ठाणे : पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या वीरभूमी परिक्रमा - स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहांतर्गत, 'कृतज्ञ मी, कृतार्थ मी' या नाटकाचा प्रयोग सोमवार दि. 23 मे 2023 रोजी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात सावरकरप्रेमी प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रयोगाला ठाण्याचे आमदार संजय केळकर, स्वा. सावरकरांची नात असिलता सावरकर - राजे, नाटकाचे लेखक अनंत शंकर ओगले तसेच ठाणे शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीरांच्या जीवनातील उत्तरार्धात, सावरकर आणि त्यांच्या पत्नी माई सावरकर यांनी घेतलेला संवादात्मक भूतकाळाचा वेध, अशा स्वरूपात नाटक सादर होतं..स्वातंत्र्यवीरांची भूमिका करणारे यतिन ठाकूर आणि माईच्या भूमिकेत सायली सांभारे अशी दोन पात्रे असूनही नाट्यप्रयोग विलक्षण प्रभावी होतो. या दोन पात्रांच्या जोडीला दृकश्राव्य माध्यमाचा केलेला वापरही नाटकाची परिणामकारकता वाढवतो. तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि साहित्य- कला क्षेत्रातील मान्यवरांचे सावरकरांशी असलेले नाते आणि त्यांच्या कार्याविषयी असलेला आदर पोचवण्याचे काम हे नाटक करते. प्रेक्षकांमधील तरूण, प्रौढ आणि वृद्ध अशा तीनही वयोगटातल्या लोकांना हे नाटक बांधून ठेवते, अंतर्मुख करते हे या नाटकाचे वैशिष्ट्य. सावरकरांचे विचार आणि जीवनाची झलक अनुभवायची असेल तर हा नाट्यप्रयोग अवश्य पहावा.
आपल्यात शक्ती असेपर्यंत जमतील तितके या नाटकाचे प्रयोग आपण गावोगावी करणार असल्याचे दिग्दर्शक आणि अभिनेते यतिन ठाकूर यांनी प्रयोगानंतर प्रेक्षकांशी संवाद साधताना सांगितले.
हा नाट्यप्रयोग यशस्वी होण्यासाठी स्थानिक नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे आणि त्यांचे पती रमेश आंब्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.