हिंदू-मुस्लीम सद्भाव जपणारे प्रा. श.नू. पठाण

‘टाकीचे घाव’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. ‘गावचा खजिना : गावातील लाखमोलाची माणसं’ यात त्यांच्या संपर्कात आलेली सहृदय, त्यांच्या हुशारीला आणि मनमिळाऊ स्वभावाला मन:पूर्वक दाद देणारी, प्रसंगी पदरमोड करणारी गावातील लोकांची व्यक्तिचित्रणे आहेत. या दोन्ही पुस्तकांचा मजकूर एक-दुसर्‍याला पूरक असल्याने येथे त्यांचा एकत्र परिचय करून द्यायचा आहे.

विवेक मराठी    08-Apr-2023   
Total Views |
‘टाकीचे घाव’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. ‘गावचा खजिना : गावातील लाखमोलाची माणसं’ यात त्यांच्या संपर्कात आलेली सहृदय, त्यांच्या हुशारीला आणि मनमिळाऊ स्वभावाला मन:पूर्वक दाद देणारी, प्रसंगी पदरमोड करणारी गावातील लोकांची व्यक्तिचित्रणे आहेत. या दोन्ही पुस्तकांचा मजकूर एक-दुसर्‍याला पूरक असल्याने येथे त्यांचा एकत्र परिचय करून द्यायचा आहे.

book
आतापर्यंत प्रा. डॉ. शहाबुद्दीन नूरमहंमद पठाण, निवृत्त उप-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (नागपूर) विद्यापीठ यांची ओळख वाचकांना झाली असेल. ते मुस्लीम मराठी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. तेथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांसाठी त्यांचे भाषण फारसे सुखावह ठरले नसले, तरी परिणामकारक होते. संमेलनाचा आढावा घेणार्‍या लेखात मी त्यांचा आवर्जून उल्लेख केला होता. तेथे उपस्थित असलेल्या मुस्लीम मराठी श्रोत्यांना त्यांनी स्पष्ट शब्दात खडे बोल सुनविले होते की त्यांच्या स्थानिक हिंदू समाजाशी एकरूप होण्याच्या गाड्या दोनदा सुटल्या आहेत. जेव्हा भारतात दहशतवाद सुरू झाला, त्याच्या विरोधात ते रस्त्यांवर उतरले नाहीत. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी बहुसंख्य हिंदूंविरोधात भूमिका घेतली. हिंदूंनी त्यांच्या या वागणुकीचा विपरीत अर्थ घेतला आणि दहशतवादाला त्यांचा मूक पाठिंबा आहे असे ते धरून चालले, तर हिंदूंना दोषी धरता येणार नाही. त्यांचे भाषण सुरू असताना संयोजक त्यांना भाषण संपविण्यासाठी सुचविणार्‍या चिठ्ठ्या पाठवत होते. एका वेळी तर ते क्षुब्ध झाले. त्यांनी काय सांगायचे होते ते परखडपणे सांगूनच व्यासपीठ (आपल्याकरता, इतरांसाठी विचारपीठ) सोडले. मला आठवते, भाषणाच्या सुरुवातीलाच पठाणांनी ‘व्यासपीठ’ असाच निर्देश केला होता. विचारपीठ हा शब्द भारतीय संस्कृतीचा विटाळ होणार्‍या डाव्या विचारसरणीने जन्माला घातला, तेथे बोलणारे वक्ते त्याचीच री ओढत होते.
 
