संवेदनशील आई - मधुराणी प्रभुलकर

विवेक मराठी    13-Jun-2023
Total Views |
@उत्तरा मोने
 
 
vivek
‘आई कुठे काय करते!’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर. आई हा कुटुंबातील हळवा कोपरा असला, तरीही त्यात सारं विश्व सामावलेलं असतं. स्टार प्रवाहच्या या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही आई मालिकेत जितकी संवेदनशील आहे, तशीच खर्‍या आयुष्यातही संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष आई म्हणून आपली भूमिका बजावत आहे.
सध्याच्या दिवसात मराठी मालिकांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा चालते ती स्टार प्रवाह या वाहिनीवरील ’आई कुठे काय करते!’ या मालिकेची, त्यातही मध्यवर्ती भूमिका करणार्‍या मधुराणी प्रभुलकर हिची. खरं तर 2003मध्ये झी मराठी वाहिनीच्या ‘इंद्रधनुष्य’ या मालिकेतून आपण तिला प्रथम पाहिलं. त्यानंतर काही मालिकांत, सिनेमांमध्ये किंवा झी मराठी वाहिनीच्या ‘सा रे ग म प’ या सेलिब्रिटी शोमध्ये आपण तिच्या गाण्याची चुणूकही पाहिली. ‘गोड गुपित’, ‘लेकरू’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘तुमचं आमचं सेम असतं’ किंवा ‘सुंदर माझे घर’ या चित्रपटांतल्या तिच्या भूमिका आपल्या लक्षात राहिल्या. पण तिला खरी ओळख मिळवून दिली ती ‘आई कुठे काय करते!’ या मालिकेतल्या अरुंधतीच्या भूमिकेने.
 
 
मधुराणीने वयाच्या सोळाव्या वर्षी स्वत:च लिहिलेल्या आणि स्वत:ची निर्मिती असलेल्या ‘सी-सॉ’ या नाटकातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. या नाटकाला सर्वोत्तम नाटकाचा पुरुषोत्तम करंडक पुरस्कारही मिळाला होता.
 
 
जवळपास 15 ते 20 वर्षं या क्षेत्रात काम केल्यानंतर खर्‍या अर्थाने मधुराणी रसिकांसमोर आली. तिला खरी ओळख मिळाली, ती घराघरात पोहोचली.
 
 
मधुराणी सांगते त्याप्रमाणे, “या भूमिकेने मला एक वेगळंच समाधान दिलं. महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने या भूमिकेमुळे मी एक पाऊल पुढे टाकू शकले. आज अनेक तरुण मुली, स्त्रिया मला येऊन भेटतात आणि आवर्जून सांगतात की आमच्या आयुष्यातही अरुंधतीच्या वागण्याने आम्हाला एक दिशा दिली. आयुष्यात स्वत:साठी कसं उभं राहायचं हे शिकवलं. खरं तर स्त्रियांना पुढे नेणारी, चिरकाल टिकून राहणारी आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही भूमिका आहे.
 
 
आश्चर्याची गोष्ट ही वाटते की आजही स्त्रियांची मानहानी होताना दिसते. अनेक घरांतून तिला दुय्यम स्थान दिलं जातं किंवा तिचं अस्तित्वच नाकारलं जातं, घरात तिला कमीपणा स्वीकारावा लागतो, तिच्यावर नको ते आरोप केले जातात. स्त्रीच्या व्यक्तित्वाची हेळसांड होताना दिसते. त्यामुळेच अगदी लहान वयातल्या मुलींपासून मध्यमवयीन महिलांपर्यंत सगळ्यांना ही भूमिका आपल्या खूप जवळची वाटते. अनेक बायका मला येऊन घट्ट मिठी मारतात आणि आवर्जून सांगतात की अरुंधतीकडून आम्हाला बळ मिळतं.”
 

vivek 
 
अरुंधती म्हणून मधुराणीची ओळख निर्माण झाल्यावर तिच्याभोवती एक वेगळंच वलय तयार झालं. या मालिकेसाठी तिला जेव्हा विचारलं, तेव्हा तिने खरं तर सपशेल नकार दिला होता. यामागे दोन कारणं होती - एकतर तिची मुलगी स्वराली खूपच लहान होती आणि ती पुण्यात राहायला गेली होती. त्यामुळे शूटिंगसाठी पुणं-मुंबई करावं लागेल. मुलीला वेळ पुरेसा देता येणार नाही. आणि दुसरं कारण म्हणजे मालिकेत ज्या वयाची मुलं आहेत, त्यांची आई म्हणून ती शोभेल का.. अशी शंका तिच्या मनात होती. मग मधुराणीने आई, बहीण आणि नवरा प्रमोद यांच्याशी चर्चा केली. पुन्हा एकदा भूमिकेचा ग्राफ समजून घेतला. तो खूपच इंटरेस्टिंग वाटला. प्रमोदने मुलीला स्वरालीला सांभाळायची पूर्ण जबाबदारी घेतली. मधुराणीने मालिकेला होकार दिला आणि गेली साडेतीन वर्षं आपण अरुंधतीला अनुभवतोय. आता तर मालिकेचे 1000 भाग पूर्ण होताहेत. चांगलं दिलं तर पाहिलं जातं आणि रसिकांकडून त्याचं कौतुकही केलं जातं, याचा अनुभव मधुराणीला भरभरून मिळाला. अनेक दिग्गज कलाकारांनी आवर्जून फोन करून आपले अभिप्रायही तिला कळवले. पुन्हा एकदा हेही सिद्ध झालं की नाटकच श्रेष्ठ, सिनेमा श्रेष्ठ असं म्हणणार्‍यांना मालिकेतही ताकद असते हेही कळलं. या भूमिकेनंतर मधुराणीला साहजिकच काही नाटकांसाठी, चित्रपटांसाठी विचारणा झाली. पण सध्या हे चालू असताना दुसरं काही नाही, ही खूणगाठ मात्र मधुराणीने मनाशी पक्की बांधली.
 
