‘ओटीटी’चा विळखा

विवेक मराठी    16-Jun-2023
Total Views |
@डॉ. स्वाती कांबळे-कामशेट्टे
लॉकडाउननंतर भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मचा सुळसुळाट प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या प्लॅटफॉर्मवर पाहिले जाणारे प्रकार हॉरर, थ्रिलर, साय फाय, ड्रामा यात प्रचंड वाढ झालीय. आजकाल समाजात वाढता हिंसाचार, तरुण पिढीच्या तोंडची विकृत भाषा, विकृत लैंगिक गुन्हे, चोर्‍या किंवा खून करण्याचे नवनवीन मार्ग यांचं प्रमाण पाहता या सगळ्यांपाठी हा अमर्यादित आणि अप्रमाणित ओटीटी कंटेंट असावा का, असा गंभीर प्रश्न पडतो.
  
ott

“अरे, काय सांगतेस तू मला पी एस 5 घ्यायला पैसे नाहीत म्हणून? काय ** समजलात का मला? दिवसभर घासून इतका पैसा कमावता, तो काय बँकेत कुजवायला?’‘
 
 
प्रमोद आईला अद्वातद्वा बोलत होता. घरात कधी उच्चारलेही न जाणारे अपशब्द त्याच्या तोंडून सहज बाहेर पडत होते. त्याने त्याची आई दिङ्मूढ होऊन गेली होती.
 
 
आपला मुलगा असा कसा बदलला? इतके वाईट शब्द आणि ही भाषा त्याच्या तोंडी कशी आली? याचा विचार करताना तिला वाटलं की कदाचित प्रमोद वाईट मित्रांच्या संगतीत आला असेल. पण शाळा, क्लासेस यानंतर सरळ घरी येऊन खोलीत घुसणारा हा मुलगा. अभ्यासातही उत्तमच. वाईट संगतीचा तर प्रश्नच नाही. होमवर्क झाल्यावर तो आणि त्याचा लॅपटॉप.
म्हणजे लॅपटॉपवर तर काही वाईटसाईट पाहत नसेल ना हा?
 

vivek 
 
अचानक तिला आठवलं. हल्ली आपण कित्येक दिवसांत प्रमोदची नेट अ‍ॅक्टिव्हिटी तपासलेली नाही. बर्‍याचदा तो वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवेनवे चित्रपट पाहत असतो. “पुस्तकं वाचावीत रे, त्याने जनरल नॉलेज वाढतं” असं सुचवल्यावर “आई, तुमच्या काळात पुस्तकं वाचत, कारण त्या वेळी नेट, मोबाइल, लॅपटॉप, यूट्यूब, ओटीटी यांचा जन्मही झाला नव्हता, म्हणून मग तुम्ही पुस्तकं वाचायचात. आता तेच नॉलेज आम्ही नेटवर मिळवतो.”
 
 
घरात इन्स्टॉल केलेलं एकुलतं एक ओटीटी तिने उघडलं. आपल्या प्रोफाइलमध्ये तर सगळे चांगले नावाजलेले, पुरस्कार मिळालेले सिनेमेच होते. मग प्रमोदची प्रोफाइल उघडली, तर त्यातही काही वाईटसाईट नव्हतं.
 
 
पटकन ती प्रमोदच्या खोलीमध्ये गेली, तर समोर एका वेगळ्याच ओटीटीवर एक वेबसिरीज चालू होती. “हा प्लॅटफॉर्म तुझ्याकडे कसा आला? याच्या सबस्क्रिप्शनची फी कशी भरलीस?” हे विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण नंतर नीट चौकशी केल्यावर कळलं की या मुलांकडे चार-पाच की जास्तच ओटीटी आहेत. पॉकेटमनीतून वर्गणी काढून हे ओटीटी सबस्क्रिप्शन घेतात आणि एकच पासवर्ड वापरून साताठ जण ते आलटून पालटून पाहतात.
 
 
ott
 
केवळ प्रमोदच नाही, तर आजकाल सगळ्याच मुलांकडे, तरुणांकडे आणि कुटुंबांकडे वेगवेगळे ओटीटी आलेले आहेत. पूर्वी जरी टीव्ही पाहिला, तरी तो सगळ्यांसमोर बसून आणि केबल किंवा सेटटॉप बॉक्सवर चॅनल्स दिसत तेच. पण ओटीटी आल्याने हवा तो कंटेंट खाजगीपणे स्वत:च्या मोबाइलवर, लॅपटॉपवर सर्च करता येतो.
 
