भाषाभिमानी सावरकर

विवेक मराठी    08-May-2023
Total Views |
@ज्योती उत्पात कुलकर्णी
साहित्यिक सावरकरांनी मराठी भाषेचा अभिमान, आग्रह धरला नसता तरच नवल होते. परकीय भाषेतून मराठीत शब्द घेणे हे भूषण नसून दूषण आहे, असे मानणार्‍या सावरकरांनी मराठीत अनेक प्रतिशब्द निर्माण केले. ते शब्द नुसतेच शब्द नव्हते, तर ते त्या परकीय भाषेतील शब्दाला अगदी तंतोतंत बसणारे, मार्मिक व दर्जेदार प्रतिशब्द होते.

vivek
 
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी॥
 
 
सुरेश भटांच्या या ओळी त्यांना स्फुरण्यापूर्वी ज्या व्यक्तींनी आपल्या आचरणातून, विचारातून महाराष्ट्रासमोर मांडल्या, असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेले भाषाशुद्धीचे कार्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला दिलेली एक अमूल्य भेट आहे. फार पूर्वी याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मराठी भाषेचा आग्रह धरत केसरी वृत्तपत्रातून एप्रिल/मे 1925मध्ये भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. ज्या मराठीला ज्ञानेश्वर माउली ‘अमृतातेही पैजा जिंके’ असे म्हणतात, त्या मराठीला मानाचे स्थान देण्याचा प्रयत्न सावरकरांनी केलेला दिसतो. त्यासाठी त्यांना बर्‍याच विरोधाला सामोरे जावे लागले, तसेच मराठीतील साहित्यिकांचाही विरोध पत्करावा लागला. पण त्या सर्व आक्षेपांना, विरोधकांना तात्यारावांनी सणसणीत उत्तरे देणारी लेखमाला पुन्हा सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये लिहिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेने जळगाव येथील अधिवेशनात भाषाशुद्धीचे तत्त्व मान्य केले. कवी माधव ज्यूलियन सुरुवातीला कट्टर विरोधक होते, ते नंतर उपासक बनले. स्वत:च्या अनेक जुन्या कविता त्यांनी पुन्हा शुद्ध मराठीत लिहिल्या. सावरकरांची भाषाशुद्धीची चळवळ लोकांच्या पचनी पडू लागली. पुढे घटना समितीने देवनागरी लिपीत हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून मान्य केली. शुद्धतेच्या बाबतीत ते मराठीसकट सर्व भाषांच्या शुद्धतेचे आग्रही होते.
 
 
 
सावरकरांनी मराठीत अनेक प्रतिशब्द निर्माण केले. ते शब्द नुसतेच शब्द नव्हते, तर ते त्या परकीय भाषेतील शब्दाला अगदी तंतोतंत बसणारे, मार्मिक व दर्जेदार होते. उदा., तारीख या शब्दाला दिलेला दिनांक हा प्रतिशब्द बघितला, तर दिन आणि अंक म्हणजे तारीख या शब्दाला इतका योग्य शब्द कुठल्याही भाषेत असणार नाही, इतका हा शब्द योग्य आहे. सावरकरांनी मराठी भाषेला 45 शब्द दिले आहेत, त्यातील काही पुढीलप्रमाणे -
 
 
vivek
 
मराठी चित्रपटसृष्टीवर तर तात्यांचे प्रचंड ऋण आहे. चित्रपटसृष्टीसंबंधीचे अनेक शब्द सावरकरांनीच दिलेले आहेत.
 
सावरकरांच्या मते एखादा मराठी शब्द दिला, तरी तो रुळवण्याची जबाबदारी सर्वांवर असते. सावरकरांनी सर्वांना त्याची सवय लावली. त्यामुळे सावरकरांनी मराठीत अनेक शब्द रुळवले, असे म्हणायला अभिमान वाटतो. आपल्या भाषेचा, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे सावरकर म्हणतात की “परदेशी भाषेतील शब्द जरी आपल्याला घ्यावे लागले, तरी त्यातील उदात्त कल्पना, अगाध ज्ञान, सुरेख वाक्प्रचार त्याज्य नाही. जे उत्तम, लोकहितवर्धक, अनुकरणीय असेल ते कोणाकडूनही घ्यावे. मानापमानाचा प्रश्न नाही.” त्यांच्या मते भारतवर्षांचे तात्त्विक ज्ञान आणि कला यांचे परकीयांवर इतके ऋण आहे की त्यांच्या आजच्या दुकानातून आम्ही त्यांच्या सामानाची कितीही उचल केली, तरी ते ऋण न फिटणारे आहे. त्यामुळे काही शब्द जसेच्या तसे वापरले तरी चालतील. उदाहरणार्थ, टेबल, कोर्ट, टाय यासाठी उगाचच अतिरेकी मराठी वापर टाळावेत. सावरकरांच्या मते आपल्या भाषेत ज्या अर्थाचे शब्द आहेत, त्या अर्थाचे परकीय शब्द वापरू नये, त्यामुळे शब्दसंपत्ती वाढत नाही. ज्या अर्थाचे शब्द, त्या वस्तू आपणाकडे मुळातच नाहीत, असे परकीय शब्द वापरण्यास हरकत नाही. मराठी शब्द रूढ करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या साहित्यातून, लेखातून शक्य तितके प्रयत्न केलेले दिसतात. त्यांचे म्हणणे असे होते की शब्द रुळवण्यासाठी सुशिक्षित माणसांनी सर्व ठिकाणी वापरण्यास सुरुवात केली की ते अशिक्षितापर्यंत पाझरत जातील. समाजातील केवळ काही मंडळींनी त्याचा निश्चय केला पाहिजे. त्यासाठी शिक्षक, लेखक, राज्यकर्ते, समाजातील अनेक उच्चपदस्थ व्यक्ती यांनी याचा वापर करणे नेटाने चालू ठेवले पाहिजे, म्हणजे आपोआपच हे शब्द रूढ होतील.
 