 
प्रा. पठाण यांची दोन पुस्तके संमेलनात प्रसिद्ध झाली. त्यांच्या भाषणानंतर मी त्यांना जाऊन भेटलो, परखडपणे विचार मांडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. दोन्ही पुस्तकांवर त्यांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या. आमचे जुजबी बोलणे झाले. संमेलनावरून परतल्यावर मी त्यांची दोन्ही पुस्तके वाचून काढली. माझ्या डोळ्यासमोर त्यांच्या बाळपणचे खेडेगाव पिंप्री जलसेन, ता. पारनेर उभे राहिले. ‘टाकीचे घाव’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. ‘गावचा खजिना : गावातील लाखमोलाची माणसं’ यात त्यांच्या संपर्कात आलेली सहृदय, त्यांच्या हुशारीला आणि मनमिळाऊ स्वभावाला मन:पूर्वक दाद देणारी, प्रसंगी पदरमोड करणारी गावातील लोकांची व्यक्तिचित्रणे आहेत. या दोन्ही पुस्तकांचा मजकूर एक-दुसर्‍याला पूरक असल्याने येथे त्यांचा एकत्र परिचय करून द्यायचा आहे.
 
 
गवंड्याचे कुटुंब
 
प्रा. पठाणांच्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय गवंडी कामाचा होता. घरात अठराविशे दारिद्य्र होते. दोन वेळचे जेवायला मिळेल याची शाश्वती नसे. अशा वेळी धान्याचे पीठ अत्यंत अल्प किंमतीत हमखास देणारे काशीगीर बाबांचे व्यक्तिचित्रण त्यांनी ‘गावचा खजिना’त केले आहे. जेव्हा घरात काहीच नसे आणि फाके पडण्याची वेळ येई, तेव्हा त्यांच्या आईने अत्यंत अल्प मोबदल्यात काशीगीर बाबांकडून पीठ आणल्यावर घरात चूल पेटत असे. इथे पठाणांची कृतज्ञतेची भावना नमूद करण्यासारखी आहे. नोकरी लागून प्राध्यापक झाल्यावर ते जेव्हा गावी जात, तेव्हा काशीगीर बाबांना भेटण्यास जात. कारण त्यांच्या खांद्यावरील त्या भगव्या झोळीने व ‘अलख निरंजन’ या मंत्रानेच आमच्या घरची चूल पेटल्याची आठवण मी त्यांना करून देत असे. ते त्या बाबतीत मंद हास्य करून, “बाबा रे, तू अधिक शीक व आई-वडिलांचे पांग फेड” असा मला आशीर्वाद देत. पठाणांच्या लिखाणात ही कृतज्ञता पानोपानी उतरली आहे. गावचा खजिना हे त्यांचे पुस्तक त्यांच्या जीवनात वेळोवेळी आलेल्या उदारहृदयी व्यक्तींविषयीच्या आदरपूर्वक आठवणींनी परिपूर्णपणे सजले आहे.
 
 
पठाणांवर त्यांच्या आईच्या - अमिनाबींच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे. त्या अत्यंत करारी, सचोटीच्या, कुटुंबदक्ष, दूरदृष्टीच्या आणि सुस्वभावी होत्या. स्वत: पठाण यांनी आणि पुस्तकाला प्रस्तावना लिहिणार्‍या त्यांच्या सुहृदांनी त्यांच्या आईची तुलना साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’मधील आईच्या व्यक्तिचित्राशी केली आहे. पठाणांच्या शालेय शिक्षणाबाबत त्या अत्यंत आग्रही होत्या. प्रसंग पडला तर 12-15 कि.मी. पायपीट करून त्या दुपारचा डबा पोहोचवून देत. अशिक्षित असल्या, तरी वेळोवेळी अगदी योग्य सल्ला देऊन त्यांनी पठाणांना पुढे जाण्याची प्रेरणा दिली. बाहेरगावी कामाला गेलेल्या पतीने दुसरे लग्न केल्याची बातमी ऐकल्यावर त्या पत्ता काढत पतीच्या गावी गेल्या. तेथे मजुरी करणार्‍या इतर महिलांशी होणारी पतीची वागणूक निरखली आणि तसे काही नसल्याची खात्री झाल्यावर त्या घरी परत आल्या. या प्रसंगात बालवयात असलेल्या पठाणांकडे वडिलांवर लक्ष ठेवण्याचे काम आले होते. तो प्रसंग मुळातून वाचण्यासारखा आहे.
 
