वत:च्या तळ्यामध्ये, कोणत्याही स्थानिक जलाशयामध्ये सांभाळणे किंवा होऊ देणे हे कायद्याने गुन्हा ठरवण्यात आले होते. तरीसुद्धा या वनस्पतीचे तेथील अस्तित्व पाहता आता या जलपर्णीला बंगालमध्ये ‘टेरर ऑफ बंगाल’ का म्हणतात, हे लक्षात येते.
जलपर्णीची उपद्रवमूल्ये
जलपर्णी प्रदूषित पाणीसाठ्यांवर फारच झपाट्याने वाढते. त्यामुळे त्या वनस्पतीचा घट्ट गालिचा प्रदूषित पाणी शुद्ध करण्याचे काम करत असल्याचा समज होतो. प्रत्यक्षात मात्र या वनस्पतीमुळे तेथील पाण्याचे प्रदूषण व विषारी घटकांचे प्रमाण वाढवण्याचे काम होत असते. पर्यायाने तो जलस्रोत मृत करणे हे घडताना दिसते.
जलपर्णीचा पाण्यावर घट्ट व जाड गालिचा तयार होऊन तो सूर्यप्रकाशास पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यापासून रोखतो. त्यामुळे त्या पाण्यामधील नैसर्गिक वनसंपत्ती र्हास पावतात. तसेच त्या पाण्यामध्ये प्राणवायू विरघळणे थांबून मासे व इतर जलचर यांची वाढ थांबते व कधीकधी तेथील मासे अचानक मोठ्या प्रमाणात मरणे संभवते. जलपर्णीमुळे स्थानिकांचा रोजगार असलेली मासेमारी व मत्स्यशेती संपुष्टात येते.
जलपर्णी दुसर्या वनस्पतींना वा अन्य जिवांना वाढू देत नाही. त्यामुळे तेथील जीवविविधतेसाठी कायमस्वरूपी फार मोठा धोका निर्माण होतो.
जलपर्णीच्या प्रचंड पर्णपृष्ठ भागामुळे बाष्पोत्सर्जनामुळे पाणी साठ्यामध्ये झपाट्याने घट होते.
जलपर्णीयुक्त जलसाठे डेंग्यूच्या व मलेरियाच्या डासांच्या प्रजननासाठी योग्य ब्रीडिंग ग्राउंड ठरतात.
जलपर्णीमुळे पाण्याचे प्रवाह रोखून धरून पूरपरिस्थितीला मदत करतात.
जलपर्णीमुळे जलस्रोतांचा वापर पर्यटनास हानिकारक ठरतो.
जलपर्णीमुळे जलस्रोतांच्या देखभालीचे व दुरुस्तीचे काम जिकिरीचे होते.
जलपर्णीच्या दाट जाळ्यात फसून, रुतून, गुदमरून अडकून प्राणी व मनुष्य जीवितहानी होताना आढळते.
सगुणा जलसंवर्धन तंत्राचा उगम व विस्तृत अनुभव
2017मध्ये सगुणा बागेतील 9 तलावांपैकी एका तलावात जलपर्णी प्रचंड वाढली होती. जाळ्याच्या साहाय्याने किंवा हाताने काढून तिची वाढ आम्ही थांबवू शकत नव्हतो. त्याच तळ्यात मौल्यवान कमळाची लागवड व मत्स्यशेतीसुद्धा होती, ज्याला धोका निर्माण झाला होता. प्रयोगासाठी आम्ही कमळाची सर्व पाने कापून टाकून तेथे जलपर्णीवर जगात इतरत्र जलस्रोतावर वापरलेले ग्लायफोसेट हे आंतरप्रवाही तणनाशक वापरले. यामुळे जलपर्णी समूळ नष्ट होऊन एक महिन्याच्या आत तेथे मोठ्या प्रमाणावर कमळे, मासे, पाणवठ्यावरचे पक्षी व मधमाश्या यामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले.
आम्ही प्रसारमाध्यमातून ही माहिती प्रसिद्ध केली व त्याला जगभरातून चांगली वाहवा मिळाली. 2019मध्ये संभाजीनगर येथील डॉ. सलीम अली सरोवर (40 एकर) या ऐतिहासिक सरोवरातील जलपर्णी नष्ट करण्यासाठी त्या महापालिकेने आम्हाला आमंत्रित केले. मे 2019मध्ये आम्ही हे काम पूर्ण केलेले असून आजतागायत ते सरोवर जलपर्णीमुक्त आहे. 2020 साली कर्जत तालुक्यातील उकरूळचे गावतळे असेच यशस्वीपणे जलपर्णीमुक्त केले आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीच्या 30 कि.मी.मधील जलपर्णी यशस्वीपणे नष्ट करण्याचे काम आमच्या टीमने ‘उल्हास जलपर्णीमुक्त अभियाना’अंतर्गत (
https://youtu.be/k3GOZTGlc-I) एप्रिल-मे-जून 2021-22मध्ये केले आहे.
