बुद्धिनिष्ठ सावरकर

विवेक मराठी    25-May-2023
Total Views |
 @मिलिंद रथकंठीवार
 
vivek
सर्व जातीजमातींच्या हिंदूंना मंदिर प्रवेशाला, त्यांच्या पूजाधिकाराला आमंत्रित सनातनी ब्राह्मणांनी विरोध दर्शवला. एवढेच काय, तर शंकराचार्यांच्या संमतीलादेखील सहमती देण्यास नकार दिला. सावरकरांनी कुठलीही तडजोड न करता प्राणप्रतिष्ठा पूजाविधी घडवून आणला आणि बुद्धिनिष्ठ सावरकर ही प्रतिमा पुन्हा उजळली. दि. 1 मे 1933 रोजी सावरकरांनी सर्व जातींतील हिंदूंसाठी एक उपाहारगृहदेखील सुरू केले. असा उपक्रम भारतात प्रथमच झाला आणि त्यांच्या या कृतीने समाजात एक चांगला संदेशदेखील दिला गेला.
आपली प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत उन्नत, उदात्त, उत्तम अशा मूल्यांवर आधारित अशी संस्कृती आहे. इतरत्र जेव्हा मनुष्य हा प्राणिमात्र होता, होमो सेपियन्स म्हणून ओळखला जात होता, तेव्हा भारतातील संस्कृती जीवनाची सार्थकता प्रतिपादित करीत होती.
 
 
परंतु कालौघात, विविध अमानुष यवनी आक्रमणांत..
 
 
शास्त्र पराभूत झाले शस्त्रापुढे,
मानवता पराभूत झाली अमानुषतेपुढे,
ज्ञान पराभूत झाले अज्ञानापुढे
शौर्य पराभूत झाले क्रौर्यापुढे
नीती पराभूत झाली अनीतीपुढे,
विचार पराभूत झाले अविचारापुढे
विवेक पराभूत झाला अविवेकापुढे,
ज्ञान पराभूत झाले अज्ञानापुढे..
 
 
परिणामी, समाजामध्ये अनेक दोष निर्माण झाले. कर्मांवर आधारित असणारी एकेकाळची उपयुक्त चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था जन्मावर आधारित सामाजिक विघटन करणारी, जातिभेद निर्माण करणारी अन्याय्य वर्णव्यवस्था होऊ लागली. सामाजिक ऐक्य धोक्यात येऊ लागले. अनेक प्रकारची विषमता निर्माण झाली. वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी ह्या सप्त बेड्या हिंदूंच्या अधोगतीला कारणीभूत ठरल्या. समाजात कर्मकांड फोफावले, अंधश्रद्धा फोफावली, जातीच्या भिंती ह्या धर्माच्या भिंतीपेक्षा उंच होऊ लागल्या, देशाचे ऐक्य धोक्यात आले आणि आक्रमक इथले वैभव लुटून जनतेवर जुलमी अत्याचार करू लागले आणि दास्याच्या बेड्या आवळल्या गेल्या.
 
 
 
अनेक मोठ्या समाजसुधारकांनी, समाजधुरिणांनी, विचारवंतांनी समाजाचे दोष निवारण करण्याचे कार्य केले. काहींनी जातिनिहाय सुधारणा सुचवल्या, काहींनी स्वयंसेवी संघटना उभारून या दिशेने भरीव कार्य केले, काहींनी समाजजागृती, सशस्त्र लढा, अंधश्रद्धानिर्मूलन इत्यादी. त्यापैकी विनायक दामोदर सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचा लढा, सामाजिक उत्थान, जातिभेद उच्चाटन, गोमातापूजनऐवजी गोपालन, रोटी-बेटी व्यवहार, भाषाशुद्धी इत्यादी विषयांवर सामाजिक जाणिवा जागृत करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला.
 
 
क्रांतदर्शी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी प्रसिद्ध चरित्रकार धनंजय कीर म्हणतात.. "Scripture-based caste division is a mental illness. It gets cured instantly when the mind refuses to accept it. The seven indigenous shackles whose breaking will liberate this Hindu Nation from the illness and demonic possession.
 
 
 
सावरकर हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे आदर्श जीवन जगण्याची एक पद्धत, एक सम्यक विचारपद्धती, एक तार्किक सर्वंकष विकसित व्यक्तिमत्व जसा आहे, तसाच सावरकर म्हणजे गैरसमज आणि विपर्यास असा दुहेरी शाप मिळालेला महापुरुषदेखील आहे.
 
 
वैचारिक भूमिकेची चिकित्सा करताना बुद्धिनिष्ठ, तत्त्वनिष्ठ, तर्कशुद्ध अभ्यास असावा लागतो. दूरदृष्टीदेखील असावी लागते. भावनाधीन होऊन चालत नाही, तसेच भावनाहीन असूनदेखील चालत नाही. तात्याराव सावरकरांना तो कठोरपणा, तो तटस्थपणा, ती त्रयस्थ दृष्टी उपजतच लाभलेली होती.
 