 
भारतात पूर्वी हे ओटीटीचं वेड नव्हतं. घरातली मंडळी ठरावीक चॅनल्स बघत. रिमोटवर तर महिला मंडळाचीच मालकी असे. त्याच त्या सासूसूनांच्या, दुसर्‍या नवर्‍याच्या तिसर्‍या बायकोच्या मालिका बायका मन लावून बघतात, म्हणून तरुणाई त्यांना हसत असे. सोशल मीडियावर याविषयी कित्येक विनोद आणि पोस्ट्स येत असत.
 
 
मात्र कोरोनाचा लॉकडाउन आला आणि हे चित्रच बदललं.
 
 
पालकांचं वर्क फ्रॉम होम आणि मुलांचं स्कूल फ्रॉम होम आल्यावर प्रत्येकी एक मल्टिमीडिया डिव्हाइस असणं कनिष्ठ मध्यमवर्गापासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांसाठीे जणू अनिवार्य ठरलं.
 
 
 
मालिका पाहणार्‍या स्त्रियांना गंमतीत ‘सिरियल किलर’ म्हणून जी तरुणाई चिडवत असे, तीच आता ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप चालणार्‍या ऑनलाइन कंटेंटला चिकटून खर्‍याखुर्‍या सिरियल किलर्सवरच्या वेबसिरीज पाहू लागली होती.
 
नुसत्या लॉकडाउन नंतर एका महिन्यात ओटीटी पाहणे किती वाढले ते दाखवणारा हा आलेख...
 
 
 
 
vivek
 
केवळ लॉकडाउनमध्ये थिएटरात जाऊन सिनेमे पाहणं शक्य नाही, म्हणून घरीच सिनेमे पाहू.. यांतून सुरुवात होऊन त्या ठरावीक ओटीटीसाठी तयार होणारे सिनेमे आणि वेबसिरीज पाहू, इथपर्यंतचा प्रवास अवघ्या एका वर्षात झाला. सुरुवातीला केवळ प्राइम विडिओ, क्वचित नेटफ्लिक्स असणार्‍या भारतीय ओटीटी मार्केटमध्ये सध्या जवळपास 40 हिंदी/इंग्लिश, प्रादेशिक प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यातही नेटफ्लिक्स आणि प्राइम आघाडीवर आहेत.
 

vivek
 
 
Ornamax India या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार इंग्लिश आणि इतर परकीय भाषांतून इंग्लिशमध्ये डब झालेले व्हिडिओज (यात सिनेमे, वेबसिरीजेस, शॉर्टफिल्म्स सगळंच आलं) पाहणारे लोक 2019पूर्वी जवळपास दोन कोटी होते, तर आता ते आठ कोटीच्या वर गेलेत.
 
 
 
मागच्या चार वर्षांत कुटुंबासह एकत्र पाहता येतील असे शोज पाहण्यात केवळ 1 टक्का वाढ झालीय, तर हॉरर, थ्रिलर, साय फाय, ड्रामा पाहण्यात प्रचंड वाढ झालीय.
 
 
vivek
आजकाल समाजात वाढता हिंसाचार, तरुण पिढीच्या तोंडची विकृत भाषा, विकृत लैंगिक गुन्हे, चोर्‍या किंवा खून करण्याचे नवनवीन मार्ग यांचं प्रमाण पाहता या सगळ्यांपाठी हा अमर्यादित आणि अप्रमाणित ओटीटी कंटेंट असावा का, हा प्रश्न आजकाल समाजशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा अभ्यास करणार्‍या लोकांना पडतो.
 
  
सामान्य लोक तर पूर्वी कादंबर्‍यांना, नंतर सिनेमांना, त्यानंतर टीव्ही सिरियल्सना दोष देतच असत. मात्र हल्ली काही गुन्हे झाल्यानंतर गुन्हेगारांनी आम्हाला ही आयडिया ओटीटीवरून मिळाली, असं चक्क कबूल केलं आहे.
 
 
 
2015नंतर कमी झालेले इंटरनेटचे दर आणि वाढलेला नेटचा वेग यांमुळे भारतातल्या तरुणांवर काय परिणाम झालाय, पाहू या.
एका रिसर्च पेपरनुसार भारतातले लोक साधारण साडेआठ तास ऑनलाइन कंटेंट पाहायला वापरतात (इतर देशांत तो वेळ सरासरी साडेसहा तास आहे). फार पूर्वी भारतात 20-25 मिनिटांच्या आणि आठवड्यात केवळ एकदा येणार्‍या साप्ताहिक मालिका असत. नंतर दैनंदिन मालिकांचा रतीब सुरू झाला, तरी पुढचा भाग पाहायला किमान साडेतेवीस तास जात, जोपर्यंत आयुष्यात बाकी घडामोडी होऊन मालिकेतील विषयाची दाहकता थोडी कमी होत असे. मात्र वेबसिरीज साधारण एकेक तासाचे दहा-बारा भाग असतात. एकदा पाहायला सुरुवात केल्यानंतर शेवटची दोन मिनिटं विषयाला इतकी कलाटणी असते की पुढचा भाग बघायची प्रचंड उत्सुकता तयार होते. आणि नेटवर एका क्लिकवर पुढचा भाग लगेच उपलब्ध असल्याने तो लगेच पाहिला जातो. मालिकांचे सीझन्सच्या सीझन्स एका रात्रीत ‘बिंजवॉच’ करणारी पिढी तयार झालीय.
 
