@डॉ. धनश्री साने । 9833573927
पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे ’बुकस्ट्रीट’ हा आगळावेगळा उपक्रम जागतिक पुस्तक दिनी आयोजित केला. वाचनसंस्कृतीत एक नवीन पायवाट यानिमित्त सुरू केली गेली. साहित्यिक मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच लोकांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा उद्देश या उपक्रमामागे आहे.
भल्या पहाटे फक्त पुस्तकांच्या ओढीने मोठी रांग लावून असंख्य पुस्तकप्रेमी शिस्तीने आले असल्याचा आगळावेगळा अनुभव डोंबिवलीत 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आला.
दिवाळी पहाट, स्वागतयात्रा या कार्यक्रमाला जसा डोंबिवलीकर उत्स्फूर्त प्रतिसाद देतात, तसाच प्रतिसाद ’बुकस्ट्रीट’वर पाहावयास मिळाला. डोंबिवलीत प्रथमच नदीसारखी पुस्तके रस्त्यावर मांडण्यात आल्याचे चित्र सर्वांसाठीच निराळे, वेगळे होते. डोंबिवलीतील फडके रोडवर पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे ‘बुकस्ट्रीट’ हा अनोखा उपक्रम आयोजित केला होता.
आजच्या काळात उपलब्ध असणारी मनोरंजनाची विविध साधने, मोबाइल, टीव्ही यासारखी माध्यमे यामुळे वाचनसंस्कृतीस आहोटी लागली आहे. वाचन करण्यासाठी लागणारी स्थिरता, एकाग्रता कमी होऊ लागली आहे असे चित्र काही ठिकाणी काही प्रमाणात असले, तरी ते बदलता येते. समाजाचा वैचारिक स्तर उंचावायचा असेल, तर समाजाला पुस्तकांशी जोडून देणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी मोबाइलऐवजी पुस्तक यावे, लोकांची पुस्तक वाचनाची आवड वाढीस लागावी, म्हणून सतत प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै. पै फ्रेंड्स लायब्ररीत फक्त पुस्तकांची देवाणघेवाण होत नाही, तर वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी पैसर सतत क्रियाशील असतात. नवनवीन कल्पना साकार करण्यासाठी अविरत कष्ट करतात.

युरोपातील देशात एखाद्या बागेमध्ये वाचक एकत्र येऊन पुस्तकांची परस्परांत देवाणघेवाण करतात, हे वाचनात आल्यावर त्यातून पैसरांना पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शनाची कल्पना सुचली. ती मूर्त रूपात साकार करून त्यांनी एका अभिनव उपक्रमाचा पायंडा घातला. हा उपक्रम गेली पाच वर्षे उत्साहाने चालू आहे. या उपक्रमाद्वारे जवळपास 2 ते 3 लाख पुस्तकांची देवाण-घेवाण होते.
वाचकांनी आपल्याकडील वाचून झालेली पुस्तके लायब्ररीत आणून ह्यातील व या पद्धतीने जमलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनातून जितकी पुस्तके दिली, तितकीच पुस्तके घ्यावीत, अशी यामागील संकल्पना. अशा पद्धतीने आयोजित केलेले पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन हे भारतातील पहिले प्रदर्शन. नंतर त्याच्या अनुकरणातून अनेक ठिकाणी अशी प्रदर्शने आयोजित केली जाऊ लागली.
या पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शनातून फ्रेंड्स लायब्ररीने अनेक नवीन पायंडे रुजविले. उदा., या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराची पुस्तकांची तयार केलेली भव्य कमान, पुस्तकांचे केलेले इग्लू घर, ख्रिसमस ट्री इ. या पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शनास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, कला, आध्यात्मिक इ. विविध क्षेत्रांतील नामवंतांची उपस्थिती लाभली आहे. माजी लोकसभा अध्यक्षा व माजी खासदार मा. सुमित्राताई महाजन, डॉ. अरुणा ढेरे, अशोक नायगावकर, डॉ. उमा कुलकर्णी, डॉ. अच्युत गोडबोले, उदय निरगुडकर, मा. प्रल्हाद दादा पै, पत्रकार सुशील कुलकर्णी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यासारख्या दिग्गजांची नावे सांगता येतील.
या वार्षिक उपक्रमाबरोबरच अनेक उपक्रम करून पुंडलिक पैसर वाचकांशी सतत संपर्कात असतात. -
महिन्याच्या दुसर्या व चौथ्या शुक्रवारी ‘फ्रेंड्स कट्टा म्हणून एक साहित्यविषयक कार्यक्रम संध्याकाळी सहा ते आठ या वेळात आयोजित केला जातो.
बाल वाचक तयार व्हावेत, म्हणून दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत 15 एप्रिल ते 15 जून या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘फंडूकट्टा’ या नावाचा छोटासा वर्ग घेतला जातो. यामधून बालक खर्या अर्थाने वाचक म्हणून घडतात.
स्त्री कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन दर वर्षी वेगळ्या संकल्पनेतून साजरा केला जातो.
