पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन, विवेक व्यासपीठ आणि सावरकर विचार मंच, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वीरभूमी परिक्रमा - स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहांतर्गत’ स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित गीतांच्या गायनाचा ‘जयोस्तुते’ कार्यक्रम 23 मे रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सावरकरप्रेमी रसिकांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येत पार पडला. काही कारणांमुळे कार्यक्रम सुरू होण्यास विलंब झाला, मात्र तरीही शेवटपर्यंत सावरकर प्रेमींचा उत्साह काही कमी झाला नाही, ही विशेष बाब होती.
सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन यांच्या गीतांनी आणि पार्थ बावस्कर यांच्या अप्रतिम निवेदन शैलीने सारे वातावरण सावरकरमय झाले होते.
या कार्यक्रमाला आमदार गणेशजी नाईक, माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक, प्रकाश मोरे, विजय वाळुंज, अजय वाळुंज, अॅड. निलेश भोजने, माधुरी सुतार, डी.बी. पाटील, विवेक व्यासपीठाचे नंदकुमार जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई, सावरकर विचार मंचचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे नवी मुंबईतील तरुण वर्गाला सोबत घेऊन त्यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी केला. पनवेल ते ऐरोली असा प्रवास करून कार्यक्रम घरोघरी पोहोचविण्याचे कार्य या युवा पिढीने केले. ज्या वयात सावरकरांनी ही गीतं रचली त्या वयातील मुलं आज सावरकरांच्या गीतांच्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत, त्याहून आनंद तो काय! असे गौरवोद्गार पार्थ बावस्कर यांनी आपल्या निवेदनात काढले.
संस्कार भारती वाशी समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नवी मुंबई, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळ, कुसमाग्रज सार्वजनिक वाचनालय, सीवूड्स आणि विष्णुदास भावे नाट्यगृह या सर्वांच्या सहकार्यामुळेच कार्यक्रम यशस्वी झाला.
सावरकरांच्या ‘जयोस्तुते’ या गाण्यानेे कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि नंतर कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार होत गेला. आपल्या महाविद्यालयाच्या काळात सावरकरांनी प्रथम शिवाजी महाराजांवर आरती लिहिली. या आरतीमधील त्यांचे शब्द, प्रतिभा किती विलक्षण आहेत, हे ऐकल्याशिवाय लक्षात येणार नाही.
एखाद्या माणसाला त्याच्या आयुष्यात किती त्रास सहन करावा लागतो, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सावरकर. एखाद्या तरुणाच्या आयुष्यातील तिशीपर्यंतचा काळ हा उमेद गाजविण्याचा काळ असतो. मात्र सावरकरांच्या बाबतीत इतके दुर्दैव की त्यांना आपल्या 30 व्या वर्षी अंदमानच्या काळ्या कोठडीत राहावे लागले. पंचवीशीत मार्सेलिसची उडी मारावी लागली, 26-27 चे असताना मृत्यूपत्र लिहावे लागले. मृत्यूपत्रातही ते म्हणतात, ‘हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वक्तृत्व वाक् - विभव ही तुज अर्पियेले...’ म्हणजे माझ्याकडे बाकी काहीच नाही, माझ्याकडे माझे शब्द आहेत, रसाळ कविता आहेत, माझं वकृत्व आहे हे सर्व मी तुझ्यावर अर्पण करतो.
लॉकडाऊनच्या काळात सावरकरांना मानवंदना देण्यासाठी मुग्धा वैशंपायन यांनी पहिल्यांदाच स्वत: संगीतबद्ध केलेलं आणि कौस्तुभ आठल्ये यांनी सावरकरांवर लिहिलेले ‘विनायका रे’ हे गीतदेखील येथे सादर करण्यात आले.
‘जयदेव जयदेव जय शिवराया’, ‘हे हिंदुशक्ति संभूत दीप्तितम तेजा...’ ‘अनादि मी अनंत मी’ ही सर्व गाणी सावरकरांचे राष्ट्रापती असणारे प्रेम व्यक्त करतात. पण हेच सावरकर जेव्हा राष्ट्राच्या भावनेने ओथंबलेली नाटकं लिहितात त्या नाटकात मात्र अगदी कोमल आणि तरल अशी प्रतिभा निर्माण करतात आणि त्या प्रतिभेने रसरसलेली, तरलतेने ओथंबलेली विरह गीतं लिहितात. शत जन्म शोधिताना, शत आर्ति व्यर्थ झाल्या... हे त्यातलंच एक गीत.
निवेदकाचं कौशल्य म्हणजे सावरकरांच्या प्रत्येक गाण्याचा अर्थ रसिकांना उलगडून दाखविल्याने गाणी ऐकताना तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहात होता. ‘आयुष्यात कधी खचायचं नाही, कधी हरायचं नाही, सतत लढायचं’ हेच सावरकरांच्या जीवनातून आपण शिकलं पाहिजे. असेही निवेदक सांगून जातो.
सावरकरांचं आयुष्य दर्शविणारं अजरामर गीत ‘सागरा प्राण तळमळला’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.