सनातन धर्माचा दीपस्तंभ दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठ, शृंगेरी

विवेक मराठी    25-Apr-2023
Total Views |
@स्नेहा नगरकर
शृंगेरी हे तीर्थक्षेत्र आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या पहिल्या ‘आम्नाय’ म्हणजेच वैदिक पीठाकरिता सुविख्यात आहे. शृंगेरी कर्नाटक राज्याच्या चिकमंगळूर जिल्ह्यात गर्द वृक्षराजीने आणि उत्तुंग पर्वतांनी वेढलेले, तुंगा नदीच्या तिरावर वसलेले जगप्रसिद्ध असे सनातन हिंदू धर्माचे एक प्रमुख आणि साक्षात आद्य शंकराचार्य आणि शृंगेरी पीठाचे पीठाधीश यांच्या पावन सान्निध्याने पुनित झालेले असे केंद्र आहे. आद्य शंकराचार्य आणि श्री रामानुजाचार्य या दोन्ही महापुरुषांची जयंती वैशाख शुक्ल पंचमी या दिवशी जगभर साजरी केली जाते आणि या वर्षी ही जयंती 25 एप्रिलला साजरी केली जाणार आहे. याचेच औचित्य साधून प्रस्तुत लेखात आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदापीठाच्या इतिहासाचा संक्षिप्त रूपात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 
adi shankaracharya
 
 
शृंगेरीचे मूळ नाव शृंगगिरी असे होते. आद्य शंकराचार्य त्यांच्या एका विजययात्रेदरम्यान येथे आले आणि त्यांनी येथे एक अत्यंत अद्भुत असे दृश्य बघितले. एक साप आपल्या फण्याने एका बेडकाचे उन्हापासून रक्षण करत होता. शृंगगिरीचे माहात्म्य आचार्यांच्या लगेच लक्षात आले आणि ते असे की या पावन भूमीत नैसर्गिक शत्रूंमध्येदेखील मित्रत्वाची भावना आणि सलोखा होते. त्यांनी शृंगेरीला पहिला आम्नाय मठ स्थापन करण्याचे तेव्हाच निश्चित केले.
 
 
सनातन वैदिक हिंदू धर्माच्या आणि अद्वैत वेदान्त दर्शनाच्या प्रचार आणि प्रसाराकरिता आद्य शंकराचार्य आजीवन झटले. आपले हे कार्य भविष्यातदेखील अविरत चालू राहण्यासाठी त्यांनी भारतवर्षात चार दिशांमध्ये आम्नाय मठ किंवा पीठे उभारली. हिंदू संन्याशांच्या समुदायाला दशनामी संप्रदायांमध्ये संघटित केले आणि संन्यासधर्माचे नियोजनदेखील केले. आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केलेले चार मठ म्हणजे द्वारका येथील कालिका मठ (पश्चिम), बदरीकाश्रम येथे ज्योतिर् मठ (उत्तर), पुरी येथे गोवर्धन मठ (पूर्व) आणि शृंगेरी येथे शारदा मठ (दक्षिण). या चारही मठांमध्ये शृंगेरी शारदापीठ हे अग्रगण्य मानले जाते. यातील प्रत्येक मठाशी निगडित अशा देवता, तीर्थ, वेद, आचार्य, संप्रदाय, महावाक्य आणि बिरुदे आहेत. आद्य शंकराचार्यांनी आपल्या चार वरिष्ठ शिष्यांना या चार पीठांचे पीठाधीश्वर म्हणून नेमले -
 
