भारतीय संविधान आणि संतवाङ्मय अंतरंग नाते

विवेक मराठी    24-Jun-2023
Total Views |
@डॉ. श्यामा घोणसे । 9890615861
 
samvidhan wari
काळ-भाषा-प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन भारतीय संतवाङ्मयाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची एकत्रित वाटचाल अधोरेखित केलेली दिसते. संतांनी भारतीय मनाची केलेली मशागत ही भारतीय संविधानाच्या रूपाने फलद्रूप झालेली दिसते, असे निश्चितच म्हणता येते. संतप्रणीत समता भावाचे झालेले बीजारोपण भारतीय भूमीत राज्यघटनेच्या रूपाने अक्षय वटवृक्षासारखे दृश्य झालेले आहे. म्हणूनच भारतीय राज्यघटना म्हणजे नव्या युगाचा धर्मग्रंथ ठरतो.
 
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित भारतीय संविधान आणि अध्यात्माच्या आधारे याच त्रिसूत्रीचा जागर करणारे संतवाङ्मय यांच्यामध्ये काही अंतरंग नाते असल्याचे दिसते. वस्तुत: भारतीय संविधान या आधुनिक संकल्पनेत आणि मध्ययुगाशी निगडित असलेल्या संतवाङ्मयामध्ये काळाचे भलेमोठे अंतर आहे. साहजिकच संतवाङ्मयाकडे केवळ अध्यात्माच्या नजरेतून बघणार्‍या लोकांच्या दृष्टीने, तसेच पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीच्या चश्म्यातून या वाङ्मयाकडे बघणार्‍या विद्वानांच्या लेखी हे आंतरिक नाते ओढूनताणून आणले आहे की काय, असे वाटण्याची शक्यता आहे.
 
 
इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकापासून प्रवाहित झालेल्या संतवाङ्मयाला प्रदीर्घ परंपरा असली, तरी एकतर ते भजन-पूजनाच्या कक्षेत मर्यादित केले जाते किंवा ते कालबाह्य समजून त्याच्याबद्दल अनेक गैरसमज मनात बाळगले जातात. भक्ती चळवळीच्या माध्यमातून, म्हणजेच प्रबोधनाच्या अंगाने संतवाङ्मयाचा विचार केल्यास मात्र भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन तत्त्वे संतवाङ्मयातही अनुस्यूत असलेली दिसतात. किंबहुना काळ-भाषा-प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन भारतीय संतवाङ्मयाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची एकत्रित वाटचाल अधोरेखित केलेली दिसते. विशेषत: तत्कालीन काळाच्या मर्यादेत वावरत असतानादेखील संतवाङ्मयाने जनमानसात समतेचा प्रचार-प्रसार करण्याचा अखंड प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर कुळ, जाती, वर्ण, लिंग, भाषा यापलीकडे जाऊन ’माणूस’ म्हणून समानतेचे एक सूत्र त्यांनी आपल्या काव्य-कार्याद्वारे अधोरेखित केलेले दिसते. त्यामुळेच संतांनी भारतीय मनाची केलेली मशागत ही भारतीय संविधानाच्या रूपाने फलद्रूप झालेली दिसते, असे निश्चितच म्हणता येते. समानतेचा सारा भाव संतांनी आध्यात्मिक क्षेत्रापुरता किंवा भक्ती चळवळीच्या माध्यमातून मर्यादित केला, असे मानले जाते. परंतु संतप्रणीत समता भावाचे झालेले बीजारोपण भारतीय भूमीत राज्यघटनेच्या रूपाने अक्षय वटवृक्षासारखे दृश्य झालेले आहे. म्हणूनच भारतीय राज्यघटना म्हणजे नव्या युगाचा धर्मग्रंथ ठरतो. कारण माणसाने माणसाला ‘माणूस’ म्हणून बंधुतेने, समानतेने वागवावे, माणूस म्हणून सारेच एका पातळीवर आहेत व तेथे उच्चनीच काही नाही, असा मानवतावादी विचार भारतीय संविधान सांगते आणि संतवाङ्मयामध्ये हा विचार मध्ययुगापासूनच आलेला दिसतो. म्हणूनच बंगालचे बाऊल संत लालन साई सांगतात,
 
