@उत्तरा मोने
uttaramone18@gmail.com
गुणी अभिनेत्री म्हणून सर्वांच्या परिचयाची अभिनेत्री अशी जिची ओळख आहे, ती अभिनेत्री म्हणजे सुलेखा तळवलकर. यूट्यूबवर ‘दिल के करीब’हा तिचा लोकप्रिय कार्यक्रम सुरू आहे.या कार्यक्रमादरम्यान तिने घेतलेल्या मुलाखती, त्याचा प्रवास आणि त्यातून आलेली समृद्धी उलगडणारा सुलेखा तळवलकरशी साधलेला संवाद
एक काळ होता, जेव्हा दूरदर्शनवर नव्या नव्या मालिका, मुलाखतींचे कार्यक्रम सादर व्हायचे. अनेक प्रतिभावंतांच्या, कलावंतांच्या मुलाखती ऐकताना त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष, त्याचं मोठेपण जाणवत राहायचं. मी स्वत: गेली 30 वर्षं आकाशवाणी, दूरदर्शन आणि विविध वर्तमानपत्र यासाठी अनेक कलावंतांच्या मुलाखती घेतल्या. या कलावंतांची एक वेगळी बाजू - त्यांच्यातलं माणूसपण मला नेहमी सापडत गेलं आणि त्यातून मी अधिक समृद्ध होत गेले. असंच समृद्ध होणं जिने गेल्या काही दिवसात अनुभवलं, ती सगळ्यांची लाडकी, गुणी अभिनेत्री सुलेखा तळवलकर.
आता यूट्यूबचा जमाना आलाय. अशा अनेक यूट्यूब चॅनल्स सुरू झाल्या आहेत, ज्यांनी आपल्याला अनेक उत्तमोत्तम विषय दिलेत आणि त्यापैकी एक म्हणजे सुलेखा तळवलकर. आज तिची यूट्यूब चॅनल गाजतेय ती तिच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमामुळे. खरं तर लॉकडाउनच्या काळात अनेक ऑनलाइन कार्यक्रम होऊ लागले. त्या ऑनलाइन कार्यक्रमांतही अनेक वेगवेगळे प्रयोग झाले, अनेक विषय मांडले गेले आणि त्या प्रयोगात दिल के करीब खूपच गाजला.
कोविडच्या आधीच खरं तर या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोविडमध्ये थोडा खंड पडतोय की काय असं वाटत होतं, पण याही काळात ज्यांच्या घरी येण्याची परवानगी मिळत होती, त्यांच्या घरी जाऊन दिल के करीबच्या एपिसोड्सचं शूटिंग होत होतं. त्या काळात खरं तर बरेच ऑनलाइन कार्यक्रम सुरू झाले होते. पण सुलेखाला हा कार्यक्रम ऑनलाइन करायचा नव्हता.
सुलेखा म्हणाली की “या कार्यक्रमाच्या नावातच सगळं आहे. ‘दिल के करीब’ माझ्या हृदयाच्या जवळची माणसं, त्यांना मी भेटणार आणि समोरासमोर बसून मनातल्या गोष्टी बोलणार. शिवाय प्रत्येकाच्या घरी जाऊन किंवा कामाच्या ठिकाणी जाऊन जिथे ते कलाकार मोकळेपणे बोलू शकतील, अशा ठिकाणी याचं शूटिंग करायचं हे आम्ही ठरवलं होतं. एक पर्सनल टच हवा होता या कार्यक्रमासाठी.”
मग कार्यक्रमात सहभागी होणार्या कलाकारांना आपण काही मानधन देत नव्हतो. पण कलाकार आपला वेळ काढून येतात, तर काही तरी प्रेमाची भेट त्यांना द्यावी आणि महिला उद्योजिकांनाही हातभर लागावा, यासाठी काही भेटवस्तू देण्याची सुरुवात झाली. पाहुण्यांनाही या भेटी आवडू लागल्या आणि त्या उद्योजकांनाही देशातून-परदेशातून त्यांच्या उत्पादनांसाठी मागणी येऊ लागली. यामुळे सुलेखाला याचा निश्चित आनंद होता.

हे सगळं सांगतानाही एक वेगळंच समाधान सुलेखाच्या चेहर्यावर होतंच. सुलेखाचा हा कार्यक्रम जसजसा प्रसिद्ध होऊ लागला, तसतसे प्रायोजक वाढू लागले आणि या मालिकेचे प्रेक्षकही. तसंही रिललाइफ आणि रियल लाइफ यामध्ये फरक असतोच. पडद्यावर एखादी व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार प्रत्यक्षात कसा आहे, माणूस म्हणून त्याचं मोठेपणा कशात आहे, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडलं जाऊ लागलं आणि मग प्रेक्षकांच्या ‘दिल के करीब’ असलेल्या कलाकारांची नावं सुलेखाच्या टीमपर्यंत पोहोचू लागली. त्या त्या कलाकारांच्या उपलब्धतेसाठी मग वर्ष वर्ष थांबूनही ते एपिसोड झाले. किंवा कलाकरांचं शूटिंग संपल्यावर अगदी रात्री-अपरात्रीही याचं शूटिंग झालेलं आहे आणि प्रेक्षकांनी त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे.