 
तात्याराव सावरकर कट्टर तर्कबुद्धिवादी होते, त्यांच्या राजकीय दर्शनातउपयोगितावाद, तर्कवाद, प्रत्यक्षवाद (Positivism), मानवतावाद, सार्वभौमिकता, व्यावहारिकता आणि यथार्थवाद ही तत्त्वे होती. या तत्त्वांच्या कसोटींवर प्रत्येक विषय तावून सुलाखून सावरकर त्यांची भूमिका घट्ट करत असत.
 
 
दैनिक ‘केसरी’त 1930-1931 साली लिहिलेल्या लेखमालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मजात जातिभेदाचा उच्छेद आणि गुणजात जातिभेदाचा उद्धार ही चातुर्वर्ण्यासंबंधी सूत्रे मांडतात.
 
भगवद्गीतेतल्या चातुर्वर्ण्यासंबंधी,
 
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश:।
 
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।
 
या वचनाचा आधार घेत तात्याराव सावरकर युक्तिवाद करतात की, ‘जर वर्ण हा गुणकर्मावर आधारलेला आहे, जन्मावर नव्हे, तर मग आजचे चातुर्वर्ण्य हे जन्मजात कसे? आणि त्यामुळेच जातिभेद हा खरे पाहता त्या गीतेतल्या गुणकर्मावर आधारलेल्या चातुर्वर्ण्याचा उच्छेद आहे’ हा त्यांचा विचार युक्तिवादासाठी आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की तात्यारावांना गुणनिष्ठ चातुर्वर्ण्य हवे होते, कारण पुढे तात्याराव सावरकर म्हणतात, ‘मुळात चार वर्ण असोत की पाच, त्याच्याशी आपल्याला काय कर्तव्य? त्या चार वर्णांच्या आज झालेल्या चार हजार जाती कशा नष्ट कराव्यात, हे आपले मुख्य कर्तव्य’ हीच तात्यारावांची भूमिका होती.
 
 
‘मोठा दशग्रंथी ब्राह्मणाचा मुलगा, पण काही उपजतच ’हरी ओम्’ म्हणून वेदपठण करू लागत नाही. त्याला जन्मभर काही शिक्षणच दिले नाही, तर तो अगदी निरक्षर भट्टाचार्यच राहणार. तेच एखाद्या शूद्राचा मुलगा उपजत शंख, पण त्याला काहीतरी शिकवत राहिल्यास तो त्या दशग्रंथी ब्राह्मणाच्या मुलापेक्षा अधिक बोलका निघेल.’ पुढे तात्याराव म्हणतात, ‘मानवजातींत संकर हा नसतोच, कारण नैसर्गिक जात ही एकच - फक्त मानव. जातिभेदाचे, बीजशुद्धीचे विचार हे विज्ञाननिष्ठेच्या कसोटीवर तर्कशुद्ध उतरत नाहीत.’
 
 
A reformer rebuilds the old structure. A revolutionary blows up the old building and builds a new one. Veer Savarkar was not a mere social reformer, he was an action-oriented active social revolutionary. या प्रगतीच्या पायातल्या साखळदंडाच्या बेड्या आहेत. त्या वेळीच तोडल्या नाहीत, तर अनर्थ होईल. आमिष दाखवून, बलप्रयोग करून धर्मांतरे घडवली जाणे हे काही देशासाठी नवीन नाही आणि नव्हतेदेखील! परंतु अभ्यासाअंती सावरकरांच्या असे लक्षात आले की, धर्मांतरित व्यक्तीला आपली चूक उमगून पुनश्च हिंदू धर्मात येण्याची तरतूदच नव्हती. ही उणीव दूर व्हावी, म्हणून त्यांनी शुद्धीकरणाची एक चळवळ सुरू केली.
 
तात्याराव सावरकरांनी अशी शास्त्रशुद्ध भूमिका मांडून ती आचरणात कशी आणावी, हे पतितपावन मंदिरात तथाकथित अस्पृश्यांबरोबर पंगती भोजनासारखे कार्यक्रम व्यवहारात आणून दाखवून दिले.
 
 
आंतरजातीय भोजन पंक्तिप्रपंच हा 1920 साली तत्कालीन समाजाच्या दृष्टीने कल्पनेपलीकडला होता. रोटी-बेटी व्यवहार ही दास्याच्या शृंखलेची एक कडी होती, असे सावरकर मानायचे. पण सावरकरांनी सर्व विरोध पत्करून एका निग्रहाने सर्व जातीयांच्या भोजनाची पंगत मांडून एक सुरुवात रुजू केली.
 
 
 
निसर्गाच्या तात्त्विक नि व्यापक अर्थी हे कृत्रिम आणि ते स्वाभाविक असा भेदच उरत नाही. जे कृत्रिम, जे मनुष्यकृत, फार काय तर जे जे घडू शकते, ते ते वास्तविक नैसर्गिकच आहे. तत्त्वत: अनैसर्गिक असे काही असूच शकत नाही! धर्मग्रंथांवर समाज उभा करण्याचे दिवस आता गेले, आता समाज उभा करायचा असेल आणि टिकवायचा असेल, तर तो विज्ञाननिष्ठ, तार्किक विचारांनीच, असे त्यांचे स्वच्छ मत होते.
 
