ग्रामीण महिलांसाठी सुधारित शेती अवजारे

विवेक मराठी    23-May-2023
Total Views |
@डॉ. लालासाहेब तांबडे । 8411894295
 
शेतीकामात महिलांचा महत्त्वाचा सहभाग असतो. शेतीची विविध कामे करताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सुधारित कृषी अवजारे वापरल्याने कामाची गती वाढून कामे सुखकर होतात. वेळेची, शक्तीची व पैशाची बचत होते.

krushivivek
शेतीमध्ये महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणावर आहे. शेतीतील विविध कष्टप्रवण कामे महिलांना करावी लागतात. ही सर्व कामे जास्तीत जास्त वेळ व मानवी ऊर्जा लागणारी आहेत. शेतकरी महिला खूपच कमी प्रमाणात शेती अवजारांचा वापर करताना दिसून येतात. यामुळे त्यांना थकवा जाणवतो व कामाचे प्रमाणही कमी होते. शेतीतील विविध कामे करत असताना महिलांची शारीरिक स्थिती अनैसर्गिक होते. त्यामुळे महिलांमध्ये पाठीचे, मानेचे आजार दिसून आले आहेत.
 
 
शेतीकामातील थकवा जास्तीत जास्त शारीरिक दगदगीमुळे जाणवतो. यासाठी शेतीची सुधारित अवजारे वापरली, तर बराच शारीरिक ताण कमी होतो. विविध शेतीकामातील अवजारे तयार करताना महिलांचे शारीरिक मापंदड घेतले जातात. त्यामुळे सुधारित अवजारे वापरण्याने कामाची गती वाढून कामे सुखकर होतात. वेळ, शक्ती व पैसा यांची बचत होऊन कामाची प्रत सुधारते. ग्रामीण महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या विविध कृषी अवजारांची येथे अंदाजे किंमत, वजन व वापरण्याची पद्धत देत आहोत.
 
 
भेंडी तोडणी कात्री
 
* भेंडी फळे तोडण्यासाठी याचा उपयोग होतो.
 
* एका दिवसात एक महिला 50 ते 60 किलो भेंडी तोडते.
 
* भेंडी तोडताना लव टोचत नाही.
 
* तोडणीचे काम पारंपरिक पद्धतीपेक्षा दुपटीने होते.
 
* या कात्रीची अंदाजे किंमत रु. 45/- प्रति नग आहे.
 
 
 
मका सोलणी यंत्र
 
 
* वाळलेल्या मक्याची दाणे काढण्यासाठी उपयोग होतो.
 
* एक मजूर 200 किलो मक्याची कणसे एका दिवसात सोलतो.
 
* यंत्र आकाराने लहान व वजनाने हलके असते. त्यामुळे हातात सहजपणे जास्त श्रम न पडता धरता येते.
 
* लहान प्रमाणावर मका सोलण्यासाठी फार उपयोगी आहे.
 
* या यंत्राची अंदाजे किंमत रु. 50/- प्रति नग आहे.
 
 
वैभव विळा
 
* गहू, ज्वारी, गवत इत्यादींची कापणी जमिनीलगत करता येते.
 
* दातेरी पात्यामुळे धार लावावी लागत नाही
 
* वजनास हलका आणि अधिक चांगली पकड असून समतोल साधून सहज कापणी होते.
 
* एका तासामध्ये 1 गुंठ्याची कापणी करता येते.
 
* वैभव विळ्याची अंदाजे किमत रु. 50/- प्रति नग आहे.
 
 
भुईमूग शेंगा फोडणी यंत्र
 
 
* भुईमूग शेंगा फोडण्यासाठी याचा उपयोग होतो.
 
* या यंत्राच्या साहाय्याने भुईमुगाच्या शेंगांपासून दाणे व टरफले वेगळी केली जातात.
 
* एका दिवसात या यंत्राच्या साहाय्याने एक व्यक्ती 65 ते 70 किलो शेंगा सहजपणे फोडू शकते,
 
* या यंत्राची अंदाजे किंमत रु. 1200/- प्रति नग आहे.
 
नूतन झेला
 
* देठासहित आंबे काढता येतात.
 
* फांद्यांना हिंदोळा बसत नाही.
 
* काढणीच्या वेळी फळे पडत नाहीत.
 
* वापरण्यास सुलभ असून वजनास हलका आहे.
 
* अंदाजे किंमत रु. 95/- प्रति नग आहे.
 
नारळ सोलणी यंत्र
 
* नारळ सोलण्यासाठी उपयोग होतो.
 
* एका दिवसात 250 ते 300 नारळ सोलून होतात.
 
* पारंपरिक पद्धतीने 50 ते 60 नारळ सोलले जातात, त्यापेक्षा या यंत्राने 4 ते 5 पट जास्त नारळ सोलता येतात
 
* या यंत्राची अंदाजे किंमत रु. 200/- प्रति नग आहे.
 
 
नवीन टोकण यंत्र
 
* या नवीन टोकण यंत्राच्या साहाय्याने महिलांना उभे राहून तूर, भुईमूग या बियाणांची लागवड करता येते.
 
* या यंत्राच्या साहाय्याने बी जमिनीत खोलवर पडते.
 
* या यंत्राच्या साहाय्याने 35 टक्के मजुरांची बचत होते.
 
* या यंत्राची अंदाजे किंमत रु. 250/- प्रति नग आहे.
 
 
सायकल कोळपे
 
* एक स्त्री किंवा मनुष्य चालवू शकते.
 
* वजन अंदाजे 5 किलो आहे.
 
* एक स्त्री एका दिवसात अंदाजे एक एकर क्षेत्राची कोळपणी करू शकते.
 
* वापरण्यास अत्यंत सोपे असून हलके असल्याने वाहतुकीस सुलभ आहे.
 
* या यंत्रामुळे शारीरिक कष्ट कमी होऊन रोजगारनिर्मिती होते. याची अंदाजे किंमत रु. 600/- प्रति नग आहे.
 
लेखक कृषी विज्ञान केंद्र, खेड (जि. सोलापूर)चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख आहेत.