समाजसुधारक श्री.म. माटे

विवेक मराठी    07-Apr-2023
Total Views |
@राजेश कुलकर्णी
 
 
book
 
 
•श्रीपाद महादेव माटे यांची ओळख सामान्यत: साहित्यिक म्हणून करून दिलेली दिसते. ते शाळेत असताना त्यांनी प्रासंगिक मोह टाळल्याच्या प्रसंगावर आधारित एक पाठ शिकल्याचे आठवते. त्यांनी अस्पृश्यांकरिता केलेल्या कार्याचे तपशील त्यांच्या आत्मचरित्रात आलेले आहेत. मात्र त्यांनी दलितांसाठी केलेल्या कामाचा उल्लेख अतिशय त्रोटक स्वरूपात करून दिला जातो. त्यांची ही ओळख विस्ताराने सांगितली जात नाही, हा त्यांच्यावरील मोठाच अन्याय ठरतो. ‘समाजसुधारक श्री.म. माटे - एक निरीक्षण’ हे डॉ. मधुकर पुरुषोत्तम उपाख्य बापू केंदूरकर यांनी लिहिलेले पुस्तक ही कसर भरून काढण्याचे महत्कार्य करते. त्यांनी माटे यांच्या सामाजिक कार्यावर पीएच.डी.चा प्रबंध लिहिला होता. या पुस्तकाचा परिचय करून देतानाच श्री.म. माटे यांच्या अलौकिक सामाजिक कार्याबद्दल सांगण्याबरोबरच ते कार्य उलगडून दाखवण्याच्या डॉ. केंदूरकर यांच्या कौशल्याबद्दल सांगण्याचेही प्रयोजन आहे.
 
 
अरुण करमरकर यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत केंदूरकर यांच्या कार्याची व पुस्तकात सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळलेल्या माटेंच्या व्यक्तिमत्त्वाची व कार्याची अतिशय उत्तम पद्धतीने ओळख करून दिली आहे.
 
 
माटेंचे बालपण अठराविशे दारिद्य्रात गेले. ते एक वर्षाचेही नसताना वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांच्या आईवर त्यांच्यासह पाच मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पडली. सर्वात धाकट्या असलेल्या माटेंच्या जीवनावर आईने काढलेल्या खस्तांचा कायमस्वरूपी संस्कार झाला. पुढे विपरीत आर्थिक परिस्थितीतून येणार्‍या मर्यादांमुळे क्रांतिकार्यात सहभागी न होता सरकारी नोकरी पत्करायची नाही, एवढे त्यांनी स्वत:पुरते ठरवले.
 
 
समाजसुधारणेचे प्रयत्न करताना होणार्‍या ‘पूर्वज मूर्ख होते का?’ या सामान्य प्रतिवादावर मात करताना ‘जुने ते सारेच चूक’ असे न म्हणता ते आज गैरलागू असल्याचे सांगणे सुधारणेला उपकारक ठरते, असे माटे म्हणत. आजच्या काळात नव्याची कालोचितता, उपयुक्तता व अनिवार्यता सांगणे, हेही त्यांना महत्त्वाचे वाटले. क्रांतीद्वारे होणारी आणि लोकांना पटवून देत होणारी समाजसुधारणा यातील फरक ते जाणत. अस्पृश्यता नष्ट होण्याबरोबरच त्यांना स्वत:च्या उद्धारासाठी सुयोग्य उपयोजन करण्याची संधी मिळाली पाहिजे, त्याकरिता आवश्यक संधिसमानत्वासाठी प्रयत्न करणे हेच अस्पृश्यतानिवारणाच्या क्षेत्रातील पहिले पाऊल असले पाहिजे आणि त्यातून स्पृश्यास्पृश्य समाजांची आवश्यक ती सरमिसळ होईल, अशी माटेंची खात्री होती. त्यामुळे काही सुधारकांनी या क्षेत्रात सहभोजन व मिश्रविवाह यांचा जो आग्रह धरला होता, तो माटेंनी टाळला. एक तर मिश्रविवाह आणि सहभोजन या अस्पृश्यतेच्या संदर्भातील खर्‍या समस्या नव्हेत, कारण अनेक जातींमध्ये, पोटजातींमध्येसुद्धा एकमेकांमध्ये रोटीबेटी व्यवहार होत नाहीत. तेव्हा हे प्रश्न सुधारणेच्या प्रयत्नात घेणे म्हणजे अस्पृश्यतेच्या कक्षेबाहेरच्या प्रश्नांची गल्लत करत मूळ प्रश्नाला फाटे फोडणे ठरते, असे माटेंचे मत होते. माटेंनी अनेकदा अस्पृश्यांसमवेत सहभोजन केलेले असूनही त्यांनी विविध कारणांमुळे त्याला फारसे महत्त्व न दिल्याचे दिसते. अस्पृश्यांच्या देहाला विटाळ आहे, त्यांच्या स्पर्शाने जलाशय विटाळतात आणि दर्शन घेतले असता मंत्रप्रतिष्ठापित मूर्ती भ्रष्ट होतात असेच ज्या समाजाला अजून वाटत आहे, त्याच्यापुढे तुम्ही अस्पृश्यांशी लग्न करा असा उपदेश वेडगळपणाचा ठरेल, असे त्यांचे मत होते.
 