 
 
यामुळे जवळपास सात-आठ तास एखादा विषय प्रेक्षकांवर अत्यंत दाहकतेने आदळतो. बाकी सगळं विसरून तो त्या विषयात हरवून जातो. रात्री-अपरात्री जागरण करून, झोपेचा नाश करून जडावलेल्या मेंदूवर हा विषय त्यातल्या आवाज, ग्राफिक्स आणि चटकदार संवाद यांमुळे अगदी नीटच कोरला जातो. (झोपेचा नाश करून केलेला अभ्यास इतका का कोरला जात नाही, कारण मुळात तो करायचा नसतो, करायची साधनं इंटरेस्टिंग नसतात, त्यात उजळणी असेल तर तसं नवं फारसं काही नसतं.)
परदेशात झालेल्या काही सर्वेक्षणांनुसार बिंज वॉचिंगमुळे अभ्यासात मागे पडणं, नैराश्य, लो सेल्फ एस्टीम आणि सटरफटर स्नॅकिंगचं बिंज ईटिंग वाढू लागलेलं आहे. त्या अभ्यासानुसार विद्यार्थिदशेतल्या कित्येकांचा दिनक्रम एखाद्या वेबसिरीज बिंजवॉचिंग करण्यावर बेतलेला असतो - म्हणजे उठेन, झटपट नाश्ता करीन, कॉलेजला चटकन जाऊन येईन आणि मग आज अमुक एक वेबसिरीजचा फडशा पाडीन. अगदी अहमहमिकेने हे भाग पाहिले जातात आणि त्याच्या स्पर्धाही लागतात. यात मग मैदानी खेळ, पालक आणि मित्रांबरोबरचा संवाद, व्यायाम आणि अभ्यास यांकडे मुलं दुर्लक्ष करतात.
 
भारतातही आता हा प्रकार लोकप्रिय होत आहे. लहानपणी पाहिलेले सिनेमे, गाणी, डायलॉग्ज फार लवकर ग्रास्प होतात आणि बरीच वर्षं आठवणीत रहातात. आजकाल लहान मुलांना - विशेषत: कुमारवयीन मुलांना चटक लागेल असे चटपटीत आणि रावडी भाषेतील संवाद असणार्‍या वेबसिरीज फार जास्त प्रमाणात प्रदर्शित होत आहेत. इतकंच नव्हे, तर बरेच ओटीटी स्वत:च्याच इतर अनेक कार्यक्रमांपेक्षा ओटीटीवर अशा वेबसिरीजचं प्रदर्शन आणि प्रमोशन प्रामुख्याने करतात.
  
 
सुरुवातीस केवळ श्रीमंत, इंग्लिश माध्यमात शिकणारी मुलं हा टारगेट ऑडियन्स असला, तरी आजकाल भारतीय भाषांत बोलणार्‍या, शिकणार्‍या कनिष्ठ मध्यमवर्गातील कुमारांना आणि तरुणांना आवडतील आणि भुरळ पाडतील आणि पाहायला परवडतील अशा भारतीय भाषांतल्या वेबसिरीजचंही प्रमाण वाढलेलं आहे.
 
 
जरी वेबसिरीजवर सहसा कोणत्या वयोगटातल्या लोकांनी ती पाहावी हे सांगितलं असतं, तरी एकदा ओटीटी उपलब्ध झालं की त्यावर काय पाहिलं जातं यावर सरसा पालकांचा अंकुश राहत नाही. तरुणांबाबत आणि थोड्याशा प्रौढांबाबत तर अंकुश ठेवणारंही कोणी नसतं.
 
 
वेबसिरीजमधली नग्नता, अर्वाच्य भाषा, दारू, सिगरेट्स, अंमली पदार्थ यांचं उघडंवाघडं दर्शन वारंवार झाल्याने यात काही चुकीचं आहे हे वाटत नाही. मुक्त लैंगिक जीवनाचा पुरस्कार करणार्‍या कित्येक वेबसिरीजेस असल्या, तरी अशा संबंधांमुळे होणार्‍या आजारांविषयी बोलणार्‍या फार कमी सिरीज दिसतात.
 