 
एक बार जगन्नाथे देख रे थेये, जात केन राख बाचिये।
चांडाल आनिले अन्न ब्राह्मणे ताइ लये खेये॥
जोला छिलो खिलो कबीरदास। धर्म प्रभू जगन्नाथ॥
चारो नारे से जात-अजात, भक्त अधीन से॥
 
 
- बाबांनो, धर्मप्रभू जगन्नाथजी जातीपातींचा विचार न करता केवळ प्रेम-भक्तीद्वारा माणसाच्या अधीन होतात, म्हणूनच त्यांचा निवास असलेल्या या क्षेत्रात त्यांना तळागाळातील एखाद्या माणसाने अर्पण केलेला प्रसाद ब्राह्मणदेखील श्रद्धेने ग्रहण करतो. मग त्याचे जगन्नाथाचे भक्त म्हणवणारे आपण माणसामाणसांमध्ये भेद का करायचा? - याचाच अर्थ समतेचा संतांनी रुजवलेला भाव मर्यादित क्षेत्रांमध्ये का असेना, परंतु आचरणात येत होता.
 
 
संतांनी केलेल्या समतेच्या जागरामुळे आंतरिक सद्भाव आणि माणुसकीवरचा विश्वास यामुळे सामाजिक व्यवहारात असलेली विषमता आणि उच्चनीचतेची भावना काही प्रमाणात कमी झाली. संतांच्या सांगण्याला हिंदुत्वाची जोड मिळाली आणि भारतीय संस्कृती या परिप्रेक्ष्यात समता सामावली गेली. परंतु मुस्लीम आक्रमण आणि गोडबोली इंग्रजी सत्ता, तसेच फोडा आणि झोडा या इंग्रजी प्रशासकांच्या नीतीला पाश्चात्त्य शिक्षणाची जोड मिळाली आणि त्यातून परकीय अभ्यासकांच्या जोडीलाच स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्‍या तथाकथित समाजवादी, साम्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृतीत संतांनी रुजवलेली समता, स्वीकार आणि समन्वय ही तत्त्वे शबलित केली, याचेही विस्मरण प्रस्तुत विषयाचा वेध घेताना होऊ देता कामा नये. असो.
 
 
 
अर्थात भारतीय संविधान आणि संतकार्य व त्यांचे वाङ्मय या दोन्हींमध्ये फरक आहे तो समतेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात. संत प्रेमाने, तर कधी अनुनयाने, तर कधी कठोर शब्दात समता तत्त्वाचा जागर करावा असे आवाहन करीत असले, तरी समता न पाळणार्‍यांना कोणतेही कायदेशीर शासन करण्याचा अधिकार संतांजवळ नव्हता. उलट समतेचा व्यवहार न करणार्‍यांविरुद्ध भारतीय संविधानाने कायद्याचा धाक निर्माण केलेला आहे. संविधान प्रेमाची नव्हे, तर कायद्याची भाषा वापरते आणि संत प्रेमाची भाषा वापरतात, मन:परिवर्तनावर भर देतात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील कायद्याच्या धाकापेक्षा मन:परिवर्तनाचा भाग महत्त्वाचा मानला होता, हे या संदर्भात ध्यानात घेणे आवश्यक आहे.
 
 
आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा संत आणि संविधान दोन्हीही देते. कारण अंतिमत: मानवी कल्याण हा दोघांचाही उद्देश आहे. माणूस म्हणून माणसाचा सन्मानाने विचार करणे, त्याला समाजामध्ये समान स्थान देणे आणि त्यासाठी सामाजिक समरसतेचा पुरस्कार करणे हे दोघांनाही अत्यावश्यक वाटते. मागे राहिलेल्यांसाठी आपली गती थोडी कमी करून त्याला आपल्या समवेत घेणे या उद्दिष्टावर दोघांनीही भर दिलेला दिसतो. ‘धर्मोधारयिती प्रजा’ याचा अर्थ विसरलेल्या मध्ययुगीन काळात समाजातील दीनदुबळ्या, पतित मानल्या गेलेल्या बांधवांना बंधुत्वाच्या भावाने वागवावे, हे सामाजिक समतेचे सार सगळ्याच भारतीय संतांनी सोप्या पद्धतीने सांगितले आहे.
 
