बंदिवासातील काटे आणि फुले

विवेक मराठी    17-May-2023
Total Views |
@विकास पांढरे । 9970452767
  
book
वसंत कृष्ण मराठे हे ऑक्टोबर 1975 ते मार्च 1977 या आणीबाणीच्या कालावधीत मिसा कायद्यान्वये येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध होते. वसंतरावांच्या आणीबाणीतल्या कटू-गोड आठवणी पत्रांच्या माध्यमातून श्रीकांत वसंत मराठे यांनी संकलित केल्या आहेत. याद्वारे निर्माण झालेला ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे ‘सज्जनतेचा बंंदिवास’ हे पुस्तक होय.
भारतीय लोकशाहीच्या इतिहासात 26 जून 1975 ते 21 जून 1977 हा 21 महिन्यांचा काळ अंधारकाळ समजला जातो. या कालावधीत व्यक्तिस्वातंत्र्याची व लेखनस्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्यात आली होती. सरकारविरोधात आवाज उठविणार्‍या कार्यकर्त्याला तुरुंगवास भोगावा लागला. आणीबाणीच्या या काळ्या दिवसात ज्या कार्यकर्त्यांनी तुरूंगवास भोगला, सत्याग्रह केला, त्यातील एक सत्याग्रही म्हणजे वसंत कृष्ण मराठे.
वसंत मराठे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक होते. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रीय विचारांचा वसा जपला. रा.स्व. संघात मुंबई महानगरात बौद्धिक विभाग, संपर्क विभाग प्रमुख, मुंबई महानगर कार्यवाह, 1985नंतर काही वर्षे भाग संघचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. ऑक्टोबर 1975 ते मार्च 1977 या आणीबाणीच्या कालावधीत मिसा कायद्यान्वये ते येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध होते.
बंदिवासात असताना त्यांनी आपला अभ्यास व छंद जोपासला. शिवाय त्यांनी आपल्या कुटुंबासाठी काही पत्रे लिहिली. यातील काही निवडक पत्रांचा प्रस्तुत पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. या सर्व पत्रांमध्ये वसंतरावांनी सुख दु:खांना, भावभावनांना महत्त्व दिले आहे. पत्रसंवादाची भाषा लालित्यपूर्ण नसली, तरी आशय मात्र अर्थपूर्ण आहे.
वसंतरावांची कुटुंबाविषयीची अतीव ओढ, आई वत्सलाबाई, पत्नी भाग्यश्री, बहीण कमल, भाऊ माधव, मुले श्रीकांत, सुलभा यांना लिहिलेल्या पत्रांतून वसंतरावांच्या भावनांचा कॅलिडोस्कोप समोर येतो. पत्रांचे वाचन करताना वसंतरावांचा कुटुंबसंस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती सूक्ष्म आणि सखोल आहे, हे लक्षात येते. पत्रसंवादातून जीवनाचे अनेकविध पैलू ते उलगडून दाखवितात.
 
मिसाखाली बंदिवान म्हणून वसंतरावांचा संघर्ष उभा राहतो, त्यांच्या कुटुंबाच्या अंतरंगातही संघर्ष वाट्याला येतो. आई वत्सलाबाईंचे आजारपण, लहान बहीण कमलचे झालेले अकाली निधन, पत्नी भाग्यश्रीची होणारी ओढाताण यातून त्यांच्या भावनेचा बांध मोकळा होताना दिसतो. वसंतराव लिहितात, ‘आपल्या कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्यापासून आम्हा सर्वांना वंचित केले आहे. स्वतंत्रपणे वावरण्याची मुभा नाही. कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्ये येथे असल्यामुळे पार पडता येत नाहीत, याबद्दल कधीकधी वाईट वाटते. शारीरिक हाल नसले, तरीही जी मानसिक रुखरुख आहे, त्यामुळे तुुरूंगवास काळ म्हणजे काळाचा अपव्ययच होय.’
वसंतरावांना पॅरोल मिळावा यासाठी माधव यांनी केलेले प्रयत्न, सरकारच्या हटवादी भूमिकेविषयी केलेले भाष्य वाचनीय आहे. परममित्र चंदू गोडबोले यांना लिहिलेल्या पत्रामधून आणीबाणीच्या भीषण स्वरूपाचे दर्शन घडते. या पुस्तकातील सर्वच पत्रांतला संवाद सुखदु:खाशी जोडणारा आहे. त्यामुळे नव्या पिढीतल्या स्वयंसेवकांनी त्यांचे अनुभव वाचणे आणि समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.