जयेश मेस्त्री

मनोरंजनातून समाजप्रबोधन हा स्वा. सावरकरांचा मुख्य हेतू होता. विचारांचा प्रचार करणे हाच सावरकरांच्या प्रसिद्ध आणि प्रकाशित नाटकांचा हेतू होता. सावरकरांनी लिहिलेल्या दोन कादंबर्यादेखील प्रचारकी आहेत. सावरकरांच्या नाट्यप्रवासाचा मागोवा घ्यावासा वाटतो तो त्यांच्या तीन नाटकांमुळे. त्यांना नाटककार म्हणून लौकिक मिळवून देण्यात या तीन नाटकांचा मोठा वाटा आहे.
स्वा. सावरकरांची प्रसिद्ध झालेली आणि प्रकाशित झालेली तीन नाटके म्हणजे 1927 साली प्रसिद्ध झालेले ’संगीत उ:शाप’, 1931मध्ये ’सन्यस्त खड्ग’ आणि साधारण 1933 साली प्रसिद्ध झालेले ’संगीत उत्तरक्रिया’. ते रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांनी ही तिन्ही नाटके लिहिली. ह्या तीन नाटकांमुळे आपण स्वा. सावरकरांना नाटककार म्हणतो. कॉलेजमध्ये असताना त्यांनी नाटकात काम केले होते. नाटकाचे दिग्दर्शनही केले होते. त्यांनी ऑथेल्लो नाटकात इयागो नावाची भूमिका केली असल्याचेही म्हटले जाते. परंतु या कारणामुळे त्यांना नाटककार म्हणता येणार नाही. कॉलेजजीवनात आपण अशा गोष्टी करत असतो. एखादी व्यक्ती कॉलेजच्या टीममधून क्रिकेट खेळत असली, तरी त्या व्यक्तीला पुढे जाऊन आपण क्रिकेटर म्हणत नाही. सांगायचे तात्पर्य - सावरकरांच्या नाट्यप्रवासाचा मागोवा घ्यावासा वाटतो तो या तीन नाटकांमुळे, त्यांना नाटककार म्हणून लौकिक मिळवून देण्यास या तीन नाटकांचा मोठा वाटा आहे. इतकेच काय, तर 1943 साली ते नाट्यमहोत्सवाचे अध्यक्षही राहिले होते. आता सावरकरांनी नाटके का लिहिली? असा प्रश्न पडतो. या 13 वर्षांच्या आधी किंवा नंतर त्यांनी नाट्यलिखाणाला इतक्या प्रकर्षाने हात घातलेला नाही.
सावरकरांच्या साहित्याची ताकद त्यांच्या साहित्यामुळे झालेल्या परिणामांवरून दिसून येते. ‘1857चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथावर प्रकाशनापूर्वी बंदी घालण्यात आली होती. मात्र बंदी घातल्यानंतरही हे पुस्तक पुष्कळ गाजले. अनेक क्रांतिकारकांनी या पुस्तकातून प्रेरणा घेतली. भगतसिंह आणि सुभाषबाबू यांसारख्या महान देशभक्तांनी प्रकाशकाची भूमिकादेखील निभावली होती. थोडक्यात, या पुस्तकाच्या बाबतीत सांगायचे तर कंसाने देवकीचे 7 पुत्र मारले, परंतु 8वा पुत्र निसटला आणि त्याने कंसाचा वध केला; तसेच सावरकरांच्या या पुस्तकावर बंदी घातली, तरी इतर अनेक मार्गांनी हे पुस्तक प्रकाशित झाले आणि क्रांतिकारकांना इंग्रजांविरोधात लढण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या नाटकांच्या बाबतीत असेच म्हणायला हवे.