पुस्तकांचा प्रचार, प्रसार याबरोबरच वाचनसंस्कृतीचे जतन व्हावे, अशी पुंडलिक पै यांची आंतरिक तळमळ असते. त्यातून विविध उपक्रम आयोजित केले जातात. पुस्तकांना ते वाचकांच्या जास्त जवळ घेऊन जातात.
जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून 23 एप्रिल 2023, शनिवार या रोजी पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे ’बुकस्ट्रीट’ हा एक असाच आगळावेगळा उपक्रम आयोजित करून एक नवीन पायवाट सुरू केली आहे, असे म्हणता येईल.
परदेशात अनेक शहरांमध्ये ‘एक दिवस पुस्तकांसाठी’ उपक्रम आयोजित केला जातो. स्पॅनिश पुस्तकप्रेमी लुझ इंटरप्युटस यांची ही संकल्पना. एक दिवस रस्त्यावरील वाहनांचा गोंगाट, प्रदूषण, गर्दी कमी करून त्याऐवजी साहित्यिक, वैचारिक, देवाण-घेवाण, पुस्तक आदान-प्रदान, शांतता यासाठी तो दिवस राखीव असावा, या उद्देशातून लुझ यांनी रस्त्यावर पुस्तके मांडून ती वाचकांना भेट देण्याचा, त्या निमित्ताने साहित्यिक मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. लोकांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा उद्देश या उपक्रमामागे आहे. या विचारांतून पैसरांनी प्रथमच डोंबिवलीत या ‘बुकस्ट्रीट’चे आयोजन केले.
डोंबिवलीतील मुख्य फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौक ते आप्पा दातार चौक या 200 मीटरच्या रस्त्यावर लाल गालिचावर सुमारे एक लाखांहून अधिक विविध प्रकारची पुस्तके आखीव-रेखीव पद्धतीने मांडण्यात आली होती. या पुस्तकांमध्ये बहुभाषिक पुस्तके, कथा, कादंबर्या, ऐतिहासिक, आध्यात्मिक, कलाकुसरीवर आधारित, पाकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अनुवादित, वैज्ञानिक, लहान मुलांसाठी चित्रकथा, गोष्टींची मराठी, इंग्लिश अशी विविध प्रकारची पुस्तके पाहता यावी, हाताळता यावी, यासाठी आजूबाजूला ऐसपैस जागा सोडली होती.
कडक उन्हाळा असल्याने हा कार्यक्रम पहाटे पाच ते दहा या वेळेत ठेवण्यात आला होता. विविध संस्थांचे 200 स्वयंसेवक शनिवारच्या मध्यरात्रीपासून पहाटे चार वाजेपर्यंत दीड लाख पुस्तकांची मांडणी करीत होते. काही स्वयंसेवक तर संपूर्ण रात्रभर उपस्थित होते. या स्वयंसेवकांमध्ये आवर्जून उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे शाळांशाळांमधील नववी-दहावी परीक्षा झालेली मुले-मुली, जी या देशाचे भविष्य आहेत, ती उत्साहाने सामील झाली होती. त्यांचे पालक, अनेक ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी रात्री व पहाटेपासून हजेरी लावली. मोबाइलच्या दुनियेत वावरणारी ही तरुणाई पुस्तकांच्या दुनियेत दंग झाली होती.
पुस्तक मांडणी पहाटे पूर्ण झाल्यानंतर उपस्थित नागरिकांना कूपन देऊन ‘बुकस्ट्रीट’मध्ये सोडण्यात आले. या ‘बुकस्ट्रीट’मध्ये आपला पहिला क्रमांक लागावा, म्हणून पुस्तकप्रेमी नागरिक पहाटे चार वाजल्यापासून फडके रस्त्यावर हजर होते. वाचकांचा हा प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता. एक ते दीड कि.मी. रांग असून शिस्तीने शांततेने, उत्सुकतेने व तितक्याच उत्साहाने सहभाग होता. सिनेमा, नाटक, बस, रिक्षा, डी मार्ट अशा ठिकाणी लोकांची गर्दी होऊन कूपन संपून जातात, लोक नाराज होऊन निघून जातात, इतका भरभरून प्रतिसाद डोंबिवलीकरांनी पुस्तकांसाठी ‘बुकस्ट्रीट’ला द्यावा, ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.
बुकस्ट्रीटमधील सहभागाची एकूण नोंदणी सहा हजारांपेक्षा जास्त होती. बदलापूर, कल्याण, ठाणे येथील नागरिक या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. उपक्रमात सहभागी प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीचे कोणतेही एक पुस्तक विनामूल्य घेऊन जाता येत होते. आवडीचे पुस्तक घेतल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होता.
डोंबिवलीचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांच्या उपस्थितीत बुकस्ट्रीटचे उद्घाटन करण्यात आले. या संपूर्ण उपक्रमात मा. मंत्री रवींद्रजी चव्हाण यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा होता.
संपूर्ण पोलीस यंत्रणा, पत्रकार, सर्व स्वयंसेवक, राजकीय नेते, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका या सर्वांनीच या उपक्रमाला भरभरून दाद दिली. खर्या अर्थाने डोंबिवली सांस्कृतिक नगरी असल्याचे चित्र यातून समोर आले.