 
पुस्तकाचे नाव - समाजसुधारक श्री.म. माटे - एक निरीक्षण
• लेखक - डॉ. मधुकर पुरुषोत्तम केंदूरकर
•* प्रकाशक - श्रीमती शशिकला केंदूरकर व शमांगी देशपांडे
• पृष्ठसंख्या - 272 • मूल्य - 300 रु.
• संपर्क - शमांगी देशपांडे - 9822408957
 
 
राजकारणापासून अलिप्त राहून समाजसुधारणेचे काम करण्यामागे माटेंची निश्चित अशी भूमिका होती. राजकारणामध्ये विविध समाजसमूहांचे हितसंबंध आड येत असल्यामुळे राजकारणी समाजसुधारणा करू शकत नाहीत, या निष्कर्षाप्रत ते आले होते. त्यामुळेच गांधींच्या व काँग्रेसप्रणीत सामाजिक सुधारणांच्या स्वरूपाला त्यांचा विरोध होता. त्यातही ‘आधी ब्रिटिशांपासून सुटका की सामाजिक सुधारणा?’ हा वाद विसाव्या शतकाच्या सुरुवातीला चर्चिला गेला. सामाजिक सुधारणांची वाट पाहत बसल्यास ब्रिटिश आणखी दोनशे वर्षे येथून हलणार नाहीत, हे ओळखून ब्रिटिशांपासून सुटका करून घेण्यासाठी आवश्यक त्या सामाजिक सुधारणा करणे गरजेचे आहे, हे त्यांनी ओळखले. याचा अर्थ त्यांनी अस्पृश्यतानिवारणाचे जे प्रयत्न कळकळीने केले, ते केवळ या व्यवहारापोटी होते असे अजिबात नव्हे. त्या काळातील जवळजवळ वीस वर्षांमधील त्यांची दिनचर्याच त्यांची या कामीची कळकळ दाखवते. गांधींनी आपल्या प्राणांची भीती घालत केलेल्या अस्पृश्यता संपवण्याच्या प्रयत्नांना माटेंचा स्पष्ट विरोध होता. अशी भीती घालून केलेल्या प्रयत्नांना मिळणारे फळ हे वरवरचे असेल, अस्पृश्यता मनातून घालवण्यासाठी त्याचा अजिबात परिणाम होणार नाही, असे त्यांनी गांधींना सांगितले. अस्पृश्यतेच्या मुळाला गांधी वा काँग्रेसी नेते हात घालत नसल्यामुळे वरवर होणारे समाजसुधारणेचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत, हिंदू समाज एकत्र येत नाही आणि दुसरीकडे मुसलमान नेते मात्र काँग्रेसच्या व्यासपीठावरूनच भारतातील अस्पृश्यांची हिंदू व मुसलमानांमध्ये विभागणी करण्याचे आवाहन करण्याइतके शिरजोर होतात, हे त्यांनी दाखवून दिले. 1923च्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना अली बंधूंपैकी मुहम्मद अली यांनी ही अतिशय संतापजनक मांडणी केल्याचा त्याला संदर्भ होता. अली यांच्या विधानाबद्दल माटे यांनी गांधींना विचारले असता गांधींनी मोघम उत्तर दिल्याचे ते सांगतात. माटेंनी असे धाडस अनेक वेळा केल्याचे दिसते. समाजकार्यात असलेली, मात्र परंपरागत कल्पनांना घट्ट चिकटून असलेली मंडळी आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ युरोपीय विचारवंतांचे दाखले बळेच दामटत असत. ते पाहून माटेंनी थेट त्या विचारवंतांशीच पत्रव्यवहार करून त्यांची मते जाणून घेतली. हिंदूंचे धर्मांतर करण्याचे मुसलमानांचे उद्योग पाहून त्यांनी थेट आगाखान यांनाही पत्र लिहिले.
 