 
संतांनी केलेला समतेचा पुरस्कार भारतातील आद्य समाजसुधारक म्हणावेत असे महात्मा बसवेश्वर समतेचा पुरस्कार करताना म्हणतात,
 
 
ल दोंदे होलेगरी शिवालयक्के। जलवोंदे शौचाचमनक्के॥
 
कुलदोंदे तन्ना तानरिदवंगे। फलवोदे षडदर्शन मुक्तीगे॥
 
निलऊ ओंदे ककुडलसंगदेव, निम्मनरिवंगे॥
 
 
अर्थात गावाबाहेरील वस्तीची जमीन आणि शिवालयाची जमीन शेवटी एकच भूमी असते, शरीर स्वच्छ करण्यासाठी लागणारे पाणी आणि पूजेसाठी लागणारे पाणी शेवटी एकच असते हे जर तारतम्याने जाणून घेतले, तर माणसाचे कुल आणि जात एकच असते, त्या जातीचे नाव म्हणजे ‘माणूस जात’ होय. त्यामुळे सारी माणसे समान पातळीवर असतात, म्हणूनच त्यांच्याशी केवळ जन्मावर आधारित जातीचे निकष घेऊन कोणताही भेदाभेद करू नये, सार्‍यांशी समतेनेच वागावे, हे बसवेश्वर कुडलसंगमदेवाची साक्ष घेऊन सांगतात.
 

samvidhan wari 
 
 
शिवभक्तीसमावेशे क्व जातिपरिकल्पना।
 
इंधनेशष्वग्निदग्धेषु को वा भेद: प्रकीर्त्यते॥
 
 
असा आदेश वीरशैव परंपरेतील श्रीसिद्धांतशिखामणी हा ग्रंथ देतो.
 
 
एका ताटी वाढा त्यांना एका ताटी जेऊ द्या।
 
या दुनियेतील सर्व जणांना, सर्व भेदही विसरू द्या।
 
एकरूप होऊन सर्वही। जगावेत एकत्रच ते
 
 
दोन्ही बाहू उभारून द्यावे। त्यांना आशीर्वाद असे॥
 
 
म्हणजेच सहभोजन, सहसंवेदना आणि संवाद यातून निर्माण होणार्‍या सर्वसमावेशक समतेची कल्पना आंध्रातील संत वेमन्ना व्यक्त करतात.
 
 
संत कबीरदासांच्या मते,
 
उच्च नीच है मध्य की बानी
 
एक पवन एक है पानी।
 
एक मटिया एक कुंभारा। एक सबन का सिरजनहरा।
 
एक चाक सब चित्र बनाई। नाद बिंद की मध्य समाई।
 

samvidhan wari 
 
- माणसामाणसामध्ये विषमता निर्माण करणे, उच्चकनिष्ठतेचा भाव निर्माण करणे हीच नीच मनोवृत्ती आहे. पंचमहाभूतांमध्ये फरक असला तरी त्यांच्या एकत्र येण्यातूनच ब्रह्मस्वरूपाची निर्मिती होते. माणूसही रजवीर्यापासूनच निर्माण होतो. निसर्गात जर ही समता असेल, तर माणसाला परस्परांशी समतेने न वागण्याचा अधिकारच नाही. संत तुकोबाराय सर्व माणसे एका देहाचे अवयव आहेत असे समजून
 
 
अवघे समभ्रम पाहे। सर्वांभूती विठ्ठल आहे।
 
 
तुका म्हणे वर्ण धर्म। अवघे आहे सम ब्रह्म।
 
 
म्हणत समतेच्या तत्त्वाचा जागर करतात. तर समर्थ रामदासांच्या मते,
 
 
पृथ्वीवरील जितकी शरीरे। तितुकी भगवंताची घरे।
 
जितुकी शरीरे तितुकी मंदिरे। कळली पाहिजे।
 
 
- शरीररूपी मंदिरात परमेश्वराचे वास्तव्य असते, हे मान्य केले तर जन्मजात जातिभेद, श्रेष्ठ-कनिष्ठता नाहीशी होईल आणि म्हणूनच ‘देव नाना शरीरे धरितो’ असा विश्वास त्यांनी प्रकट केला.
 
 
जगामध्ये जगदात्मा विश्वामध्ये विश्वात्मा। सर्व चालवी सर्वात्मा। नाना रूपे॥
 
असे आवर्जून सांगत ते समतेच्या तत्त्वाचे अधोरेखन करतात.
 