 
पात्रता ओळखणारे शिक्षक
 
पठाणांच्या आयुष्याला वळण देणारी अत्यंत महत्त्वाची घटना ते सातवीच्या परीक्षेत तालुक्यातून पहिले आल्यावर घडली. हा कोण हुशार मुलगा आहे याचा शोध करत शेजारच्या गावातील शिक्षक सायकलवरून त्यांना भेटायला आले. त्यांनी पाहिले की पठाणांच्या घरची परिस्थिती शिक्षण घेण्यासारखी नाही. त्या वेळी ते गवंडी कामावर लागण्याच्या मानसिकतेत होते. त्या शिक्षकांनी आईला आणि गावकर्‍यांना गळ घालून पठाणांना तालुक्याच्या ठिकाणी शिकण्याची व्यवस्था केली. गणवेश घेऊन दिला. जनसेवा विद्यालय, वडझिरे या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या, ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद’ असलेल्या शाळेत त्यांना प्रवेश मिळाला. इथून त्यांची प्रगती सुरू झाली. या शाळेत त्यांनी शेती, बागायती असे शारीरिक कष्टाचे काम केले. पुढे जाऊन रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात कमवा आणि शिका या विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली. नवे उपक्रम सुरू केले.
 
 
हा प्रवास सोपा नव्हता. परिस्थितीचे चटके बसत होते. पैशांची अडचण हरघडीस होती. पठाणांना प्रत्येक अडचणीच्या वेळी मदत करणारे हात पुढे आले. त्यातील बहुतांश हिंदू होते. महाविद्यालयात शिक्षण, नोकरी, पीएच.डी.साठी नोंदणी करण्याची मिळालेली प्रेरणा, त्यासाठी नोंदणी करताना आलेला सुखद अनुभव हे सर्व मुळातून वाचण्यासारखे आहे.
 
 
समाजातील सहृदयता
 
दोन्ही पुस्तके वाचताना एक गोष्ट सतत जाणवत राहते की त्यांच्या मदतीला आलेल्यांचे अनेक प्रकारचे ऋण ते मोकळेपणे मान्य करतात. त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे, घरात स्वयंपाकघरापर्यंत प्रवेश देऊन, स्वहस्ते चहा करून पाजणारे प्राध्यापक, अशी उदारहृदयी मंडळी त्यांच्या आयुष्यात आल्यामुळे त्यांची प्रगती सुकर होत गेली. ‘टाकीचे घाव’ हे त्यांचे आत्मचरित्र खरोखरीच जीवनसंघर्षाचा आणि सामाजिक सहृदतेच्या धर्मातीत अनुभवाचा आलेख आहे. त्यात लग्न होऊन नव्या घरी गेल्यावर आठवडाभरातच पत्नीचा सोन्याचा दागिना गहाण टाकण्याचा प्रसंग आला आहे. त्यांची पत्नी क्षणभराचा विचार न करता सोन्याची साखळी त्यांना देते. भविष्यातील भरभराटीच्या आणि सुखी कौटुंबिक आयुष्याची ती विलक्षण सुरुवात होती. त्यानंतरचा प्रवास फार खोलात जाऊन दिलेला नाही. धावता आढावा आहे. The rest is historyअसे म्हणता येईल.
 
