भूशास्त्राचा अभ्यासपूर्ण वेध

विवेक मराठी    19-May-2023
Total Views |
श्रीराम शिधये । 9967989253

vivek
भूशास्त्र या विषयाचा पद्धतशीर अभ्यास करणारे सोडले, तर या शास्त्राबद्दल बहुसंख्य लोक अनभिज्ञ असतात. भूस्खलन, भूकंप किंवा त्सूनामीसारख्या नैसर्गिक आपत्ती आल्या की मग मात्र या शास्त्राचं नाव वर्तमानपत्रांतून वाचनात येतं. पण निनाद भागवत यांनी आपल्या ‘ओळख भूशास्त्रा‘ची पुस्तकामध्ये या सार्‍याचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. त्यामुळे वाचकांना याबद्दल अधिक माहिती मिळते..
 
निनाद भागवत या तरुण आणि उच्चविद्याविभूषित लेखकाने भूशास्त्राची सर्वांगीण ओळख करून देणारं पुस्तक लिहिलं आहे. भागवत यांनी याच विषयावर मुंबईच्या तरुण भारतमध्ये एक लेखमाला लिहिली होती. त्याच लेखांवर संस्कार करून आणि त्यांच्यामध्ये आवश्यक ते बदल करून त्यांनी प्रस्तुतचा देखणा ग्रंथ सिद्ध केला आहे. देखणा हे विशेषण उत्तम प्रतीच्या कागदाला, रंगीत छायाचित्रांना, विविध आकृतींना उद्देशूनच नाही, तर वाचकाच्या माहितीच्या कक्षा वाढवणार्‍या, त्याला या शास्त्राची सर्वांगीण ओळख करून देणार्‍या आशयाला आहे. भूशास्त्र या विषयाचा पद्धतशीर अभ्यास करणारे सोडले, तर या शास्त्राबद्दल बहुसंख्य लोक अनभिज्ञ असतात. भूस्खलन, भूकंप किंवा त्सूनामीसारख्या नैसर्गिक आपत्ती आल्या की मग मात्र या शास्त्राचं नाव वर्तमानपत्रांतून वाचनात येतं.
 
 
 
आपण ज्या पृथ्वीवर राहतो, तो ग्रह चैतन्यशील, स्पंदनशील, नवनिर्मितिक्षम असून जैविक बहुविधतेने नटलेला आहे. त्यावर लहानसहान टेकड्या आहेत, तसेच आल्प्स आणि हिमालयासारखे पर्वत आहेत. भूभागावर ज्वालामुखी आहेतच, तसेच महासागरांतही आहेत. अफाट विस्ताराचा आणि अचाट खोलीचा प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिणी महासागर, आर्क्टिक महासागर याच्याबरोबरच अरबी समुद्र, बंगालचा उपसागर यासारखे समुद्र आहेत. पृथ्वीचा जवळपास 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीच्या पोटात अनेक खनिजं आणि धातू आहेत. विविध प्रकारचे खडक आहेत. एकंदर भूभागामध्येसुद्धा चकित करणारं वैविध्य आहे. सर्वार्थाने अतिशय संपन्न असलेली पृथ्वी ही आपल्या आकाशगंगेमध्ये सुमारे 450 कोटी वर्षांपूर्वी जन्माला आली. ही आकाशगंगा ज्या विश्वाचा एक लहानसा भाग आहे, त्या विश्वाचा जन्म सुमारे 1300 कोटी वर्षांपूर्वी झाला. विश्वाचं ’वय’ लक्षात घेतलं, तर आपली पृथ्वी बरीच ’तरुण’ आहे. ही तरुणी आपल्या आकाशगंगेत बिंदुवत आणि एकंदर विश्वाच्या पसार्‍यात वाळूचा अगदी लहानगा कण असावा इतकीच आहे. मात्र पृथ्वीवरील माणूस नावाच्या प्राण्याने आपल्या बु्द्धिमत्तेच्या, प्रतिभेच्या, कल्पकतेच्या, चिकाटीच्या, अथक मेहनतीच्या जोरावर पृथ्वीचा, तिच्या जन्माचा आणि तिच्या एकंदर रूपाचा शोध घेतला आहे आणि अजूनही घेतच आहे. याचं कारण पृथ्वीमध्ये सतत बदल होत असतात. उदाहरणार्थ, संपूर्ण भारतीय उपखंड अतिशय मंद गतीने उत्तरेकडे सरकत आहे, तर प्रशांत महासागराचा सामुद्रिक ठोकळा (ओशनिक प्लेट) कालपरत्वे पूर्वेकडील उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांखाली चालला आहे.
 