खरे पाहता सावरकरांचे सबंध जीवन नाट्यमय होते, म्हणूनच चिंतामणराव कोल्हटकरांसारखे मोठे कलाकार म्हणतात की सावरकरांच्या जीवनावर नाटके लिहिली पाहिजेत. सावरकरांनी नाट्यलेखन एका विशिष्ट हेतूने केले आहे. ’काळे पाणी’ आणि ’मोपल्यांचे बंड’ या कादंबर्या लिहितानादेखील त्यांच्या मनात विशिष्ट हेतू होता. त्यांचे असे मत होते की जे काम व्याख्यानाने होत नाही, ते काम नाटकाने होते. लोकांना जागृत करण्यासाठी, आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी नाटके लिहिली आहेत. परंतु हा दोष न मानता हा गुण आहे असे मानायला हवे. पुढे डावी चळवळ जी यशस्वी झाली, ती अशाच प्रचारकी नाटकांच्या आणि कलेच्या जिवावर. आजही कलेच्या क्षेत्रात डाव्यांचा मोठा पगडा आहे. ’दि कश्मीर फाइल्स’ आणि ’दि केरला स्टोरी’ हे दोन्ही प्रचारकी चित्रपट आहेत. या चित्रपटांमुळे लोकांना वास्तव कळू शकले. अनेक व्याख्यानांनी आणि इतिहासाच्या पुस्तकांनी जे काम केले नसते, ते काम या दोन चित्रपटांनी केले आहे. आपल्याकडे पूर्वीपासूनच कथेच्या माध्यमातून संस्कार करण्याची पद्धत आहे. केवळ आनंदनिर्मिती हे नाटकाचे कार्य नसून संसार कसा असावा हेही नाटकाने दाखवले पाहिजे, असे त्यांचे मत होते.
सावरकरांच्या प्रचारकी वृत्तीबद्दल चिंतामणराव कोल्हटकर यांनी एक किस्सा सांगून ठेवला आहे. ’सन्यस्त खड्ग’ हे नाटक ’बलवंत नाटक मंडळी’ सादर करत होते. नाटक संपल्यावर सावरकरांच्या सन्मानार्थ मित्रमंडळींसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम करण्याचा विचार मांडला, तेव्हा सावरकरांनी अट घातली की ’ते सहभोजन असावे.’ कोल्हटकर लिहितात, ‘कोणत्याही प्रसंगी त्यांना (सावरकरांना) आपल्या भूमिकेचा विसर पडत नसे. एखाद्या प्रचारकाप्रमाणे ते प्रसंग मिळताच त्याचा आपल्या कार्याला उपयोग करून घेतल्याविना सोडीत नसत.’ त्यांच्या प्रचारकी वृत्तीनेच त्यांच्यातला नाटककार जागृत केला, असे म्हणायला हवे. सन्यस्त खड्ग या नाटकात त्यांनी सशस्त्र क्रांतीच्या लढ्याला पाठबळ दिले आहे. सावरकरांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला असता विरोधकांनी त्यांना रिक्रुइटवीर म्हणून हिणवले. परंतु हिंदू तरुण सैन्यात भरती झाले आणि ते इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले नाहीत, ही इंग्रजांपुढील डोकेदुखी होती. सुभाषबाबूंनीदेखील 1944मध्ये आकाशवाणीच्या भाषणातून सैनिकीकरणाचा पुरस्कार केला आहे. आपला हा सैनिकीकरणाचा आणि सशस्त्र क्रांतीचा विचार त्यांनी या नाटकातून मांडला आहे. सेनापती विक्रम प्रयोग म्हणून बुद्ध तत्त्वज्ञान स्वीकारतो. मात्र 40 वर्षांनंतर शाक्य राज्यावर आक्रमण होते, तेव्हा विक्रम पुन्हा तलवार उचलतो. राष्ट्राचे रक्षण करणे हे पहिले कर्तव्य आहे, असा संदेश सावरकर देतात. शस्त्राने शास्त्राचे रक्षण करावे लागते. त्यांच्या नाटकाचा प्रभाव असा की डॉ. ना.भा. खरे हे नाटक पाहताना अत्यंत भावुक झाले होते.
