दहा तोंडांचे संजय राऊत..

विवेक मराठी    10-May-2023   
Total Views |

raut
संजय राऊत पूर्वी भाजपावर टीका करीत होते. आता ते सर्वच राजकीय पक्षांवर टीका करीत आहेत. त्यामुळे त्यांना नक्की किती तोंडे आहेत? असा प्रश्न पडला आहे. पण राऊतांना आवर घातला जात नाही. हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न निर्माण होतो.
2009च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत सेना-भाजपा युतीचा दारुण पराभव झाला होता. मुंबईतील सहापैकी पाच जागी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते. यावर सामना वृत्तपत्रातून ‘मराठी माणसाने खंजीर खुपसला’ अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला होता. सर्वच स्तरांतील मराठी माणसांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. नंतर खुद्द बाळासाहेबांनी याची दखल घेऊन, “संजय राऊतांनी तो लेख लिहिला” असे सांगून सारवासारव केली. यावरून लक्षात येते की, राऊतांनी आपल्या तोंडातील वाक्य सामन्यात छापून बाळासाहेबांनाही अडचणीत आणण्याचे काम केले होते. बाळासाहेबांनंतर राऊत यांना मोकळे रानच मिळाले आहे. महाराष्ट्रात सध्या राजकारणातील माध्यमांना बातम्या पुरवणारे आणि माध्यमस्नेही कोण असतील तर ते म्हणजे संजय राऊत! त्यांची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. 2019पासून माध्यमांना रोज काहीतरी बातमी देणारे म्हणजे संजय राऊत आहेत. सकाळी सकाळी राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर बेछूट आरोप करायचे, त्यानंतर माध्यमांनी त्यावर दिवसभर बातम्या चालवायच्या, हा रतीबच घालून दिली होता. त्यांच्या आरोपांवर कोणी पुरावे मागत नाहीत की त्यांना प्रतिप्रश्न करीत नाहीत. त्यामुळे राऊतही अगदी बेछूट आरोप करीत असतात. ते करताना त्यांच्यात पंचमहाभूतांतील मोठी शक्ती असल्यासारखाच त्यांचा आवेश असतो. आपण म्हणजे उबाठा आहोत, आपण म्हणजेच सामना पेपर.. त्यामुळे अगदी शिवराळ भाषा वापरायला ते मागे-पुढे पाहत नाहीत. त्यांनाही प्रसिद्धीची एवढी सवय झाली आहे की, एक दिवस काही बडबडले नाही, तर त्यांना दिवस जात नसेल. गेल्या काही दिवसांपासून भाजपाने संजय राऊत यांच्या आरोपांना, टीकेला फक्त नितेश राणेच उत्तर देणार अशा प्रकारची रचना केली. त्यामुळे माध्यमांपासून राऊतांची कोंडीच झाली आहे. राऊत काही बोलले, तर नितेश राणे शेरास सव्वाशेर अशी प्रतिक्रिया देत आहेत. यामुळे राऊतांच्या प्रसिद्धीलाही मर्यादा आल्या आहेत. हवी तशी प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळेच ते आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर तोंडसुख घेऊ लागले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या आठवड्यात त्यांनी काँग्रेसवर टीका केली. त्यावर नाना पटोले यांनी त्यांना झापले. राऊतांनी हा चोंबडेपणा बंद करावा असे प्रत्युत्तर देऊन गप्प केले. अजित पवारांनी तर “कोण संजय राऊत?” अशी टीका करून इज्जतच काढली. काल संपादकीयमधून राऊत यांनी राष्ट्रवादीच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केले, त्यावर भुजबळांनी त्यांना झापले आहे. राऊतांनी टीका करायची आणि तोंडघशी पडायचे, अशी राऊत यांना सवयच लागली आहे.
 
 
शिवसेना-भाजपाचे सरकार 2014 ते 2019पर्यंत सत्तेत होते. सरकार म्हटले की काही हेवेदावे आणि मानापमानाचे प्रसंग येणारच. त्यामध्ये वरिष्ठ नेत्यांनी पडद्याआड समन्वय करून सरकार कसे एकत्र काम करते हे दाखवायचे असते. पण सरकारमध्ये आमचा कसा अपमान होत आहे, आम्ही किती नाराज आहोत हे सांगणारे अग्रलेखच सामनामधून प्रसिद्ध होत असत. अगदी गलिच्छ भाषेत सरकारवर टीका करण्याचे काम केले होते. राऊत हे कोणाच्या सांगण्यावरून करत होते का, की ते स्वप्रेरणेने टीका करतात, हा संशोधनाचा विषय आहे. आज उबाठा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. काही महिन्यांपासून चिन्ह व पक्ष गमावलेल्या उबाठाला महाविकास आघाडीत मोठेपण मिळत आहे. पण तरीही राऊत यांच्या तोंडाचा दांडपट्टा सुरूच आहे. उद्धव ठाकरे मात्र त्यांना का आवर घालत नाहीत? असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा भाजपा-सेना युतीमध्ये वितुष्ट आणण्याचे काम राऊत यांनी केले. आता महाविकास आघाडीत तेच करीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा याला आशीर्वाद आहे, या शंकेला वाव आहे. आता उबाठासेनेच्या वाचाळवीरांच्या यादीत आणखी भर पडली आहे, ती म्हणजे सुषमा अंधारेंची. पण त्यांना माध्यमांमधून फारशी प्रसिद्धी मिळत नसल्याने ते समजून येत नाही. अशा वाचाळवीरांना जर पक्षप्रमुखांनी आवर घातला नाही, तर आहे त्या शिल्लक पक्षाचे पतन होण्यासाठी दुसर्‍या बंडाची गरज भासणार नाही, ते आपोआपच होईल....