@मिलिंद परांजपे। 9869631895
तात्या टोप्यांचे तिसर्या पिढीतील उच्चशिक्षित वंशज पराग टोपे यांनी Operation Red Lotus हा ग्रंथ लिहिला आहे. त्यांना मिळालेल्या दस्तऐवजाचा उपयोग करून व त्यात आणखी सखोल संशोधनाची भर घालून त्यांनी तात्या टोप्यांचं ‘अँग्लो-इंडियन’ युद्धातील कार्य आणि त्याचे परिणाम यावर नवीन, वेगळा प्रकाश टाकला आहे. यामध्ये प्रत्येक विधानाला शेवटच्या टिपांमध्ये पुरावा दिला आहे. प्रत्येक लढाईच्या वर्णनाला नकाशाची जोड असल्यामुळे वर्णनं रोचक झाली आहेत. या ग्रंथामुळे 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाचा आणि भारताचा दडपलेला मूळ इतिहास उजेडात येतो.
पराग टोपे हे तात्या टोप्यांचे तिसर्या पिढीतील उच्चशिक्षित वंशज आहेत. 1857च्या युद्धावर जास्त लेखन इंग्रजांनी केलं आहे. सावरकरांनी 1908मध्ये इंग्लंडमध्ये असताना लिहिलेल्या (पण इंग्रजांनी आधीच बंदी घातलेल्या) पुस्तकानंतर युद्धाबद्दल आणखी खूप माहिती उजेडात आली आहे. ओर्च्छाच्या दिवाणांच्या वंशजांना अलीकडेच शंभराहून अधिक उर्दू आणि बुंदेली भाषेत 1858मध्ये लिहिलेली पत्रं सापडली आहेत. नानासाहेब पेशव्यांच्या ऑफिसातून तात्या टोप्यांना किंवा सय्यद मोहमद इसाकना (तात्यांचे मीर मुन्शी अथवा सेक्रेटरी यांना) ही पत्रं लिहिलेली आहेत. इंग्रजांनी भारतीयांची बहुतेक पत्रं नष्ट केली; जी थोडी वाचली, त्यापैकी ही काही (परिशिष्टात त्यातील काही इंग्लिश भाषांतरासह छापली आहेत). त्या सर्वांचा उपयोग करून व आणखी सखोल संशोधनाची भर घालून पराग टोप्यांनी तात्या टोप्यांचं ‘अँग्लो-इंडियन’ युद्धातील कार्य आणि त्याचे परिणाम यावर नवीन, वेगळा प्रकाश टाकणारा हा ग्रंथ लिहिला आहे.
‘रूल ऑफ डार्कनेस’ प्रकरणात लेखकाने भारतीय भाषा, शिक्षणपद्धती यांना मारून भारतीयांना ख्रिस्ती करण्याचं मेकॉलेचं धोरण आणि भारतात आधीच असलेली ‘मुक्त व्यापार’ पद्धती बंद करून भारताचं कसं नुकसान केलं, हे विशद केलं आहे. भारताची आर्थिक पिळवणूक करण्याचं मेकॉले आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंकचं धोरण, त्याला अजिबात प्रसिद्धी न देण्याचा भारतातील इंग्रज सरकारचा अधिकृत खोटारडेपणा यासाठी ब्रूक्स अॅडॅम्स (अमेरिकन प्रेसिडेंट जॉन क्विन्सी अॅडॅम्सचा नातू) याने लिहिलेल्या पुस्तकाचा पुरावा दिला आहे. इंग्रजांनी जबरदस्तीने केलेली अफूची लागवड आणि व्यापार आणि त्यामुळे होत असलेली भारताची आर्थिक आणि सामाजिक दुर्दशा, भारतातील शेकडो वर्षांच्या वस्त्रोद्योगाची केलेली गळचेपी म्हणजे ‘राजा बने व्यापारी, प्रजा बने भिखारी’ उक्तीत बसणारा ईस्ट इंडिया कंपनी ह्या व्यापारी कंपनीचा कारभार नाशिक जिल्ह्यातील येवल्यात जन्मलेल्या रामचंद्र उर्फ तात्यांनी पाहिला आणि अनुभवलेला होता. राजकीय परिवर्तन होणं आवश्यक आहे, याची त्यांना बिठूरला (ब्रह्मावर्त) 1830मध्येच जाणीव झाली असावी.
ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदे (महादजींची सून) यांनी ‘सर्वतोमुखी यज्ञ’ करणार, अनेक विद्वान ब्राह्मणांना दक्षिणा, दान देणार असं जाहीर केलं होतं. त्यासाठीच अलिबागजवळील गोडसेभटजी उत्तरेत गेले. त्यांचं त्रयस्थ दृष्टीने लिहिलेलं चक्षुर्वैसत्यम ‘माझा प्रवास’ पुस्तक आज 1857च्या घटनांचा नि:पक्षपाती पुरावा समजला जातो. लेखकाच्या मते यज्ञ हा बायजाबाईंचा वरकरणी देखावा होता, युद्धाची तयारी हा अंतस्थ हेतू होता. महादजी शिंद्यांनी हातात सर्व सत्ता असूनही मोगल बादशहाला गादीवर बसू दिलं, कारण त्यामुळे मुस्लीम नबाबांचं सहकार्य मिळालं. त्याचप्रमाणे नानासाहेब पेशव्यांनी बहादुरशहा आणि लखनौचा नबाब व बेगम हजरत महल यांच्याशी मैत्री करून त्यांचं आणि सर्व मुसलमान जनतेचं सहकार्य मिळवलं. हिंदू-मुस्लीम एकी हे 1857चं एक महत्त्वाचं अंग होतं. नानासाहेबांनी लंडनला पाठवलेल्या अझिमुल्लाने बॅरिस्टर नेमला की नाही आणि नानासाहेबांच्या पेन्शनसाठी खरोखर काही प्रयत्न केले का, याबद्दल खात्रीलायक पुरावा मिळाला नाही. तिथे असताना इंग्लंड सुमारे 75000 सैन्य भारतास पाठवू शकेल असा अंदाज अझिमुल्लाने काढला होता. परत येताना इस्तंबूलमध्ये तुर्की सेनापतीशी आणि रशियन दूतांशी त्याच्या भेटी, चर्चा झाल्या. अझिमुल्ला क्रिमियातील सेवास्टोपोल बंदरालाही रसेल ह्या वार्ताहराबरोबर जाऊन आला होता. तिथल्या युद्धात रशियन तोफांचा भडिमार आणि रशियाने इंग्रजांचा केलेला पराभव त्याने प्रत्यक्ष पाहिल्याचं रसेलने लिहून ठेवलं आहे. लेखक म्हणतात, ‘रशिया आणि तुर्कस्तान यांची मदत आजमावणं हाच अझिमुल्लाचा मुख्य उद्देश असू शकेल.’
युद्धासाठी सैनिकांची सहमती आहे हे कळण्यासाठी कमळ पाठवलं जाई. सहमती असलेला प्रत्येक सैनिक एक पाकळी तोडून ते दुसर्यास पाठवी. शेवटी तात्यांकडे फक्त देठ परत येत असे. अशी अनेक कमळं पाठवून सर्व रेजिमेंट्सची सहमती कळत असे. आपल्या सैन्याला अन्नधान्याचा पुरवठा वाटेत असणार्या सामान्य जनतेकडून होईल याच्या खात्रीसाठी सैन्याच्या संभाव्य मार्गावर एका गावाकडून दुसर्या गावाकडे चपात्या पाठवल्या जात. त्यात स्त्रियाही सहभागी असत. चपात्यांच्या संख्येवरून किती सैनिकांची सोय करावी लागणार याचा गावच्या मुख्यास अंदाज येत असे. लेखी काही नसल्यामुळे इंग्रजांना या दोन्ही गोष्टींचा अर्थच कळला नाही. तात्यांनी अतिशय कल्पकतेने आणि बरेच महिने आधीपासून या माध्यमांचा उपयोग केला. म्हणून लेखक म्हणतात - ‘अनेक इतिहासकार या युद्धाला केवळ काही असंतुष्ट संस्थानिकांचं कटकारस्थान (conspiracy) आणि मूठभर सैनिकांचं बंड (mutiny) संबोधतात, तसं नसून विचारपूर्वक तयारी करून परदेशी सत्तेच्या जाचातून देशाला मुक्त करण्यासाठी केलेलं सार्वत्रिक स्वातंत्र्ययुद्ध होतं.’
गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगने सैन्यात नसलेल्या पण ‘बंडवाल्या’ना सहानुभूत असलेल्या सामान्य नागरी आबालवृद्ध स्त्रिया-पुरुष-मुलांची सरसकट कत्तल करण्यास परवानगीचा कायदा पारित केला, ही गोष्ट 1857वरील इतर पुस्तकांत कुठे वाचनात येत नाही.
गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगने सैन्यात नसलेल्या पण ‘बंडवाल्या’ना सहानुभूत असलेल्या सामान्य नागरी आबालवृद्ध स्त्रिया-पुरुष-मुलांची सरसकट कत्तल करण्यास परवानगीचा कायदा पारित केला, ही गोष्ट 1857वरील इतर पुस्तकांत कुठे वाचनात येत नाही. लेखकाने त्या नरसंहाराला मध्ययुगीन इंग्लिश ‘सभ्यता’ आणि ‘संस्कृती’ म्हटलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सने त्याला ‘डिसिप्लिन्ड टिरनी’ संबोधून 1857चं युद्ध हा एका अतिशय जुलमी राजवटीचा शेवट म्हटलं आहे. कानपूरला ब्रिटिश स्त्रियांची व मुलांची ढाल करून ब्रिटिश सैनिक सती चौरा किल्ल्यातून बाहेर पडले. त्यामुळे त्यांची नाहक हत्या झाली. त्याआधी काही दिवस हॅवलॉक आणि कर्नल नील यांनी कानपूरच्या आग्नेयेला दुआबात नुसतंच दग्दभू धोरण न करता जी हजारो भारतीय नि:शस्त्र आबालवृद्धांचीदेखील भयानक कत्तल केली, ती बाजूच्या जमावात ताजी होती. म्हणजे कानपूरला इंग्रज स्त्रियांची हत्या हे कारण नसून इंग्रजांच्या निर्दयतेचा परिणाम होता.
संबंध प्रांतच्या प्रांत निर्वंश करण्याइतक्या नीच धोरणापर्यंत आणि कृत्यापर्यंत सुसंस्कृत समजले जाणारे इंग्रज जाऊ शकतील, असं तात्यांना किंवा इतर नेत्यांना कधी वाटलं नाही. त्यामुळे तशी तयारीही त्यांनी केली नव्हती. हेच त्यांच्या पराभवाला एक मुख्य कारण झालं, असा निष्कर्ष लेखक काढतात.
हॅवलॉक आणि ह्यू रोझ ह्या दोन अनुभवी इंग्रज सेनापतींनी झांशी किल्ल्याला घातलेल्या आणि दिवसेंदिवस अधिक कडक होणार्या वेढ्यावर तात्यांनी हल्ले करून दोघांचंही सैन्य आणि लक्ष दुसरीकडे वेधलं. त्याची संधी साधून राणी लक्ष्मीबाई मोठ्या धीराने रात्रीच्या अंधारात आपल्या बारा वर्षाच्या मुलाला पाठीला बांधून, पुरुष वेशात चिलखत घालून, हातात तलवार उगारून पांढर्यासफेद घोड्यावर आपल्या सैनिकांसह किल्ल्यातून बाहेर पडल्या. राणीच्या डोक्यावर इंग्रजांनी मोठं बक्षीस लावलं होतं. म्हणून सावज सुटल्याचं समजल्याबरोबर ह्यू रोझने जोमाने पाठलाग केला, धुमश्चक्रीत दोन्ही बाजूचे अनेक सैनिक मेले, पण राणीसाहेब जास्त शूर आणि चपळ ठरल्या. जिवंत सोडाच, राणीसाहेबांचा मृतदेहदेखील त्यांची विटंबना करण्यास टपलेल्या इंग्रजांच्या हाती पडला नाही. राणीची इच्छा पूर्ण होऊ शकली, हीच एक तात्यांची मोठी कामगिरी झाल्याचं लेखक म्हणतात. गोडसेभटजींचा दाखला देऊन, बक्षिसासाठी हपापलेल्या दोघाही सेनापतींचे अहवाल किती खोटे आहेत, हे लेखकाने दाखवलं आहे. नंतर इंग्रजांनी झाशी शहरातील मुद्दाम केलेल्या स्त्रीपुरूष नागरिकांच्या सरसकट नरसंहाराबद्दल व्हिक्टोरिया क्रॉसने सात इंग्रज सैनिकांचा ‘सन्मान’ करण्यात आला. ह्यू रोझला ‘सर’की मिळाली, तरी बक्षिसासाठी त्याने कोर्ट केस केलीच.