 
1. द्वारका - श्री पद्मपादाचार्य
 
2. बदरी - श्री तोटकाचार्य
 
3. पुरी - श्री हस्तामलकाचार्य
 
4. शृंगेरी - श्री सुरेश्वराचार्य
 
 
adi shankaracharya
 श्री शारदा पीठ, शृंगेरी

शृंगेरी पीठाचे दुसरे आचार्य म्हणजे श्री सुरेश्वराचार्य. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव मंडन मिश्र असे होते आणि ते आस्तिक दर्शन परंपरेतील पूर्वमीमांसा दर्शनाचे प्रकांडपंडित होते. पूर्वमीमांसा दर्शनाचे अध्वर्यू कुमारील भट्ट यांच्या सांगण्यावरून आद्य शंकराचार्य महिष्मती नगर येथे मंडन मिश्र यांच्याशी तात्त्विक खंडनमंडन करण्यास गेले. मंडन मिश्र यांच्या पत्नी उभय भारती या स्वत: एक प्रज्ञावान विदुषी होत्या. त्यांच्या पांडित्यामुळे त्यांना देवी सरस्वतीचा अवतार मानण्यात येते, तर मंडन मिश्र यांना साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार समजण्यात आले आहे. मंडन मिश्र हे अत्यंत सधन आणि प्रतिभासंपन्न असे विद्वान होते. आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यातील दार्शनिक वादविवाद तब्बल आठ दिवस चालला आणि स्वत: उभय भारती या वादविवादाच्या परीक्षक होत्या. शेवटी आद्य शंकराचार्यांचा विजय झाला आणि मंडन मिश्र यांनी अतिशय नम्र आणि अनासक्तरित्या आचार्यांच्या चरणी शिष्यत्व स्वीकारले. आद्य शंकराचार्यांनी त्यांना रीतसर संन्यासदीक्षा आणि ’सुरेश्वराचार्य’ हे नवीन नामाभिदान प्रदान केले. शृंगेरी येथील दक्षिणाम्नाय पीठाचे पीठाधीश्वर म्हणून आद्य शंकराचार्यांनी श्री सुरेश्वराचार्य यांची नेमणूक केली. श्री सुरेश्वराचार्यांनी अनेक दार्शनिक ग्रंथांची निर्मिती केली. आद्य शंकराचार्यांच्या तैत्तिरीय आणि बृहदारण्यक उपनिषदांवरील भाषयांवर त्यांनी वार्तिका लिहिल्या, तसेच आचार्यांनी रचलेल्या दक्षिणामूर्ती स्तोत्रावर वार्तिका लिहिली आणि ’मानसोल्लास’ म्हणून ही वार्तिका पुढे सुविख्यात झाली. श्री सुरेश्वराचार्यांची ग्रंथसंपदा केवळ अद्वैत वेदान्तापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी सर्वश्रुत अशा याज्ञवल्क्य स्मृतीवर ’बालक्रीडा’ नावाचे भाष्यदेखील लिहिले. भारताच्या दार्शनिक इतिहासात आद्य शंकराचार्य यांच्याप्रमाणे श्री सुरेश्वराचार्य हेदेखील कधीही अस्त न पावणारे ज्ञानसूर्यच आहेत.
 
 
शृंगेरी पीठाच्या गुरुपरंपरेत भगवान सदाशिवांना आद्य गुरू मानण्यात आले आहे. या गुरुपरंपरेचे विभाजन तीन श्रेणींमध्ये केले आहे. प्रथम म्हणजे ’दिव्योघ’ (divine group) श्रेणी, जिच्यात साक्षात सदाशिव, नारायण आणि ब्रह्मा यांचा समावेश केला जातो. दुसरी श्रेणी म्हणजे ’सिद्धोघ’ (semi divine), जिच्यात वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास आणि शुक तसेच श्री गौडपादाचार्य, श्री गोविंद भगवतपाद आणि आद्य शंकराचार्य या महान तपस्वींचा समावेश करण्यात आला आहे. शेवटच्या श्रेणीला ’मानवोघ’ (human) असे म्हणण्यात आले आहे आणि यात आद्य शंकराचार्यांचे चार प्रमुख शिष्य - म्हणजेच श्री सुरेश्वराचार्य, श्री पद्मपादाचार्य, श्री तोटकाचार्य आणि श्री हस्तामलकाचार्य यांना समाविष्ट करण्यात आले आहे. श्री सुरेश्वराचार्य यांच्या समाधिपश्चात अनेक सिद्धगुरूंनी शृंगेरी पीठाची धुरा समर्थपणे सांभाळली.
 
 
इ.स. 9व्या शतकानंतर भारतात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली आणि तत्कालीन धार्मिक स्थितीवरदेखील त्यांचा निश्चितच प्रभाव पडला. इ.स. 13व्या शतकापासून भारतात इस्लामी राजवट स्थापन झाली. खिलजी आणि तुघलक सुलतानांनी थेट दक्षिण भारतापर्यंत अनेक आक्रमण केले आणि हिंदू सत्तांचे अतिशय क्रूर पद्धतीने उच्चाटन केले. याच काळात शृंगेरी पीठाच्या गुरुपरंपरेतील 10वे आचार्य श्री विद्या तीर्थ (इ.स. 1229-1333) हे पीठाधीश्वर होते. ते योगशास्त्रात निष्णात होते. श्री विद्या तीर्थ यांचे दोन शिष्य - श्री भारती तीर्थ आणि श्री विद्यारण्य या दोघांनीही त्यांच्या गुरूंच्या समाधीनंतर शृंगेरी पीठाच्या पीठाधीश्वरांचे पद भूषवले. असे म्हटले जाते की लांबिक योगाच्या माध्यमातून श्री विद्या तीर्थ यांनी जिवंतपणेच समाधी घेतली. अशी एक समजूत आहे की त्यांनी ज्या ठिकाणी समाधी घेतली, तेथे त्यांच्या शिष्यांनी विद्या शंकर या नावाने प्रसिद्ध असलेले मंदिर उभारले. असे मानले जाते की लांबिक योगाच्या स्थितीत श्री विद्या तीर्थ अजूनही विद्या शंकर मंदिराच्या खाली असलेल्या तळघरात जिवंत आहेत. अशीही एक समजूत प्रचलित आहे की देवता श्री विद्या तीर्थ यांचे प्रत्येक रात्री पूजन करतात. याच कारणास्तव शृंगेरी पीठाच्या जगद्गुरूंनी पाठवलेली श्रीमुखे वर्तमानकाळातदेखील श्री विद्या तीर्थ यांच्या नावाने लिहिली जातात. यातला चमत्काराचा भाग बाजूला सारला, तरी असे लक्षात येते की श्री विद्या तीर्थ यांच्या काळापासून शृंगेरी पीठाच्या महत्तेचे अधिक वर्धन होऊ लागले आणि त्यांच्या शिष्यांच्या कालखंडात या पीठाला विजयनगर साम्राजाच्या शासकांनी राजाश्रय प्रदान केला.
 