त्यांची नाटके प्रचारकी असली, तरी मनोरंजनाला बगल देऊन त्यांनी नाटके रचली नाहीत आणि त्याचबरोबर केवळ मनोरंजनासाठीदेखील नाटके लिहिलेली नाहीत. मनोरंजनातून समाजप्रबोधन हा मुख्य हेतू होता. सावरकर म्हणत - ‘वसंत व्याख्यानमालासह कृतिमाला महत्त्वाची आहे.’ सावरकर स्वत: कृतिशील नेते होते. इतर नेत्यांप्रमाणे केवळ भाषणे देण्यालाच त्यांनी महत्त्व दिले नसून त्यांनी स्वत: मोठी व अगदी लहानसहान कामे केली आहेत. संगीत उत्तरक्रियेचे वाचन सुरू असताना त्यांना एका गावाला भेट देण्यासाठी काही मंडळी बोलवायला आली. तेव्हा सावरकरांनी त्यांना विचारले की, “तुमच्या गावातील स्पृश्यास्पृश्य मुले एकत्र बसून शिक्षण घेऊ लागली, तर मी गावी अवश्य येईन.” भारताला स्वतंत्र करण्यासाठी आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रगतिपथावर येण्यासाठी हिंदूंचे संघटन महत्त्वाचे होते. जातीपातीत विभागले गेलेले हिंदू राष्ट्र कसे समृद्ध करतील? त्यामुळे सावरकरांनी रत्नागिरी पूर्वास्पृश्यता निवारण्याचे काम हाती घेतले. पतितपावन मंदिराची स्थापना केली, अखिल हिंदू गणेशोत्सव सुरू केला. ‘हिंदुत्व’ या ग्रंथामधून त्यांनी एक व्यापक दृष्टीकोन मांडला. काँग्रेसने स्वातंत्र्यप्राप्तीपेक्षा हिंदी-मुस्लीम ऐक्यावर भर दिला. हा त्यांच्यासाठी प्रयोग होता, मात्र त्यामुळे अनेक हिंदूंना प्राणाची आहुती द्यावी लागली. काँग्रेसचा हा प्रयोगदेखील फसला आणि रक्तरंजित फाळणीला सामोरे जावे लागले. इतकेच काय, तर हा प्रश्न आजही आ वासून आपल्यासमोर उभा आहे.
सावरकरांचे ‘उ:शाप’ हे नाटक हिंदुत्व या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. पाकिस्तानी प्रवृत्तीला हिंदू समाज नष्ट करायचा आहे आणि सावरकरांच्या विचारांवर चालणार्यांना हिंदू समाज एक करायचा आहे. ज्याप्रमाणे सन्यस्त खड्गमध्ये सुलोचना या सुंदरीच्या पतीला जेव्हा शत्रू पकडून नेतात आणि शरण आला नाहीत तर त्याला मारण्याची धमकी देतात, तेव्हा सुलोचन झालेली पुरुष वेश धारण करून आलेली सुलोचना म्हणते, ‘’आता शरण नव्हे रण, मारित मारित मरण.” हे वाक्य आजही सावरकरांच्या फ्लोमध्ये (प्रवाहामध्ये) ऐकले, वाचले, म्हटले तरी रक्त सळसळते. हे खरे तर सावरकरांच्या नाट्यलिखाणाचे यश आहे. आज सावरकरांवर गलिच्छ आरोप होत असताना हिंदुत्ववाद्यांनी संताप व्यक्त करत बसण्यापेक्षा किंवा हळहळ व्यक्त करण्याऐवजी प्रचारकी दृष्टीकोनाने लहानसहान कामे हाती घेतली पाहिजे. सावरकर साहित्याचा, चरित्राचा व त्यांच्या विचारांचा कल्पक पद्धतीने प्रचार व प्रसार झाला पाहिजे. लक्षात ठेवा, व्याख्यानाने आणि लेखाने जे काम होत नाही, ते एका लहानशा कृतीतून, कलेच्या माध्यमातून आणि तरुणाईच्या कल्पकतेतून होऊ शकते.
नाट्यकला प्रसार मंडळीने सावरकरांचे ‘संगीत उ:शाप’ हे नाटक रंगभूमीवर आणले. रत्नागिरीत स्थानबद्ध झाल्यानंतर सावरकरांनी अस्पृश्योद्धाराचे काम हाती घेतले, त्याचबरोबर शुद्धी हेदेखील महत्त्वाचे कार्य होते. हिंदुत्वाच्या दृष्टीकोनातून ही कामे होत होती. या नाटकात त्या विचारांचा प्रचार दिसून येतो. सनातनी लोक किसन, कमलिनी आणि शंकरला पाण्याच्या स्रोताजवळ फिरकू देत नाहीत. मुस्लीम जाऊ शकतात, पण हिंदूंना मनाई आहे. अशा अपमानाला कंटाळून शंकर मुस्लीम होतो, शिकंदर होतो आणि सैन्यात भरती होतो. तो किसनला मुस्लीम व्हायला सांगतो. तेव्हा किसन म्हणतो, “अरे, तुझी पाटीलकी काय, पण मला कोणी राजपद देऊ केले आणि त्या राज्यावर बसताच जर हिंदू धर्माचा ध्वज काढून