खरं तर ‘दिल के करीब’ने सुलेखाला खर्या अर्थाने एक वेगळा दृष्टीकोन दिला. अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या भेटी झाल्या. त्यांचा मोठेपणा त्यांच्या प्रवासातून तर समोर आलाच, तसंच त्यांच्या बोलण्यातून सुलेखा म्हणते त्याप्रमाणे, “माझ्या जगण्यातली अनेक उत्तर मला या मुलाखतींतून सापडली. स्वत:शी संवाद वाढला. अनेक प्रसंगात आपण वागतोय ते चूक की बरोबर, योग्य की अयोग्य असे प्रश्न मला पडायचे, याचीही उत्तरं अनेकदा मला सापडली. माणूस म्हणून माझ्यात खूपच बदल झाला. मनातली कृतज्ञता वाढली. अनेकांचा संघर्ष पाहिल्यावर देवाने मला जे भरभरून दिलंय, त्याबद्दल मी देवाचे आभारच मानले. आताही रोज सकाळी उठल्यावर मी देवाचे आभार मानते. जमिनीवर पाय ठेवताना धरतीमातेला नमस्कार करून तिची क्षमा मागते आणि आपण जो श्वास घेतो, तोही गृहीत न धरता त्याबद्दल ही कृतज्ञता व्यक्त करते.”
या सगळ्या प्रवासात अनेक कलाकारांना आपण व्यक्तिरेखांच्या माध्यमातून पाहत होतो. त्याच कलाकारांना भूमिकांच्या पलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून आपण पाहू लागलो. तिलाही ते पाहता आलं आणि प्रेक्षकांनाही तिने ही ओळख करून दिली.
मुळात ती स्वत: एक उत्तम संवेदनशील अभिनेत्री असल्यामुळे कलाकारांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू तिला उत्तम रितीने उलगडता आले. रुइया कॉलेजमध्ये असताना तिथल्या ‘नाट्यवलय’च्या ऑडिशनला सहज म्हणून गेलेली सुलेखा ‘सातच्या आत घरात’ या एकांकिकेत प्रमुख भूमिकेसाठी निवडली गेली. संजय नार्वेकर त्या वेळी दिग्दर्शक होते. निशिकांत कामत यांची अभिनयात साथ होती. पदार्पणातच सुलेखा आणि निशिकांत कामत या दोघांना अभिनयाची बक्षिसं मिळाली आणि तिच्या एकांकिकेला त्या वर्षाची सगळी बक्षिसं मिळाली. त्यातूनच मग दिग्दर्शक राजन वाघधरे यांनी ‘बोलाची कढी बोलाचा भात’ या मालिकेसाठी तिची निवड केली. मग जाहिराती आणि मालिकांचा, नाटकांचा तिचा प्रवास सुरू झाला. झी टीव्हीवरच्या ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या मालिकेने हिंदी पडद्यावर आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘आई’ या मराठी चित्रपटाने मोठ्या पडद्यावर तिचं पदार्पण झालं.

प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती स्मिता तळवलकर यांच्या घरची ती सून झाली आणि कलेचं एक विद्यापीठच जणू तिच्यासमोर खुलं झालं. लग्नानंतर खरं तर सुलेखाने कला क्षेत्रात थोडी विश्रांतीच घेतली होती. पण स्मिताताईंच्या आग्रहामुळे ती पुन्हा एकदा या क्षेत्रात आली. तेव्हा स्मिताताई ‘अवंतिका’ ही मालिका करत होत्या. सुलेखाच्या दृष्टीने तिने अवंतिकामध्ये केलेलं काम टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर मग ‘असंभव’, ‘कुंकू’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘माझा होशील ना’, ‘सरस्वती’, ‘सांग तू आहेस ना’, ‘मुरंबा’ अशा अनेक मालिकांमधून सुलेखाच्या विविधांगी भूमिका समोर आल्या.
तसंच ‘आई’ या चित्रपटानंतर ‘तुझ्या माझ्यात’, ‘तिन्ही सांजा’, ‘श्यामचे वडील’, ‘कदाचित’, ‘कॅनव्हास’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा अनेक चित्रपटांतून सुलेखाच्या अभिनयाचे पैलू प्रेक्षकांना अनुभवता आले.