 
adi shankaracharya
 
श्री विद्या तीर्थ यांचे उत्तराधिकारी श्री भारती तीर्थ किंवा श्री भारती कृष्ण तीर्थ यांनी शृंगेरी मठाच्या कार्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. श्री भारती तीर्थ हे शृंगेरी पीठाचे अकरावे जगद्गुरू होते. त्यांच्या असे लक्षात आले की जर सनातन हिंदू धर्म टिकवायचा असेल, तर राजकीय सत्तादेखील हिंदू राजांकडेच असणे अत्यावश्यक होते. श्री भारती तीर्थांच्या कालखंडात इ.स. 1336मध्ये हरिहर आणि बुक्क या दोन बंधूंनी विजयनगर साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. या दोघांना श्री भारती तीर्थ यांचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ बंधू श्री विद्यारण्य यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले. भारती तीर्थ यांना असेही वाटले की शृंगेरी पीठाकडे सामान्य जनतेचादेखील ओघ वाढला पाहिजे. त्यांनी श्री शारदाम्बा हिच्या सुवर्णप्रतिमेची प्राणप्रतिष्ठा केली आणि तिच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनी पीठाच्या इतर वास्तूंचीही डागडुजी केली. विजयनगरचे सम्राट हरिहर-1 यांनी इ.स. 1346मध्ये शृंगेरी पीठाला श्री भारती तीर्थ यांचे तप अखंड चालू राहण्याकरिता आणि पीठाच्या चाळीस ब्राह्मण कर्मचार्यांचच्या उदरनिर्वाहासाठी नऊ गावे दान दिली. या दानाचा तपशील असणारा दगडावर कोरलेला पुराभिलेख शृंगेरी पीठाकडे आहे. हरिहर-1चा भाऊ बुक्कराया स्वत: जगद्गुरूंच्या दर्शनाकरिता शृंगेरीला आला आणि पीठाला शृंगेरी जवळच्या भूमीचे दान दिले. प्राप्त झालेली भूमी जगद्गुरूंनी काही ब्राह्मणांमध्ये वाटली आणि त्यांना तिथे, शृंगेरी पीठाजवळ स्थायिक होण्याकरिता प्रोत्साहन दिले. इथूनच शृंगेरी गावाची स्थापना आणि पुढे वाढ झाली.
 
 
 
श्री भारती तीर्थ यांच्यानंतर त्यांचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ बंधू श्री विद्यारण्य (इ.स. 1380-1386) शृंगेरी पीठाच्या व्याख्यान सिंहासनावर विराजमान झाले. श्री भारती तीर्थ वयाने श्री विद्यारण्य यांच्यापेक्षा लहान होते, परंतु त्यांनी संन्यासदीक्षा अगोदर घेतली होती. श्री विद्यारण्य हे शृंगेरी पीठाच्या गुरुपरंपरेतील 12वे आचार्य होते. दक्षिण भारतातील जनतेत ऐक्य आणि आत्मविश्वास जागृत करण्याकरिता श्री विद्यारण्य यांच्या कारकिर्दीत शृंगेरी पीठाचे रूपांतर एका महासंस्थानात झाले. मुस्लिम आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर सनातन हिंदू धर्माचे संरक्षण आणि जतन करण्याकरिता श्री विद्यारण्य यांनी शृंगेरी पीठाच्या माध्यमातून अनन्यसाधारण योगदान दिले. त्यांनी आद्य शंकराचार्यांचे ’माधवीय शंकर विजय’ या नावाचे चरित्र तर लिहिलेच, तसेच अद्वैत वेदान्ताचे दोन प्रमुख ग्रंथ - ’पंचदशी’ आणि ’जीवनमुक्ती विवेक’ यांचीदेखील रचना केली.
 