vivek 
 
बंदीवासात असल्यापासूनच सावरकरांनी मराठी भाषेचा स्वीकार, प्रचार, प्रसार करण्याचे कर्तव्य केले. शेकडो स्त्री, पुरुष, विद्यार्थ्यापासून विद्वानांपर्यंत आपली मराठी भाषा, आपल्या भावना पोहोचण्याचे खरे माध्यम आहे हे पटवून दिले व निरनिराळे शब्द रूढ केले.
 
 
पुस्तके छापण्यासाठी मुद्रकांना दोनशे टंक लागत होते, म्हणून सावरकर त्यांच्यासाठी फक्त प्रतिशब्द देऊन थांबले नाहीत, तर त्यासाठी नवी लिपी तयार केली. उदा., जसे स्वीकार केला, स्वीकारला, प्रतिकार केला - प्रतिकारले असे स्वतंत्र शब्द दिले. या सर्वांचे जनकत्व सावरकरांकडे जाते. केसरी वृत्तपत्रातून सावरकरांना स्वारी, माहिती, चौकशी, ठराव, करार या परकीय शब्दांना प्रतिशब्द देण्याचे आव्हान दिले गेले. तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करत सावरकरांनी सांगितले की हे शब्द परकीय नसून संस्कृतोद्भव आहेत. जसे अश्वारोही - स्वारी, महित - माहिती, भुजा - बाजू, वृत्त - बातमी ही रूपे प्राकृतातून उत्पन्न झाली आहेत. काहींचे प्रत्यय पर्शियन आहेत, म्हणून ते परकीय मानणे हास्यास्पद आहे. एखाद-दुसर्‍या शब्दासाठी व्युत्पत्तीची शंका असणे नाकारता येणार नाही. पण ते फुटकळ आहे.
 
 
 
त्यांनी मराठीचा अभिमान बाळगला, पण दुराभिमान केला नाही. राष्ट्रभाषा हिंदीच असावी असा त्यांनी आग्रह धरला. भाषा ही माणसाच्या संस्कृतीचे प्रतीक असते आणि याहूनही अधिक ते म्हणतात की, ‘संपूर्ण मनुष्यजातीची भाषा एक होत असेल, तर मी हिंदीचाही त्याग करायला मागेपुढे पाहणार नाही. परंतु इंग्लिश स्वीकारा व मराठी मारून टाका असे आम्हाला सांगितले, तर ते कदापिही शक्य नाही. ही भोळसट भूतदया राष्ट्रीय एकात्मतेला मारक ठरत असेल तर सोडून देऊ, परंतु प्रांताचा विषय आला तर मराठीचा नक्कीच अभिमान बाळगू.’
 
 
vivek
 
गणपतराव नलावडे जेव्हा पुणे शहराचे मेयर झाले, त्या वेळेस मराठी भाषेचा खरा अभिमान बाळगणार्‍या सावरकरांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात ‘महापौर’ हा शब्द प्रथम वापरला, ‘त्यासाठी हे अभिनंदन’. ‘असे पत्र विलंबाने लिहीत आहे त्याबद्दल क्षमस्व’ असेही लिहिले. तात्यांचे भक्त असणारे गणपतराव पत्र मिळताच कार्यालयाबाहेर आले व मेयर, पुणे ही पाटी काढून त्यांनी महापौर ही पाटी तयार करवून घेऊन कार्यालयाबाहेर लावली. तेव्हापासून महापौर हा शब्द रूढ झाला. अशा अनेक शब्दांचे पितृत्व सावरकरांकडे जाते.
  
जगातल्या अनेक साहित्यिकांनी त्यांच्या त्यांच्या भाषेसाठी भाषाशुद्धीची ही चळवळ केलेली दिसते. न्यूटन, शेक्स्पियर यांनीदेखील शुद्ध इंग्लिशचा आग्रह धरला. आयरिश लोकांनी मातृभाषेच्या पुनरुज्जीवनासाठी व शुद्धीकरणासाठी केलेले आंदोलन सर्वज्ञात आहे. इस्रायलने तर हिब्रू भाषेला कबरीतून वर काढून राष्ट्रभाषा केले. आपल्याकडेही संतांनादेखील आपल्या भाषेचा अभिमान दिसतो. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथही त्यांच्या साहित्यातून मराठी भाषेचा अभिमान प्रतीत करताना दिसतात. म्हणूनच संत एकनाथही म्हणतात, ‘संस्कृतवाणी देवें केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि जाली।’
 
 
 
अशा सर्वांचा वारसा सांगणार्‍या, जगातील उत्तमोत्तम स्वीकारा असे सांगणार्‍या साहित्यिक सावरकरांनी मराठी भाषेचा अभिमान, आग्रह धरला नसता तरच नवल होते. परकीय भाषेतून मराठीत शब्द घेणे हे भूषण नसून दूषण आहे असे मानणार्‍या सावरकरांना येणार्‍या 28 मेच्या जयंतीनिमित्त नम्र अभिवादन आणि त्यांच्या भाषाशुद्धीच्या कार्याला मानाचा मुजरा!