वर्गात एकूण 682 शिक्षार्थी सहभागी
21 मे 2023 रोजी सायंकाळी वर्गाचे पथसंचलन
1 जून 2023 रोजी वर्गाचा समारोप
_202305081704361958_H@@IGHT_387_W@@IDTH_900.gif)
नागपूर : रेशीमबागस्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आज सकाळी तृतीय वर्षाचा शुभारंभ झाला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सहसरकार्यवाह तसेच वर्गाचे पालक अधिकारी रामदत्तजी यांनी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. देशभरातील सर्व प्रांतांमधून आलेल्या शिक्षार्थ्यांना संबोधित करताना रामदत्तजी म्हणाले, “कष्टातही आनंदाच्या अनुभूतीला साधना म्हणतात. संघ शिक्षा वर्ग या प्रकारच्या अनुभूतीची साधना आहे. ज्या प्रकारे शेतकरी स्वत:च्या शेतात बीजारोपण करतो, त्याचप्रमाणे संघ शिक्षा वर्गात स्वयंसेवकांमध्ये संस्कारांचे बीजारोपण करण्यात येते. रेशीमबागची ही पवित्र भूमी डॉ. हेडगेवार आणि गुरुजी गोळवलकर यांची तपोभूमी आहे. येथे येणार्या प्रत्येक स्वयंसेवकाला देश प्रथम, स्वत:प्रती गौरव, प्रामाणिकता, देशभक्ती, शिस्त आणि स्नेहभावना विकसित करण्याची संधी प्राप्त होते. वर्गात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी इतर प्रांतातून आलेल्या किमान दोन स्वयंसेवकांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करायला हवेत. त्यांच्या प्रांतातील समस्यांची माहिती करून घ्यावी. स्वयंसेवकांनी समाजातील प्रश्नांची चर्चा करणारे होण्याऐवजी समाधान शोधणारे व्हायला हवे. संघ शिक्षा वर्गात राहत असताना संघाच्या स्वभावालादेखील समजावे लागेल. स्वत:चे वैयक्तिक मत संघमतात विलीन करणे शिकावे लागेल; हाच संघटनाचा गुणधर्म आहे. स्वयंसेवकांनी समाजात कार्य करताना अग्रेसर होत नेतृत्व करणारे बनावे लागेल. लवकरच संघस्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत, या पार्श्वभूमीवर संघ शिक्षा वर्गात सहभागी होणार्या स्वयंसेवकांनी येत्या दिवसांत कार्यविस्तासंदर्भात आपली भूमिका काय असावी, याबाबत विचार करायला हवा. संघ आणि समाजाचे विचार एकरूप होईस्तोवर आपल्याला कार्यरत राहावे लागणार आहे.” या प्रसंगी सहसरकार्यवाह मुकुंदजी, अवध प्रांत संघचालक तसेच वर्ग सर्वाधिकारी कृष्ण्मोहनजी उपस्थित होते. यंदाच्या वर्गात एकूण 682 शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. 21 मे 2023 रोजी सायंकाळी वर्गाचे पथसंचलन होईल, तर 1 जून 2023 रोजी वर्गाचा समारोप होणार आहे.