 
सुरुवातीच्या काळात आरक्षणाची कल्पना नसली, तरी राजकारणातून अस्पृ्श्यांना ‘झुकते माप’ दिल्यास त्यातून त्यांचे आर्थिक उन्नयन होऊन अस्पृश्यतानिवारणास मदत होईल अशी कल्पना माटे यांनी मांडली. अस्पृश्यांच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नयनाची जबाबदारी समाजातील सर्वच घटकांनी घ्यायला हवी, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून त्यांची दूरदृष्टी कळू शकते. हिंदूंच्या धर्मपरिवर्तनासाठी प्रयत्न करणार्‍या शक्तींवर टीका करताना माटेंनी स्वकीयांचेही कान टोचले आहेत. रोगराई उद्भवल्यास प्रत्येक वस्तीत मदत पोहोचवली जाते; मात्र धर्माला रोग लागत असल्याचे दिसत असूनही शंकराचार्य व विविध संतमंडळी वस्त्यांमध्ये पोहोचून त्यांना आधार देत नसल्यामुळे मिशनर्‍यांचे फावते, हे त्यांचे निरीक्षण अचूक होते.
 
 
माटे यांनी आपल्या सामाजिक कार्याची कधीच प्रसिद्धी केली नाही. तब्बल वीस वर्षे केलेल्या या कार्यासाठी त्यांनी कधीही इतरांकडून धनाची अपेक्षा केली नाही. खासगी शाळेतील तुटपुंज्या पगारातून आणि इंग्लिश शिकवणीच्या वर्गातून मिळणार्‍या मोबदल्यातून त्यांनी हे काम केले. अतिशय विपरीत परिस्थितीमध्येही इतरांपुढे हात न पसरण्याची त्यांच्या आईची शिस्त त्यांनी पाळली. मात्र यातील प्रसिद्धिपराङ्मुखतेमुळे त्यांच्या कार्याबाबत दुष्प्रचार करणार्‍यांचे फावत असे. सामाजिक लोकशाहीमध्ये भिन्न गटांमधील मतभेदांमधून मार्ग काढायचा असतो, हे उमजत असूनदेखील समाजसुधारणांसाठीच्या प्रयत्नांमधील त्यांच्या एककल्लीपणाचा केंदूरकर उल्लेख करतात. या भूमिकेमुळे एखादी व्यक्ती अधिकाराने मोठी आहे म्हणून तिचे म्हणणे मान्य करायलाच हवे, अशी मर्यादा आपल्यावर न पडल्याचे माटेंनी नमूद केले. त्यातूनच गांधींच्या हरिजन सेवक संघाचे प्रमुख कार्यवाहपद स्वीकारण्याचा प्रस्ताव त्यांनी नाकारला. माटे यांच्यामध्ये अनेक उपजत गुण होते, मात्र त्यांच्या या स्वभावामुळे त्यांच्या कार्यविस्तारावर मर्यादा पडल्याचे महामहोपाध्याय द.वा. पोतदार यांनी सांगितले. मात्र इतरांचा सल्ला मानण्याचे माटेंनी ठरवले असते, तर आधीच या सुधारणांना असलेला समाजाचा विरोध पाहता समाजसुधारणेची आमटी किती पातळफुळूक झाली असती, याचा विचार करून माटेंच्या स्वभावदोषाचे कारण देत त्यांच्यावर अन्याय होऊ नये असे वाटते. शिवाय माटेंनी एककल्लीपणा केला असे क्षणभर समजले, तरीही मांग व चांभार यांच्या वस्तीमध्ये जाऊन काम करण्यासाठी त्यांनी शंभरपेक्षा अधिक स्पृश्य मुलांना उद्युक्त करणे, अस्पृश्य समाजातूनही कार्यकर्ते निर्माण करणे, अस्पृश्य समाजातील मुलांसाठी वीसएक शाळा थोडीथोडकी नाही, तर तब्बल दहा वर्षे चालवणे, त्यांच्यामध्ये आपल्या हेतूबद्दल विश्वास निर्माण करणे व त्यातून त्यांच्या अन्य समस्यांच्या निवारणासाठी प्रयत्न करणे आणि हे सारे पदरमोड करत करणे.. हे कार्य छोटे आहे, असे कोणीही म्हणणार नाही.
 