 
श्री विद्यारण्य यांनी दीर्घ काळाकरिता आधुनिक हंपीजवळ असलेल्या मातंग पर्वतावर तप केले. याच काळात हरिहर आणि बुक्क हे दोन बंधू श्री विद्यारण्य यांना शरण आले. मोहम्मद बिन तुघलक या सुलतानाने या दोन बंधूंना बंदी करून दिल्लीस नेले आणि तिथे बळजबरीने त्यांचे धर्मांतर करण्यात आले. पण मोहम्मद बिन तुघलक याला या दोन्ही बंधूंची कार्यक्षमता माहीत होती आणि दक्षिणेतील एक उठाव मोडून काढण्याकरिता त्याने हरिहर आणि बुक्क यांना धाडले. या संधीचा उपयोग करत या दोघांनी आपले स्वातंत्र्य जाहीर केले आणि श्री विद्यारण्य यांच्या आशीर्वादाने इ.स. 1336मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. श्री विद्यारण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता या दोन बंधूंनी आपल्या साम्राज्याच्या राजधानीला ’विद्यानगर’ असे नाव दिले. श्री विद्यारण्य यांच्या मार्गदर्शनाखाली एका श्रीचक्राप्रमाणे या राजधानीची रचना करण्यात आली. या श्रीचक्ररूपी नगराच्या मध्यावर होते श्री विरुपाक्ष मंदिर आणि भगवान विरुपाक्ष हे विजयनगरचे आराध्य दैवत आहेत. श्री विद्यारण्य यांच्या काळापासून शृंगेरी पीठाच्या जगद्गुरूंना ’कर्नाटक सिंहासन प्रतिष्ठापनाचार्य’ असेदेखील संबोधण्यात आले आणि शृंगेरीच्या जगद्गुरूंच्या बिरुदावलीत आजच्या काळातदेखील हे संबोधन अतिशय गौरवाने समाविष्ट करण्यात येते.
 
 
adi shankaracharya
 
विजयनगर साम्राज्याचा सर्वात कर्तृत्ववान आणि पराक्रमी शासक म्हणजे कृष्णदेवराय (राज्यकाळ इ.स. 1509-1529). कृष्णदेवराय हा जरी श्री वैष्णव संप्रदायाचा अनुयायी होता, तरी शृंगेरी पीठाच्या जगद्गुरूंवर त्याची निस्सीम श्रद्धा होती. इ.स. 1516 या वर्षी ओडिशाच्या मोहिमेला निघण्यापूर्वी त्याने शृंगेरी पीठाचे तत्कालीन जगद्गुरू श्री पुरुषोत्तम भारती यांना संदेश पाठवून त्यांचे आशीर्वाद मागितले. जगद्गुरूंनी त्यांच्या एका शिष्याद्वारे कृष्णदेवराय याला आपले आशीर्वचन पाठवले आणि ओडिशाच्या गजपती राजावर कृष्णदेवराय याने मोठा विजय संपादन केला. मध्ययुगीन काळातदेखील, विशेषकरून विजयनगर साम्राज्याच्या अंतानंतरही (इ.स. 1565 - तैलकोटाचे युद्ध) शृंगेरी पीठाचे महत्त्व अबाधित राहिले. केळदी नायक राजांनीदेखील शृंगेरी पीठाच्या व्यवस्थेसाठी महत्त्वाचे योगदान दिले. याच घराण्यातील वेंकटप्पा नायक याने विद्या शंकर मंदिराला सहा सुवर्ण स्तूपी भेट दिल्या. हा शासक स्वत: कवी होता आणि अद्वैत मताचा अनुयायी होता.
 
 
 