ग्वाल्हेरमध्ये तात्या, लक्ष्मीबाई आणि रावसाहेब जियाजीरावांना भेटले, त्यांना 19 लाखांची तिजोरी मिळाली, जिचा उपयोग सैनिकांचा पगार आणि इतर खर्चासाठी झाला. ग्वाल्हेरचे शिंदे इंग्रजांच्या बाजूस गेले असा समज जरी मॅकफर्सन ह्या पोलिटिकल एजंटच्या रिपोर्टवरून इतिहासकारांनी काढला असला, तरी जियाजीरावांनी गुपचुप ग्वाल्हेरचा खजिना आणि सर्व सैन्य आपणहोऊन तात्यांना दिला, असं पराग टोपे साधार दाखवून देतात. बायजाबाई शिंदे आतून तात्यांना सामील होत्याच.
ग्वाल्हेरनंतर तात्या बेटवा नदीच्या पश्चिमेस राजस्थानात आणि पूर्वेस माळव्यात स्वैर संचार करू लागले. त्यांना लहानमोठे राजे आणि सामान्य प्रजा उघड किंवा गुपचुप साहाय्य्य देत होते. विझू लागला असं वाटणार्या अग्नीला पुन्हा नवीन चैतन्य प्राप्त झालं. ह्या सर्व काळात तात्यांना आज पकडतो की उद्या असे रिपोर्ट पाठवणारे इंग्रज सैन्याधिकार्यांचे अहवाल केवळ आत्मश्लाघेचे होते, हे लेखक अनेक हवाल्यांनीशी सिद्ध करतात.
व्हिक्टोरिया राणीच्या 1858च्या जाहीरनाम्यात ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा कारभार सरकारने काढून घेतलाच, पण महत्त्वाचं म्हणजे भारतीयांच्या धार्मिक बाबतीत कुठलाही हस्तक्षेप न करण्याची (धर्मांतरं न करण्याची) ग्वाही इंग्रज सरकारने दिली. पराग टोपे म्हणतात, ‘तात्या, नानासाहेब आणि भारतीय ज्यासाठी लढत होते, त्यातील एक अतिमहत्त्वाचा उद्देश सफल झाला होता. त्यामुळे अनेक राजे आणि सामान्य प्रजा यांचा इंग्रजी राज्यावरील एक मुख्य आक्षेप नाहीसा झाला. पण त्यामुळे तात्यांना मिळणारे त्यांचे साहाय्य्य डळमळीत झाले.’ राजकीय पारतंत्र्य, आर्थिक पिळवणूक वगैरे तसंच चालू राहणार असलं, तरी भारत एक स्वत:चं तत्त्वज्ञान असलेली प्राचीन संस्कृती म्हणून अबाधित राहणार होता. तात्यांचा पराभव करणं किंवा त्यांना पकडणं कठीण आहे हे इंग्रजांनी ताडलं, म्हणून नेमका त्याच वेळेस व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला, असाही लेखकाने काढलेला अर्थ बरोबरच वाटतो. तात्या नागपूरच्या दिशेने दौडत आहेत असं समजल्याबरोबर इंग्रजांनी नागपूरकर भोसल्यांच्या घरातील सर्वांना अटक करून आपल्या ताब्यात घेतलं. आता तात्या नागपूरजवळ आलेच तर ओलीस धरलेल्या भोसल्यांचे प्राण ते वाटाघाटीत लावू शकत होते. पण तात्या नागपूरकडे अजिबात न जाता गुजरात-राजस्थानच्या दिशेने गेले.