 
दि. 10 मार्च 1929 रोजी महाशिवरात्रीच्या शुभदिनी रत्नागिरीतील पतितपावन मंदिराच्या पायाभरणीचा सोहळा शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांच्या हस्ते पार पाडला. शंकराचार्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पाडला असल्याने पुराणमतवादी कर्मठांना ती एक चपराकच होती. सर्व जातीजमातींसाठी हे मंदिर खुले होते. स्पृश्य-अस्पृश्य यांचे सहभोजन यानिमित्त घडवून आणले. जातीपातीच्या अंताची ती एक मुहूर्तमेढ होती. ती उभी वास्तू सामाजिक सुधारणेची, जातिभेदाची, अंधश्रद्धा निर्मूलनाची साक्षीदार ठरली. या प्रसंगी शिवू चव्हाण या भंगी समाजाच्या मुलाने सावरकर रचित पद्य गाऊन या सोहळ्याला आणखी एक आयाम जोडला. दि. 2 मार्च 1930 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या काळाराम मंदिर प्रवेशासाठी असाच ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. ह्या दोन्ही एकमेकांना पूरक अशा घटना सामाजिक इतिहासात नोंदवल्या जाव्यात अशाच आहेत. पतितपावन मंदिराच्या संकल्पनेविषयी बोलताना सावरकर म्हणाले, “काशी विश्वेश्वर, जगन्नाथ पुरी, द्वारका, रामेश्वर इत्यादी मंदिरात कुठल्याही जातीजमातीच्या हिंदूच्या प्रवेशाला मज्जाव असूच नये. सर्व हिंदूंना समान अधिकार या तत्त्वावरच पतितपावन या मंदिराची स्थापना आधारित असणार आहे.”
 
 
सर्व जातीजमातींच्या हिंदूंना मंदिर प्रवेशाला, त्यांच्या पूजाधिकाराला आमंत्रित सनातनी ब्राह्मणांनी विरोध दर्शवला. एवढेच काय, तर शंकराचार्यांच्या संमतीलादेखील सहमती देण्यास नकार दिला. सावरकरांनी कुठलीही तडजोड न करता प्राणप्रतिष्ठा पूजाविधी घडवून आणला आणि बुद्धिनिष्ठ सावरकर ही प्रतिमा पुन्हा उजळली. दि. 1 मे 1933 रोजी सावरकरांनी सर्व जातींतील हिंदूंसाठी एक उपाहारगृहदेखील सुरू केले. असा उपक्रम भारतात प्रथमच झाला आणि त्यांच्या या कृतीने समाजात एक चांगला संदेशदेखील दिला गेला.
 
 
तात्याराव सावरकरांचे समाजजागृतीचे असे सततचे जात्युच्छेदक उपक्रम अनुकरणीय असेच होते. मतभिन्नता असूनही अनेकांनी सावरकरांची प्रशंसा केली. ब्राह्मो समाजचे विठ्ठल रामजी शिंदे यांनीदेखील प्रशंसोद्गार काढले. ते म्हणतात, “सावरकरांनी जातीपाती उच्चाटनाचे जे यशस्वी प्रयोग केले, ते बघता ईश्वराने माझे उर्वरित आयुष्य सावरकरांना द्यावे.”
 
 
गोरक्षणाची चळवळ धार्मिक आणि भाकडपणाच्या आधारावर न चालवता सुस्पष्ट आणि प्रयोगक्षम अशा आर्थिक आणि वैज्ञानिक पायावर चालवावी, असे आवाहन करून सावरकरांनी गोपूजनाऐवजी गोपालन करणे अधिक इष्ट मानले.
 
 
 
‘माझ्या मृत्युपश्चात माझ्या मृतदेहाचे आधुनिक विद्युतदाहिनीत दहन करावे, जुन्या रूढींप्रमाणे माझे कलेवर चार माणसांनीं खांद्यावर नेऊ नये किंवा कुठल्याही प्राण्यांनी ओढलेल्या वाहनातून नेऊ नये. कुणीही कुठलाही व्यवसाय बंद करू नये.’ ते पुढे म्हणतात, ‘माझ्या निधनापश्चात कुठलेही सुतक, विटाळ पाळू नये. पिंडप्रदान, काकस्पर्श, श्राद्ध इत्यादी कालबाह्य विधी करू नयेत.’ त्यांच्या सामाजिक जाणिवा, भूतदया, संवेदनशील मन अखेरपर्यंत तेवढेच जागृत होते, तल्लख होते. मृत्यू त्यांना शरण येण्यापूर्वी अखेरच्या क्षणापर्यंत तात्याराव सावरकरांनी आपली बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा जागृत ठेवली.