पुढे दक्षिण भारतात इतर अनेक सत्ता उदयास आल्या. इ.स. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हैसूरचे राज्य हैदर अली आणि त्याचा पुत्र टिपू सुलतान यांच्या आधिपत्याखाली गेले. टिपू सुलतानाने शृंगेरी पीठाला काही दाने दिली. टिपू सुलतानच्या पराभवानंतर शृंगेरी पीठाला वोडेयार राजघराणे आणि इंग्रज यांचेही आर्थिक पाठबळ प्राप्त झाले. शृंगेरी पीठाचे बत्तिसावे जगद्गुरू म्हणून श्री नृसिंह भारती (सातवे) यांनी इ.स. 19व्या शतकात अनेक वर्षे पदभार सांभाळला. त्यांनी जवळजवळ चाळीस वर्षे संपूर्ण भारतभर विजययात्रा पूर्ण केल्या. या विजययात्रांदरम्यान त्यांनी अनेक मंदिरांना भेटी देऊन तिथल्या काही चुकीच्या रूढी बंद केल्या आणि त्यांच्याजागी वेदशास्त्रप्रमाणित पद्धती सुरू केल्या. श्री नृसिंह भारती (सातवे) यांच्या समाधीनंतर त्यांचे उत्तराधिकारी श्री सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारती महास्वामीजी शृंगेरी पीठाचे तेहतिसावे जगद्गुरू म्हणून व्याख्यान सिंहासनावर विराजमान झाले. त्यांना आद्य शंकराचार्यांचा अवतार मानण्यात येते. महास्वामीजींनी शृंगेरी पीठाच्या वृद्धी आणि विकासाकरिता अपूर्व योगदान दिले. त्यांच्या असे लक्षात आले बहुसंख्य हिंदू समाजाला आद्य शंकराचार्य यांच्या महान कार्याचा विसर पडला आहे. सामान्य जनांपर्यंत त्यांच्या कार्याची ओळख पोहोचवण्याकरिता महास्वामीजींनी महत्त्वाची अनेक पावले उचलली. ‘माधवीय शंकर विजय’ या ग्रंथातील संदर्भांच्या आणि स्वत:च्या दिव्यदृष्टीच्या आधारे महास्वामीजींनी आद्य शंकराचार्य यांची केरळ स्थित जन्मभूमी ’कालडी’ शोधून काढली. तिथे इ.स. 1910मध्ये महास्वामीजींच्या पुढाकाराने देवी शारदाम्बा आणि आद्य शंकराचार्य यांची मंदिरे उभारण्यात आली आणि शास्त्रोक्त पद्धतीने या दोघांच्याही विग्रहांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. महास्वामींजींनी आद्य शंकराचार्य यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यास सुरुवात केली आणि त्याच्याही पुढे जाऊन आद्य शंकराचार्यांच्या ग्रंथसंपदेचे प्रकाशनदेखील करून घेतले. महास्वामीजींनी शृंगेरी नगरातील नरसिंह नावाच्या एका अत्यंत मेधावी छात्राला आपला उत्तराधिकारी म्हणून नेमले. दुर्दैवाने नरसिंह यांना आपल्या गुरूंचे फार काळ सान्निध्य लाभले नाही. संन्यासदीक्षेनंतर नरसिंह यांना ’चंद्रशेखर भारती’ हे नाव देण्यात आले आणि इ.स. 1912 ते इ.स. 1954 या बेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ काळात त्यांनी शृंगेरी पीठाच्या पीठाधीश्वरांचे पद भूषवले. श्री चंद्रशेखर भारती महास्वामीजी हे खर्याप अर्थाने जीवनमुक्त होते. त्यांना बाह्य जगाप्रती थोडीदेखील आसक्ती नव्हती. त्यांच्या जीवनातील अनेक वर्षे त्यांनी बाह्य जग आणि पीठाचे कामकाज यांच्यापासून दूर राहून तप आणि साधनेत व्यतीत केली. पण त्यांना आपल्या भक्तांचा कधीही विसर पडला नाही आणि त्यांनी अनेकांचा उद्धार केला. आद्य शंकरांच्या ’विवेकचूडामणी’ या ग्रंथावर श्री चंद्रशेखर भारती यांनी विस्तृत असे भाष्य लिहिले आहे. त्यांच्या काळात म्हैसूर संस्थानाचे आणि बडोदा संस्थानाचे राजे शृंगेरीला भेट देऊन गेले आणि सामान्य जनतेप्रमाणे त्यांनाही महास्वामीजींचे आशीर्वाद प्राप्त झाले. श्री चंद्रशेखर भारती यांनी इ.स. 1931मध्ये बंगळुरू येथील अत्यंत बुद्धिमान आणि तेजस्वी ’श्रीनिवास’ यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित करून त्यांना संन्यासदीक्षा प्रदान केली. त्यांना ’श्री अभिनव विद्या तीर्थ’ हे नाव देण्यात आले. श्री अभिनव विद्या तीर्थ स्वामीजींच्या अध्ययनाकडे स्वत: महास्वामीजींचे लक्ष होते. थोड्या काळातच श्री अभिनव विद्या तीर्थ स्वामीजी सर्व शास्त्रांमध्ये, विशेषकरून योगशास्त्रात पारंगत झाले. इ.स. 1954मध्ये भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी शृंगेरी पीठाला भेट दिली आणि उभय जगद्गुरूंशी धर्म या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली. सप्टेंबर 1954मध्ये श्री चंद्रशेखर भारती महास्वामीजी यांना विदेह मुक्ती प्राप्त झाली. ऑक्टोबर 1954मध्ये श्री अभिनव विद्या तीर्थ महास्वामीजी यांनी शृंगेरी पीठाच्या जगद्गुरूंचे दायित्व स्वीकारले. श्री अभिनव विद्या तीर्थ महास्वामीजी एक महान योगी आणि तपस्वी तर होतेच, तसेच ते एक अत्यंत कुशल असे प्रशासकदेखील होते. त्यांनी शृंगेरी पीठाच्या कामकाजात अनेक सुधारणा करून पीठाचा मोठ्या प्रमाणावर विस्तारदेखील केला. त्यांच्याच मार्गदर्शनाने श्री शारदाम्बा आणि श्री शंकराचार्य यांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. त्यांनी शृंगेरी येथे भक्तांकरिता एक अतिथीगृह उभारले, तसेच शृंगेरीला येणे सुलभ व्हावे, म्हणून पक्के रस्ते बांधून घेतले. त्यांनी पीठाशी संबंधित शेती आणि सिंचन या दोन्ही बाबींमध्ये सुधारणा केल्या. तसेच त्यांनी भारतात अनेक ठिकाणी शृंगेरी मठाच्या शाखा स्थापन केल्या. संस्कृत भाषेच्या प्रसाराच्या उद्देशाने जगद्गुरू श्री अभिनव विद्या तीर्थ महास्वामीजी यांनी ’सूर सरस्वती सभा’ या संस्थेचीदेखील स्थापना केली.
 