तात्यांची इंग्रजांशी शेवटची लढाई राजस्थानातील छिपा बारोड गावी 1 जानेवारी 1859 रोजी सकाळी झाली. ते पांढर्या वेशात पांढर्या अरबी घोड्यावरून त्यांच्या सैनिकांना आपल्या तलवारीने तोफा आणि बंदुका चार्ज करण्यास सांकेतिक चेतावणी देत होते. त्याच वेळेस एक गोळा लागून ते आणि त्यांचा घोडा खाली कोसळले. त्यांच्या साथीदारांनी त्यांना तत्क्षणी उचलून नेले असं तिथे असलेल्या मेजर पॅजेट ह्या इंग्रजाने लिहिलेल्या पुस्तकाचा दाखला देऊन लेखक लिहितात. तिथेच तात्यांचा अंत झाला. तात्यांना एप्रिल 1859मध्ये पकडून फाशी दिलं हा मेजर मीडने तात्यांवर लावलेलं बक्षीस मिळवण्यासाठी पाठवलेला रिपोर्ट कसा अविश्वसनीय आहे, हे लेखक सप्रमाण दाखवतात.
स्वातंत्र्यानंतर 1957मध्ये सुरेंद्रनाथ सेन आणि रमेशचंद्र मजुमदार ह्या दोघांनी 1857च्या युद्धाचा वेगवेगळा ‘अधिकृत इतिहास’ लिहिला. सेन ह्यांचं पुस्तक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध केलं. मजुमदार युनेस्कोच्या ‘इंटरनॅशनल कमिशन फॉर हिस्टरी ऑफ सायंटिफिक अँड कल्चरल डेव्हलपमेन्ट ऑफ मॅनकाइंड’चे उपाध्यक्ष होते. दोघांनी 1857च्या नेत्यांना ‘वर्थलेस’, ‘विकेड’, ‘रिफरॅफ’, ‘डोटर्ड’ असली शेलकी, इतिहासकारांत अशोभनीय विशेषणं वापरून जो चुकीचा इतिहास सादर केला इंग्रज इतिहासकारांनी 1857चे इतिहास त्यांच्या दृष्टीकोनातून लिहिलेले आहेत. मेकॉलेने इंग्रजाळलेल्या भारतीय इतिहासकारांनी त्यांचीच री ओढली आहे, त्यामुळे त्यांना इंग्लंडमध्ये शिष्यवृत्त्या, ‘फेलोशिप्स’ मिळून आंतरराष्ट्रीय ख्यातीही मिळाली. स्वातंत्र्यानंतर 1957मध्ये सुरेंद्रनाथ सेन आणि रमेशचंद्र मजुमदार ह्या दोघांनी 1857च्या युद्धाचा वेगवेगळा ‘अधिकृत इतिहास’ लिहिला. सेन ह्यांचं पुस्तक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध केलं. मजुमदार युनेस्कोच्या ‘इंटरनॅशनल कमिशन फॉर हिस्टरी ऑफ सायंटिफिक अँड कल्चरल डेव्हलपमेन्ट ऑफ मॅनकाइंड’चे उपाध्यक्ष होते. दोघांनी 1857च्या नेत्यांना ‘वर्थलेस’, ‘विकेड’, ‘रिफरॅफ’, ‘डोटर्ड’ असली शेलकी, इतिहासकारांत अशोभनीय विशेषणं वापरून जो चुकीचा इतिहास सादर केला आणि त्याचा चुकीचा अर्थ काढला आहे, त्याचा पराग टोप्यांनी मुद्देसूदपणे प्रतिवाद केला आहे. पुस्तकाचा तो मुख्य उद्देश सफल झाला आहे. सामान्य वाचक, बुद्धिवादीही तसल्या चुकीच्या इतिहासावरूनच आपले निष्कर्ष काढतात, ही लेखकाला खंत आहे. एवढ्यावरच न थांबता पराग टोप्यांनी 1946 सालच्या आरमारातल्या हिंदू आणि मुसलमान नाविकांनी एकत्रित होऊन केलेल्या ‘बंडा’वर सबंध उपसंहार लिहिला आहे. ‘बंडा’च्या बातमीमुळे लंडनमध्ये दुसर्याच दिवशी मंत्रीमंडळाची तातडीची बैठक होऊन भारताचं स्वातंत्र्य नक्की झालं, एवढं त्याचं महत्त्व होतं. महात्मा गांधी, पटेल आणि जीना यांनी नाविकांच्या क्षोभाला पाठिंबा वा सहानुभूती राहूच द्या, उलट कडक शब्दात त्याचा निषेध केला. ज्या राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता, त्यांची नावं अज्ञातच राहिली.