 
 
पूर्वी अशा गोष्टी आपण किंवा आपली पालकांची पिढी पुस्तकांत /वर्तमानपत्रांत वाचत नव्हतो का? तर होतो, पण प्रमाण कमी होतं. असं वाचताना व्हिज्युअलाइज करायची जी एक प्रोसेस होती, त्याची आवश्यकताच या सिरीजेसनी नष्ट केलीय. एखादा गुन्हा करताना बारीकसारीक काळजी कशी घ्यावी - मग तो दरोडा असो की खून.. हे इतक्या तपशिलात दाखवलं जातं की सहज ती गोष्ट करून पाहयचा विचार डोक्यात येतो. आणि आजकाल दारू, सिगरेट्स, अंमली पदार्थच नव्हे, तर सेक्सही स्वस्त आणि सहज उपलब्ध झालेला आहे.
 
 
याबरोबरच धार्मिक तेढ वाढवणारे, एखाद्या विशिष्ट समाजाला लक्ष्य करणारे चित्रपट, वेबसिरीजही सातत्याने लोकांसमोर येत आहेत. इतिहासाची मोडतोड करणार्‍या, इतिहासातला नेमकाच भाग समोर आणून तोच कसा खरा आहे हे दाखवणार्‍या सिरीज आणि चित्रपटही योग्य ते निर्बंध नसल्याने लोकांसमोर सातत्याने येत आहे. यामुळे धार्मिक तेढ वाढणं, एखाद्या जातिधर्माचा तिरस्कार वाढणं, स्वत:च्या धर्माविषयी-जातीविषयी फुकाचा अभिमान वाढीस लागणं असेही प्रकार घडू लागलेत. सारासार विचार करण्याची क्षमता गमावलेल्या मेंदूला मग भडकायला आणि भडकवायला एखादा छोटासा ट्रिगरही पुरतो.
 
 सेन्सॉर बोर्डसारखी एखादी संस्था ओटीटीसाठीही असावी का, असा एक विचार सध्या चालू आहे.
यावर सेन्सॉर बोर्डसारखी एखादी संस्था ओटीटीसाठीही असावी का, असा एक विचार सध्या चालू आहे. आजकाल सगळ्याच संस्थांवर राजकारणाचा आणि राजकारण्यांचा प्रभाव पहाता अशा संस्थाही निरपेक्षपणे काम करतील असं वाटत नाही. तरीही किमान नग्नता, अर्वाच्य असभ्य भाषा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वेबसिरीजना काही प्रमाणात चाप लागेल.
 
 
मात्र लोक आजकाल प्रमाणाबाहेर नेटसाक्षर झालेत. जितके जास्त निर्बंध तितकी जास्त उत्सुकता, तितकं ते मिळवण्यासाठी जास्त धडपड.
 
 
काही वर्षांपूर्वी सरकारने पॉर्न स्ट्रीमिंगवर बंदी घालून नेटवर पॉर्न साइट्स सहज दिसणार नाहीत अशी व्यवस्था केली. त्याचं पुढे काय झालं? लोक व्हीपीएन वापरून, प्रायव्हेट नेटवर्क वापरून एकमेकांना हे पाठवतच राहिले. ती बंदी केवळ कागदावरच राहिली.
 
 
आता प्रत्येक प्रौढाने आपल्या भावविश्वात या ओटीटी किंवा ऑनलाइन कंटेंटला किती जागा द्यायची आणि आपल्या पाल्याला या सगळ्यांचं एक्स्पोजर किती द्यायचं, हे समजून उमजून स्वत:च तसा निर्णय घ्यायची वेळ आलीय. परिणामांबद्दल लहानपणापासून माहिती करून देणं, बिंज वॉचिंगचं व्यसन लागतंय का हे वेळीच ओळखणं आणि लागलं असल्यास योग्य समुपदेशन घेणं हे महत्त्वाचं आहे. मैदानी खेळ, वाचन, लोकांशी प्रत्यक्ष भेटणं आणि बोलणं, गप्पांचा खराखुरा अड्डा जमवणं महत्त्वाचं आहे.
 
 
 
दिवसेंदिवस गढूळत चाललेल्या या सामाजिक वातावरणात, आपण आणि आपल्या पाल्याने किती अडकायचं, कसं तरून जायचं याचा निर्णय आपणच जाणतेपणी घ्यायचा आहे.
 
 
लेखासाठी विविध साइट्स, नियतकालिके आणि पूर्वप्रकाशित ऑनलाइन सर्वेक्षणं यांचा संदर्भ घेतला आहे. पूर्ण संदर्भसूची विस्तारभयास्तव इथे दिलेली नाही.
 
 
OTT