 

adi shankaracharya
 
महास्वामीजी यांनी इ.स. 1974 या वर्षी त्यांचे परमशिष्य ब्रह्मचारी सीताराम आंजनेयुलू यांना संन्यासदीक्षा आणि ’भारती तीर्थ’ हे नामाभिधान प्रदान करून आपला उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली. पुढे इ.स. 1989मध्ये श्री अभिनव विद्या तीर्थ महास्वामीजी यांच्या समाधिपश्चात श्री भारती तीर्थ महास्वामीजी शृंगेरी पीठाचे छत्तिसावे जगद्गुरू म्हणून व्याख्यान सिंहासनावर आरूढ झाले. श्री भारती तीर्थ महास्वामीजी एक पराकोटीचे तपस्वी, ज्ञानी, योगी, गुरू आणि वक्ता आहेत. ते एक प्रतिभासंपन्न संस्कृत भाषेतील विविध स्तोत्रांचे रचनाकार म्हणून विश्वविख्यात आहेत. त्यांनी रचलेले विष्णु स्तोत्र विशेष लोकप्रिय ठरले. सनातन हिंदू धर्म वृद्धिंगत व्हावा आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावे, याकरिता श्री भारती तीर्थ महास्वामीजी सदैव कार्यमग्न असतात आणि वेळोवेळी अनेक लोकांना योग्य मार्गदर्शन आणि आशीर्वाद देतात. त्यांचे संस्कृत, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि तामिळ भाषांमधील अनेक अनुग्रह संदेश त्यांच्या जगद्गुरुत्वाची साक्ष देतात. श्री विधुशेखर भारती महास्वामीजी हे जगद्गुरू श्री भारती तीर्थ महास्वामीजी यांचे उत्तराधिकारी आहेत.
 
 
शृंगेरी मठाशी निगडित असणार्या देवता म्हणजे विभांडक ऋषी यांनी पूजन केलेले मलहानिकरेश्वर शिवलिंग, वराह, श्रीराम आणि देवी शारदाम्बा. येथील पवित्र तीर्थ म्हणजे तुंगा नदी आणि वेद म्हणजे यजुर्वेद. प्रत्येक आम्नाय पीठाचे एक महावाक्य आहे. हे महाकाव्य श्रुतींमधले असते आणि जीव-ब्रह्म ऐक्य याचे साक्ष देते. शृंगेरी मठाशी निगडित महावाक्य आहे ’अहं ब्रह्मास्मि‘. आद्य शंकराचार्य यांनी शृंगेरी पीठाच्या आचार्यांना ’सरस्वती, पुरी, भारती, अरण्य, तीर्थ, गिरी आणि आश्रम’ ही बिरुदे वापरण्यास संमती दिली होती. शृंगेरीच्या आचार्य परंपरेचा आढावा घेतला, तर असे लक्षात येते की येथील बहुतकरून आचार्यांनी ‘भारती‘ हे बिरुद धारण केले होते.
 
 
आद्य शंकराचार्य यांनी जेव्हा शृंगेरी पीठाची स्थापना केली, तेव्हा त्यांनी सभोवतीच्या टेकड्यांवर या पीठाच्या रक्षक देवतांची म्हणजेच कालभैरव, दुर्गा आणि काली यांची मंदिरे बांधली. या मंदिरांमध्ये सध्याच्या काळातदेखील यथाविधी या रक्षक देवतांचे पूजन केले जाते.
 
 
 