1857मध्ये इंग्रजांनी भारतीयांचं इंग्रजीकरण करावं (म्हणजे त्यांच्या रक्तात इंग्रज अंश आणावा) असा मतप्रवाह सुरू झाला होता. परंतु कानपूर आणि लखनौ इथे झालेल्या अत्याचाराची खरीखोटी वर्णनं वाचून सामान्य इंग्रज भारतात येऊन तसे संबंध प्रस्थापित करण्यास अजिबात उत्सुक नव्हता. त्यामुळे भारतातील इंग्रजांची किंवा संकरितांची संख्या कमीच राहिली आणि 88 वर्षांनंतर हस्तांतर सुलभ झालं. स्वातंत्र्यानंतरदेखील शिक्षण आणि प्रशासन यावरील इंग्लिश भाषेचा मक्ता, जातीनिहाय कायदे, व्यापार आणि उद्योगधंदे यावरील सरकारी वर्चस्व आणि हस्तक्षेप इत्यादी तसेच चालू राहिले. त्यामुळे नानासाहेब पेशवे आणि इतर भारतीय नेत्यांनी 25 ऑगस्ट 1857मध्ये केलेल्या जाहीरनाम्यातील आणि भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून असलेली अनेक वचनं पूर्णत्वास जाऊ शकलेली नाहीत, अशी व्यथा लेखक शेवटी व्यक्त करतात.
सावरकरांनी ‘1857चे स्वातंत्र्ययुद्ध’ लिहून इंग्रजांनी आधी लिहिलेल्या ‘इतिहासलेखन’ पद्धतीवरच घाला घातला. 1857चं सत्य बाहेर येऊ नये, यासाठी इंग्रजांकडूनच त्याला कडाडून विरोध झाला. आज स्वातंत्र्यानंतरही तसाच विरोध चालूच आहे. ज्या वेळेस सावरकरांनी ‘इतिहासलेखना’वर चालू केलेली लढाई जिंकली जाईल, त्याच वेळेस भारताचा इतिहास खर्या अर्थाने मुक्त होईल, असं लेखक परिशिष्टात म्हणतात.
लेखकाने प्रत्येक विधानाला शेवटच्या टिपांमध्ये पुरावा दिला आहे. प्रत्येक लढाईच्या वर्णनाला नकाशाची जोड असल्यामुळे वर्णनं रोचक झाली आहेत. फक्त पुस्तकात तात्यांचं एखादं तरी चित्र हवं होतं, असं वाटतं. हे वाचनीय पुस्तक सर्व भारतीय भाषांमध्ये लवकर अनुवाद व्हावं या योग्यतेचं आहे.
पुस्तकाचे नाव - Tatya Tope's Operation Red Lotus
लेखक - पराग टोपे
प्रकाशक - रूपा पब्लिशिंग
पृष्ठसंख्या - 431 किंमत - 399 रु.