 
‘गावचा खजिना’ या पुस्तकातील वर्णने वाचताना कळते की त्यांचे गाव धार्मिक भेदांपासून अलिप्त होते. ते दहीहंडी फोडण्यासाठी निवडले गेले. तेथे त्यांचा धर्म आडवा आला नाही. त्यांच्या अंगावर पडलेला दहीहंडीचा प्रसाद भक्त हिरिरीने वेचून खात होते. लेखकाला नोकरी लागल्यावर आईने ग्रामदैवत रोकडोबाला त्याच्या वजनाचा गूळ वाटून नवस फेडला. लेखकाचे चार क्रमांकाचे मामा नबाबभाई भजनात रमत. रामनवमी, गोकुळाष्टमी, गावातील उरूस, भजन-कीर्तन अशा अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे. धार्मिक तेढीचा स्पर्श गावाला तोवर झाला नव्हता. गावात अनेक कर्तृत्ववान लोक होते. ते गावाशी एकरूप झाले होते. त्यांच्यापैकी काहींनी गावातच तर काहींनी पुणे-मुंबईत येऊन उद्योगधंद्यात नाव काढले.
 
 
ही दोन्ही पुस्तके वाचताना आपण एखादे आदर्श गाव कसे असावे याचा वस्तुपाठ वाचतो आहोत, असे वाटते. त्यातील एकही व्यक्तिमत्त्व बनवून अथवा तिखटमीठ घालून व्यक्त केलेले जाणवत नाही. एक विशेष म्हणजे ‘गावचा खजिना’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मुख्य चित्र ग्रामदैवत रोकडोबा आणि त्याच्या भोवताली पुस्तकात आलेल्या एकूण अठरा व्यक्तींची रेखाचित्रे आहेत. त्यांनी जीवन सहचारिणी निवडताना ती नमाज पढते याची खात्री करून घेतली, लग्नाला जाण्यापूर्वी पद्धतीनुसार ते नमाज पढून आले. व्यक्तिगत धार्मिक व्यवहारात ते कमी पडलेले दिसत नाहीत. पठाणसाहेब खर्‍या अर्थाने भारतीय आहेत. त्यांची संस्था धार्मिक सद्भाव वाढविण्याचे आणि हिंदू-मुस्लीम एकोप्याचे काम करते. त्यांची व्यवसायिक कारकिर्दसुद्धा अतिशय नेत्रदीपक होती. त्यांना मिळालेल्या व्यावसायिक जबाबदार्‍या त्यांनी निपुणतेने पार पाडल्या. उच्चशिक्षण क्षेत्रात कामाचा ठसा उमटविला.
 
 
अनेक प्रतिष्ठित संस्थांनी त्यांचा गौरव केला. सरसंघचालक के. सुदर्शनजींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. श्रेयनामावली वाचताना एक गोष्ट लक्षात आली की अनेक हिंदू संस्थांनी त्यांचा गौरव केला. मात्र एकाच मुस्लीम संस्थेचे, विदर्भ मुस्लीम खपींशश्रश्रशर्लीींरश्र र्ऋेीीाचे नाव त्यात समाविष्ट आहे. देशातील सांस्कृतिक प्रवाहापासून वेगळे, फटकून राहणार्‍या इस्लामी धार्मिक-सामाजिक संस्थाचालकांना ते आपले वाटले नसतील, त्यामुळे बाकी मुस्लीम संघटनांनी त्यांना वाळीत टाकलेले दिसते. हे या देशातील वास्तव आहे. त्यावर मात करून हिंदू-मुस्लीम ऐक्य साधू पाहणारे प्रा. पठाणसाहेब वाहून घेतलेल्या आपल्या नव्या शुभकार्यात यशस्वी होवोत, अशा त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.
 

डॉ. प्रमोद पाठक

अभियांत्रिक म्हणून उच्चविद्याविभूषित असणारे डॉ. प्रमोद पाठक हे 'गोवा एनर्जी डेव्हलपमेण्ट एजन्सी' अर्थात 'गेडा'चे प्रमुख म्हणून काम पाहतात. कामानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहण्याचा त्यांना वारंवार योग आला. मुस्लीम प्रश् आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांचा खास अभ्यासविषय आहे. या विषयावरील लेखन साप्ताहिक विवेक तसेच अन्य नियतकालिकांतून सातत्याने प्रकाशित होत असते.