 
 
माटेंनी स्वीकारलेल्या समाजसुधारणेच्या व्रतामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचा संपूर्ण पाठिंबा होता. मात्र प्रत्येक कार्यकर्त्याची स्थिती तशीच असणे अशक्य आहे, याची त्यांना कल्पना होती. जन्मभर अस्पृश्यांसाठीचे वसतिगृह चालवणार्‍या एका ब्राह्मण कार्यकर्त्याची पत्नी ‘आपण आयुष्याच्या अखेरीस तरी थोड्या चांगल्या वस्तीत जाऊन राहू या ना?’ असे म्हणाल्याचा उल्लेख केंदूरकर करतात. स्वत: माटेंनी पदरखर्चातून समाजसेवा केली असली, तरी त्यातून स्वत:चे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते, हे समजण्याचा व्यावहारिकपणा त्यांच्याकडे होता.
 
 
 
माटेंच्या कार्याची नीटशी माहिती न घेताच डॉ. आंबेडकरांनी त्यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळते. माटेंनी एखाद्या अस्पृश्याबरोबर रोटीबेटीचा व्यवहार केला आहे का? हा प्रश्न त्यांनी ‘बहिष्कृत भारत’मधील एका लेखात विचारल्याचे दिसते. अस्पृश्य समाजात काम करणार्‍या माटेंचा बाबासाहेबांकडून सत्कार व्हावा, या कार्यकर्त्यांकडून सतत होणार्‍या विनंतीला बाबासाहेबांनी एकदा मान दिला. मात्र महारवस्तीत काम करून घरी जाता, तेव्हा तुमचे शुद्धीकरण केले जाते का? या बाबासाहेबांच्या प्रश्नावर माटेंनी होकारार्थी उत्तर दिल्यावर बाबासाहेबांनी त्यांचा सत्कार करण्याचा आग्रह करणार्‍या आपल्या कार्यकर्त्यांनाच दटावले, अशी एक कथा वाचण्यात येते. मात्र तिला काही आधार दिसत नाही. माटेंच्या कार्याला त्यांच्या कुटुंबीयांचा पाठिंबा असल्याचा उल्लेख आधी केलाच आहे. काहीही असले, तरी माटेंनी अतिशय तळमळीने मांग व चांभार वस्त्यांमध्ये केलेले काम त्यांच्या नजरेस पडलेच नव्हते का? त्यांची माटेंशी भेट झाली होती का? हे प्रश्न अनुत्तरित राहतात. एकीकडे ही परिस्थिती, तर स्पृश्यांकडून ‘महार माटे’ म्हटले जाण्याव्यतिरिक्तही नको ती दूषणे दिली जात असतानाही ते विचलित झाले नाहीत.
 