 
निनाद भागवत यांनी आपल्या प्रस्तुतच्या पुस्तकामध्ये या सार्‍याचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. तो घेताना आपण सर्वसामान्य वाचकांसाठी लिहीत आहोत, याचं त्यांनी अचूक भान ठेवलं आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या विवेचनाला पूरक ठरतील अशी छायाचित्रं, आकृत्या, तक्ते दिले आहेत. त्यामुळे वाचत असलेली भूशास्त्राची माहिती समजण्यास मदतच होते. विषय कठीण आणि अतिशय गुंतागुंतीचा असला, तरी लेखकाने तो अधिकाधिक सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इथेच लेखकाची परीक्षा असते. याचं कारण प्रतिपाद्य विषय सोपा करताता त्यातील आशय ’पातळ’ होणार नाही किंवा निसटणार नाही, हे साध्य करणं ही तारेवरची कसरत असते. भागवत यांनी ती चांगल्या प्रकारे केली आहे. पुस्तकामध्ये, ’पृथ्वीबद्दल जाणून घेताना, पृथ्वीच्या अंतरंगात, रचनात्मक भूशास्त्र, पृथ्वीचा इतिहास, भूरसायनशास्त्र, जलशास्त्र, नैसर्गिक आपत्ती, विविध खंडांची प्राकृतिक वैशिष्ट्ये, ग्रहीय भूशास्त्र आणि दूरसंवेदन आणि करियर मार्गदर्शन’ अशी 10 प्रकरणं आहेत. ज्यांना या विषयाची अधिक माहिती करून घ्यावयाची आहे, त्यांना उपयोगी पडणारे संदर्भ दिले आहेत. पारिभाषिक शब्द आणि त्यांचे इंग्लिश प्रतिशब्दही दिले आहेत. अगदी शेवटी असलेला छायाचित्रांचा भाग चकित करणारा आणि माहितीपूर्ण आहे.
 
 
 
लेखकाने भूशास्त्रामधील विविध ज्ञानशाखांचा करून दिलेला परिचय वाचकाला अनेक अर्थांनी संपन्न करणारा आहे. पाणी हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे आणि भविष्यामध्ये तो अधिकच गहन होणार आहे. भारत देशाचा विचार केला, तर पाऊस हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्याबद्दल भागवत सांगतात, ’पृथ्वीवर होणार्‍या एकूण पर्जन्यापैकी सुमारे पाच टक्के पर्जन्य हिमस्वरूपात होत असतो. असे असले, तरी पृथ्वीच्या एकूण ताज्या जलसाठ्यापैकी सुमारे 75 टक्के जलसाठा हिम आणि बर्फस्वरूपात आहे. याचा अर्थ पावसापासून आपल्याला केवळ 25 टक्के जलसाठाच वापरावयास मिळतो. याचे कारण म्हणजे बराचसा पाऊस समुद्रावर होतो आणि त्या पावसाचे पाणी आपल्याला वापरावयास मिळत नाही. बराचसा हिमरूपी जलसाठा उंच पर्वतांमध्ये आणि ध्रुवांमध्ये आहे. त्यामुळे तोही आपल्याला सहजपणे वापरायला मिळत नाही. पण जेव्हा हे हिम वितळते, तेव्हा त्यातून निर्माण झालेले पाणीच नद्यांमधून वाहत येते आणि आपल्याला वापरायला मिळते.’ या नद्यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणारीसुद्धा ज्ञानशाखा आहे. लेखक सांगतात, ’नदीशास्त्र ही शाखा नद्यांच्या शास्त्रीय अभ्यासासाठी वाहून घेतलेली आहे. शास्त्रीय अभ्यासात नदीचा प्रवाह, त्या प्रवाहामुळे तिच्या पात्राची झालेली झीज, तसेच तिने वाहून आणलेला गाळ इत्यादीचा अभ्यास केला जातो. याशिवाय या शाखेमध्ये नदीप्रवाहामुळे निर्माण झालेल्या विविध भूस्तरांचाही अभ्यास केला जातो.’ विविध ज्ञानशाखा परस्परांशी किती आणि कशा रितीने गुंतलेल्या असतात आणि त्यांच्या एकत्रित अभ्यासातूनच आपल्याला ’भूशास्त्रा’ची माहिती मिळवता येते, हेच यावरून स्पष्ट होतं.
 
 
 
गेल्या काही वर्षांमध्ये माणसाने आपल्या सूर्यमालेतल्या ग्रहांचा आणि उपग्रहांचा अभ्यास सुरू केला आहे. चंद्रावर आणि मंगळावरसुद्धा वसाहत उभारण्याचं स्वप्न माणूस बघतो आहे. पण तसं करण्यापूर्वी आपल्याला त्या त्या ग्रहाची किंवा उपग्रहाची अधिकाधिक माहिती मिळवणं आवश्यक असते. तिथली वैशिष्ट्यं समजून घ्यावी लागतात. ती कशी माहीत करून घ्यायची? तर ’दूर संवेदन शाखे’तून. भौतिकशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स या चार शाखांच्या एकत्रीकरणातून ही शाखा तयार झाली आहे. या शाखेचा विचार करणारं प्रकरण अतिशय उत्कंठावर्धक आहे. खरं तर तर प्रस्तुतचं पुस्तकच आपली पृथ्वीची रचना आणि तिची चकित करणाारी वैशिष्ट्यं यांच्याबाबतीची उत्कंठा वाढवणारं, अनेक कुतूहलांची उत्तरं देणारं आणि त्या त्या गोष्टीबाबत अधिक माहिती करून घेण्यास उद्युक्त करणारं आहे. हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. वाचकाला माहितीसंपन्न करणारं हे पुस्तक आवर्जून वाचावं आणि संग्रही ठेवावं असंच आहे.
• पुस्तकाचे नाव - ओळख भूशास्त्राची
• लेखक - निनाद भागवत
• प्रकाशन - भूभौतिक प्रकाशन, डोंबिवली (पूर्व)
• पृष्ठसंख्या - 188
• मूल्य - 1000 रुपये.