 
vivekमुळातच वेगळं आणि दर्जेदार काही करण्याचा मधुराणीचा मानस असतोच. त्यातूनच कदाचित ’कवितेचं पान’, ‘रंगपंढरी’ यासारख्या दोन उत्कृष्ट डिजिटल कार्यक्रमांची निर्मिती तिने केली. लहानपणापासून कवितेची आवड होतीच तिला. कॉलेजमध्ये असताना ती स्वत: कविता करायचीही. वाङ्मय मंडळाचा त्यांच्या ग्रूपही होता. मोठमोठ्या कवींच्या कवितांचे कार्यक्रम ऐकायला जाणं हा त्यांचा आवडीचा छंद होता. मधुराणीची आई आणि बहीण दोघीही उत्तम शास्त्रीय गायिका. आई जेव्हा तिला गाणं शिकवत असे, तेव्हा त्या गाण्यातली कविता उलगडून दाखवत असे. कॉलेज सुटलं आणि मग अभिनय, मॉडेलिंग यात कविता कुठेतरी मागे पडत गेली. शर्वरी जमेनिसचा एक नृत्याचा कार्यक्रम होता - ‘अष्टनायिका’. त्या कार्यक्रमाचं निवेदन मधुराणी करणार होती. ते निवेदन करताना तिने निवेदनातून कविता साभिनय सादर केल्या. तिथेच तिला कविता पुन्हा एकदा गवसली. तिला वाटलं, या कविता जर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायच्या असतील, तर काहीतरी करायला हवं. मग त्यातून ’कवितेचं पान’ची संकल्पना आकाराला आली. मग या कविता सादर करताना काही नामवंत कलाकार यात सामील झाले, तर ती कविता अधिक लोकांपर्यंत पोहोचेल असं वाटलं आणि मग काही कवी, गीतकार, संगीतकार, कलाकार सगळेच या मैफिलीत सामील झाले. मधुराणीने संशोधन करून कवितेची ही सुरेख मैफील सजवली आणि मग अनेकांना ‘कवितेचं पान’ची गोडी लागली. अनेकांच्या मनातला कवितेचा हळवा कोपरा उजळला गेला. ज्यांचा कवितेचा हात निसटला होता, ते पुन्हा एकदा कवितेशी जोडले गेले.
देशात, परदेशात कवितांचे अनेक कार्यक्रम या निमित्ताने मधुराणीने केले. कविता चांगली वाचली गेली तर ती उत्तम रितीने ऐकली जाते, याचाही तिला प्रत्यय आला आणि त्याबरोबरच शाब्दिक, वाचिक अभिनयाचा तिचा अभ्यासही झाला. एखाद्या भूमिकेला जसे अनेक पदर असतात, तसे कवितेलाही असतात हेही जाणवलं आणि अतिशय समृद्ध अशा आपल्या साहित्याचीही तिला पुन्हा एकदा जाणीव झाली.
 
 
मधुराणी म्हणते, “हा कार्यक्रम सुरू करताना किती लोक तो बघतील किंवा यातून मला काय मिळेल, पैसा, लौकिक यापेक्षाही कवितेशी माझी असलेली बांधिलकी मला महत्त्वाची वाटली. पुढच्या पिढीसाठी ते करावं, ते चिरकाल टिकावं हाच माझा यामागचा विचार होता. स्वत:च त्याची निर्मिती करत असल्यामुळे कमीत कमी पैशात कसं करता येईल याचाही विचार होता. कवितेमुळे झालेला आमचा मित्र कॅमेरामन धनेश पोतदार याने आनंदाने याच्या ध्वनिचित्रमुद्रणाची जबाबदारी उचलली. कलाकारांनीही कवितेच्या प्रेमापोटी एकही रुपया मानधन घेतलं नाही. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने या कार्यक्रमाने अगदी भरभरून दान माझ्या पदरात पाडलं.”
 