 
केवळ भूतदयेपोटी समाजसुधारणा करू पाहिल्यास फसगत होते, त्यामुळे अस्पृश्यतेविरुद्धचे काम समाजशास्त्रीय अभ्यासातून व्हायला हवे, असे माटेंचे म्हणणे होते. तसे करण्याने आपण सुधारणांना विरोध करणार्‍यांना या कार्याची निकड समजावून देऊ शकू, अशी त्यांना खात्री होती. अस्पृश्य म्हणजे ‘शिवण्यास अयोग्य’ हा नकारात्मक भाव पाहता त्यांनी ‘अस्पृष्ट’ म्हणजे ‘कोणी शिवत नसलेले’ या अर्थाची शब्दयोजना केली, हे किती जणांना माहीत असते? राजकारणामुळे हिंदूंमधील विविध घटकांच्या आकांक्षा जागृत होत असल्यामुळे याचा मूलभूत अभ्यास न केल्यास हिंदू समाज दुभंगण्याचा धोका त्यांनी ओळखला होता. त्यामुळे त्यांनी अनेक भारतीय परंपरागत ग्रंथांसह ब्रिटिशांनी केलेल्या विविध जातविषयक पाहण्यांचे व या संदर्भात काम केलेल्या अनेक युरोपीयांच्या अहवालांचे अफाट वाचन केले. या अभ्यासामधूनच ते हिंदूंचे धर्मांतर करू पाहणार्‍यांचा प्रभावीपणे प्रतिवाद करू शकले. हिंदू धर्माबद्दलची त्यांची निष्ठा हा हे कार्य करण्यामागच्या त्यांच्या प्रेरणेपैकी एक प्रमुख घटक असला, तरी ते करताना त्यातील कालविसंगत त्याज्य बाबी कोणत्या, हे त्यांनी चांगले ओळखले होते. समाजसुधारणा करताना एकीकडे अस्पृश्यांमधील पिढ्यानपिढ्या चालत आलेली हीनतेची भावना दूर करणे आणि दुसरीकडे स्पृश्य समजल्या जाणार्‍या समाजमनामध्ये मुरलेला वांशिक श्रेष्ठत्वाचा भाव दूर करणे अशा दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागेल, हे आताच्या काळात कदाचित सामान्य वाटले, तरी पूर्वाभ्यासातून त्यांच्या लक्षात आले होते. या संदर्भात ‘गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव होऊ द्या, मग ते आपोआपच जागे होतील’ या बाबासाहेबांच्या वचनाशी ते साधर्म्य सांगतात.
 
 
 