स्मिताताईंमुळे कलेच्या ह्या क्षेत्रात काम करताना कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कोणत्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत या सगळ्याच गोष्टींचं एक प्रकारे प्रशिक्षण मिळालं सुलेखाला. सुलेखा म्हणाली की “स्मिताताईंनी असं कधी हाताला धरून शिकवलं नाही, पण त्यांच्यामुळे कितीतरी गोष्टी मला कळल्या.
आमचं नात इतकं घट्ट होतं की आजही कितीतरी प्रसंग आठवतात, ज्यातून आमचं नातं अधिकच दृढ झालं.
माझं लग्न झाल्यावर आमचा दादरचा बंगला रिनोव्हेट करण्याचं काम स्मिताताईंनी माझ्यावर सोपवलं. म्हणाल्या, सुलेखा, तुझंही इंटिरियर डेकोरेशन झालंय ना? तर सुधीर भटकाकांच्या मदतीने घराचं काम पाहा. त्यांनी सुधीरकाकांना तंबीच दिली होती आता मी इथं कुठेही लक्ष देणार नाही. अंबरची बायको आली आहे. घर तिचं आहे, तिच्या आवडीप्रमाणे करा. सासूबाई इतक्या समंजस असतात? नवीन सून घरात आल्या आल्या संपूर्ण घराचा ताबाच देऊन टाकतात. स्मिताताईंबद्दल नकळत माझ्या मनात एक हळवा कोपरा तयार झाला. अशी सूट आणि मोकळीक मिळाल्यावर आमचा दादरचा बंगला सुंदररित्या साकारला गेला. तो बंगला म्हणजे गावातील एक टुमदार घरच होतं. आजूबाजूला वडापिंपळाची मोठाली झाडं जणू काही वयोवृद्ध तपस्व्यासारखी आमचं रक्षण करीत होती. आजूबाजूला चार-पाचच बैठी घरं, त्यात हा टुमदार कौलारू बंगला. आमच्या लग्नाचे सर्व विधी याच दादरच्या बंगल्यात स्मिताताईंनी उत्साहात साग्रसंगीत करवून घेतले. याच आमच्या घरात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांची मांदियाळी असे. याच घरात कधी सिनेमाच्या कथेवर काम चाले, कधी संगीतावर, तर कधी संकलनाचं काम कसं असावं यावर चर्चा झडत. स्मिताताईंना माणसांचं व्यसन होतं. त्या नेहमी म्हणत - बँकेत किती बॅलन्स आहे हे पाहण्यापेक्षा आपल्या घराबाहेर चपलांचा ढीग किती आहे हे पाहावं. खरी श्रीमंती ती आहे. आमच्या घरचं लांबलचक डायनिंग टेबल सदैव भरलेलं असायचं. घरी आलेला पाहुणा जेवल्याखेरीज आपल्या घरातून जाता कामा नये, ही सासूबाईंची सक्त ताकीद असे. कळत नकळत माझ्यावरही हेच संस्कार होत होते. आजही आम्ही ती रीत कासोशीने पाळतो.
सासरच्या माणसांचं प्रेम, आईवडिलांचे आशीर्वाद, नवरा अंबर, मुलं आर्य आणि टिया या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आज ती तिचं काम करू शकतेय, असं सुलेखाने आवर्जून सांगितलं. आज नाटकाचे प्रयोग, मालिकेचं शूटिंग, दिल के करीबचं शूटिंग या सगळ्या गोष्टींसाठी सुलेखा शांतपणे आणि पूर्ण वेळ देऊ शकतेय, कारण घरची आघाडी उत्तम सांभाळली जातेय आणि याचं श्रेय अर्थातच ती घरच्यांना देते, जे अर्थातच तिच्या ‘दिल के करीब’ आहेत.
दिल के करीबचं यश पाहता आज ही मालिका अशा टप्प्यावर आहे, जिथे प्रेक्षकांच्या तिच्याकडून अपेक्षा आहेत. म्हणूनच आता तिच्या यूट्यूब चॅनलवर स्मृतिचित्रे, किस्से बहाद्दर, सावलीतल्या कला, टेलकथा अशा अनेक नव्या मालिका सुरू होतायत. विषयांचं वैविध्य राखत तिच्या या प्रत्येक कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांना एक समाधान आणि आनंद नक्कीच मिळेल, तसंच अभिनेत्री म्हणून सुलेखाही अधिक समृद्ध होत राहील, हा विश्वास आज तिच्या सगळ्या कारकिर्दीकडे बघताना निश्चित वाटतोय.
‘दिल के करीब’च्या माध्यमातून सुलेखा तळवलकर यांनी घेतलेल्या मुलाखती