देवी शारदा ही शृंगेरी दक्षिणाम्नाय पीठाची अधिष्ठात्री देवता आहे. शृंगेरी पीठाच्या गुरुपरंपरेतील सर्व आचार्यांना तिचे रूप मानले गेले आहे. म्हणूच देवी शारदेला गुरुरूपिणीदेखील म्हटले जाते. शारदा देवी हिला सगुण ब्रह्माचे प्रतीक मानले जाते. तिच्या हस्तांमध्ये अमरत्व प्रदान करणारा सुधाकुंभ, परम ज्ञानाचे प्रतीक असणारे पुस्तक आणि अक्षमाला आहेत. ही अक्षमाला अक्षर किंवा बीज ज्यांच्यापासून या ब्रह्मांडातील मूर्त रूपांचे प्राकट्य होते, यांचे प्रतीक आहे. एक हात चिन मुद्रेत आहे. ही मुद्रा जीव आणि ब्रह्म यांचे अद्वैत दर्शवते. अशा प्रकारे देवी शारदा ही अद्वैत वेदान्त दर्शनाच्या प्रमुख तत्त्वांचे आणि ब्रह्मविद्येचे मूर्त रूप आहे. देवी शारदा श्रीयंत्रावर विराजमान आहे. सहसा देवी ललिताराजराजेश्वरी ही श्रीयंत्राची देवता मानली जाते, पण ती आणि शारदाम्बा या अभिन्न आहेत. शारदाम्बा ही ’चित’ तत्त्वाचे रूप आहे, तर ललिता राजराजेश्वरी ही मूर्तिमंत ’आनंद’ तत्त्व आहे. आद्य शंकराचार्य स्वत: श्रीविद्योपासक होते आणि त्यांनी स्थापन केलेल्या प्रथम वैदिक पीठात देवी शारदाम्बाची प्रतिष्ठापना ही या श्रीविद्या उपासनेचेच द्योतक मानता येईल. देवी शारदाम्बा ही त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि शिव, तसेच त्यांच्या शक्ती अनुक्रमे सरस्वती, लक्ष्मी आणि ईश्वरी यांच्या अतीत आहे. तिला शारदा परमेश्वरी म्हणूनदेखील ओळखले जाते आणि तिच्या पूजनाच्या वेळेस ललितासहस्रनामाचा घोष केला जातो. शृंगेरी पीठाच्या आध्यात्मिक परंपरेनुसार देवी शारदाम्बा ही शक्ती आणि शक्तिमान या दोन्ही तत्त्वांचे रूप आहे. आचार्यांनी स्वत: तुंगा नदीतील एका पाषाणावर एक यंत्र कोरले आणि त्यावर देवी शारदाम्बा हिच्या चंदनाच्या मूर्तीची स्थापना केली. सध्या शारदाम्बा मंदिरात असलेली सुवर्णमूर्ती स्वामी विद्यारण्य यांच्या कारकिर्दीत म्हणजेच इ.स. 14व्या शतकात स्थापन करण्यात आली. इ.स. 1907पर्यंत शारदाम्बाचे मंदिर तसे छोटेखानी होते. शृंगेरी पीठाचे तेहतिसावे आचार्य जगद्गुरू श्री सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारती महास्वामीजी यांनी या मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यास प्रारंभ केला. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य शृंगेरी पीठाचे चौतिसावे आचार्य, जगद्गुरू श्री चंद्रशेखर भारती यांनी हे त्यांच्या गुरूंनी सुरू केलेले कार्य इ.स. 1916 या वर्षी पूर्णत्वास नेले. या मंदिराचे स्थापत्य तामिळनाडू येथील नाटुकोटायी चेट्टी शैलीवर आधारलेले आहे. या मंदिरात मुखत्वे गर्भगृह आणि त्यासमोरील मंडप असे दोन घटक आहेत, तसाच एक रुंद प्रदक्षिणा पथदेखील आहे. संपूर्ण मंदिर Granite दगडात बांधले आहे. सभामंडपात स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण असलेले स्तंभ आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारात एक लक्षवेधी असे गोपुर बांधण्यात आले आहे. मंदिराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिथे असलेले व्याख्यान धर्मसिंहासन, जे सर्व ज्ञानपीठाचे प्रतीक मानले जाते. आधीच्या पीठाधीश्वरांच्या समाधीनंतर जेव्हा नवे पीठाधीश्वर नियुक्त होतात, तेव्हा ते याच व्याख्यान सिंहासनावर आरूढ होतात.
 
 
 
शृंगेरी येथील दुसरे अत्यंत महत्त्वाचे मंदिर म्हणजे भव्यदिव्य असे विद्याशंकर मंदिर. भारतीय मंदिरस्थापत्याच्या परंपरेतील अमोल असे रत्न म्हणजे हे देवालय. विद्या शंकर मंदिराचे स्थापत्य भारतीय स्थापत्यशास्त्राच्या इतिहासात अद्वितीय आहे. या मंदिराच्या कालखंडाच्या बाबतीत इतिहासकारांमध्ये वाद आहेत. शृंगेरी पीठाच्या पारंपरिक इतिहासाप्रमाणे हे मंदिर इ.स. 14व्या शतकात बांधले गेले. पण इतिहासकारांच्या मते या मंदिराचे बांधकाम इ.स. 15व्या किंवा 16व्या शतकात करण्यात आले. गर्भगृह आणि सभामंडप अशी या मंदिराची स्थापत्य रचना आहे. सभामंडप हा सममितीय (symmetrical) असून त्याच्या मध्यभागी एक घुमट आहे. हा घुमट बारा स्तंभांवर उभारण्यात आला आहे. या प्रत्येक स्तंभावर एक एक राशीचे अंकन करण्यात आले आहे. या मंदिराला पूर्व, उत्तर आणि दक्षिण अशी तीन प्रवेशद्वारे आहेत. या स्तंभांची रचना अशी आहे की सूर्योदयाच्या वेळेस सूर्यकिरणे अचूक त्याच राशीवर पडतात, जिच्यात सूर्य त्या महिन्यात असतो. विद्या शंकर मंदिर हे भारतीयांनी केलेल्या खगोलशास्त्रातल्या प्रगतीचे अत्यंत अद्भुत असे उदाहरण आहे. जक्कन नावाच्या स्थपतीने श्री भरती तीर्थ आणि श्री विद्यारण्य यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.
 