सामाजिक चिंतन करताना माटेंना त्यांच्या नेणिवेतून मानसिक द्वंद्वाला सामोरे जावे लागले, हे केंदूरकर दाखवून देतात. मात्र त्याच वेळी ‘शास्त्रे जरी अस्पृश्यतानिवारणाच्या विरुद्ध गेली, तरी ती बिल्कुल मानू नयेत’ असे माटे म्हणत असल्याचे ते दाखवतात. सामाजिक विषयांवर चिंतन करताना परस्परविरोधी मते व्यक्त केलेली दिसणे हे अनेक थोर व्यक्तिमत्त्वांबाबत घडताना दिसते. आर्य बाहेरून आले ही समजूत अगदी अलीकडे दूर झाली, मात्र माटेंच्या काळात तोच समज रूढ असल्यामुळे त्यांना वंशशुद्धी महत्त्वाची वाटली असावी, असे केंदूरकर म्हणतात. जातिव्यवस्था वर्णपद्धतीतून सुरू झाली का? आर्य बाहेरून आले, तेव्हा येथे अस्पृश्यता आधीपासूनच अस्तित्वात होती का? आधी वर्णपद्धतीत व नंतर जातीपद्धतीत वंशशुद्धी हाच एक घटक अस्पृश्यता पाळली जाण्यासाठी कारणीभूत होता की त्यास आर्थिक हितसंबंध हा घटकदेखील जबाबदार होता? इथपासून ते जातिव्यवस्था केवळ विविध व्यवसायांमुळे सुरू झाली व अस्पृश्यता मुस्लीम आक्रमकांच्या भारतातील आगमनापासून सुरू झाली, इथपर्यंत टोकाची मते मांडली जाताना दिसतात. त्यापैकी आर्य बाहेरून आले हा मुद्दा एव्हाना निकालात निघाला आहे. माटेंच्या या बाबतीतील मतांचा केंदूरकरांनी ऊहापोह केला आहे. त्याचबरोबर माटेंच्या काळापूर्वीची व समकालीन सुधारकांची याबाबतची मतेही त्यांनी मांडली आहेत. वंशशुद्धीबद्दलच्या कल्पनेचे समर्थन त्यांनी आपल्या नेणिवेतून केले असावे, तर वंशशुद्धीविरुद्धची मते त्यांनी आपल्या व्यावहारिक व तर्कशुद्ध भूमिकेतून मांडली आहेत, अशा दोन्ही तर्‍हा केंदूरकरांनी दाखवून दिल्या आहेत. ब्राह्मण ही जात फार फार तर हिंदूंमधील प्रगत जात असू शकेल, कारण ती राजकारणग्रस्त आहे, असे परखड मत माटेंनी मांडले होते. विरोधाभासाचा हा प्रकार आयुष्याच्या विविध टप्प्यातील चिंतनातून झालेल्या लिखाणातून झाला आहे का, हे पडताळायला हवे. जातिव्यवस्था त्रिवर्णीयांप्रमाणेच अस्पृश्यांमध्येही असते, हे सांगताना त्यांनी महारांमधील व नागांमधील आपल्याला अकल्पनीय वाटेल इतक्या संख्येने असलेल्या पोटजातींची यादीच दाखवली. वांशिक भिन्नतेच्या कल्पनांमुळे सर्व मानवी समूहांमध्ये हे घडणे नैसर्गिक आहे, हे त्यांनी दाखवून दिले. काहीही असले, तरी अशा प्रकारच्या चर्चेपेक्षा माटेंनी भोगलेल्या दारिद्य्राला पुढे सामाजिक अन्यायाच्या वास्तवाची जोड मिळाल्यावर त्यांनी अस्पृश्यतानिवारणाचे जे काम केले, त्याला तोड नाही. अशा विषयातील कोणतीही वरवरची कळकळ सलग वीस वर्षे टिकू शकत नाही.
 
 
 
माटेंनी समाजाचा अभ्यास करताना स्पृश्यास्पृश्यतेच्या पलीकडच्या परिघातील वनवासी, गिरिवासी व गुन्हेगार गणल्या गेलेल्या जाती अशांची नोंद घेत त्यांचाही आर्थिक व सामाजिक अंगांनी अभ्यास केला. आधुनिकतेमुळे परंपरागत व्यवसाय बंद पडलेल्यांची अन्य सोय न झाल्यामुळे त्यांना मजुरीकडे वळण्याखेरीज इतर पर्याय उरत नाही व त्यातून वेगळेच सामाजिक प्रश्न निर्माण होतात, हे आजही दिसणारे वास्तव त्यांनी त्या काळात ओळखले.
 
 
 
माटेंचे सामाजिक कार्य उलगडून दाखवताना केंदूरकर यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा परामर्श येथे घेणे विस्तारभयामुळे अशक्य आहे. त्यासाठी पुस्तकच वाचायला हवे. सुरुवातीला म्हटले, तसे माटेंची प्रमुख ओळख साहित्यिक अशी आहे. त्यांनी लिहिलेल्या कथांमध्येही त्यांच्या सामाजिक कळकळीचे प्रतिबिंब उमटले नसते तरच नवल. दहा टक्के साहित्यिक जरी माटेंसारख्या ‘सामान्य’ माणसासारखे क्रियाशील झाले, तर समाज बदलण्यास वेळ लागणार नाही. ‘आधी केले, मग सांगितले’ हा माटेंनी सांगितलेला सामाजिक पाठ हिंदू समाजाने अंगीकारला, तर समाज म्हणून झालेली अवनतीची परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही, हा माटेंचा संदेश केंदूरकर समर्थपणे वाचकांपर्यंत पोहोचवतात.