अशा प्रकारे हा प्रयोग अत्यंत यशस्वी होताना आढळला आहे. काम चालू असताना वेळोवेळी तेथील पाण्याचे नमुने ग्लायफोसेटच्या शिल्लक अवशेषासाठी अत्यंत नामांकित प्रयोगशाळेत तपासण्यात आले असता त्याचे शिल्लक अवशेष आढळले नाहीत.
उल्हास नदीच्या पावशेपाडाच्या बॅकवॉटरमध्ये असाच एक लहान प्रयोग घेतला. पाण्याचे नमुने फवारणीपश्चात 1 तासाने व 5 दिवसांपर्यंत रोज दोन नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासले असता ग्लायफोसेटचे अंश आढळले नाहीत.
जलपर्णीचे व्यवस्थापन
जलपर्णीचे व्यवस्थापन करण्यासाठी जलपर्णी या वनस्पतीची Physiology (शरीरक्रियाशास्त्र) समजून घेणे अत्यावश्यक आहे. समग्र द़ृष्टीकोनातून याचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात दोन आठवड्यांत दुप्पट इतका सदर वनस्पतीचा पाण्यात फोफावण्याचा वेग महाप्रचंड असतो व हा वेग प्रतिवर्षी वाढत जातो. प्रत्येक मातृरोप 9-12 सूक्ष्म पिल्लांना (Daughter plants) जन्म देते, त्याला धक्का लावताच किंवा पाण्याच्या लाटांमुळेसुद्धा ती पिल्ले पाण्यामध्ये सोडून देते. त्यामुळे यांत्रिक पद्धतीने जलपर्णी काढण्याच्या प्रयत्नांना अपयश येत आहे. त्यामुळेच जलपर्णीचे समूळ उच्चटन करण्यासाठी अचूक व प्रमाणबद्ध रसायनांचा वापर करणे अनिवार्य ठरते. 2017पासून आमच्या टीमने मिळवलेल्या अनुभवावरून, तसेच नामांकित प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासून मिळालेल्या माहितीवरून आम्ही हे ठामपणे हे सांगू शकतो की SJT तंत्रामध्ये वापरलेल्या रसायनांचे प्रोटोकॉल शास्त्रशुद्ध व प्राणिमात्रांना हानी न पोहोचवणारे आहे. SJT तंत्र अशी हमी देते की जलाशयामध्ये या तंत्रामुळे एकही मासा, बेडूक, कासव किंवा इतर जलचर दगावणार नाहीत. तसेच हे पाणी लगेच शेतीसाठी किंवा पिण्यासाठी वापरले, तरी हानिकारक नाही.
थोडक्यात पण महत्त्वाचे
जलपर्णीविषयी संपूर्ण समाजाचे प्रबोधन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कोरोना हटवण्यासाठी जसे चिवट प्रयत्न केले, तशीच सातत्याने पुढील 5 वर्षे ही मोहीम राबवली, तरच महाराष्ट्र जलपर्णीमुक्त होऊ शकेल.
सर्वसमावेशक प्रयत्नांची शिकस्त करणे व त्यासाठी सर्व स्तरांवरून सहकार्य मिळवणे अत्यावश्यक आहे.
नैसर्गिक जलाशय सुदृढ राहण्यासाठी त्या पाण्यामध्ये सूर्यप्रकाश खोलवर पोहोचणे व हवेचा पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श होऊन त्यामध्ये प्राणवायू विरघळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जलाशयामध्ये वाहून येणारे प्रदूषण (मानवी व प्राणिज) याचे सूर्यप्रकाशाच्या मदतीने एकपेशीय शैवालामध्ये रूपांतर होणे व ते शैवाल, मासे व जलचरांमध्ये रूपांतरित करणे या नैसर्गिक-वैज्ञानिक तत्त्वाचे अस्तित्व प्रस्थापित करणे हाच शाश्वत मार्ग आहे.
गावाचे/शहरांचे प्रदूषित पाणी जलपर्णीने शुद्ध केल्यासारखे भासते, पण प्रत्यक्षात पाणीसाठा रोगट होतो. डासांच्या झुंडीच्या झुंडी तयार होतात.
@लेखक सगुणा बाग कृषी पर्यटन केंद्राचे संस्थापक आहेत.