 

 
’कवितेचं पान’प्रमाणेच ‘रंगपंढरी’ हाही तिचा डिजिटल कार्यक्रम चांगलाच गाजला. योगेश पडवळकर यांनी निर्मितीची बाजू सांभाळली. मोहन आगाशे, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, वंदना गुप्ते असे अनेक दिग्गज कलाकार याही कार्यक्रमात आनंदाने सहभागी झाले. त्यांची कारकिर्द या कार्यक्रमात उलगडली गेली आणि कायमचं एक डॉक्युमेंटेशन झालं. रंगपंढरीचे 35 भाग आणि कवितेचं पानचे 48 भाग म्हणजे रसिक अभ्यासकांच्या दृष्टीने एक पर्वणीच आहे.
 
 
या सगळ्या दर्जेदार कलाकृती मधुराणीला कराव्याशा वाटतात, कारण तिच्यावर तसे संस्कार झालेत. तसेच कलात्मक संस्कार मधुराणी तिच्या मुलीवरही करते आहे. ती आणि प्रमोद दोघांनीही त्यांची मुलगी स्वराली हिला नक्कीच अनुभवसंपन्न केलंय.
 
 
मधुराणीने जेव्हा कवितेचं पान हा कार्यक्रम केला, तेव्हा स्वराली अगदीच लहान होती. साडेतीन/चार वर्षांची. स्वरालीसाठी तिने बालकवितांचा एपिसोड केला. तिला त्यात सहभागी करून घेतलं.
 
 
 
विंदांच्या कविता तिने सादर केल्या. त्यामुळे अगदी लहान वयातच कवितेचं बीज तिच्यामध्ये रुजलं, जे मोठेपणी तिला नक्कीच जाणवेल. मधुराणीने स्वरालीसाठी पुण्यातली गोकुळ ही वेगळी शाळाही निवडली आहे. व्यक्तिगत शिकवण्यावर भर देणारी अशी ही शाळा आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून या शाळेत शिक्षण दिलं जातं. ओपन बोर्ड असल्यामुळे या शाळेला अभ्यासक्रम नाही, ठरावीक एक भाषा नाही, घरचा अभ्यास नाही. मुलांच्या क्षमतेप्रमाणे ती मुलं वेगवेगळ्या इयत्तेत असतात. एकूण 30 मुलं शाळेत आहेत आणि ती सगळी एकत्र शिकतात. व्यक्ती म्हणून त्यांना तयार केलं जातं. आयुर्वेदिक डॉक्टर ज्योत्स्ना पेठकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही शाळा डॉ. ज्योत्स्ना स्वत: चालवतात. विविध विषयांची माहितीसुद्धा मुलांना दिली जाते. भारतीय कालगणना शिकवली जाते, ऋतूनुसार आहार कसा असावा हे शिकवलं जातं किंवा काही व्यक्तींना खास निमंत्रित केलं जातं. एकदा मर्चंट नेव्हीमधला एक अधिकारी आला होता, त्यांनी बोट पाण्यावर कशी उभी राहते, वेगवेगळ्या देशातल्या बोटी कशा असतात याचीही माहिती मुलांना दिली. अशा वेगळ्या पद्धतीच्या शाळेत आपल्या मुलांना पाठवणं यासाठी पालकांमध्येही एक वेगळंच धाडस लागतं. मधुराणी आणि प्रमोद दोघांमध्ये ते आहे आणि म्हणूनच या शाळेत जायला लागल्यापासून स्वरालीच्या व्यक्तिमत्त्वात झालेला बदल एक आई म्हणून मधुराणीला महत्त्वाचा वाटतो.
 
 
 
‘आई कुठे काय करते!’ या मालिकेच्या निमित्ताने मधुराणीने आईची भूमिका उत्तम रितीने साकारली आहे आणि तिच्यासाठी तिची आई एक प्रेरणास्थान आहे. वयाच्या पासष्टाव्या वर्षी मधुराणीच्या आईने संगीतात झह.ऊ. केलंय. याविषयी अभिमानाने सांगताना मधुराणी म्हणते, ‘’आम्ही दोघी बहिणी लहान होतो, तेव्हापासून आमचं सगळं करण्यात तिचा रियाझ तसा कमीच होत असे. पण ती शिकत राहिली. संगीताचा हात तिने कधी सोडला नाही. आजही ती इतर गायकांचं गाणं ऐकते. काही वर्षांपूर्वी वडिलांना जेव्हा कॅन्सर झाला, तेव्हाही सकाळी 5 वाजता उठून तिचा रियाज, संशोधन चालूच होतं. तिचं हे डेडिकेशन मला नेहेमीच प्रेरणादायक वाटतं. त्यामुळेच मला जी कला मिळाली, ती मी जोपासली पाहिजे असं मला नेहमी वाटतं आणि तेच संस्कार आज स्वरालीमध्येही रुजावेत यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो.”
 
 
 
मधुराणी ही मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे मुळातच एक संवेदनशील मन तिच्याकडे आहे. त्यामुळेच ‘कवितेचं पान’ असो, ‘रंगपंढरी’ असो किंवा ‘आई कुठे काय करते!’सारखी मालिका असो.. तिचं व्यक्तित्व नेहमीच उठून दिसतं, एवढं नक्की.