थोडक्यात मध्ययुगीन भारतातील प्रत्येक प्रांतातील संतांनी आपापल्या प्रादेशिक भाषेमध्ये समता तत्त्वाची जागृती केली.
समता आणि समरसता
 
 
samvidhan wari
 
समता या तत्त्वाचा विचार करीत असताना आपल्याला समता आणि समरसता यांच्यातील सूक्ष्म अंतरदेखील ध्यानात घेणे आवश्यक आहे. समता ही आर्थिक अंगाशी, बाह्य परिवर्तनाशी निगडित असते. हे बाह्य परिवर्तन अत्यावश्यक असले, तरी आलेली समता टिकवण्यासाठी समरसता आवश्यकता असते. समरसता या संज्ञेमध्ये असलेला ’रस’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. हा शब्द मानवी अंत:करणातील भावनेचा ओलावा आणि अंत:करणाची असणारी ओढ स्पष्ट करतो. या समरसतेलाच संतांनी ’आत्मौपम्य वृत्ती’ असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे अंगठ्याला ठेच लागल्यानंतर डोळ्यात पाणी येते, त्याचप्रमाणे इतरांच्या सुखदु:खाशी आत्मीय भावनेने निगडित होणे, दुसर्‍याचे दु:ख ते आपले दु:ख मानणे म्हणजे ’आत्मौपम्य भाव’ होय. सहसंवेदनेचा हा भाव कायद्याची निर्मिती करून निर्माण होत नाही, याची सार्थ जाणीव असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “कायदे करून समता येईल. परंतु कायद्याने सगळे प्रश्न सुटत नाहीत. म्हणूनच माझ्या तत्त्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे. तरीसुद्धा त्यात संपूर्ण समतेला मुळीच थारा नाही. कारण अमर्याद समता हे स्वातंत्र्याच्या अस्तित्वाच्या आड येते आणि स्वातंत्र्याला भाव असणे तर आवश्यक आहे.” ते पुढे असेही म्हणाले होते, “स्वातंत्र्य आणि समतेचे रक्षण करण्यासाठी कायदेकानूनचे स्थान गृहीत धरलेले आहे. पण मी कायद्याचे स्थान फारच गौण मानतो, कारण स्वातंत्र्य आणि समतेच्या भंगाबाबतीत कायदा खात्रीने समर्थ ठरेल असा मला विश्वास वाटत नाही. त्यामुळेच मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो. बंधुभाव हाच खरा रक्षक आहे. त्याचेच दुसरे नाव सहभाव आहे. बंधुभाव अथवा मानवता हे धर्माचे दुसरे नाव आहे. कायदा हा धर्मातीत असल्यामुळे कोणीही मोडू शकतो. याउलट सहभाव अथवा धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य गणले जाते.” वेगळ्या शब्दात सांगायचे तर सामाजिक समरसतेशिवाय समता उभी राहू शकत नाही आणि खरा मानवतावाद आणायचा असेल तर माणसाच्या जगण्याला धर्माचे अधिष्ठान असणे गरजेचे आहे, ही संततत्त्वज्ञानातील जाणीवच पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1945ला व्यक्त केली होती. त्यांच्या मते, आपण भारतीय परस्परांचे सख्खे भाऊ आहोत. परंतु बंधुतेचे हे तत्त्व आपण पाळत नाही. या बंधुतेचे विस्मरण झाल्यावर काय घडते, याचे वस्तुनिष्ठ विश्लेषणही डॉ. बाबासाहेबांनी त्या वेळी केले होते.
समतेतून येणार्‍या आर्थिक आणि भौतिक विकासाचे महत्त्व जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेबांना माहीत होते. परंतु या आर्थिकतेला, समानतेला धर्माचे अधिष्ठान नसेल तर मिळणारी समृद्धी अनर्थाला कारण होईल, अशी भीतीदेखील बाबासाहेबांनी व्यक्त केलेली होती. त्या भीतीमागील बाबासाहेबांच्या विचारांचा वेध घेता, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील कायद्याच्या धाकापेक्षा मन:परिवर्तनाचा भाग महत्त्वाचा मानला होता, हे या संदर्भात ध्यानात घेणे आवश्यक आहे. संविधान कितीही श्रेष्ठ असले, तरी त्याच्या प्रामाणिक अंमलबजावणीवर आणि जनतेने त्याचे आत्मीयतेने, निष्ठेने पालन करण्यावरच त्याची उपयुक्तता अवलंबून असते, याचे भान डॉ. बाबासाहेबांनी भारतीय जनतेला देण्याचा प्रयत्न केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संतवाङ्मय आणि संविधान यांना जोडणारा सर्वात मोठा दुवा आहेत, हे ध्यानात घेतले तर आपल्याला भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचे नेमके आकलन होईल.
 