 
विद्याशंकर मंदिराच्या स्थापत्य रचनेवर होयसाळ, विजयनगर आणि इक्केरी नायक यांच्या स्थापत्यशैलींचा प्रभाव आहे, असे काही वरिष्ठ कला इतिहासकार (art historians) मानतात. याचा अर्थ असा होतो की हे मंदिर इ.स. 16व्या शतकात बांधले गेले असावे. पण खुद्द शृंगेरी मठाचा इतिहास या मताला दुजोरा देत नाही. काही पाश्चिमात्य आणि काही भारतीय इतिहासकारांचे असे मत आहे की शृंगेरी मठाची स्थापना हीच इ.स. 14व्या शतकात विजयनगरच्या नृपतींनी केली. या वर्गातल्या अनेक इतिहासकारांची मते केवळ सेकंडरी सोर्सेसवर आधारलेली असतात. हिंदू मठांकडे असलेले ऐतिहासिक पुरावे अनेकदा 'traditional history' म्हणून तथाकथित इतिहासकार बाजूला सारतात आणि पाश्चिमात्य पद्धतीने भारतीय इतिहासाची, विशेषकरून सनातन हिंदू धर्माच्या इतिहासाची चुकीची मांडणी करतात.
 
 
 
विद्याशंकर मंदिरावर होयसाळ स्थापत्यशैलीचा निश्चित प्रभाव जाणवतो. मंदिराच्या शिखराला जोडून एक लक्षवेधी शुकनास आहे. पण यांच्यात आणि चालुक्य मंदिरावर असलेले शुकनास भिन्न आहेत. तेथील शिल्पांमध्ये आणि विजयनगर शैलीच्या शिल्पांमध्ये थोडेफार साधर्म्य आहे. या मंदिराच्या मंडपातील स्तंभ विजयनगर स्थापत्यशैलीबरोबर साम्य दर्शवतात. होयसाळ शिल्पांच्या तुलनेत विद्याशंकर मंदिरावरील शिल्प ‘लो रिलीफ‘मध्ये आहेत. होयसाळ शिल्पांप्रमाणे ही शिल्पे अनेक अलंकारांनी सजलेली नाहीत. मंदिराच्या भितीवर शिव-पार्वती, स्कंद, विठ्ठल, हयग्रीव, गजलक्ष्मी सूर्य, त्रिपुरान्तक शिव, कामांतक शिव, कालान्तक शिव, गजान्तक शिव, हरिहर, लक्ष्मी-नृसिंह आणि भगवान विष्णू यांचे दशावतार अशी अनेक शिल्पे आहेत.
 
 
 
पीठाच्या प्रांगणात इतर अनेक देवतांची आणि पीठाधीश्वर आचार्यांची मंदिरे आहेत. यात प्रमुख म्हणजे महाविष्णू, तोरणगणपती, आद्य शंकराचार्य आणि शृंगेरी पीठाचे द्वितीय आचार्य सुरेश्वराचार्य यांची मंदिरे. शृंगेरी पीठ येथे भुवनेश्वरी, राम, ब्रह्मा, हनुमान आणि गरुड, तसेच अनेक बाणलिंग आणि शाळीग्राम यांचे ही विधिवत पूजन केले जाते. पण या देवतांपेक्षा ही चंद्रमौलीश्वर शिवलिंग, रत्नागर्भ गणपती, श्रीचक्र यंत्र, स्फटिक मेरू यंत्र, देवी शारदाम्बा आणि आद्य शंकराचार्य यांना अधिक प्राधान्य प्रदान करण्यात आले. चंद्रमौलीश्वर शिवलिंग हे एक अत्यंत पवित्र आणि दैवी असे स्फटिक शिवलिंग आहे. भगवान विश्वेश्वर यांनी कैलास पर्वत येथून हे शिवलिंग आणून काशी येथे आद्य शंकराचार्य यांना सुपुर्द केले, असा समज आहे. शृंगेरी येथील प्रत्येक पीठाधीश्वर आचार्यांनी नितांत भक्तीने या शिवलिंगाचे पूजन केले आहे. हे शिवलिंग जगद्गुरूंजवळच ठेवण्यात येते.
 
 
 
दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठाचे - सनातन धर्माच्या रक्षणाचे आणि जतनाचे दैवी कार्य यावच्चंद्रदिवाकरौ वृद्धिंगत व्हावे आणि श्री शारदाम्बा, श्री विद्या शंकर, भगवान मलहानिकरेश्वर, आद्य शंकराचार्य आणि शृंगेरीदेशिक परंपरेतील सकल जगद्गुरू यांचा कृपाप्रसाद संपूर्ण विश्वाला प्राप्त होऊन समस्त जिवांचे कल्याण होवो.
 
 
शारदे पाहि माम्। शङ्कर रक्ष माम्।
जय जय शङ्कर। हर हर शङ्कर।