टाकला, तर ते सिंहासन लाथाडून मी हिंदू धर्माच्या धुळीत उडी घेईन.” हा सावरकरांचा हिंदुत्वविषयक विचार किसनच्या मुखी सहज येतो. सवर्णांचा हिंदू धर्मावर जितका अधिकार आहे, तितकाच तो इतर सर्व हिंदूंचा आहे, हा संदेश सावरकर देतात. या नाटकातले अंतिम दृश्यसुद्धा रोमांचक आहे. कमलिनी तिच्यावर बलात्कार करणार्यावर प्रहार करते. इतर शिपाई जेव्हा तिच्याशी लगट करू पाहतात, तेव्हा शिकंदर झालेला शंकर शिपायांना मारून टाकतो. या झटापटीत कमलिनी घायाळ होते. ती आता वाचणार नाही, हे पाहून तो तिला दिलेल्या वचनाची आठवण करून देतो आणि म्हणतो की ‘’तू माझ्या मिठीत मर.” यावर कमलिनी म्हणते की “मी हे वचन शिकंदरला नव्हे, तर माझ्या शंकरला दिले होते.” असे म्हणताच शंकर स्वत:च्या पोटात चाकू खुपसून घेतो आणि म्हणतो, “शिकंदर मेला, आता उरलाय तो शंकर..” या भावुक आणि दु:खात्मक प्रसंगातून सावरकर हिंदू असण्याचे महत्त्व सांगतात. शुद्धीकरण, अस्पृश्यतानिवारण, हिंदुत्व असा विचार सावरकर या नाटकातून देतात.
ब्रिटिश काळात लोकांनी एक समज करून घेतला होता की हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा आहे. आपले पूर्वज मूर्ख होते असेही काही लोक समजत. ‘सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ लिहून सावरकरांनी हा समज दूर केला. मात्र त्याआधी ‘संगीत उत्तरक्रिया’ हे नाटक लिहून त्यांनी जनमनावर हे बिंबवण्याचा प्रयत्न केला की पानिपतचे युद्ध मराठे हरले असले, तरी पुढे मराठ्यांनी पहिले माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वात उत्तर दिग्विजय केला आहे. हे नाटक पानिपतच्या पराभवाचा सूड घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आहे. ‘उत्तरक्रिया म्हणजे उत्तर जिंकण्याची क्रिया’ असे सावरकरांना म्हणायचे आहे. या नाटकात वेडीचे एक पात्र आहे. ती वेडी म्हणते,
सोनपत पानपत, तुमची आमची गेली पत.
पादशहा हिंदुपत घ्या घ्या सूड. साप विंचू मुंगुस पाल.
मराठ्यांनो करा वार. मोगलांची तोडा ढाल.
दिल्लीच्या बादशाहीच पाडा रणात धूड.
मग उत्तरक्रिया - आधी भाऊंचा सूड.
विश्वासाचा सूड. पानपतचा सूड.
हे नाटक लिहिण्याचे कारण म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याजोगे तरुण पिढी पराक्रम गाजवू शकेल. विचारांचा प्रचार करणे हाच सावरकरांच्या तिन्ही प्रसिद्ध आणि प्रकाशित नाटकांचा हेतू होता. सावरकरांनी लिहिलेल्या दोन कादंबर्यादेखील प्रचारकी आहेत. पण प्रचारकी असण्यात काहीच वावगे नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. सावरकर ध्येयवादी होते, कृतिशील होते. सावरकर जिथे गेले, तिथे जे जे करण्यासारखे होते, ते ते सर्व त्यांनी केले. प्राप्त परिस्थितीत आपले काम करणे हेच महत्त्वाचे असते. डाव्या विचारसरणीने थेट आणि गुप्त स्वरूपात कलेच्या माध्यमातून लोकांच्या मनावर आपले विचार बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे. आज ‘दि कश्मीर फाइल्स’ आणि ‘दि केरला स्टोरी’ अशा चित्रपटांची चर्चा होते. परंतु सावरकरांनी जवळजवळ 100 वर्षांआधीच याची सुरुवात केली होती. नाटक हे त्या वेळी एक प्रभावी माध्यम होते. आता काळ बदलला आहे. चित्रपट आणि वेब सिरीज ही आता प्रभावी माध्यमे बनली आहेत. या प्रभावी माध्यमांचा पुढे योग्य असाच उपयोग होईल अशी आशा करायला मुळीच हरकत नाही.
मुख्य संदर्भ
सावरकरांची नाटके
रत्नागिरी पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
सावरकर : एक चिकित्सक अभ्यास - डॉ. प्र.ल. गावडे