 
 
संतांनी भारतीय तत्त्वदर्शनाच्या आधारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचा जागर केला आणि योगायोग म्हणजे याच विषयावर 3 ऑक्टोबर 1954 रोजी दिल्ली नभोवाणीवर भाषण करताना डॉ. बाबासाहेब म्हणाले होते, “माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन शब्दातच साकारलेले आहे. अर्थात ही तिन्ही तत्त्वे मी फ्रेंच राज्यक्रांतीतून उसनी घेतली आहेत असे मात्र कोणीही समजू नये. तसे मी केलेले नाही, असे मी निक्षून सांगतो. माझ्या तत्त्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात आहे. माझे गुरू भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतूनच हे तत्त्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे.”
 
 
 
साररूपाने सांगायचे, तर भारतीय लोकमानस हे कायदाकेंद्री नाही. आपण धर्मकेंद्री आहोत. चिरंतन धर्ममूल्यांचा प्रभाव आपल्यावर आहे. त्यामुळेच “धम्मा इज सोशल अँड रिलिजन इज पर्सनल” असे बाबासाहेब सातत्याने सांगायचे. साहजिकच संत कबीर यांना आपल्या ’तीन फक्कड गुरूं’मध्ये स्थान देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि संतवाङ्मयाचा एक हृदय अनुबंध आहे. या अनुबंधाकडे लक्ष वेधण्याचे काम संतसाहित्याचे अखिल भारतीय पातळीवरील साक्षेपी अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी अलीकडेच केले आहे. त्यांच्या लेखनाचा सारांश असा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञानेश्वरीबद्दल प्रेम होते. ज्ञानेश्वरीवर बोलताना डॉक्टर तन्मयतेने रंगून जात. संतसाहित्याची मूळ बैठक आत्मज्ञानावर अभिष्टचित असून त्यामुळे आत्मभानही येते याची जाणीव असलेल्या डॉ. बाबासाहेबांना महात्मा कबीरदासांबरोबरच संत तुकारामही विशेष प्रिय होते. म्हणूनच 1951 साली एकनाथ संशोधन मंदिर, खडकेश्वर संभाजीनगर या संस्थेच्या उभारणीप्रसंगी बाबासाहेब म्हणाले होते, “माझ्या तरुणपणी मला महाराष्ट्र संतांच्या वाङ्मयाची आवड होती.” 1941 साली मराठी वाङ्मयांबद्दल ज.रा. जोशी यांच्याशी चर्चा करताना बाबासाहेब म्हणाले होते, “तुकारामांची अभंग गाथा आणि ज्ञानेश्वरी या दोन ग्रंथांच्या आधारे माझी मराठी यावच्चंद्रदिवाकरौ अभिमानाने व डौलाने जिवंत राहील.” (डॉ. अशोक कामत, संतसाहित्य : काही अनुबंध, पृ. 176 ते 202.) हिंदुत्वाचे परिप्रेक्ष्य व्यापक करणारे संत आणि हिंदू कोड बिलाच्या रूपाने विखुरलेल्या हिंदूंना एकत्र करून राष्ट्रीय एकात्मतेचे अधोरेखन करणारे डॉ. बाबासाहेब यांच्यातील आंतरिक नात्यामुळे आणि मूळच्या राष्ट्रीय ऐक्यात्मक वृत्तीमुळे हिंदू संघटन हे राष्ट्रीय कार्य आहे. हिंदूंना अंतर्गत सामर्थ्य नसेल, तर स्वराज्याचे गुलामगिरीत रूपांतर होईल असे डॉ. बाबासाहेब धर्मांतराच्या घोषणेनंतर म्हणतात, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. (शेषराव मोरे, डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास, राजहंस प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, 1998, पृष्ठ 187.) हे लक्षात घेतले, तर समता हे सूत्र संत आणि संविधान यांना जोडणारे असून त्यातूनच भारतीय एकात्मतेचा रेशमी गोफ विणला जाणार आहे, जो अत्यंत बळकट आणि तरीही मुलायम असेल.